गुरुवार, ११ ऑक्टोबर, २०१२

आम्हांला काय हवंय?

माझे सगळे शाळकरी मित्र इंजिनिअरिंग करताहेत. माझी सहामाही परिक्षा नुकतीच संपल्याने मला सध्या भरपूर वेळ असतो आणि म्हणून मी त्यांना "भेटायला येता का?' असं विचारायला फोन किंवा मेसेज करत असतो. एरवी त्यांचे क्लासेस, कॉलेज किंवा परिक्षा असल्या की ते "नाही' म्हणतात. पण मी परवापासून विचारतोय तर एकजात सगळ्यांचं एकच उत्तर - असाइनमेंट्‌स आहेत रे! खूप आहेत. सॉरी, नाही जमणार. पुढच्या आठवड्यात एक्साम्स आहेत, त्यांचा अभ्यास करायला सुद्धा वेळ मिळत नाहीये. मी विचारलं, की या असाइनमेंट्‌सचा मार्क मिळण्यापलीकडे काही उपयोग आहे का, तर सगळेच जण नाही म्हणाले. म्हणजे हा सुद्धा शाळेत असताना निरर्थकपणे वह्या पूर्ण करण्यात मुलांचा वेळ, शक्ती, शाई, कागद, पैसा(त्यांच्या पालकांचा) आणि सर्वांत महत्त्वाचा म्हणजे त्यांचा चांगला मूड वाया जायचा, आणि अजूनही जातो, त्यातलाच एक प्रकार. कॉमर्समध्ये आम्हांलाही असेच दहा-दहा मार्कांचे प्रोजेक्ट्‌स दिले जातात. हे प्रोजेक्ट्‌स कॉलेजने दिलेल्या वहीतच करून द्यावे लागतात, नाहीतर शून्य मार्क मिळतात. कॉलेजने दिलेल्या वहीचा दर्जा अतिशय हीन असतो. तरी एका वीस पानी वहीसाठी आम्हाला गेल्या वर्षी पन्नास रुपये मोजावे लागले होते. प्रत्येक विषयाला एक वही. असे 7 विषय. विद्यार्थ्यांनी आरडाओरड करून देखील पावत्या मिळाल्या नव्हत्या, किंवा वह्यांची किंमतही कमी झाली नव्हती. यावर्षी वह्यांच्या ऐवजी पस्तीस रुपयांत सात छोटी बुकलेट्‌स वाटली गेली. म्हणजे एका बुकलेटची किंमत पन्नास वरून पाच रुपयांवर आली. नव्या क्रेडिट सिस्टीमनुसार दहा मार्क उपस्थितीला दिले जातात - "हवं तर मार्क देतो, पण कॉलेजात बसा,' अशी गयावया शिक्षण खातं आपल्याकडे करतंय, असाच सूर विद्यार्थ्यांमध्ये निघताना दिसायला लागला. मार्क हे एखाद्या विद्यार्थ्याला किती येतंय, हे ठरवण्यासाठी दिले जायचे. तुझं बूड सहा महिन्यांसाठी तू रोज कॉलेजच्या तुझ्या वर्गातल्या बाकडावर टेकवलंस की तुला दहा मार्क मिळतील, या पद्धतीला काय अर्थ आहे. बूड टेकवल्याने डोचक्यात काय शिरणार आहे? मार्कांच्या आमिषाने मुलं वर्गात बसतात सुद्धा, पण शिक्षक एखाद्‌-दुसरे सोडले तर बाकी सगळे अतिशय बकवास असतात. कॉलेजमध्ये आल्यापासून मी स्वत: काठावर पास होणारा विद्यार्थी आहे. मार्कांच्या आमिषांना भुलून मी मी कॉलेजला जात नाही. त्यामुळे कॉलेजमधल्या शिक्षकांच्या योग्यतेबद्दल मला जास्त काही बोलता येणार नाही. पण शाळेत डोकाऊन बघावं, तर मी बरंच काही बोलू शकतो. आम्हांला आठवीत असताना सेमी-इंग्रजीच्या वर्गाला सायन्स शिकवायला एक शिक्षिका आली होती. टेम्पररी होती ती. ती मराठी सायन्सचं पुस्तक घेऊन यायची आणि सरळ सरळ मराठीतून धडा शिकवायची - शिकवायची म्हणजे, वाचून दाखवायची. तेही तिला नीट वाचता यायचं नाही. आमच्या वर्गातली दोन-तीन हुशार मुलं-मुली, आणि माझ्यासारखी काही आगाऊ कार्टी, जेव्हा तिला एखादा प्रश्न विचारायचे, तेव्हा तिची धांदल उडायची. मग अख्ख्या वर्गाकडे नजर टाकून, "कोण सांगेल याचं उत्तर? येतंय का कुणाला?' कुणीच हात वर केला नाही, की "उद्या शोधून आणा. नाहीच सापडलं तर मी सांगते.' मग ती दुसऱ्या दिवशी स्वत: त्याचं उत्तर शोधून आणायची. मी मुद्दामून तिला उलटसुलट शंका विचारून गोंधळात पाडायचो. एकदा तिला मी jaggery म्हणजे काय, ते विचारलं होतं. तर jaggery म्हणजे "आर्द्रता' म्हणाली. थाप मारावी, तर थोडा तरी विचार करून मारावी की गं. गायीसाठी तयार करण्यात येणाऱ्या आंबोणामध्ये शेतकरी आर्द्रता का आणि कशी मिसळेल, हे मला पडलेलं एक कोडं आहे. विद्यार्थ्यांनी तिची तक्रार केली. तेव्हा तिचं परिक्षण घेतलं गेलं. त्या परिक्षणाच्या वेळी तिने कधी नव्हे ते फळ्यावर इंग्रजीमध्ये धड्याचे मुख्य मुद्दे लिहून काढले. त्यांत तीन-चार स्पेलिंग च्या चुका होत्या. अक्षरसुद्धा परिक्षकांना नीट वाचता येणार नाही असं काढलं होतं बहुतेक. आणि बाईसाहेब कधी नव्हे ते फाड-फाड इंग्रजीतून बोलत होत्या. अर्थात त्यांची इंग्रजीमधील शब्दसंपत्ती बेताचीच होती म्हणा. पण नुसतं इंग्रजी येत नाही म्हणून नाही, तर तिला शिकवताच यायचं नाही, म्हणून मला तिचा राग यायचा. तिला त्या परिक्षणानंतर काढून टाकण्यात आलं. आठवीतच आमच्या इंग्रजी सुपर्ब शिकवणाऱ्या परब मॅडम रिटायर झाल्या, आणि त्यांच्या जागी कोणीतरी नवीन बाई आली. तिही अर्थात टेम्पररीच. गाईडमध्ये इंग्रजीच्या धड्यांचं मराठीत भाषांतर दिलेलं असायचं. ती भाषांतरं कापून या बाई आपल्या पुस्तकात ती कात्रणं धड्यांप्रमाणे घालून ठेवायच्या आणि मग आम्हांला शिकवायला यायच्या. त्यांचा आवाज कधी आमच्यापर्यंत पोचलाच नाही. लवकरच त्यांचीही गच्छंती झाली. संस्कृतला नव्या बाई आल्या. थोड्या बोबड्या होत्या(आहेत). भरपूर लिहायला लावायच्या. लिहायला देताना त्या "त' चा उच्चार "त्‌' असा करायच्या आणि अर्ध्या त चा उच्चार पूर्ण करून मग त चा पाय मोडा असं सांगायच्या. तरी हे ठीक आहे. बाकी तश्या बऱ्या शिकवायच्या. निदान त्यांना विषयाचं ज्ञान तरी होतं. असो. बऱ्याचदा मुलांची अशी ओरड असते, की मराठी शाळांमध्ये सेमी इंग्रजीच्या वर्गांकडे जास्त लक्ष दिले जाते, त्या वर्गाचे इतर वर्गांना अवाजवी दाखले दिले जातात, ज्यामुळे विनाकारण सेमी-इंग्रजी आणि इतर वर्गांत आपोआपच तेढ निर्माण होते. तसेच दहावीच्या परिक्षेत सेमी-इंग्रजीच्या विद्यार्थ्यांकडूनच जास्त अपेक्षा असल्याने शिक्षकांकडून त्यांच्याकडे जास्त लक्ष देण्यात येते आणि इतर वर्गांकडे दुर्लक्ष होते. प्रत्येक पुस्तकात प्रत्येक धड्याखाली स्वाध्याय म्हणून प्रश्नोत्तरं दिलेली असतात. वरकरणी मुलांना धड्यातलं किती येतंय, हे त्यांना कळावं, म्हणून स्वाध्याय दिलाय, असं सांगितलं जातं. मुलं काय मूर्ख आहेत? पेपर काढणं सोयीचं जावं, म्हणून हे स्वाध्याय दिलेले असतात, हे चटकन मुलांच्या लक्षात येतं, आणि गाईड मधून फक्त धड्याखालची प्रश्नोत्तरं पाठ करून ही मुलं परिक्षेत पैकीच्या पैकी मार्क मिळवतात. मुळात धड्याखालचे स्वाध्याय देणं बंद करून, मागल्या वर्षींचे पेपर उपलब्ध करून देणे तात्पुरतं बंद केलं, की आपोआप मुलं सगळे धडे पूर्णपणे वाचतील आणि खऱ्या अर्थाने त्यांच्या डोक्यात भर पडेल. अशा रितीने घेण्यात येणारी परिक्षा सुद्धा खरी असेल आणि त्याचा निकाल सुद्धा. इतिहास-नागरिकशास्त्र या विषयांना मार्कांच्या दृष्टीने जे महत्त्व दिलं जातं, ते अतिशय गैर वाटतं मला तरी. खरं तर इतिहासापेक्षा नागरिकशास्त्र हा विषय जास्त महत्त्वाचा आहे. पण नागरिकशास्त्र हा विषय कंटाळवाणा आहे. त्यात त्याला चाळीसापैकी फक्त बारा मार्क असल्याने कुणाला परिक्षेच्या वेळीही त्याचा अभ्यास करावासा वाटत नाही. नागरिकशास्त्राचा अभ्यासक्रम चांगला असतो, पण परिक्षेच्या दृष्टीने त्याला फारसं महत्त्व न दिल्याने त्याच्याकडे विद्यार्थ्यांकडून कानाडोळा केला जातो. हे अगदी साहजिकच आहे. त्यामुळे चाळीसापैकी अठ्ठावीस मार्क नाशा ला, आणि फक्त बारा मार्क इतिहासाला द्यावेत, जेणेकरून मार्कांचे महत्त्व लक्षात घेऊन तरी मुलं या विषयाचा अभ्यास करतील. इतिहासच्या पुस्तकाकडे एक गोष्टीचं पुस्तक म्हणून बघितलं जातं. त्यामुळे मार्क कमी केले तरी वाचणारी मुलं इतिहासाचा अभ्यास करतीलच. मराठी विषयांत घरी धडे वाचून येऊन परिक्षेत ते न बघता लिहायची पद्धत मला अजिबात आवडत नाही. अहो तुम्हांला मुलांच्या भाषेचं ज्ञान वाढवायचंय की पाठांतर? "दोन्ही' असं म्हणाल तर पाठांतर इतर विषयांमध्येसुद्धा होतच असतं. त्याची मराठी विषयात गरज काय? कवितांचं पाठांतर चालेल, पण धड्यांचं कशाला? एकूण अभ्यासक्रम तसा फारसा वाईट नसतो, पण त्यातही सुधारणेला भरपूर वाव आहे. पण महाराष्ट्रातल्या सर्व स्तरातल्या मुलांना झेपेल, असा अभ्यासक्रम काढला जातो. तेव्हा, सर्व राज्याला एकच अभ्यासक्रम ठेवण्याऐवजी, जिल्ह्यानुसार अभ्यासक्रमाची पातळी ठेवण्यात यावी, असंही बरेच विद्यार्थी म्हणतात. उदाहरणार्थ, मुंबई-ठाण्यासारख्या जिल्ह्यांत, जिथे महाराष्ट्रांतील बहुतांश जिल्ह्यांच्या मानाने विद्यार्थ्यांना हव्या त्या सुविधा मिळणे सोयीस्कर जाते, तिथल्या अभ्यासक्रमाची पातळी आणि दर्जा जास्त ठेवला जावा. अनेक शाळांमध्ये आठवीपासून संस्कृत, हिंदी किंवा काही शाळांमध्ये विदेशी भाषांचे पर्याय दिले जातात. त्याऐवजी(किंवा त्याबरोबरच) अर्थशास्त्र या विषयाचा पर्याय ठेवण्यात यावा. दहावी झाल्यानंतर मुलांना विज्ञान, वाणिज्य किंवा कला यापैंकी एक शाखा निवडावी लागते. इतिहासाप्रमाणेच भूगोलाचे महत्त्व कमी करून अर्थशास्त्र हा विषय आठवीपासूनच मुलांना लागू केल्यास दहावीपर्यंत आपल्याला कोणत्या शाखेत जास्त रस आहे, याची योग्य कल्पना मुलांना येऊ शकेल. हे सर्व एक विद्यार्थी म्हणून सुचवत असताना एक नमूद करावेसे वाटते, की वर्षानुवर्षे सह-विद्यार्थ्यांशी सहज अधूनमधून चर्चा करून समोर आलेले विचार मी येथे मांडले आहेत. हे आणि असे विचार योग्य असतीलच, असं नाही. पण एकूणच विद्यार्थ्यांच्या मनात शिक्षणपद्धतीविषयी काय काय कल्पना आणि विचार आहेत, ते मांडण्याचा मी एक प्रयत्न केला आहे(यात एक विद्यार्थी म्हणून माझ्या काही कल्पना आणि विचार यांचाही समावेश होतोच). हे आमचे विचार आम्ही कुणापुढे मांडायला जावं, तर "अभ्यास करा आधी स्वत:चा; ते सोडून नसत्या उखाळ्यापाखाळ्या काढत बसल्येत विद्वान' असं म्हणून आम्हांला गप्प केलं जातंच(अर्थात्‌, मी अभ्यास करत नाही, यात बरंच तथ्य आहे म्हणा). म्हणून इथे मांडतोय. चुकलो, तर दुरुस्त करा; पटलं, तर अंमलात आणा, एवढीच विनंती.

शनिवार, ६ ऑक्टोबर, २०१२

ट्रेन आणि थुंकी

शाळा संपली; दहावी पास झालो. चांगल्या कॉलेजात प्रवेशही मिळाला. आणि ओघानेच ट्रेनने नियमितपणे प्रवास करण्याचे दिवस सुरु झाले. ट्रेनमध्ये गर्दी असते, त्यापेक्षा बस बरी - अशा मताचा मी होतो. पण माझं हे मत, मला लहान असताना आईबरोबर लेडिज कंपार्टमेंटात दरवेळी चढावं लागल्याने तयार झालं होतं, तेव्हा आता ते मत बदलून, जनरल डब्यातला माझा रोजचा प्रवास माझ्या अपेक्षेपेक्षा कितीतरी अधिक सुखमय होऊ लागला. कधी जास्त गर्दीतून जावं लागलं, तरी मजा यायची. आणि मग ट्रेनपेक्षा बसचा प्रवासच कितीतरी जास्त क्लेशकारक आहे, अशा मताचा मी झालो. पहिला महिनाभर सेकंडक्लासात घालवला. मग कन्सेशनपास मिळायला लागल्यापासून फर्स्टक्लासने यायला लागलो. सकाळी-सकाळी गोरेगाव-जोगेश्वरीला लागून जलद ट्रेन दौडु लागली, की पूर्वेकडे उगवणारा भलामोठा तांबडा सूर्य बघून आपण दहिसरला का बरं राहतो, असं राहून राहून वाटतं. वांद्रे जवळ आलं की तिथल्या खाडीत प्रत्येक ट्रेनच्या या-ना त्या डब्यातून कचऱ्याने भरलेल्या प्लॅस्टिकच्या पिशव्या पडायला लागतात, तेव्हा त्यांना फेकणाऱ्या लोकांनाच फेकून द्यावंसं वाटतं. पुढे माहिम-माटुंगा हा प्रवास जीव (म्हणजे नाक) मुठीत धरून करावा लागतो, निदान सकाळच्या वेळीतरी. माहिम-माटुंगा दरम्यानच्या सर्व रेल्वेपट्ट्‌या म्हणजे मुंबईतील सर्वात मोठं सार्वजनिक मलनिस्सारण केंद्र आहे, असं म्हणायला हरकत नाही. केवळ मोठं असल्यानेच तिथे रांगा लागत नसाव्यात, इतकाच काय तो त्यातला आणि बाकी "सुलभ' मधील फरक. दादरला ट्रेन लागली, की अतिशय चिंचोळ्या जिन्यांवर मुंबईकरांच्या फौजा चढाव करायला सुरुवात करतात, ते बघणं म्हणजे एक डिफरंटच अनुभव असतो. सेकंडक्लासात मराठमोळ्या, तर फर्स्ट क्लासात प्रामुख्याने गुर्जरगप्पा कानी पडतात. कधीकधी हिंदी आणि इंग्रजीत गप्पा झाडणारी माझ्यासारखी कॉलेजवयीन मुलं सुद्धा येतात. बारावीत भल्या पहाटे उठून क्लासला जायचो, म्हणून वसई-विरार वरून येणाऱ्या गाडीत चढायचो. तिथे तर भलताच प्रकार. वसईच्या लोकांची भाषा काही निराळीच आहे. त्यातलं ओ-का-ठो मला कळलं नाही कधी. या गाड्यांमध्ये एखाद-दुसरे नायजेरियन नागरिक सुद्धा दिसून येतात. विरारवरून येणारी बहुतेक मंडळी, ही अंगापिंडाने चांगली मजबूत असतात. त्यामुळे "अपना पैर हटाओ, हात निकालो, बाजू हटो ना, उतरो जल्दी जल्दी' अशा तुसड्या स्वरातील सुचना त्यांना द्यायला माझं मन (आणि तोंड) कधीही धजत नाही. ट्रेनमध्ये सगळ्यांत मजेशीर आणि कधीकधी(म्हणजे तशी नेहमीच) किचकट वाटणारी एक गोष्ट म्हणजे लेडीज डब्याबाहेरचा आणि आतला गोंधळ, धक्काबुक्की आणि कलकलाट. त्या डब्यात आधी कोण चढतो (ते), यावरून (अक्षरश:) मारामारी होते. एकमेकींच्या वेण्या, ओढण्या, पदर ओढत या बायका ना धड स्वत: नीट चढतात, ना दुसऱ्याला चढू देतात. बरं गाडी ज्या दिशेनं चालली आहे, त्यादिशेकडे तोंड करून कधीही चढणार किंवा उतरणार नाहीत. वसई-विरार ट्रेनमध्ये, परतीच्या वेळी, गोरेगाव-मालाड(आजकाल काही ठरावीक गाड्या थांबतात), दहिसर इथे हमखास बाया प्लॅटफॉर्मवर उतरताना तोल जाऊन आदळताना आढळतात. काही स्त्रिया माझ्या या सगळ्या निरीक्षणावर आक्षेप घेतील बहुतेक, पण माझ्या कित्येक मैत्रिणींनी स्वत:च या गोष्टीची "लेडीज कंपार्टमेंट? बापरे! डोंट आस्क!' अशा काहीशा शब्दांत कबुली दिली आहे, की "जेंट्‌स खूपच को-ऑपरेटिव्ह असतात.' सकाळी सकाळी विरारहून येणाऱ्या गाड्या आमच्या बोरीवलीहून निघालेल्या संथ गतीच्या ट्रेन्सच्या बाजूने भरधाव वेगाने जातात. त्यांच्या कोणत्यातरी डब्यामध्ये झांजांचा आवाज नेहमी येत असतो. लोक भजन म्हणत असतात. मला एकदातरी त्या भजन गाणाऱ्या लोकांच्या डब्यातून प्रवास करायचा आहे, पण आजपर्यंत तरी तो योग आलेला नाही. दहिसरला सकाळी अकरा वाजून सतरा मिनिंटानी येणाऱ्या गाडीमध्ये पुढच्या फर्स्टक्लासमध्ये काही अयोध्येकरांनी रामाच्या रटाळ आरती-स्तोत्रांचा सपाटा लावलेला असतो. खरं तर, त्या आरत्या रटाळ नसाव्यात, पण त्या गाणाऱ्या लोकांचचं स्वरज्ञान बेताचं असतं, त्यामुळे त्या डब्यात चढलं, की डोकं फिरतं. पण एक वेगळीच गोष्ट आहे, जी या सगळ्यापेक्षा हटके आहे, आणि भारतीय रेल्वेची ती एक अविभाज्य घटक आहे. प्रत्येक स्टेशनावरील चित्रविचित्र पोशाखातील विविध रंगाढंगाच्या मुलींपेक्षाही हीगोष्ट माझ्या जास्त नजरेत भरत आलीय. ती म्हणजे - पिचकारी - थुंकी ! रेल्वेने रोज हजारो लोक प्रवास करत असतात. त्यातले शेकडो लोक येता-जाता थुंकत असतात. कोणी दरवाज्यात लटकत असताना अधून-मधून थुंकतं, कुणी त्या लटकणाऱ्यांना बाजुला व्हायला सांगून स्वत:ची पिंक टाकून घेतं, तर कुणी खिडकीच्या गजांमधून थुंकतं. कुणी पचा-पचा थुंकत राहतात, कुणी घसा खरवडून "खर्राक्‌... थू' करतात. कुणी जीभेनं आणि प्रसंगी बोटाने तोंडात उरलेला सगळा चोथा ओठांशी आणून मग थुंकतात. कुणी थुंकतंय की ओकतंय तेच कधी कधी कळत नाही. काही जण हनुवटी गळ्याजवळ आणून, मग ती पुढे नेताना थुंकतात, जेणेकरून थुंकी लांबवर उडावी. काहीजण नुसतेच जुन्या नळातून सरळ पाणी खाली गळावं तसे थुंकतात. कुणी लाल थुंकतात, कुणी नुसताच पांढरा फेस थुंकतात, कुणी थुंकायला मजा येते म्हणून सुद्धा थुंकत असावेत - काही सांगता येत नाही. अहो, ढुंगणातून काढायचा, तो धूर नळकांडी वापरून तोंडातून काढणारे आणि त्याला "कूल' म्हणणारे का थोडे आहेत? त्यांच्या तुलनेत थुंकणं हे कूल असतं, असं कुणी मानलं तर त्यात विकृती ती कसली? असो. लहानपणी मला या थुंकणाऱ्यांकडे बघून मोठी मजा वाटायची. रस्त्यातून येता-जाता मला जागोजागी थुंकलेलं दिसून यायचं. एकेकाची थुंकी भरपूर मोठ्ठी असायची. मी एकदा थुंकुन पाहिलं, तर माझी थुंकी त्यामानाने खूपच छोटी वाटली मला. मी नाराज झालो. पण त्यावेळी आपण सलमान खानला फायटिंग शिकऊ शकतो, असे मानणारे काडी-पेहेलवान आम्ही! थुंकी मोठी दिसावी, म्हणून लोक ती आधी तोंडात साठवून घेत असावेत, आणि पुरेशी साठली, की मग थुंकत असावेत, असं मला वाटलं. कारण असं केल्याशिवाय माझी थुंकी मोठी येत नाही, आणि जर माझी येत नाही, तर इतर कुणाची कशी बरं येईल? या गोष्टीला इगो-सेंट्रलिझम असं म्हणतात म्हणे - लहान मुलांमध्ये नेहमी आढळून येतो. काही जण म्हणतात, की तो माझ्यात अजूनही आहे. ते जाऊ दे. तर आईबरोबर एकदा फिरत असताना, माझ्या बाजूने एक माणूस गेला आणि जाताना थुंकला, त्याची थुंकी छानपैकी नाण्याच्या आकाराएवढी मोठी होती. मी लगेच प्रयोग करून बघितला. चांगली तीन-चार मिनिटं मी तोंडात जमेल तेवढी थुंकी गोळा करण्यात घालवला. मग मी ती थुंकलो. लगेच आईने मला फटका मारला, तिथल्या तिथेच. "सगळे थुंकतात म्हणून मी सुद्धा थुंकतो, मला मोठी थुंकी हवीये सगळ्यांसारखी', असं मी म्हटल्यावर मला अजून एक फटका बसला. "ते थुंकणारे लोक घाण्णेड्डे असतात, आपण थुंकायचं नाही त्यांच्यासारखं' अशी समज मला देण्यात आली. तेव्हापासून मी रस्त्यात थुंकणं जे बंद केलं(त्यापूर्वी तरी असा कितींदा थुंकलो होतो म्हणा), ते आजतागायत मी कधी थुंकलेलो नाही, आणि थुंकणारही नाही. लहान असताना सुट्टीत ठाकूरद्वारला आजीकडे जायचो, तेव्हा तिथल्या चौथ्या मजल्यावरून जिन्यामधून वाकून बघायचो, आणि थेट तळमजल्यावर नेम लाऊन थुंकायचो. एवढ्या वरून स्वत:ची थुंकी खाली जाताना बघताना मजा यायची. तो खेळच होता माझा. कंटाळा येईपर्यंत खेळत बसायचो रोज संध्याकाळी. एकदा कुणा बाईच्या अंगावर माझी थुंकी पडली. तिने मान वर करून बघायच्या आतच मी मान मागे केली आणि घरात धूम ठोकली. तेव्हापासून तो खेळ बंद झाला. आता मी ना रस्त्यात थुंकायचो, ना जिन्यात. पण उल्हासनगरला जात असताना, ट्रेनमध्ये माझ्या समोर बसलेल्या आजीबाईंनी थुंकण्याची एक वेगळीच स्टाईल मला दाखवली. म्हणजे, त्या थुंकत होत्या, मी बघितली. दात एकमेकांवर ठेऊन त्यांच्या फटींमधून त्या खिडकीबाहेर थुंकत होत्या. मला ते बघून सापाच्या फुत्काराची आठवण झाली. लगेच मलाही त्याचं प्रात्यक्षिक करायची हुक्की आली होती, पण सार्वजनिक ठिकाणी थुंकणं मी बंद केलं असल्याने, मला आमच्या बाथरूमात त्याचा प्रयोग करावा लागला - अर्थात तो अयशस्वी ठरला. कितीही केल्या माझ्या दातांमधून पुरेशी थुंकी बाहेर येईना. शेवटी मी नाद सोडला. आज मी अजिबात थुंकत नाही. कुठेही नाही. जेव्हा लोक थुंकतात, तेव्हा ते बघायला किळस वाटते. असं वाटतं की जाऊन एक थोतरीत ठेऊन द्यावी त्या थुंकणाऱ्याच्या. बोरिवली स्टेशनात पहिल्या आणि दुसऱ्या प्लॅटफॉर्मच्या मध्ये जे रूळ आहेत, त्यांच्यावरचे दगड, आणि मधलं लोखंडी कुंपण, हे सदैव लाल असतं. इतर सुचनांप्रमाणेच रेल्वेची बाई फाटक्या लाऊडस्पिकर मधून "यात्रियोंसे निवेदन है, की वे कृपया रेल्वे प्लॅटफॉर्मपर मत थुके. थुकनेसे बिमारी फैलती है' असं काहीतरी बरळत असते. तिच्याकडे कोण लक्ष देतं कुणास ठाऊक. तरी प्लॅटफॉर्मवर आजकाल नाही कोणी थुंकत जास्त. बहुधा दंड आकारत असावेत. रेल्वेने नव्या लोकल्स आणल्या, तर त्यावरही लाल रंगाची होळी खेळली जाऊ लागली. कोणाला म्हटलं, की बाबा रे, कशाला थुंकतोस, उगाच कशाला मुंबई खराब करतोस, तर "मुंबई? कचरपट्टी तो है, सब कचरा करते है. उसमे मैने जरासा थुक दिया तो इतना क्या बिघडने वाला है?' असंच काहीसं उत्तर ऐकायला मिळणारच. जिथे आपण राहतो, जी आपली कर्मभूमी आहे, तिचा जरासा तरी आदर उरी बाळगायला नको का? मला तर लहानपणीच समज आली नशीबाने, आता बाकीच्यांना कधी येईल ते बघूया. खरं तर शहाण्यास शब्दाचा मार... या नियमाने अश्या थुकाड्यांना बडवूनच काढायला हवं. सार्वजनिक मालमत्तेविषयी अनादराची प्रवृत्ती इतकी बोकाळली आहे, की कुल्यावर चार छड्या बसल्याशिवाय अशा लोकांना समज यायची नाही. चार-पाच वर्षं जरी थुंकणाऱ्यांवर आणि कचरा टाकणाऱ्यांवर जरब ठेवली, की भितीपोटी का होईना, या वाईट सवयी सुटतील. आणि एकदा त्या सुटल्या, मनोवृत्ती बदलली, की आपोआप स्वच्छतेची आवड निर्माण होऊन लोकच या नियमांचं पालन करतील. एवढंच नाही, तर त्यांची मानसिकता एवढी बदलेल, की प्रसंगी कायद्याचा बडगा दाखवणाऱ्यांची गरजही लागणार नाही; एखाद्या थुंकणाऱ्या, कचरा टाकणाऱ्या व्यक्तीला रेल्वेमधल्या डब्यातील एकजात सगळ्यांनी झापताना, सुनावताना मला बघायचंय. लाजेनं थिजुन जाऊन ती व्यक्ती नरमली तर ठीक, नाहीतर अशा माणसाला थोडा चोप मिळाला तरी हरकत नाही. आणि एकदा का अशा प्रसंगांना सुरुवात झाली, की आपोआपच अमेरिका आणि लंडनसारख्या प्रदेशांना पॉश मानणाऱ्यांना सध्या कचऱ्याखाली गाडला गेलेला आपला "पॉश' देश दिसू लागेल.