बुधवार, २९ एप्रिल, २०१५

दुहेरी कान्हेरी

कान्हेरीला दोन आठवड्यांत दुस-यांदा गेलो. दोन्ही फे-यांमध्ये भरपूर फरक होता. भरपूर म्हणजे चिक्कार. चिक्कार म्हणजे जबरदस्तच. बरं आता मुद्यावर येतो.

पहिली फेरी रमणीय सप्तरंगी उद्दिष्टांनी नटलेली होती. अगदी हातात हात घालून नसली तरी, इथून - मधूनच खांद्यावर, कमरेवर हात ठेवून, आणि तिथून - लाडिक फटके आणि चिमटे खात नेणारी होती. पुढचा मागचा विचार न करता शरीराला संथ गतीने आणि मनाला सुसाट पळवणारी होती. दुसरी फेरी प्रबोधनात्मक होती. विचार करायला लावणारी होती.

पहिल्या फेरीत इच्छित कल्पना वास्तवात आणण्याची खटपट होती. दुस-या फेरीत घडून गेलेल्या वास्तवीक घटनांची कल्पना करायची होती.

पहिल्या फेरीत कान्हेरीच्या वाटेवरती स्वतः हरवून जायचं होतं. हरवलेलं आपलं मूळ दुस-या फेरीत शोधून काढायचं होतं. पहिल्या फेरीत नावीन्याचा खुसखुशीत आस्वाद घ्यायचा होता, दुस-या फेरीत जुन्या जतन केलेल्या आठवणींना उजाळा द्यायचा होता.

पहिल्या फेरीत आठवणींत राहतील असे क्षण जगायला गेलो होतो. दुसरी फेरी आठवणींत ठेवाव्यातच अशा गोष्टी सांगून गेली. पहिल्या फेरीत जे सुख अनुभवलं त्यावरून भविष्याची स्वप्नं रंगवली. दुस-या फेरीनं इतिहासाची साक्ष देणा-या रंगांची झलक दाखवून दिली.

पहिल्या फेरीत आजुबाजूला माकडं चिक्कार होती पण आक्रमक कोणीही नव्हतं. दुस-या फेरीत त्यांच्याशी कुस्ती घालायचं तेवढंच बाकी ठेवलं होतं.

पहिल्या फेरीत आपल्या दुकांतात कोणी बाधा आणणार नाही असं ठिकाण निवडण्यात वेळ गेला. प्रत्येक आगंतुकाला मनोमन शिव्या घालण्यात वेळ गेला. दुस-या फेरीत ठिकठिकाणी, 'प्रायव्हसी' नकळतच नष्ट करत गेलो, आपसुकच आगंतुकासारखा, दांभिकतेनं भ्रष्ट होत गेलो.

पहिल्या फेरीची सुरूवात बाकी धमाल झाली. मनसुबे होते सायकली भाड्याने घेण्याचे. एका हाताने सायकल चालवत दुसरा हात मधूनच हातात घेण्याचे. घरून निघताना नट्टापट्टा करण्यात वेळ दवडल्यानं सायकली सगळ्या निघून गेल्या. अर्थात् याबद्दल बोल लावण्यात अर्थ नव्हता, कधीच नसतो. पण मग जे अंतर सायकल चालवत असं भसकन् पार केलं असतं, तेच अंतर आरामात, रमत गमत, थांबत थबकत, लपत लपवत कापत गेलो. सकाळच्या थंडीत सायकल चालवून अंग सुन्न करण्यापेक्षा कोवळ्या उन्हात चालून, थोडा घाम गाळून चेह-याची लकाकी अजूनच खुलवत गेलो. तरीही सेल्फी(ज) काढताना 'शी माझा अवतार बघ. एक मिनीट हं' हे करण्यात भरमसाट वेळ गेला तो भाग अलाहिदा. त्याबद्दल काही बोलणं पाप असतं. मुळात राष्ट्रीय उद्यानात येऊन कान्हेरी गाठण्याची उद्दिष्टं बाळगणा-यांनी स्वतःचेच फोटो काढत बसणं कितपत शहाणपणाचं आहे, हा ही एक वादग्रस्त प्रश्न आहेच(वादग्रस्त एवढ्यासाठीच की विचारला तर दुस-या बाजूनं वाद घालणारे(-या) खूप आहेत). पण एवढा विचार करण्याचा तो दिवसच नव्हता. कारण पहिली फेरी ही 'विलासफेरी' होती.

'विवेकफेरी' होती ती दुसरी. अ ते झ मधील प्रत्येक अक्षरानं सुरू होणा-या श्लील-अश्लील अशा सर्व शिव्या घालूनही ज्यांचं वर्णन अपुरं वाटेल अशा लोकांनी इतस्ततः टाकलेला कचरा उचलून आपल्या जवळच्या पिशवीत ठेवायला हात आसुसले होते. एकदोघांना चार उपदेशाचे डोस पाजायलाही संकोच वाटला नाही. पण या सगळ्या मेहनतीवर एका झटक्यात पाणी ओतायला हुप्पे आले की धावून; शारीरिकदृष्ट्या कितीही फेरफार झाले तरी मानसिक आणि बौद्धिक दृष्ट्या आपल्याएवढीच उत्क्रांती झालेल्या आपल्या वंशज-जातीच्या भाऊबंदांना चारचौघांत खजील केलं त्यामुळे बहुदा त्यांच्या (हुप्प्यांच्या) भावना दुखावल्या असाव्यात. मग एका माकडाशी पिशवीवरून झालेल्या झटापटीत सरशी माझी झाली आणि तो बिचारा नुसताच मला त्याच्या इवलुशा तोंडाचा चंबु करून हाॅ... हाॅ करून घाबरवायला लागला. कदाचित तेव्हा त्याने माझ्यातल्या मूळ प्रजातीला साद घातली असावी, कारण मीही उत्स्फूर्तपणे माझे दात फिरवले आणि भल्यामोठ्याने 'हाॅऽऽऽ' असा आवाज काढला. मी कुठल्या भाषेत काय बोलत होतो मला कळलं नाही, पण त्या हुप्प्याला हवा तो संदेश मिळाला आणि इतर माकडांमध्ये 'ब्राॅडकास्ट' करायला तो निघून गेला. अगदी हॅरी पाॅटर झाल्यासारखं वाटत होतं.

हे सगळं मी पहिल्या फेरीत करू शकलो असतो, पण एखादं माकड मला घाबरून पळण्याऐवजी... माझंच हसं झालं असतं त्यामुळे तेव्हा मी माझा आब राखून, माझ्या बेडकीहीन दंडाला येता जाता बाहेरून दिला जाणारा पीळ थोपटत 'काही नाही करणार. लक्ष देऊ नको.' असं म्हणत पुढे जात राहिलो होतो. या दोन प्रसंगांवरून विलासफेरीत विवेकाचा आणि विवेकफेरीत विलासाचा मी कसा अनोखा मेळ साधू शकलो हे सूज्ञांच्या लक्षात आलंच असेल.

विवेकफेरीत कान्हेरीबद्दल प्रचंड माहिती मिळाली. नालासोपारा हे एकेकाळी महत्त्वाचं बंदर होतं हे या फेरीत कळलं. आनंदून जावं की शेम शेम म्हणावं ते मात्र कळलं नाही. विलासफेरीत सेल्फी काढून फेसबुकवर लाईक्स मिळवण्यापुरते महत्त्वाचे स्तूप आणि त्या लेण्या, विवेकफेरीत पार दृष्टिच पालटून गेल्या.

दुस-या शतकातल्या विटा, त्यांचं झालेलं 'संवर्धन'; विविध काळांत दगडी भिंतींमध्ये कोरलेल्या मूर्ति, आणि एकविसाव्या शतकात त्याबाजूला हार्टं काढून आपली नावं कोरणा-या महान शिल्पकारांनी त्यात घातलेली भर; आज दिसत नसलेल्या सागवानी लाकडी बांधकामाची साक्ष देणा-या दगडांमधल्या खाचा; मूर्ति आतमध्ये कोरलीये की बाहेरून त्यावरून ती कधी घडवली त्याचा बांधता येणारा अंदाज; 'तेर' या तत्कालीन चायना माल दागिने केंद्र असणा-या आणि आजही तेर म्हणूनच नावाजलेल्या ठिकाणाची ओळख; लेण्या खोदण्यासाठी देणग्या देणा-या त्यावेळच्या टाटा अंबानींची मला अजाण अशा भाषेत अन् लिपीत कोरलेली नावं आणि मूर्ति; सर्वांत मोठी होऊ शकली असती अशी, पण कंत्राटदाराच्या कामगारांनी संप पुकारल्यामुळे असेल किंवा देणगीदारांनी हात आखडता घेतल्याने असेल, अर्धवट राहून गेलेली आणि त्यामुळे लेण्यांचं बांधकाम कसं व्हायचं याचं उत्तर देऊन जाणारी लेणी; त्यापाठोपाठ कान्हेरीत मोठी असलेली, पूर्ण झालेली, दुस-या शतकातल्या फाॅल्स सिलींगची कथा सांगणारी लेणी हा आणि असा भलामोठा खजिना माझ्यासमोर विस्तृतपणे पहुडला होता. कान्हेरी हा कृष्णगिरी या शब्दाचा अपभ्रंश असून हे एक विश्वविख्यात विद्यापीठ होतं ज्याची साक्ष देणारे शीलालेख जगभरात सापडतात, हे जेव्हा कळलं तेव्हा कान्हेरीच्या इतक्या जवळ राहणा-या मला स्वतःचीच लाज वाटली. मग त्या विद्यापीठातलं ग्रंथालय पाहून आलो. तिथल्या शांत वातावरणात एक गोरा पर्यटक कुठलं तरी गाणं गात बसला होता. आधी त्याला गप्प करावंसं वाटलं, पण त्याचे सूर तिथल्या वातावरणाशी माझ्या उपस्थितीपेक्षा जास्त सुसंगत वाटत होते हे जाणवलं आणि मीच गप्प बसलो. एका पुढच्या लेणीच्या प्रवेशद्वाराशी जपानी शिलालेख दिसले. आत गेलो तेव्हा मिट्ट काळोख होता. आम्ही डोळे बंद करून थोडा वेळ उभे राहिलो. उघडले तेव्हा अंधाराला सरावलेल्या डोळ्यांना जे दिसलं, ते दृश्य केवळ अप्रतिम होतं. अख्खी लेणी शिल्पांनी भरलेली होती. बहुतेक शिल्पांवर रंगांचे अवशेष होते. जवळजवळ सर्वच शिल्पांवर चकाकी दिसत होती. मूळ शिल्पकारांनी मायका लावला होता. विलासफेरीत फोटोग्राफीची हौस भागवली होती म्हणून विवेकफेरीत मी कॅमे-याला लगाम घातला होता. पण ही दाटीवाटीत कोरलेली शिल्पं इतकी मनमोहक दिसत होती की हात आपोआपच कॅमे-याला लागला आणि मी खचाखचा बटण दाबत सुटलो.

पासष्ठ दशलक्ष वर्षांपूर्वी आज मादागास्कर आहे त्या ठिकाणावरून स्थलांतरित होत होत भारतीय उपखंडाला येऊन मिळालेल्या तप्त ज्वालामुखीच्या भुखंडावर कान्हेरी गुहा उभ्या ठाकल्या आहेत. लाव्हारस सुकून निर्माण झालेल्या बेसाॅल्टच्या दगडधोंड्यांमध्ये आणि खडकांमध्ये प्रचंड डोकं चालवून आणि परिश्रम घेऊन या लेण्यांची निर्मिती केली गेली आणि इथे विद्यापीठ उभं राहिलं. इसवी सनाच्या पहिल्या-दुस-या शतकापासूनची बांधकामं आजपर्यंत काही जीर्ण भाग सोडता अजूनही शाबूत आहेत. त्यांच्या संवर्धनासाठी सरकार किती उदासीन आहे याबाबत खडे न फोडता, आहे त्या परिस्थितीचं खरंखुरं संवर्धन कसं करता येईल, याकडे लक्ष द्यायला हवं. अगदी त्याबाबत आपण सामान्य माणूस म्हणून समजू शकत नसलो, तरी निदान त्या स्मृतींना अभंग आणि निरंतर ठेवण्यात आपल्या उपद्रवांची भर पडून वितुष्ट येऊ नये याची तरी आपण दक्षता घेतलीच पाहिजे.

विलासफेरीत कान्हेरीला पोचलो तेव्हा मोठमोठाले, छोटछोटाले स्तूप, त्याला टेकणारी, त्यावर चढून बसणारी आणि वाॅचमनच्या शिट्टीला दाद न देणारी मंडळी; घोळक्याने गोंगाट करणारी, टोळक्याने दंगा करणारी मंडळी; चार फुटांवरून माकड गेलं तरी किचाट आवाजात ओरडून आपल्याकडे लक्ष वेधू पाहणा-या पुचाट मुली; त्यांच्यावर माकडापेक्षा जास्त घाबरवणा-या आवाजात हसणारे त्यांचे मित्र; लग्नाआधी इथे बरंच काही करून(आणि बहुधा कोरून) गेलेली, आणि आता लग्न ठरलं म्हणून पत्रिकेवर छापण्यासाठी स्वतःचे फोटो काढायला खास नटून आलेली दाम्पत्यं; या लेण्यांकडे आपल्याहूनही कितीतरी जास्त औत्सुक्याने आणि आदराने पाहणारी परदेशी मंडळी; त्यांच्या कुतुहलाने ओशाळून जाण्याऐवजी त्यांच्या चालण्या-बोलण्या-दिसण्याची थट्टा उडवणारे आणि त्यांच्या केवळ रंगसंगतीवर भाळणारे बुरसट विचारांचे लोक; त्यातल्या बौद्ध भिख्खूंना जे पाणी पवित्र वाटत होतं तिथे स्थानिकांनी फेकलेल्या बिस्लेरीच्या बाटल्या(याच पाण्याचा साठा आणि वापर करण्यामागचं चकित करून टाकणारं त्या काळचं तंत्र विवेकफेरीत समजलं), यापलिकडे कान्हेरीत काहीही पाहण्यासारखं वाटत नव्हतं. गंमत येत होती ती फक्त माकडांमुळे, कारण जिथे माणसं एकमेकांच्या सलोख्यात व्यत्यय आणत होती, तिथे नायिकेला नुसती हूल देऊन दोन जीवांना जवळ आणण्याचं पवित्र परोपकारी कार्य ती माकडं सातत्यानं करत होती.

त्यानंतर विवेकफेरीत कान्हेरीचं योग्य दर्शन घडवलं ते विनायक परब सरांनी. ज्या ज्या लेण्यांत आम्ही गेलो, तिथली इत्थंभूत माहिती ते पुरवत होते. त्यांनी अशाही अनेक बाबी दाखवल्या, सांगितल्या ज्या खूप महत्त्वाच्या आहेत आणि आपल्याला चकित करून टाकणा-या आहेत, पण ते सगळंच इथे उद्धृत करत बसलो तर कान्हेरीच्या विवेकफेरीतलं सरप्राईज एलिमेंट निघून जाईल.

आणि विलासफेरीत कोणाबरोबर गेलो, हे न सांगण्यामागे सरप्राईज एलिमेंटचा भाग कमी आणि धास्ती आणि धाकाचा भाग जास्त आहे हे सूज्ञांनी समजून घ्यावं.

- कौस्तुभ अनिल पेंढारकर.