सोमवार, १३ ऑगस्ट, २०१२

मुली आणि आम्ही


परवा आमच्या कॉलनीमागल्या मोठ्या रस्त्यावरच्या बसस्टॉपवर मी वाट बघत बसलो होतो. आता, बस स्टॉपवर बसचीच वाट बघता येते, असं नाही. मी कॉलेजवरून लवकर परतलो असल्याने तिथे येऊन बसलो होतो. ज्या मुलीची वाट बघत होतो, ती माझी मैत्रीण तयार व्हायला इतका काही वेळ लावते, की काही विचारू नका. वास्तवीक सकाळी अकराच्या सुमारास मोकळ्या रस्त्यावरून फेरफटका मारायला काय मोठी एवढी तयारी करावी लागते ते तिचे तिला ठाऊक. या मुली नेहमीच एवढा वेळ लावतात. मग त्यांना अगदी शिकवणीला जायचं असलं, तरी त्यांना निदान पाऊण तास आधीपासून तरी तयारी करावी लागते म्हणे. बरं, एवढं करून 'आमच्या क्लासमध्ये चांगला दिसणारा एकही मुलगा नाही', 'आमचे सर सुंदर मुलींच्या बाबतीत जरास्से हेच आहेत, पण काय शिकवतात म्हणून सांगू!' - हे आहेच. आता जर असं असेल, तर अशा क्लासला जाताना तरी नट्टापट्टा करायची काय गरज? बरं, त्यांना तसं विचारून बघा, तर 'छे! मी अजिबात मेकअप करत नाही हा! ती अमूक अमूक करते मेकअप. मी फक्त क्रीम लावते, आय लायनर लावते, काजळ घालते, आणि लिप ग्लॉस लावते - बास्स! एवढंच!' यातली अमूक अमूक म्हणजे या मुलींची नावापुरती असलेली कोणीतरी जीवलग मैत्रीण असते. हे सगळं ऐकलं की, मेकअप म्हणजे नेमकं काय करत असाव्यात या मुली अजून, असा प्रश्न पडतो मला. अर्थात, याबाबतीत माझी जिज्ञासा जास्त तीव्र स्वरूपाची नसल्याने या प्रश्नावर मी जास्त विचार करत बसत नाही. एकदा कॉलेजमधल्या माझ्या एका मैत्रीणीबरोबर ट्रेनमधून घरी परतत असताना तिने मला विचारलं, 'तुम्ही पुरुष मंडळी रोज-रोज दाढी करत बसता, त्यापेक्षा एकदाच गाल वॅक्स का नाही करून टाकत?' आता चेहऱ्याला मेण लावल्याने दाढी उगवणं कायमचं बंद होतं की काय, अशा निरागस कल्पनेनं माझं मन अचंबित झालं होतं; अहो मेण हे फक्त दिवे गेल्यावर उपयोगी पडतं, असा माझा जन्मापासूनच समज होता. माझ्या मेण न लावलेल्या, आणि अर्धवट हिरव्या पडलेल्या त्या चेहऱ्यावर मला झालेला हा नवा साक्षात्कार स्पष्टपणे प्रकट होत होता. मी तरी माझं मेणासंबंधीचं अज्ञान लपवण्याच्या हेतूने म्हटलं, 'छ्‌या बुवा! आपल्याला त्या वॅक्स पेक्षा शेविंग क्रीमच सोयीचं पडतं. फेस आला की कसं, दाढी करायला मजा येते. मेणाला फेस येतो का? नाही. त्यामुळे त्यात मजा नाही.' दुसऱ्याच्या अज्ञानाला हसू नये, ही शीकवण मी नेहमीच पाळत आलोय. अहो मी लोकांच्या अज्ञानाला त्यांच्या पाठीही हसत नसतो. आणि ही बया इतक्या मोठ्याने हसायला लागली म्हणता, मला काही कळेनाच. 'अर्रे!! वॅक्स म्हणजे ते वालं वॅक्स नाही! वॅक्सिंग वॅक्सिंग!!' मी आपलं उगाचच, 'अच्छा अच्छा, वॅक्सिंग होय! मला वाटलं-' तसं मला तोडत ती म्हणाली, 'राहू दे हां विद्वान साहेब, तुला वॅक्सिंग म्हणजे माहित नाही ते ऍड्‌मिट कर. फेस इट, फेस इट!' यातल्या फेस इट वर तिने इतका जोर का दिला, ते मला कळल्यावाचून राहिलं नाही, पण मी माझं अज्ञान मान्य केलं. तसा मी खिलाडूवृत्तीचा आहे. नाही माहिती तर नाही माहिती आपण कशाला लपवा? त्या दिवशी स्त्रियांच्या फक्त डोक्यावरच केस उगवतात, आणि ते फक्त डोक्यावरच उगवत असल्याने ते जास्त असतात, या माझ्या ठाम समजुतीचा अंत झाला. माझ्या ज्ञानात भरपूर भर घालण्यात आली, आणि काही दूरूस्तीची कामे सुद्धा पार पडली. इतकंच नाही, तर मला अजून कोणी गर्लफ्रेंड का मिळाली नाही, याचे मुक्त आणि व्यक्त समीक्षण झाले. अर्थात्‌, मगाशी सांगितल्याप्रमाणे, मी अतिशय खिलाडूवृत्तीचा असल्याकारणाने मी ते सर्व मुकाटपणे ऐकून घेतलं. पुरुषांप्रमाणे मुलीसुद्धा दाढीमिशी करतात, हे मला आता समजलेलं आहे. दाढी करण्याला त्यांनी ब्लिचिंग असं नाव ठेवलंय, आणि मिशी काढली, असं म्हणायच्या ऐवजी 'मी अप्पर लिप्स करून आली' असं थर्ड पर्सन सिंग्युलरचं व्याकरण स्वत:साठी लावत त्या रोखठोकपणे सांगतात. मुलींच्या चेहऱ्यावरचे केस त्या ब्लिचिंग करून घालवतात की असं काहीतरी जेव्हा माझ्या कानावर आलं, तेव्हा आमची मोलकरीण जमीन साफ करायला जी ब्लिचिंग पावडर वापरते, तिने चेहरा सुद्धा साफ करता येतो हे मला अजिबात पटेना. वॅक्सिंगच्या एका अनुभवाने मी शहाणा झालो होतो, म्हणून ज्या सुमुखीच्या तोंडून 'मी पार्लरला जात्येय, ब्लिचिंग करायचंय' असं मी ती चेहऱ्याभोवती बोट फिरवून दाखवत असताना ऐकलं, तेव्हा फक्त 'ब्लिचिंग?' एवढंच कपाळावर आठ्या आणत म्हणून मी माझं अज्ञान ग्रेसफुली प्रकट केलं. अर्थात्‌ या अज्ञानाबाबत माझं हसं झालं नाही. या मुली पार्लर मध्ये तासन्‌तास घालवतात. मेसेज करून चौकशी केली, की 'आता झालंय सगळं ऑलमोस्ट, फक्त क्लीन-अप बाकी आहे' असं उत्तर येतं. हे क्लीन अप करणं, म्हणजे सलून मध्ये न्हावी दाढी झाल्यावर तुरटी फिरवतो, त्याला समांतर असावं, असा माझा समज आहे. पण हा समज गैर असो वा नसो, मला या बाबतीतल्या माझ्या संभाव्य अज्ञानातच सूख आहे. या मुली सुंदर दिसण्यासाठी एवढी जोमाने तयारी करतात, याची मला काही वर्षांपूर्वी सूतराम कल्पना नव्हती. त्या मानाने आम्ही पुरुष मंडळी काहीच मेहनत घेत नाही असं म्हणायला हरकत नाही. जिम मध्ये रोज जाऊन चार बैठका मारल्या आणि गाढवासारखी ओझी उचलली, याला मेहनत म्हणायला आता मी तयार नाही. वास्तविक आम्हां पुरुषांना जास्त मेहनत करण्याची मुळी गरजच नाही हे आता माझ्या लक्षात आलं आहे. आमचं निश (niche) हे बायकांच्या तुलनेत जास्तच असणार, याची मला खात्री आहे. निश म्हणजे एखाद्या जीवाची निसर्गातील इतर घटकांच्या नजरेतील भूमिका, किंवा अवस्था. आम्हां पुरुषांच्या बाबतीत मला अवस्था हा शब्द जास्त सुटेबल वाटतो. असो. हे निश बहुतांशी प्राणी-प्रजातींत पुरुषांमध्ये जास्त चांगलं आढळून येत असावं. उदाहरणार्थ, सिंह-सिंहीण, मोर-लांडोर, चिमणा-चिमणी, कोकिळ-कोकिळा(मी दोघांनाही बघितलंय), कोंबडा-कोंबडी, बोका-भाटी, इ. प्रजातींमध्ये नर हे मादीपेक्षा सुंदर दिसतात. मला विचाराल, तर कुत्रा-कुत्री मध्ये सुद्धा मला कुत्राच जास्त छान वाटतो. इथे, एक नमूद करतो, की लांडोर आपल्याला तेवढी सुंदर वाटली नाही, तरी मोराला तीच सर्वांत सुंदर वाटते, कारण ते सजातीय आहेत. त्याचप्रमाणे, आपल्या पुरुष जातीला जरी स्त्री ही जगातील सर्वांत सुंदर वस्तू वाटत असली(आणि वाटायलाच हवी), तरी निसर्गाच्या दृष्टीतून आम्ही पुरुष मंडळीच जास्त सुंदर ठरतो, हे मात्र नक्की. या मला झालेल्या अवलोकनातूनच नट्टापट्टा करण्याची गरज पुरुषांपेक्षा स्त्रियांना जास्त का भासते, हे मला उमगले.