गुरुवार, ७ मार्च, २०१३

निसर्ग आणि माणूस

जन्मलो तेव्हा मला खूप अक्कल होती. कारण् तेव्हा मला माहित होतं, हे जग किती घाण आहे ते. म्हणून तर आल्या आल्या रडायला लागलो. पण घाणी राहून आपण ही घाण होतो, म्हणून असेल, किंवा मी रडून रडून कंटाळलो असेन, म्हणून असेल - मी रडायचा थांंबलो. मग वय हळू हळू वाढत गेलं, आणि अक्कल भरा भरा कमी होत गेली. मग पुन्हा नव्याने सुरुवात करावी लागली. नर्सरी म्हणू नका, केजी म्हणू नका, शाळा म्हणू नका, कॉलेज म्हणू नका... सगळं पालथं घातलं. आणि आत्ता कुठे, मी गमावलेल्या अकलेचा एक टक्का परत मिळवल्याची जाणीव होत्येय. इथे निसर्गाचा एकच कायदा आहे. आपण जगायचं, दुसऱ्याला मारायचं. सर्व्हायव्हल्‌ ऑफ द फिटेस्ट! माणूस निसर्गाच्या वर चढू पाहतोय म्हणतात. शक्यच नाही. निसर्गाने मानवाला जसा तयार केलाय, तसाच तो वागतोय. तो कोणतेच नियम तोडत नाही. मानवाने इतर प्राण्यांची शिकार केली, म्हणून आज काही प्रजाती नष्ट होतात. इतिहासात मानव यायच्या आधीही बऱ्याच प्रजाती नष्ट झाल्यात की. आणि शिकार काय माणूसच करतो? वाघ, सिंह, बिबट्या, तरस, लांडगे, चित्ता, असे भरपूर पशू आहेत. मानव हा सुद्धा पशुच. मानवाला पशु म्हटल्याने ना पशुंचा अपमान होतो, ना मानवाचा. कारण खरंच तो पशुच आहे, आणि पशुप्रमाणेच वागत आलाय, वागतोय. त्यात काही चुकीचं नाही. माणूस झाडं तोडतो. तोडत असेल, पण त्याचा काहीतरी वापर करतो. हत्ती, माकडं, यांना मस्ती चढली की विनाकारण कित्येक झाडं हकनाक मरतात. माणूस धरणं बांधून गावं बुडवतो. निसर्ग कित्येक गावं-शहरं तशीही अधुन मधुन बुडवतच असतो की. शेतकऱ्याला सुखवणारा पाऊस, काही पक्ष्यांना, किड्या-मुंग्यांना भारी पडु शकतो की. निसर्गातील कोणतीही घटना, त्या घटनेने निर्माण झालेली अवस्था, ही नेहमी काही प्रकारच्या सजीवांना मदत करते, तर काहींचा ऱ्हास करते. आपण स्वत:ला निसर्गापेक्षा वेगळे का मानतो हेच मला कळत नाही. सोयीचं जातं म्हणून? अरे पण या सोयीच्या फंदात आपण आपलं मूळ विसरुन जातो त्याचं काय! आपण बांधलेली इमारत ही "मानव-निर्मित' आणि पक्ष्यांनी बांधलेली घरटी, मुंग्यांनी बांधलेली वारुळं, मधमाश्यांची पोळी ही मात्र "निसर्गाची किमया'!!! का? आपल्या बिल्डींग्ज, टॉवर्स, इतर सर्व वास्तु, वस्तु, ही निसर्गाचीच किमया आहे. आपण जर कशाची निर्मीती केली, तर ती निसर्गाची कल्पकता आहे. आणि जर आपण विध्वंस केला, तर तो निसर्गाच्या रुद्रावताराचाच एक भाग आहे. त्यामुळे आपण आज कितीही प्राण्यांची शिकार करुन त्यांच्या जाती नष्ट केल्या, कितीही खनिजं उकरुन पृथ्वीच्या पोटातलं सगळं वापरुन संपवून टाकलं, तरी निसर्गाची काळजी करायचं काही कारण नाही. फार फार तर काय होईल? सगळे बर्फ वितळतील, बरेच जीव मरतील. त्यात माणसं सुद्धा. मरुदेत!! निसर्गाला काही फरक पडणार नाहीये. या घटनेला आपण "महा प्रलय' असं जरी नाव दिलं, तरी त्यात विशेष असं काही घडणार नाही. एके काळी जगात जिकडे तिकडे डायनासोर होते. आता ते कुठेही आढळत नाहीत. उलट असं मानलं जातं की डायनासोर सारख्या अजस्र प्राण्याच्या ऱ्हासामुळे इतर अनेक लक्षावधी लहान-मोठ्या जीवांना उत्क्रांत होण्याची संधी मिळाली. तसंच मनुष्यजातीचा ऱ्हास झाल्यावरही होईलच. आज मानवजात जिकडे तिकडे पसरलीये. महाप्रलयानंतर ती समजा नष्ट झाली. झाली तर झाली. डायनासोर गेले म्हणून निसर्गाचं काही बिघडलं का? मग माणूस गेल्यावर तरी का बिघडेल? कोण मोठे लागून गेलो आपण? आणि सगळेच जीव तर जाणार नाहीत. निसर्गाची किमयाच म्हणायची, तर महाप्रलयानंतर असे जीव उत्क्रांत होतीलच, ज्यांना त्यावेळी त्या परिस्थितीत स्वत:ची जीवनपद्धती प्रस्थापित करता येईल. जीवसृष्टी आहे तश्शीच राहील. फक्त थोडे फेरबदल होतील इतकंच. सजीवाचा आकार, रंग, गुणधर्म बदलले, बदलुदे!! काय वाईट झालं? काही नाही. तेव्हा काळजी करु नये. जगाचं समीकरण हे अस साधा सिंपल आणि सरळसोट आहे - शक्ती, बुद्धी आणि क्रौर्य - या तीन गोष्टींचा समेट ज्या जीवात नीट घडून येतो, तो जीव तगतो. बाकीचे गेले तेल लावत! आता मला सांगा, अशा या जगात केवळ बुद्धी घेऊन आलेल्या माझ्यासारख्या अडीच वीत उंचीच्या जीवाला, रडायला नाही का येणार? जग नेहमीच समतोल राखुन ठेवतं. त्यामुळे जसजशी माझ्यातली शक्ती आणि क्रौर्य वाढत गेलं, तसतशी माझी बुद्धी त्याप्रमाणात कमी होत गेली. आज माझ्यात या तीनही गोष्टी किती प्रमाणात आहेत, माहित नाही. पण तीन्ही आहेत, नाहीतर आत्तापर्यंत जिवंत कसा राहिलो असतो? मी कोण आहे? मी निसर्ग आहे! आंणि हा सगळा पसारा मी मला स्वत:शीच खेळता यावं, म्हणून माझ्यासाठीच मांडून ठेवलाय!