मंगळवार, ३ डिसेंबर, २०१३

मरीन ड्राईव्ह

मरीन ड्राईव्हला गेलो होतो(अर्थातच एकटा गेलो नव्हतो, पण ते महत्त्वाचं नाहीये). मरीन लाईन्स स्टेशनवर उतरून रस्ता ओलांडून कठड्यावर चढलो. वेळ गर्दीची नव्हती. त्यामुळे बसायला जागा भरपूर होती. पण बसावं, असं त्या अखंड कठड्यावरच्या एकाही ठिकाणी वाटलं नाही. आम्ही नुसतेच बसण्याजोगी जागा शोधत त्या कठड्यावरून फिरत होतो बराच वेळ. कोणी म्हणेल, की अरे मरीन ड्राईव्हचा एवढा लांबलचक कठडा, समोर एवढा अथांग समुद्र आणि बसण्याजोगी जागा नाही म्हणतोस?? बसण्याजोगी म्हणजे कठड्यावरची अशी जागा ज्यावर पिंक टाकल्याच्या खुणा नसतील आणि ज्याच्या पुढ्यात, खाली कचरा पडलेला नसेल अशी. टिश्यु पेपर, फूड प्रोडक्ट्सचे रॅपर्स, कोल्ड ड्रिंक्सच्या प्लॅस्टिकच्या बॉटल्स, कॅन्स, छोटे पॅक्स, चप्पल, काय वाट्टेल ते पडलेलं होतं सगळीकडे. खरं तर हे काही नवीन नाही. आपण आपलं, त्यातल्या त्यात स्वच्छ दिसणारी जागा हुडकून तिकडे ठाण मांडायची. तशी ती आम्ही मांडली.

बसलो. आणि ढुंगणाला चटका लागल्यानं लगेच हात कठड्यावर टेकून बूड उचललं. तसं हातांना सुद्धा चटका लागला म्हणून हात सोडले. बूड पुन्हा कठड्यावर जाऊन आदळलं. पुन्हा चटका!!
'उगाच आलो दुपारच्या वेळी... थोडं उशीरा आलो असतो तर चाल्लं असतं.'
'पण मग आपल्याला ही जागा मिळणं मुश्कील झालं असतं. संध्याकाळ होत जाते तशी गर्दी वाढते इथे' उत्तर आलं. पटलं. आम्ही पाय मोकळे सोडले. चपला सटकतात का काय पायातून, अशी भिती वाटायला लागली. म्हणून त्या पायाच्या अंगठ्याने आणि बोटांनी घट्ट पकडून ठेवल्या. थोड्या वेळाने एरवी एकदम हलक्या वाटणा-या त्या चपला जड वाटायला लागल्या. म्हणून मी त्या काढून कठड्यावर माझ्या बाजुला ठेवल्या. माझी बॅग त्यांच्यावर ठेवली.

'चपला का काढल्यास?'
'बसल्यानंतर पाय असे जास्त वेळ अधांतरी ठेवले तर बधिर होतात माझे. म्हणून त्यातल्या त्यात चपलांचा भार कमी केला.'

लगेच माझं अनुकरण करण्यात आलं. मी हसलो, मलाही रिटर्नमध्ये एक छानसं स्मितहास्य मिळालं. मी माझ्या उजवीकडे बघितलं. तिथं दोघंजण तनोमिलनात गुंतले होते. डावीकडे पाहिलं. तिथं रुसवे-फुगवे काढणं चालू होतं. दोन्हीही बाजुंना इंटरस्टिंग घडामोडी चालू होत्या तर. चांगलंय. डावीकडे थोडंसं पुढे पाहिलं... एक छत्रधारी-युगुल दिसलं. पूर्ण तयारीनिशी सगळं ठरवून आली होती ही मंडळी.. आमचं तर दादरच्या चौथ्या प्लॅटफॉर्मवरून क्वचित सुटणारी विरार ट्रेन पकडायच्या फंदात तिच्या आधीच्या चर्चगेट ट्रेनमध्ये चढल्यानं इथं विना-तिकीट येणं ठरलं होतं. पाठीमागे नजर फिरवली. एक फिरंगी कपल जाताना दिसलं. ही फिरंगी मंडळी मुंबईच्या रस्त्यांवर जेव्हा कधी दिसतात तेव्हा ती अशा गबाळ्या अवतारातच का फिरताना दिसतात कोणास ठाऊक!! असो. इथली-तिथली पाहणी खूप झाली. आता केंद्रस्थानी लक्ष द्या. लक्ष दिलं. डोळे बारीक आणि चेहरा जरा त्रासलेला दिसला. काय झालं??

'ऊन खूपच आहे रे!!'

अर्रर्रर्र... योगायोगानं घडलेल्या अपघातानं मिळालेल्या संधीचं सोनं करण्याची मी तयारी चालवलेली असताना हे सोन्याहूनही पिवळं असलेलं ऊन आडवं यावं...?? आता काय करावं? इतर प्रकारच्या अस्मानी संकटांना सहज तोंड देऊ शकलो असतो. पाऊस असता तर सरळ भिजलो असतो आणि भिजायला लावलं असतं. थंडी असती तर शरीराची ऊब देण्याच्या निमित्तानं जवळ खेटून बसून एका हाताने पाऊणभर विळखा घालायचा आयताच चान्स मिळाला असता. पण इथे ऊन होतं. उकडत होतं. जवळ गेलो तर जास्त गरम होईल. पावसासारखं उन्हात भिजता येत नाही. जास्तच झालं तर फारफार तर चिकट ओल्या घामानं भिजू. आता करावं काय?

'मी असं करतो, माझी उंची जास्त आहे. मी तुझ्या डाव्या बाजुला येऊन बसतो.'
'त्याने काय होणार?'

मी काही न बोलता डावीकडे जाऊन बसलो. उजवीकडे माझी थोडीशी सावली पडली. उन्हामुळे बारीक झालेले डोळे आता बॅक टू नॉर्मल मोडवर आले. मी 'कळलं मी असं का केलं?' अशा अर्थानं बघितलं. स्मितहास्य.

'थोडा असा हो ना... हा आता ठीक आहे. थँक्स.'

आम्ही थोडा वेळ बोलत बसलो. पाठनं ट्रिंग ट्रिंग करत आणि 'पानी, ठंडा पानी' असं म्हणत एक सायकलस्वार आडवा गेला. बाजुला चळवळ सुरु झाली, दोघांच्या बॅगेतला पाण्याचा साठा संपलेला होता. खालच्या ओठानं वरच्या ओठाला आतमध्ये दाबलं. नजर माझ्यावर स्थिरावली. डोळे बारीक, अर्थपूर्ण अर्धवट स्मितहास्य.

स्वाभाविकच - 'ओ भय्या, एक बिस्लेरी देना.. ठंडा है ना... हा. कितना हुआ?? पच्चीस??????' बारा-पंधरा रुपयाची बिस्लेरी हा पंचवीस रुपयांत तोंडावर मारत होता. घासाघीस करणं अशा प्रसंगी खूपच हलक्या दर्जाचं समजलं जातं. मी गपचूप पंचवीस रुपये दिले आणि भय्याकडून बिस्लेरीचा ताबा हस्तांतरित करण्यात मध्यस्थीची कामगिरी बजावली. साहजिक आहे की मला उंचावरून एक छोटासा 'ग्लग ग्लग ग्लग' होऊन, ओठांचा चंबू, तोंड पाण्यानं भरलेलं, आणि मग एक आवंढा गिळणं अपेक्षित होतं. पण जे ओष्ठ्यशिखर गाठायची माझी इच्छा होती ते त्या दहा-बारा रुपये सिक्युरिटी प्रिमिअम भरून विकत घेतलेल्या बिस्लेरीच्या बाटलीने एका झटक्यात गाठलं. मी तहानेने व्याकूळ होऊन ते दृश्य बघत होतो. तहान ज्या दोन गोष्टींची लागली होती त्या दोन्ही गोष्टी मला विसरून एकमेकांची तहान भागवण्यात मश्गुल होत्या. पाऊण बाटली संपली. उरलेलं पाणी मला मिळालं. मी का सोडतो का काय!! मीसुद्धा तोंड लावून प्यायलो. काय चव होती महाराजा!!!! अहाहाहा!! आता चेह-यावर समाधान दिसत होतं. मग त्यावर सुंदर खळ्या पाडणारं स्मितहास्य पुन्हा उमटलं. हायला!! सप्तरंगी इंद्रधनुची कमान सुद्धा फिकी दिसावी त्यापुढे. पंचवीस रुपये वसूल झाले.

'आता जरा बरं वाटतंय...' चला, पहिली पॉझिटिव्ह प्रकट प्रतिक्रिया.

मग गप्पांना जोर चढला. हळू हळू उन्हाचा आवेश कमी कमी होत गेला, थंडगार वारा वाहायला लागला. बोलता बोलता (म्हणजे, बोलणं ऐकता ऐकता) लक्ष आपसुकच समुद्राकडे गेलं. इतका वेळ गेला इथं येऊन, पण आत्ता या समुद्राकडे लक्ष गेलं माझं?? एवढ्या उशीरा? मघाशी मला फक्त माणसांनी त्या समुद्रात आणि समुद्राच्या किना-याशी केलेली घाण दिसत होती, आता त्या सगळ्यांना पुरून उरणारा समुद्र पूर्णपणे डोळ्यांत भरला. उजव्या दिशेने टवकारून ठेवलेले कान आता फक्त लाटांच्या उसळण्याचा आवाज ऐकत होते. पाठून वेगाने धावणा-या गाड्यांचा आवाज, शेजारचा आवाज, सगळं काही ऐकू येईनासं झालं. समुद्रात दूर कुठेतरी लाटा अंगावर घेणा-या एका दगडाचं टोक मला दिसायला लागलं. आत्ता मी त्या दगडावर उभा असायला हवं होतं. मी इथे काय करतोय?? अशी इच्छा होत्येय की... जावं, सरळ उडी टाकावी त्या समुद्रात, हात पाय मारावेत, दगड गाठावा आणि दोन्ही हात पसरून टायटॅनिकच्या पोजिशनमध्ये उभं राहावं. अरेच्चा, दोघंजण लागतात नाही का पोजिशनसाठी... ठीक आहे दोघंही उड्या टाकू समुद्रात त्यात काय!! मी स्वतःला त्या दगडावर उभा असल्यासारखाच कल्पू लागलो. 'आहाहा... काय मस्त वाटतंय... मस्त जोरदार वारा सुटलाय... दोघांचेही केस हवेत उडतायत.. सॉलेड रोमँटिक फील येतोय... माझ्या डोक्यावरून हात फिरतोय... कानाशी टाळ्या वाजतायत... एक मिनिट... फँटसीत काहीतरी तांत्रिक गडबड आहे. मीच हिरोईनच्या मागे उभा आहे तर माझ्या डोक्यावरून पाठीमागून कसा काय हात फिरेल?' मी दचकून भानावर आलो. दोन छक्के आम्हाला आंजारत गोंजारत भीक मागत होते. आम्ही नाही नाही म्हणून सुद्धा पिच्छा सोडेनात. मी कोणालाही भीक देत नाही. छक्क्यांना तर मुळीच नाही. आणि आता तर अजिबात नाही.... फुली फुली फुली नी माझ्या सगळ्या मूडचा, फँटसीचा विचका केला होता. पण हे छक्के जातच नव्हते.

'देऊन टाक ना पैसे... कटकट तरी मिटेल...' एका छक्क्याने सरळ माझी चप्पल उचलली आणि स्वतःच्या पायात ट्राय करून पाहायला लागला. मी गडबडीत त्याला एकमेकांना चिकटलेल्या दहाच्या दोन नोटा देऊन टाकल्या आणि सुटका करून घेतली. खरं तर मला धास्ती वाटत होती, की जिथे बिस्लेरी एमआरपीच्या दुप्पट भावाने विकली जाते तिथे भीक देण्याचा रेट काय असेल?? पण छक्क्यांचं समाधान झालं. त्यांनी पुढच्या रुसवे-फुगवे काढणा-या (एव्हाना त्यांनीही सगळं विसरून तनोमिलनास सुरुवात केली होती) युगुलाकडे मोर्चा वळवला.

'चल रे... बराच वेळ झाला आता... निघूया आई वाट बघत असेल. बाबाही आज लवकर घरी यायचेत माझे, जास्त उशीर झाला तर ओरडतील'

तेवढ्यात फोन वायब्रेट झाला.

'ओह शीट आईचा फोन... प्लीज अरे आपण निघूया प्लीज चल. बराच वेळ बसलो आपण'

माझं अद्यापी समाधान झालेलं नव्हतं. वातावरणातलं तापमान जसं खालावत होतं तसातसा मी उजवीकडे सरकून जवळीक वाढवत होतो. पण तसं बघितलं तर खरंच आम्ही बराच वेळ तिकडे बसून होतो. मरीन ड्राईव्हचा कट्टा एव्हाना गजबजून गेलेला होता. हॉटेलबाहेर माणसं वेटिंगमध्ये उभी असतात तशी इकडेसुद्धा बरीच माणसं 'कधी एकदा कोणीतरी उठतंय आणि आपल्याला तिकडे जाऊन जागा पकडता येत्येय' अशा आसुसलेल्या भावनेनं येरझा-या घालत होती. मी काहीसा नाराजीनंच उठलो. जाता जाता एकदा त्या दगडाकडे पुन्हा नजर टाकली. 'भेटू लवकरच मित्रा' असं मनातल्या मनात म्हटलं आणि चालू पडलो.

शुक्रवार, १५ नोव्हेंबर, २०१३

उगवलास तू भास्करा

पहाटे डोळे खुलले
पाहतो जग हे निजले
पान निद्रेत गळले
पर्ण दवबिंदूंनी भिजले

उमलत्या कळ्यांचा मुजरा
उमेदीचा नवा चेहरा
उजळवितो चराचरा
उगवलास तू भास्करा

का असा बसलास पाहात?
कसा गेलास सोडून साथ?
कुठे होतास अवघी रात?
का सोडलंस मला नरकात?

काल भाच्याने तोंड काळं केलं
काळोखात अमावास्येच्या नेलं
किती हे मन विषण्ण केलं
कुठेतरी भरकटत गेलं

पडझड होते जाता तू
पण आलायस परत आता तू
पृथ्वीचा थोरला भ्राता तू
प्रकाशाचा खरा दाता तू

दिपेंद्रा कशी रे तुझी लहर
दिवस येतोय जरा डोईवर
दिसशी तू होताना प्रखर
दिनकरा क्रोध हा आवर

ममता तुझी जादूयी खरी
मावळतीच्या सुखद सरी
माया करुनी ही मजवरी
माझ्यासमोर गेलास घरी

शनिवार, ९ नोव्हेंबर, २०१३

आहे मी ब्राह्मण!! मग??



आठवीनंतरच्या उन्हाळ्याच्या सुट्टीत कोकणात गेलो होतो. तिकडे एका मित्राबरोबर पैज लाऊन सात वाट्या ताक प्यायलो होतो (तेव्हाची कॅपॅसिटी तेवढीच होती). आम्हांला ताक वाढणा-या मावशींनी सहाव्यांदा वाटीत ताक ओतताना 'तुझी जात कोणती रे?' असं हळूच विचारलं.
"ब्राह्मण!!"
"वाटलंच मला!" असं हसत म्हटलं आणि निघून गेल्या. सातव्यांदा ताक ओतताना, "राग नाही ना आला?" असं विचारलं आणि मी "नाही, राग का येईल?" असं म्हटल्यावर पुन्हा हसत हसत निघून गेल्या.

नवीन नवीन मैत्री झालेल्या मित्रमंडळात मी एक गोष्ट नेहमी पाहिलीये. गप्पा मारताना सणवार, लग्न, किंवा घरातल्या इतर कोणत्यातरी समारंभाच्या विषयावरून "आम्ही अमुक अमुक जातीचे आहोत ना, आमच्यात असं असतं" असं कोणीतरी म्हटलं, की त्यावरून जातीचा विषय निघतो, आणि मग ग्रूपमधल्या निदान एकालातरी सगळ्यांची जात विचारायची खाज सुटते. तसं त्याने एक-दोघांना विचारल्यानंतर बाकीच्यांच्या चेह-यावर त्यांची पाळी आली की लगेच आपली जात सांगण्याची तयारीही दिसून येते. तशी ती माझ्यावर आली, आणि मी ब्राह्मण म्हटलं, की "तू ब्राह्मण आहेस???" अशी कोरसमध्ये प्रतिक्रिया ब-याचदा येते. मग त्यापाठोपाठ 'वाटत नाही तुझ्याकडे बघून', 'तुझ्या बोलण्याच्या स्टाईलवरून कळतं', 'वाटलंच होतं मला' अशा प्रतिक्रिया येतात. त्यांचं मला विशेष असं काही वाटत नाही. गंमत वाटते, ती 'सही रे!!!' या प्रतिक्रियेची. मी ब्राह्मण आहे, यात 'सही' काय आहे? मला कळत नाही.

एकदा आमचा एक ग्रूप क्लासच्या दिशेने चालला होता. त्यात एक 'सुबक ठेंगणी' मुलगीही होती. मी अर्थात तिला कंपनी देत होतो. आणि आमचा बोलण्याचा विषय आमच्याच ग्रुपमध्ये आमच्या पुढे चालणा-या एका मुलाचा होता.
ती मुलगी म्हणाली, 'तो मला अजिबात आवडत नाही. डोक्यात जातो.'
'का गं, काय झालं?'
'तो ब्राह्मण आहे आणि सगळे ब्राह्मण बायले असतात.'
मी थबकलो. आणि त्या मुलीकडे बघून हसलो. तशी तीही चमकली.
'तू ब्राह्मण आहेस?'
'हो!!'
'सॉरी सॉरी सॉरी... तू बायल्या नाहीयेस. पण बरेच ब्राह्मण बायले असतात.'
मी वाद घातला नाही. तिने सुद्धा माझ्या आडनावाचं एका भंडारी आडनावाशी साधर्म्य असल्याने मी ब्राह्मण कसा असा प्रश्न विचारला आणि मग तो विषय तिथेच थांबला. त्या दिवसानंतर ती मुलगी माझ्याशी तितक्याच सलगीने पुढे कधी बोल्ल्याचं मला आठवत नाही.

गप्पा मारताना मध्येच मला, 'तू ब्राह्मण आहेस का?' असं निदान पंधरा-वीस लोकांनी तरी आत्तापर्यंत विचारलं असेल. 'नाही काय आहे, तू जे नॉर्मल मराठी बोलतोस ना ते सुद्धा खूपच हाय लेवलचं आहे ना म्हणून विचारलं!' काय संबंध???? माझे कितीतरी मित्र असे आहेत, ज्यांचं मराठी माझ्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त चांगलं आहे. त्यातला एक आग्री आहे, एक क्षत्रिय आहे आणि एक महार आहे(आणि यांनासुद्धा लोक 'तू ब्राह्मण आहेस का?' असं विचारतात). इतकच नाही, तर कितीतरी ओळखीची मंडळी अशी आहेत ज्यांचं मराठी भंगार आहे आणि ते ब्राह्मण आहेत. पुण्याच्या गोडबोले नावाच्या एका मित्राची टोपी हरवली होती. ती सापडली का, असं विचारलं तेव्हा तो 'हो भेटली!' असं म्हणाला होता. माझं स्वतःचं मराठीसुद्धा तितकसं चांगलं आहे असं मला वाटत नाही. चिरणे आणि कापणे, यात माझा नेहमी गोंधळ उडतो. भाजी चिरतात, फळं कापतात हे माहितीये, पण तरीही ब-याचदा मी उलटं बोलतो.

आमच्या घरी नॉन-व्हेज खाण्यावर बंदी नाही. पण घरी आम्ही सहसा नॉन-व्हेज खात नाही, कारण कुणाला करताच येत नाही. त्यामुळे आम्हांला आमच्या शेजा-यांनी, वहिनीच्या माहेरच्यांनी, कधी हौसेने चिकन-मटन आणून दिलं, की आम्ही त्यावर मस्त ताव मारतो. वडिलांचे एक मित्र तर ब-याचदा आम्हांला त्यांच्या घरी मासे खायला बोलावतात. तरी माझे आई-वडील 'शक्यतो आपण जास्त नॉन-व्हेज खाऊ नये' असं म्हणतात. त्यामागे कारण हे, की लहानपणापासून शाकाहाराची सवय असलेल्या शरीराला एकदम नॉन-व्हेजचा पुरवठा झाला, तर त्याचे परिणाम खाल्ल्यानंतर दुस-या दिवशी सकाळी दिसून येतात. हॉटेलात मित्रमंडळींबरोबर नॉन-व्हेज खात असताना मात्र बरेच अब्राह्मण मित्रच माझ्या नॉन-व्हेज खाण्यावर आक्षेप घेताना दिसतात. मी तर श्रावणात सुद्धा नॉन-व्हेज खातो. 'तू ब्राह्मण ना, मग नॉन-व्हेज कसा काय खातोस?' अशी मला विचारणा होते. 'काही फरक पडत नाही. हल्ली सगळेच ब्राह्मण खातात.' असं मी म्हटलं, की माझ्या वाक्याला पुष्टी जोडणारी उदाहरणं सुद्धा मिळतात, आणि, 'नाही हा, आमच्याइकडे एक ब्राह्मण आहेत, जे नॉनव्हेज असलेल्या टेबलावर बसत सुद्धा नाहीत' 'आमचा एक ब्राह्मण मित्र नॉन-व्हेज तर खातो, पण घरी जाऊन स्वत:वर गोमुत्र शिंपडून घेतो.' असे किस्सेसुद्धा ऐकायला मिळतात. 'तुझ्या घरी माहितीये का तू इथे नॉन-व्हेज खातोस ते? तुला घरचे काही बोलत नाहीत?' असं लोक विचारायला लागले, की माझं एक लांबलचक उत्तर रेडी असतं. "पूर्वी शिक्षणाची मक्तेदारी ब्राह्मणांकडे होती. शिक्षण घेण्याची, किंवा देण्याची सगळ्याच जातीच्या लोकांना अनुमती नव्हती. आता बघा, शिक्षण देण्या-घेण्याचा अधिकार हा सगळ्या जातीच्या लोकांना समान आहे. तसंच पूर्वी ब्राह्मणेतर नॉन-व्हेज खायचे. आता सगळ्यांबरोबर ब्राह्मणही नॉन-व्हेज खाऊ लागले तर काय बिघडलं?" शरीराला पचत नाही, वासाचा त्रास होतो, दुस-या जीवाला मारून खाणं पटत नाही, म्हणून नॉनव्हेज कुणी खात नसलं तर ठीक आहे. पण 'मी ब्राह्मण आहे, म्हणून मी नॉन-व्हेज खाणार नाही', असा विचार करणारा माणूस (जो जन्मामुळे ब्राह्मण आहे) मागासलेल्या विचारांचा आहे असं नाही का म्हणता येणार??

विशिष्ट भाषा-जाती-धर्म-प्रांताच्या लोकांतील काही गुणांत-अवगुणांत साधर्म्य आढळतं हे मान्य!! पण ते एखाद्या जातीच्या सर्वच व्यक्तींत, सर्वच बाबतीत आढळून यावं असं तर नाही ना. आज समाजात अशी ब्राह्मण मंडळी आहेत, जी स्वतःला ते ब्राह्मण असल्यामुळे जास्त श्रेष्ठ समजतात. आणि त्यांचं हे मत उघडपणे मांडतात सुद्धा. बरीच अशी मंडळीही आहेत, जी ब्राह्मण असूनही ब्राह्मणांनाच शिव्या घालतात. पण काही अशी मंडळीसुद्धा आहेत, ज्यांना आपण ब्राह्मण असल्याचा गर्वही नाही, लाजही नाही. ब्राह्मणतेरात काही अशी मंडळी आहेत, जी ब्राह्मणांचा ते ब्राह्मण आहेत म्हणून द्वेष करतात. तर काही अशी मंडळी आहेत, ज्यांच्या मनात एखादा माणूस ब्राह्मण आहे हे कळल्यावर त्याच्याविषयी कौतुक आणि आदर वाटायला लागतो.

जातीवरून माणूस चांगला की वाईट, हुशार की मठ्ठ, हे ठरवणं चुकीचं आहे. जातीचा दुराभिमान बाळगणारे, जातीवरुन लोकांना संघटित करणारे, जातीविषयी लाज बाळगणारे, जातीच्या अशा मानल्या गेलेल्या जुन्या रुढी परंपरा जपणारे, आणि जातीची यत्किंचितही पर्वा नसणारे असे लोक हे सगळ्या जातींत असतात. तेव्हा ठरावीक लोकांच्या स्वभावावरुन अख्ख्या जातीचं चारित्र्य ठरवणं हा मूर्खपणा आहे. हे फक्त ब्राह्मणांच्या बाबतीत होतं असं नाही. त्यामुळेच इथे ब्राह्मण-ब्राह्मणेतर असा मुद्दाही मांडायचा नाही. सगळ्याच जातींच्या बाबतीत होतं. मी ब्राह्मण जातीचा आहे त्यामुळे मी ब्राह्मणांबद्दल माझ्या अनुभवातून सांगितलं. दुस-या जातीचा असतो, तर फक्त नाव आणि उदाहरणांचं स्वरूप बदललं असतं, मुद्दा तोच राहिला असता.

बुधवार, ६ नोव्हेंबर, २०१३

तू गेलीस मला सोडून

तू गेलीस मला सोडून
म्हणून मी जगायचं थांबलो नाही
तू लांबवलंस मला तुझ्यापासून
म्हणून मी तुझ्यापासून लांबलो नाही
तरी पुढे करायचं काय ते कळेना मला
माझंच मेलेलं मन मिळेना मला
मन कुठेतरी हरवलं होतं,
आणि काय करायचं ते वेंधळ्यासारखं
मी मनातल्या मनातच ठरवलं होतं
काय करायचं होतं आयुष्यात ते मला आठवेना
मेंदू बधिर झाला माझा, एकही ऑर्डर पाठवेना
कल्पकता मेली माझी, डोळे मिटले की तू दिसायचीस
स्वप्नांनाही कंटाळलो मी, कारण त्यांतही तूच असायचीस
मी हसलो, की तुझं हसू आठवायचं
मी रडलो, तरी तुझं हसूच आठवायचं
तुझ्या डोळ्यातली आसवं मला ना कधी बघवत होती
तुझ्या हस-या चेह-याची आठवणच मला जगवत होती.
तू भांडायचीस तेव्हा मी चिडायचो
मी चिडलो, की तुलाही पिडायचो
मूड तुझा सदैव रोमॅन्टिक दिसायचा
प्रेमाचा वर्षाव जायगँटिक असायचा
मी जरी कामात स्वतःला रखडून घेतलं होतं
तरी प्रेमाच्या पाशात तुझ्या जखडून घेतलं होतं
लाजाळूशा शेमेत, सोनेरी अशा हेमेत,
खेळकरशा गेमात, प्रेमळ अशा प्रेमात,
तू मला कायमचं गुंफून टाकलं होतंस
कधीही न संपणा-या जीवनाच्या मैलावर
माझ्यासारख्या या अगदी अरसिक बैलावर
प्रेमाचं औतं तू जुंपून टाकलं होतंस
बदललीस कशी अशी अचानक तू
प्रेमाची राक्षसी भयानक तू
मला विसरलीस मला सोडलंस
त्याच्यावर भाळून त्याला धरलंस,
माझ्यावर केलेलं वेडंखुळं प्रेम
जाऊन तू त्याच्या साच्यात भरलंस
आणि आज अशी एकदम मला आडवी आलीयस तू
त्या गाढवावर प्रेम करून गाढवी झालीयस तू
आज त्यादिवसापेक्षा कितीतरी गोड वागत्येस
दुसरी संधी निलाजरेपणे माझ्याकडे मागत्येस
कल्पना तरी आहे का मनाला
माझ्या किती पडल्यात भेगा
खैर आजा वापस कातिल-ए-दिल,
तू भी क्या याद रखेगा!!

सोमवार, ४ नोव्हेंबर, २०१३

फुकणं वाईट, फुकाडे नव्हे.

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या मते दरवर्षी ५०लाखांहून अधिक माणसे तंबाखूशी संबंधित असलेल्या आजारांमुळे मृत्यूमुखी पडतात. फुकण्याने तुमच्या आरोग्यावर परिणाम होतो; शारीरिक तसेच मानसिक आरोग्यावर परिणाम होतो. तुमची भूक मरते, वजन कमी होतं, हृदयरोग, कॅन्सरसारखे आजार होतात.

जनमानसातही धूम्रपान हे तुमच्या प्रतिमेला काळिमा फासण्यास कारणीभूत ठरते. पूर्वी सगळेच हिरो, व्हिलन, चित्रपटातली इतर पात्रं ही ऑनस्क्रीन स्मोकिंग करताना दिसायची. अजुनही दिसतात, पण तरी प्रमाण बरंच कमी आहे असं म्हणायला हरकत नाही. तेव्हाची परिस्थिती ठाऊक नाही, पण निदान आता तरी, एखादा माणूस फुकतो म्हटल्यावर तोपर्यंत त्या माणसाबद्दल मनामध्ये असणा-या आदरात नॉन-स्मोकर्सच्या मनात कमी-अधिक प्रमाणात घट होते. माणसाच्या तोडांला सिगरेटचा नाहीतर/आणि मिंटचा वास येतो, त्याचे ओठ काळे पडतात, तो सतत खोकत राहतो. त्याची बोटं काळी-निळी पडतात, इ. या सगळ्या कारणांमुळे त्या व्यक्तीच्या जवळ जाणेदेखील बरेच नॉनस्मोकर्स शक्यतो टाळतात. सार्वजनिक ठिकाणी खुलेआम स्मोकिंग करण्यावर निर्बंध घातल्याने ही स्मोकिंग करणारी मंडळी एका विशिष्ट ठिकाणी एकत्र स्मोकिंग करत उभी असताना दिसतात. (विशेषतः) कॉलेजमध्ये एखाद्या 'स्टायलीश आणि कूल' ग्रूपमधल्या एखाद्या मुलाला आपण त्याची सिगरेट पेटवून दिल्याने त्या ग्रूपमध्ये एन्ट्री मिळण्याची, किंवा निदान त्यांच्याशी ओळख होण्याची 'संधी' आपल्यासाठी निर्माण झालीये, ही भावनाही याच अड्ड्यांवर बळावते. या किंवा अशाप्रकारे लोकांना 'स्मोकिंग बडीज' मिळतात. पण या ग्रूप्सबद्दल जर जनमानसात वाईट मतं प्रचलित असतील (उदा. वाया गेलेली मंडळी) तर अशा माणसांबरोबर फुकताना दिसलो गेल्याने काही लोक आपल्याबद्दलही तेच मत बनवतात हे सगळ्यांच्या लक्षात येतं असं नाही. याचे पडसाद त्या व्यक्तीच्या वैयक्तिक आयुष्यात उठू शकतात, उठतात.

सध्या धूम्रपानविरोधी जनजागृतीचं प्रमाण वाढत चाल्लंय. सरकारसुद्धा चांगल्या आणि सूचक जाहिराती दाखवून धूम्रपानविरोधी जनजागृती करतंय. न्यूजपेपरात धूम्रपानाच्या दूष्परिणामांसबंधी विविध संशोधनांची, बातम्यांची, अनुभवांची माहिती छापून येत असते. स्मोकिंगवर काही नाटक-सिनेमातूनही भाष्य केलं जातं. स्मोकिंग वाईट हा संदेश स्मोकिंगला तीव्र विरोध करणारे सामान्य लोकसुद्धा आपापल्या परीने समाजात पसरवत असतात. एवढं सगळं असूनही, अजुनही, व्यसनाच्या वाटेवर नेऊन सोडणारा तो सिगरेटचा पहिला 'झुरका' घ्यायला नॉनस्मोकर्स प्रवृत्त का होतात???

यामागे बरीच कारणं आहेत.

संगतका असर
स्मोकिंगची सवय लागण्यामागचं हे एक मोठ्ठं कारण असू शकतं. साधारणतः टीनेजर्स, कॉलेजमधली मुलं, या वयात त्यांच्या शरीरात, मनावर, विचारांत घडणा-या सर्व बदलांमुळे 'आपली परिस्थिती समजून घेण्याची शक्यता' जास्त वाटणा-या समवयीन मुलांमध्ये मिसळतात. मानसिक आधारासाठी कुटुंब आणि शिक्षकांपेक्षा मित्रांवर जास्त विसंबून राहतात. इथेच जर एखादा स्मोकिंगच्या आहारी गेलेला 'सच्चा' मित्र गवसला, तर कल्याण झालंच म्हणून समजा. प्रत्येक व्यक्तीची स्वतःवर नियंत्रण ठेवण्याचीदेखील सीमा असते. ती सीमा ओलांडली, की मित्राच्या हातातली सिगरेट, 'बघू रे जरा आज मी ट्राय करून बघतो' असं म्हणून आपल्या हातात येते आणि सवयीचा श्रीगणेशा होतो.

कुतूहल
कुतूहल हे सोबतीच्या लोकांच्या सवयी बघून किंवा असंच रस्त्यात येता-जाताना, सिनेमात बघताना, पालक 'असं नाही करायचं' म्हणतात म्हणून निर्माण होऊ शकतं. काही लोकांना डेअरींग करायची सुद्धा हौस असते. डेअरिंग किंवा कुतूहल म्हणून घेतलेला हा झुरका आवडतो आणि सवय लागते.

मित्रप्राप्ती
वर सांगितल्याप्रमाणे स्मोकिंग बडीज मिळण्याच्या आशेने ही सवय लागू शकते.

पालकांचं अनुकरण
फुकणा-या पालकांच्या मुलांना स्मोकिंगची सवय लागण्याची शक्यता न फुकणा-या पालकांच्या मुलांच्या तुलनेत खूप जास्त
असते. पालकांचं बघून मुलं शिकतात आणि जर लहानपणापासून मुलांनी पालकांना फुकताना पाहिलं असेल, तर थोडं मोठं झाल्यावर मुलंसुद्धा चोरीछुपे (प्रसंगी ब्रॉडमाइन्डेड पालकांसमवेत) झुरके मारताना दिसून येतात.
या टेन्डन्सीचं एकच उदाहरण देतो, एकदा एका फॅमिली रेस्टॉरंट मध्ये बसलो होतो. आई-बाप-मुलगा-मुलगी असं कुटुंब होतं. बापाने जेवणाबरोबर दारू मागवली आणि आपली अख्खी फॅमिली बोलण्यात गुंतलीये हे बघून तो ७-८ वर्षांचा लहान मुलगा बापाचा दारूचा ग्लास जवळ घेऊन हळूच प्यायला गेला. तेवढ्यात नशिबाने सगळ्यांचं त्याकडे लक्ष गेलं, पण हे नशीब त्यांना कितीसं काळ साथ देईल कोणास ठाऊक!

चुकीची माहिती
सिगरेटमुळे किक बसते, आपण जागरूक राहतो, ताण-तणाव कमी होतो, मस्त वाटतं, इ. लोकांचे अनुभव, तसंच 'अरे हल्ली फ्लेवर्ड आणि लाईट सिगरेट्स मिळतात, त्यात तंबाखू नसतो. त्या सेफ असतात त्यात काही नसतं.' किंवा 'अरे हा ब्रँड तितकासा डेंजरस नसतो. घे बिनधास्त याने काही होणार नाही' असं सांगणारी मंडळी दिमतीला आली, की आपल्या कुतूहलाला, सुप्त वासनेला वाव द्यायची आयतीच संधी लोकांना मिळते.

मानसिक संतुलनावर उपाय आणि मिडिया
सिगरेटचा ड्रगसारखा वापर तणाव, डिप्रेशन, भिती, यासारख्या मानसिक विकारांवर उपाय म्हणून मोठ्या प्रमाणावर केला जातो. आणि हल्ली फॅशन, हिरोईनसारख्या किंवा 'द लास्ट लेअर' सारख्या चित्रपटांतून 'माणूस डिप्रेस झाला की स्मोकिंग करायला लागतो' हे त्याची अधोगती होते हे सूचकपणे दाखवण्याच्या उद्देशाने दर्शवलं जातं आणि नेमका त्याचा उलटा परिणाम होऊन डिप्रेशन वर उपाय म्हणून लोक सिगरेटच्या आहारी जातात.

ही सवय वाईट आहे हे मनापासून जाणवल्यानंतरही ती सुटता सुटत नाही... का? याचं कारण एका मित्राला विचारलं असता तो म्हणाला, 'माझ्या शरीराला स्मोकिंगची सवय झालेली आहे आता. मी जरा जरी फ्रस्टेट झालो, इरिटेट झालो, की लगेच फुकायची तल्लफ येते. नाही फुकायचं म्हटलं तर डोक्यात कळ येते, घसा कोरडा पडतो, आणि त्रास व्हायला लागतो. त्यामुळे सवय ही एकदा ठरवलं आणि सुटली असं होत नाही, हळू हळू सोडावी लागते.' - यात किती तथ्य आहे माहिती नाही, पण शेवटी एकेकाचं स्वतःवर किती नियंत्रण आहे त्यावरच शेवटी सगळं काही अवलंबून असतं.

असं मानलं जातं की प्रत्यक्ष स्मोकिंग केल्यापेक्षा सेकंड हँड स्मोकिंगने म्हणजेच पॅसिव्ह स्मोकिंगने माणसाला जास्त त्रास होतो. यात भरपूर तथ्य आहे. सत्य घटना सांगतो. एक गृहस्थ चेनस्मोकर होता. त्याचं लव्ह मॅरेज झालं. नवरा फुकायला बाहेर गेला तर दारू पिऊन घरी येतो, आणि काही केल्या स्मोकिंगला आवर घालता येईना म्हणून 'तुम्ही घरीच बसून फुकत जा' असं बायको म्हणाली. लग्नानंतर अवघ्या तीन वर्षांत ती लंग कॅन्सरनं मेली. मेडिकल रिपोर्टमध्ये तिच्या बरगड्यांची अक्षरशः राख झाल्याचं आढळून आलं.

स्वतःचा विचार जास्त करणारे, आणि स्वतःआधी दुस-यांचा विचार करणारी मंडळी असतात. हे प्रकार अर्थात स्मोकर्समध्ये सुद्धा आढळून येतात. पहिल्या प्रकारात मोडणा-यांना त्यांच्या स्वतःच्या आरोग्यावरील परिणामांची आणि दुस-या प्रकारात मोडणा-यांना त्यांच्या आप्तेष्टांच्या आरोग्यावरील परिणामांची योग्य जाणीव करून देत राहण्याखेरीज सध्यातरी आपल्याकडे दुसरा पर्याय नाही. कारण स्मोकिंग विरोधी अधिक कायदे आणि त्यांची अंमलबजावणी होण्यास किती कालावधी लागेल आणि तोवर किती जण या स्मोकिंगचे बळी पडतील काही कल्पना नाही.

शेवटी एवढंच म्हणेन, की फुकण्याची सवय वाईट असते, फुकणारी समस्त मंडळी नाही. कारण ही सवय तुम्हा-आम्हा कोणालाही जडू शकते. तेव्हा या सवयीत अडकलेल्यांची परिस्थिती समजून घेऊन त्यांना त्यातून बाहेर पडण्यात मदत करणे हे सर्वांच्याच हिताचे होईल. आणि कोणास ठाऊक त्यामुळे आपल्याला 'नो-मोअर-स्मोकिंग बडीज'ही मिळतील.

शनिवार, २ नोव्हेंबर, २०१३

तू उत्तर नाही दिलंस मला

तू उत्तर नाही दिलंस मला
मी एक प्रश्न विचारला
का तुझ्यातल्या नव-याने
आज माझ्यावर हात उगारला?

तू उत्तर नाही दिलंस मला
हवं तर पुन्हा विचारते
तुझ्या चुकांचं खापर मी
का डोक्यावर माझ्या मारते?

तू उत्तर नाही दिलंस मला
मी केव्हाची वाट पाहत्येय
संसार अधोगतीच्या प्रवाहात जातोय
आणि मीही त्यात वाहत्येय

तू उत्तर नाही दिलंस मला
उलटून बोलतोयस तू फक्त
तुझ्यासारखाच मीही जाब विचारला
तर का खवळतंय तुझं रक्त?

तू उत्तर नाही दिलंस मला
आता वाट पाहून मी थकले
तुझा विश्वास मिळालाच नाही
आज तुझ्या प्रेमालाही मी मुकले

सोमवार, ७ ऑक्टोबर, २०१३

इंग्लिश मिडियम!! कशाला??

गेल्या आठवड्यात एकदा रस्त्यावरून चाल्लो होतो तेव्हा रस्त्याच्या पलिकडच्या बाजुने एक हत्ती जात होता(लोकांकडून त्याच्या माहुतासाठी पैसे आणि स्वत:साठी खायला जे काय मिळेल ते मिळवत...). माझ्या समोरुन मला एक आई तिच्या लहान मुलीला घेऊन येताना दिसत होती. ती आपल्या मुलीचं लक्ष त्या हत्तीकडे वेधत होती. तेवढ्यात त्या गजराजाने भर रस्त्यात भलामोठ्ठा प्रसाद दिला. तशी ती बाई मोठ्ठ्याने आपल्या मुलीला म्हणाली, ‘‘ते बघ शर्वरी, एलिफंटने शीऽऽ केली!!’’ मला त्या हत्तीचा ताजा पो बघून वाटली नसेल एवढी किळस त्या बाईचं वाक्य ऐकून वाटली. ही कसली पद्धत मुलांना इंग्लिश शिकवायची? आणि नाहीतरी त्यांना इंग्लिश मिडियमात घातलंच आहे तर मग शाळेत शिकतील की ती इंग्रजी. निदान एरव्ही बोलताना तरी सरळ मातृभाषेत बोला. आमच्या इथल्या एका काकूबाईंना आपल्या मुलीला, ‘‘हे बघ स्टडी कर नाहीतर गॉड तुला पनिश करेल हा!’’ असा दम भरतानासुद्धा ऐकलंय मी. हे सगळं ऐकल्यावर आधी पोट धरुन हसायला येतं खरं, पण नंतर त्याबद्दल विचार केला की तितकंच वाईटही वाटायला लागतं. माझी आजी नेहमी म्हणते, की माणसाने बोलताना एकाच कोणत्यातरी भाषेत बोलावं. मराठीत बोलताना मराठीत, इंग्रजीत बोलताना इंग्रजीत. एका भाषेत बोलताना उगाच दुसऱ्या भाषेचे शब्द वापरू नयेत. मला ते नेहमीच पटत आलेलं आहे. इंग्रजी ही इंटरनॅशनल लँग्वेज आहे, इंग्रजी फ्लुएंटली बोलता येणं ही काळाची गरज आहे, त्यामुळे आपलं मूल हे इंग्लिश मिडियमात शिकलं तर स्मार्ट होईल, पुढे अभ्यासात मागे पडणार नाही, कॉलेजात इंग्लिश नीट बोलता न आल्याने उगाच त्याला कॉम्प्लेक्स येणार नाही, पुढे आयुष्यात सुद्धा त्याला काही त्रास होणार नाही, तेव्हा आपण त्याला इंग्लिश मिडियममध्येच घालूया... आणि त्याच्या आयुष्याचं कल्याण करुया!! असं ठरवून आजचे आई-बाबा मुलांना इंग्रजी शाळांमध्ये घालतायत. त्यात आपल्या धन्य सरकारच्या शिक्षणविषयक धन्य धोरणांमुळे मराठी माध्यमाच्या शाळांची धुळधाण उडत चाल्लीये, आणि परिणामी मराठी माध्यमात घालायची ईच्छा असूनही केवळ मराठी शाळांमध्ये नीट शिकवलं जात नाही, अशा समजूतीमुळे नाईलाजास्तव(किंवा ते निमित्त पुढे करून) आई-बाबा आपल्या प्रिय पाल्याला इंग्लिश मिडियममध्ये टाकतात. मग मुलाच्या कल्याणाची सुरुवात होते. सुरुवात केजीपासून(आजकाल खरं तर प्ले ग्रूपपासून...) होते. मराठी माध्यमातला, शिशुवर्गातला, जुनाट वाटणाऱ्या साध्या रंगसंगतीच्या गणवेशातला शेंबडा मुलगा फुकटात किंवा नगण्य किंमतीत शिक्षण घेत असतो. आणि इंग्रजी माध्यमातला, पॉश युनिफॉर्ममधला, केजीतला, स्मार्ट दिसणारा(त्याला शेंबूड येत नाही वाटतं) मुलगा शिक्षण घेण्यासाठी वर्षाचे किती रुपये मोजत असतो? जास्त नाही, फक्त 60-70 हजार!! हो, फक्त केजीसाठी साठ-सत्तर हजार मोजणारे पालक आहेत आज, इंटरनॅशनल स्कूलमध्ये आपल्या मुलाने शिकावं अशी ईच्छा असते ना त्यांची! त्याने त्यांची किंवा त्यांच्या मुलाची कुली सोन्याची होत असावीत, त्याशिवाय केजीसाठी एवढे पैसे मोजण्यात काय अर्थ आहे, हे मला कळत नाही. इतकंच नाही, या केजीतल्या मुलांना होमवर्क सुद्धा असतो म्हणे!! अहो, तिसरीपर्यंत मला गृहपाठ या शब्दाचा अर्थच माहिती नव्हता, आणि या मुलांना सरळ केजीपासून होमवर्क?? काय? तर अक्षरं गिरवा वगैरे... त्यासाठी या मुलांची ट्युशन्स घेणारी मंडळीसुद्धा आहेत बरं का! केजीत शिकवण्या?? एक काळ असा होता की शिकवणीला जावं लागलं, की मुलं लाजेने ओशाळून जायची. बरं या शिकवण्यासुद्धा शाळेचे शिक्षक फुकटात घेत असतील. आणि आता केजीसाठी ट्युशन्स?? वयाच्या चौथ्या-पाचव्या वर्षी, मुलांच्या बोटांच्या हाडांची रचना/वाढ तरी पूर्ण झालेली असते का? अशा स्थितीत त्यांना गाढवासारखी गिरवागिरवी करायला लाऊन त्यांच्या बोटांच्या रचनेची वाट नाही का लागणार? मला आठवतंय तेवढं शिशुवर्गात मी असताना आम्हांला नुसती अक्षरओळख करुन दिली होती. चित्रं दाखवून प्राण्यांची ओळख करुन दिली जायची. आणि असाच काहीतरी साधा-सोपा, शिशुवर्गाला साजेलसा अभ्यासक्रम असायचा. अभ्यास कसला, नुसती धम्माल होती सोमवार ते शुक्रवार रोज दोन तास फक्त. केजीत कुणी नापास व्हायचं नाही, आणि कोणी करुही नये. आता प्रायमरीत जाऊया. पहिलीत आल्यानंतर माझ्या हातात आधी पाटी-पेन्सिल आली. त्या पाटीवर अर्धा-एक महिना सराव केल्यानंतर वही-पेन्सिलशी ओळख झाली. तेव्हा आधी आम्हांला, //??!’()+- अशी चिन्हं काढायला शिकवलं. त्यानंतर बाराखडी, मग पुढचं सगळं. प्राथमिक शाळेत अगदी पहिल्यापासून हात व्यवस्थित जोडून (अंगठे सुद्धा बोटांच्या रेषेत सरळ ठेऊन) याकुंदेंदुतुषारहारधवला चालीत म्हणायची सवय लावली गेली. स्तोत्रांना वार दिले गेले होते. मंगळवारी प्रणम्यशिरसादेवं, शनिवारी भीमरूपी महारुद्रा; दहा मनाचे श्लोक आणि सगळी रामरक्षा हे आम्ही रोज म्हणत असू. त्यामुळे उच्चार स्वच्छ, स्पष्ट आणि शुद्ध व्हायला मदत झाली. दुसरीत गेलो तेव्हा पहिलीपासूनच मराठी माध्यमाच्या शाळांमधून इंग्रजी विषय सुद्धा शिकवण्याची योजना अंमलात (काळाची गरज नाही का!) आली. तेव्हा चौथीपर्यंत इंग्रजीची फक्त तोंडी परीक्षा घेतली जाऊ लागली. लेखी माध्यमिकमध्ये गेल्यावर. मी म्हणे आधी जरा बोबडा होतो. पण प्राथमिक शाळेत आल्यानंतर माझी वाणी, माझे उच्चार व्यवस्थित सुधारले. सगळ्यांच्याच बाबतीत होतं असं नाही, पण इंग्रजी माध्यमात गेलेल्या आणि तोतल्या राहिलेल्या बऱ्याच मुलांना पाहिलंय मी. त्यांच्या घरी कोणी तोतरं नाही किंवा त्यांची जीभही मुळात जड नाही. तरीही ही बोबडेपणाची अडचण! कशामुळे? कारण ज्या वयात शुद्ध-स्पष्ट बोलायची सवय लावायला हवी, त्या वयात हाय-फाय आणि स्टायलीश शैलीची इंग्रजीच फक्त काय ती शिकवली गेल्याचा हा परिणाम! माध्यमिक शाळेत गेल्यानंतर तर आनंदीआनंद होता. तरी मराठी माध्यमात आल्यामुळे कधीही अभ्यासात पाठी पडायची वेळ आली नाही. इंग्रजी हा तर माझा सर्वात लाडका विषय होता. पण मी माझी ही इंग्रजीविषयीची आवड अभ्यासापुरतीच मर्यादित ठेवली. कोणी म्हणालं, तुझं ठीक आहे रे, तू हुशार आहेस म्हणून निभावून नेलं. म्हणजे?? मूल मूळातच हुशार असलं, तर मराठी काय आणि इंग्लिश मिडियम काय, ते अभ्यासात चमकेलच... त्यावर भाषेच्या माध्यमाचा फारसा परिणाम होत नाही. उलट जर एखाद्या मुलाची बौद्धिक पातळी कमी असली, तर त्याला तो स्मार्ट होईल, या आशेने इंग्लिश मिडियममध्ये घालणं घोडचूक ठरतं. उलट त्यांना मराठी माध्यमातून शिक्षण घेणं सोप्पं जातं. याचा अर्थ मराठी इंग्रजीच्या तुलनेत सोप्पी आणि म्हणून थुकरट आहे असा होत नसून, त्यामागचं कारण ‘कोणत्याही व्यक्तिला कधीही कोणतीही गोष्ट आपल्या घरी बोल्ल्या जाणाऱ्या आपल्या मातृभाषेतून समजावली, की लवकर लक्षात येते; तीच गोष्ट परकीय भाषेतून समजावणं अवघड जातं’, हे आहे. त्यामुळे बौद्धिक पातळी कमी असणारी मुलं जर इंग्लिश माध्यमात गेली, तर मराठीत राहून पडली नसती एवढी मागे पडतात, लहानपणातच ताणतणावाने हैराण होतात, प्रसंगी त्यांचं मानसिक संतुलनही बिघडण्याचा संभव असतो. आणि याची जिवंत उदाहरणंसुद्धा मी पाहिलीयत. पण आपल्या मुलाची बौद्धिक पातळी कमी आहे, हे कोणता पालक म्हणायला तयार होईल? तेही तो मुलगा अवघा चार वर्षांचा असताना? अशावेळी आपल्या बौद्धिक पातळीवरून मुलाच्या बुद्ध्यांकाचा अंदाज बांधून निर्णय घेतला, तर तो मुलाच्याच हिताचा ठरतो नाहीका? याचा अर्थ सगळ्या ढ मुलांनी मराठीत जावं, आणि हुशार मुलांनी इंग्रजीत, असा अजिबात होत नाही. हुशार मुलांनी सुद्धा मराठीतच जायला हवं. कारण तेच, सवयीच्या भाषेतून शिक्षण घेतल्याने त्यांना इंग्रजी माध्यमात मिळाला नसता एवढा वाव मराठीतून शिक्षण घेतल्याने मिळू शकतो. आणि मराठीला कैवारी हवाच नाहीका? वाचनाची आवड सगळ्यानाच नसली, तरी बऱ्याच मुलांना असते. वाचणारी मुलं वाचतातच. वाचनाच्या सवयीत इंग्लिश-मराठी माध्यम हा मुद्दा येत नाही. पण मराठीतून शालेय शिक्षण घेतलेली, आणि मराठीबरोबरच इंग्लिश पुस्तकं वाचणारी मुलं बरीच दिसतात. त्याउलट, इंग्लिशमधून शालेय शिक्षण घेतलेली, आणि वाचनाची आवड असलेली मुलं, ही मराठी पुस्तकं वाचताना कमीच आढळून येतात. अर्थात, ठरावीक घरांच्या इतर संस्कारांमुळे यात अपवाद आढळून येऊ शकतात, पण तरीही ते कमीच... ‘अहो पण पुढे कॉलेजात गेल्यावर इंग्लिश फाडफाड बोलणाऱ्या मुलांमध्ये आमच्या मुलाला कॉम्प्लेक्स येईल त्याचं काय?’ काही होत नाही. कॉम्प्लेक्स येत नाही असं माझं म्हणणं नाही, मलाही आला होता. पण साता-समुद्रापार राहणाऱ्या गोऱ्या चामडीच्या ज्या डुकरांनी माझ्या देशाला सतत दिडशे वर्षं लुबाडलं, त्या लोकांची भाषा फाडायला मला जमत नाही, याविषयी यत्किंचितही लाज बाळगावी असं मला वाटत नाही. याउलट इंग्रजीतून शिक्षण घेणाऱ्या मुलांची अवस्था, निदान सांस्कृतिकदृष्ट्या तरी खूप वाईट असते असं माझं स्पष्ट मत आहे. ङ म्हणजे ड वर डॉट, आणि ञ हे ज सारखं काहीतरी अक्षर आहे असा समज; ळ, ण चे चुकीचे उच्चार; स्त्रीलिंगी-पुल्लिंगी असा काही भेदभाव न करता सगळ्या शब्दांना सरळ नपुंसक करुन टाकणे; सामान्यरूप, विभक्तीप्रत्यय कशाशी खातात हे माहिती नसल्याने गहूची पोळी, विज्ञानची वही असे शब्दप्रयोग हे या मुलांमध्ये हमखास दिसून येतात आणि ही मुलं स्वत:चं यामुळे वेळोवेळी हसं करून घेतात. अर्थात अशा मुलांची संख्या आज हसणाऱ्यांपेक्षा जास्त असल्याने त्यांना काही फरक पडत नसावा. उदाहरण दिल्याशिवाय माझंच समाधान होणार नाही म्हणून एक किस्सा सांगतो. एकदा शाळेच्या मधल्या सुट्टीत आमच्या इंग्रजी माध्यमाच्या मित्रांबरोबर आम्ही मराठी मिडियममधली मुलं गप्पा मारत उभी होतो. एक इंग्रजीचा मुलगा सारखं, ‘माझी चुकी नाही, तुझी चुकी आहे’ असं म्हणत होता. शेवटी मला न राहवून मी म्हटलं, ‘अरे, चुकी नाही रे, चूक! चुकी हे सामान्यरूप झालं!’ तर तो मुलगा ‘तेच रे ते! काय फरक पडतो?’ असं म्हणाला. मी म्हटलं, ‘सॉरी बाबा, तुला समजवायला गेलो ही माझीच मिस्टूक झाली!’ तसे सगळेजण एकसुरात ‘मिस्टेक!!!’ असं ओरडले. मी लगेच ‘तेच रे ते! काय फरक पडतो?’ असं म्हटल्यावर हशा पिकला. नुकत्याच आई झालेल्या माझ्या काही मावश्यांना मी 'काय? मराठी मिडियम ना?' असं विचारलं, की 'शीऽऽऽऽऽ मराठी काय??' असं ब-याचदा ऐकावं लागतं. मराठी शाळांचा दर्जा खालवतोय, तेव्हा मराठीसाठी असलेल्या कळवळ्यापोटी आपल्या मुलांचं आयुष्य का बर्बाद करु, असा विचार करुन जर इंग्रजीत घालत असाल, तर विचार जरा बदला. आज तुम्ही मुलांना मराठीत घालून एक उत्तम उदाहरण लोकांसमोर ठेवलंत, तर आणि तरंच उद्या मराठी शाळांसाठी मागणी वाढेल. तुमच्या मुलांना मराठीचे कैवारी करा, तुमची मुलं चमकतीलच, मराठीही चमकू लागेल.

गुरुवार, ७ मार्च, २०१३

निसर्ग आणि माणूस

जन्मलो तेव्हा मला खूप अक्कल होती. कारण् तेव्हा मला माहित होतं, हे जग किती घाण आहे ते. म्हणून तर आल्या आल्या रडायला लागलो. पण घाणी राहून आपण ही घाण होतो, म्हणून असेल, किंवा मी रडून रडून कंटाळलो असेन, म्हणून असेल - मी रडायचा थांंबलो. मग वय हळू हळू वाढत गेलं, आणि अक्कल भरा भरा कमी होत गेली. मग पुन्हा नव्याने सुरुवात करावी लागली. नर्सरी म्हणू नका, केजी म्हणू नका, शाळा म्हणू नका, कॉलेज म्हणू नका... सगळं पालथं घातलं. आणि आत्ता कुठे, मी गमावलेल्या अकलेचा एक टक्का परत मिळवल्याची जाणीव होत्येय. इथे निसर्गाचा एकच कायदा आहे. आपण जगायचं, दुसऱ्याला मारायचं. सर्व्हायव्हल्‌ ऑफ द फिटेस्ट! माणूस निसर्गाच्या वर चढू पाहतोय म्हणतात. शक्यच नाही. निसर्गाने मानवाला जसा तयार केलाय, तसाच तो वागतोय. तो कोणतेच नियम तोडत नाही. मानवाने इतर प्राण्यांची शिकार केली, म्हणून आज काही प्रजाती नष्ट होतात. इतिहासात मानव यायच्या आधीही बऱ्याच प्रजाती नष्ट झाल्यात की. आणि शिकार काय माणूसच करतो? वाघ, सिंह, बिबट्या, तरस, लांडगे, चित्ता, असे भरपूर पशू आहेत. मानव हा सुद्धा पशुच. मानवाला पशु म्हटल्याने ना पशुंचा अपमान होतो, ना मानवाचा. कारण खरंच तो पशुच आहे, आणि पशुप्रमाणेच वागत आलाय, वागतोय. त्यात काही चुकीचं नाही. माणूस झाडं तोडतो. तोडत असेल, पण त्याचा काहीतरी वापर करतो. हत्ती, माकडं, यांना मस्ती चढली की विनाकारण कित्येक झाडं हकनाक मरतात. माणूस धरणं बांधून गावं बुडवतो. निसर्ग कित्येक गावं-शहरं तशीही अधुन मधुन बुडवतच असतो की. शेतकऱ्याला सुखवणारा पाऊस, काही पक्ष्यांना, किड्या-मुंग्यांना भारी पडु शकतो की. निसर्गातील कोणतीही घटना, त्या घटनेने निर्माण झालेली अवस्था, ही नेहमी काही प्रकारच्या सजीवांना मदत करते, तर काहींचा ऱ्हास करते. आपण स्वत:ला निसर्गापेक्षा वेगळे का मानतो हेच मला कळत नाही. सोयीचं जातं म्हणून? अरे पण या सोयीच्या फंदात आपण आपलं मूळ विसरुन जातो त्याचं काय! आपण बांधलेली इमारत ही "मानव-निर्मित' आणि पक्ष्यांनी बांधलेली घरटी, मुंग्यांनी बांधलेली वारुळं, मधमाश्यांची पोळी ही मात्र "निसर्गाची किमया'!!! का? आपल्या बिल्डींग्ज, टॉवर्स, इतर सर्व वास्तु, वस्तु, ही निसर्गाचीच किमया आहे. आपण जर कशाची निर्मीती केली, तर ती निसर्गाची कल्पकता आहे. आणि जर आपण विध्वंस केला, तर तो निसर्गाच्या रुद्रावताराचाच एक भाग आहे. त्यामुळे आपण आज कितीही प्राण्यांची शिकार करुन त्यांच्या जाती नष्ट केल्या, कितीही खनिजं उकरुन पृथ्वीच्या पोटातलं सगळं वापरुन संपवून टाकलं, तरी निसर्गाची काळजी करायचं काही कारण नाही. फार फार तर काय होईल? सगळे बर्फ वितळतील, बरेच जीव मरतील. त्यात माणसं सुद्धा. मरुदेत!! निसर्गाला काही फरक पडणार नाहीये. या घटनेला आपण "महा प्रलय' असं जरी नाव दिलं, तरी त्यात विशेष असं काही घडणार नाही. एके काळी जगात जिकडे तिकडे डायनासोर होते. आता ते कुठेही आढळत नाहीत. उलट असं मानलं जातं की डायनासोर सारख्या अजस्र प्राण्याच्या ऱ्हासामुळे इतर अनेक लक्षावधी लहान-मोठ्या जीवांना उत्क्रांत होण्याची संधी मिळाली. तसंच मनुष्यजातीचा ऱ्हास झाल्यावरही होईलच. आज मानवजात जिकडे तिकडे पसरलीये. महाप्रलयानंतर ती समजा नष्ट झाली. झाली तर झाली. डायनासोर गेले म्हणून निसर्गाचं काही बिघडलं का? मग माणूस गेल्यावर तरी का बिघडेल? कोण मोठे लागून गेलो आपण? आणि सगळेच जीव तर जाणार नाहीत. निसर्गाची किमयाच म्हणायची, तर महाप्रलयानंतर असे जीव उत्क्रांत होतीलच, ज्यांना त्यावेळी त्या परिस्थितीत स्वत:ची जीवनपद्धती प्रस्थापित करता येईल. जीवसृष्टी आहे तश्शीच राहील. फक्त थोडे फेरबदल होतील इतकंच. सजीवाचा आकार, रंग, गुणधर्म बदलले, बदलुदे!! काय वाईट झालं? काही नाही. तेव्हा काळजी करु नये. जगाचं समीकरण हे अस साधा सिंपल आणि सरळसोट आहे - शक्ती, बुद्धी आणि क्रौर्य - या तीन गोष्टींचा समेट ज्या जीवात नीट घडून येतो, तो जीव तगतो. बाकीचे गेले तेल लावत! आता मला सांगा, अशा या जगात केवळ बुद्धी घेऊन आलेल्या माझ्यासारख्या अडीच वीत उंचीच्या जीवाला, रडायला नाही का येणार? जग नेहमीच समतोल राखुन ठेवतं. त्यामुळे जसजशी माझ्यातली शक्ती आणि क्रौर्य वाढत गेलं, तसतशी माझी बुद्धी त्याप्रमाणात कमी होत गेली. आज माझ्यात या तीनही गोष्टी किती प्रमाणात आहेत, माहित नाही. पण तीन्ही आहेत, नाहीतर आत्तापर्यंत जिवंत कसा राहिलो असतो? मी कोण आहे? मी निसर्ग आहे! आंणि हा सगळा पसारा मी मला स्वत:शीच खेळता यावं, म्हणून माझ्यासाठीच मांडून ठेवलाय!