बुधवार, १ ऑक्टोबर, २०१४

ट्रेनमधलं तत्त्वज्ञान भाग १



ज तिला विचारायचंच, असं मी ठरवलं होतं.

अगदी घट्ट मैत्री झालेली नसली तरी ओळख बर्यापैकी झाली होती. एकाच ग्रुपात होतो दोघंही. एकमेकांशी बोलणं फारसं होत नसलं तरी कधी अवघडलेपण जाणवलं नव्हतं एकमेकांसोबत. शाळेत असल्यापासून मनावर बिंबवलं गेलं होतं की स्त्री-पुरुष हे दोघंही समान आहेत. जी वागणूक पुरुषांना मिळते ती स्त्रियांनादेखील मिळायला हवी. मला हे अगदी मनोमन पटलं होतं आणि मी अजूनही यावर ठाम आहे. म्हणूनच मी जसा माझ्या मित्रांशी बोलायचो तसाच मुलींशीही बोलायचो. शिव्या देणं, कमरेखालचे किंवा वरचे लैंगिक विनोद करणं, रस्त्यात दिसलेल्या एखाद्या मुलीच्या शरीरवैशिष्ट्यांचं तोंडभरून कौतुक करणं इत्यादी इत्यादी क्रिया, श्रोता स्त्री आहे की पुरुष हे लक्षात न घेता, किंवा लक्षात घेऊनसुद्धा मी निर्धास्तपणे पार पाडायचो. साहजिकच फारशा मैत्रिणी नाही टिकल्या माझ्याजवळ.

श्शी तो तुझा मित्र आहे? तो किती घाणेरडं आणि चीप बोलतो. मुलींसमोर कसं वागावं याचीही अक्कल नाहीये त्याला. मला तर सहनच होत नाही त्याची बडबड... वगैरे वगैरे

मुलींच्या अशा मतप्रदर्शनानंतर त्यांच्या नजरेत चांगलं राहण्यासाठी माझ्यापासून मैत्रीच्या बाबतीत विशिष्ट अंतर राखून राहणारे मित्रही वाढले. वाढले म्हणजे, माझ्या दैनंदिन आयुष्यातून कमी झाले. आपोआप कचरा गाळला जाऊन माझा अर्वाच्य प्रामाणिकपणा आवडलेली काही मंडळी तेवढी उरली. त्यात ती सुद्धा होती. माझ्या चांगल्यातल्या चांगल्या पुचाट विनोदांवर तोंड वाकडं करायची, पण मी किंवा कोणीही उत्स्फूर्तपणे शिवी दिली की मात्र ही हसत सुटायची. कधी कधी तर वन्स मोअर म्हणायची. स्वत: मात्र शिवी अजिबात द्यायची नाही. इतर कोणीही अडचणीत सापडलेलं असलं की माझी वाट लागलीये रे (अर्थातच वाट या शब्दाला अजून एक पर्याय होता) हे सांगताना त्यांचं तोंड हिरमुसलेलं असायचं. ही हसत हसत स्वत:समोरची अडचण किंवा स्वत:ची झालेली फजिती सांगायची. कोणी म्हणेल, एवढं हसायची म्हणजे नक्कीच कुठेतरी काहीतरी सैल असणार. नाही! लो-वेस्टच्या जमान्यात तिची पँटही सैल नव्हती, डोक्यातले स्क्रू तर राहूद्यात(हो माझी निरीक्षणशक्ती चांगली आहे मला माहितीये). तिला हसवणारे हे काही मोजकेच प्रसंग असायचे. इतर वेळी कोणीतरी तोंडात मारल्यागत चेहरा करून बसायची. उत्साह या भावाचा तिच्या चेह-यावर अभाव होता. तिला काहीही नवीन सांगा, मख्ख दगडासारखा चेहरा करून सांगणार्याकडे बघायची. चेहरा खुलणं असं म्हणतात ते कधी नाहीच. निदान, माझ्याच्यानं तरी फारसं कधी ते जमवता आलं नव्हतं. त्यामुळे तिच्या वाट्याला गेल्याने बर्याच जणांची बर्याचदा फजितीच व्हायची. बरं चेहरा काही सुंदर होता अशातलाही भाग नाही. तशी बरी होती, पण आमच्या कॉलेजातल्या एकापेक्षा एकींसमोर तर ही दिसण्यामध्ये तरी अगदीच थू होती. इतकं असूनही माणसं ओढली जायची तिच्याकडे, नकळत. मीही ओढला गेलो होतो, फक्त मला ते अजून जाणवायचा अवकाश होता. एकूणच अजब रसायन होतं.

कॉलेज सुटल्यावर किंवा आम्ही कॉलेजमधून आम्हाला हवं तेव्हा सुटल्यावर, सगळे एकत्रच चालत चालत स्टेशनापर्यंत जायचो. माझ्या दिशेने प्रवास करणारी फारशी मंडळी नव्हती याचं आधी मला वाईट वाटलं होतं. मात्र नंतर उ:शाप मिळाल्यासारखं वाटायला लागलं. कारण माझ्याबरोबर ट्रेन पकडणारे दोघेजण होते, आणि त्यातली एक ती होती. दुसरा कॉलेजात जास्त यायचा नाही, आणि क्वचित कधी आलाच तरी ट्रेनमध्ये असताना पुस्तक वाचत बसायचा ज्यामुळे मी बाजूला बसल्या बसल्या कंटाळून जायचो.

असंच एकदा आम्ही सगळे रमतगमत स्टेशनपर्यंत जाऊन पोचलो आणि मग सगळे पांगले. ती आणि मी नेहमीप्रमाणे दोघंच जिना उतरून आमच्या फलाटावर आलो. विषय नव्हता. तिच्याबरोबर असं एकटं असताना कधीच नेमका विषय वेळेत सुचायचा नाही. आज तर विषय सुचण्याचा प्रश्नच नव्हता. कारण आज मला तिला महत्त्वाचा प्रश्न विचारायचा होता. त्यामुळे  धीर एकटवेपर्यंत मी गप्पच होतो. मनात मात्र हलकल्लोळ उठला होता. इतका का घाबरत होतो मी? समजा, ती नाही म्हणाली, तर काय होणार होतं फारसं? आपल्याला तोंडात मारल्यासारखं होईल... आपण निराश होऊ, पण ते तात्पुरतंच असणार आहे ना. नाही तर नाही. पण मी आधी कधीच कुठल्याच मुलीला विचारलं नव्हतं. ट्रेनमध्ये कितीतरी युगुलं एकमेकांना खेटून बसलेली दिसायची. त्यामुळे एकूणच काळाशी सुसंगत प्रश्न होता. पण मी तिला विचारल्याशिवाय काहीही होणं शक्य नव्हतं. तिने स्वत:हून उत्साह दाखवण्याची तर शक्यताच नव्हती.

ट्रेन एका मिनिटात अपेक्षित आहे असं दिसलं.

चल विचारून टाक.

ट्रेन दिसली.

अरे काय घाबरतोस काय! मर्द बन! बी अ मॅन!

ट्रेन आली, ट्रेनची गती मंदावत गेली. माझी मती गुंगावत गेली.

लेडीज डब्याच्या दिशेनं तिची पावलं हलली. तिने मोबाईलमधून डोकं काढून माझ्याकडे पाहिलं.

चल विचार... पण एकदम सहज वाटलं पाहिजे... एक दोन तीन -

जेंट्समधनं येतेस आज?

ती थांबली. माझा आवाज मी शक्य तेवढा सहज ठेवला होता. पण चेहर्यावरची अगतिकता (हल्लीच्या मराठीत डेस्पो फीलींग) झाकता आली नाही. माझ्या भुवया उंचावल्या गेल्या होत्या. खालच्या ओठाने वरच्या ओठाला आतमध्ये दाबलं होतं. तिने आधी प्रश्नाला उत्तर देण्याच्या उद्देशाने तोंड उघडलं आणि तेवढ्यात माझ्याकडे नीट पाहिलं. मग हसली आणि चल म्हणाली. आम्ही एकत्र चढलो. फर्स्ट क्लास असूनही डब्यात बसायला जागा नव्हती. तिनं तोंड वाकडं केलं.

ए शी इथे बसायलाही जागा नाहीये. लेडीजमध्ये आडवं झोपायला मिळेल मला. मी जाते. ती पटकन उतरली. मला काही सुचलंच नाही. तिला अडवायला म्हणून तोंड उघडलं पण बोलू काय?

तू लेडीज डब्यात आडवी होतेस? - मला दुसरं काहीच सुचलं नाही.

नाही रे, वेडा आहेस का! तिने लेडीज डब्यात पाय ठेवत ठेवत म्हटलं. ट्रेनही सुटली. एकदा तिनं माझ्याकडे पाहिलं. हसली. त्या हास्यात सॉरी होतं. मीही आता काय बोलणार अशा अर्थानं हसलो. तिनं ते इट्झ ओके या अर्थी घेतलं असावं. ती तिच्या डब्यात आतमध्ये गेली. मीही तोंड पाडून माझ्या डब्यात आत शिरलो. पुढच्याच स्टेशनावर दोघेजण उठले आणि खिडकीजवळची जागा मला मिळाली. कहर म्हणजे जिथे ती आत्ता बसली असती अशी मनात मी कल्पना करत होतो तिथे एक दिड माणसांची जागा व्यापणारे गृहस्थ येऊन बसले. मला खिडकीत चिणल्यासारखं वाटत होतं. उद्या काही केल्या तिला जाऊ द्यायचं नाही असं ठरवून मी कानात बोंडं घालून रोमँटिक गाणी लावून बसलो. खिसा थरथरला. मेसेज होता. आता व्यवस्थित सॉरी असं लिहून पाठवलं होतं. माझा मेसेज पॅक संपला होता. फारसा रस नसलेल्या मुलींच्या बाबतीत मी चिक्कू होतो. आणि हिला पटवायचा उद्देश नव्हता माझा. फक्त घरी जाताना थोडी कंपनी हवी होती इतकंच. नाही यायचंय तर नाही, गेली उडत. नाही घालवणार मी हिच्यापायी एक रुपया फुकट. असं मी मनातल्या मनात स्वत:ला समजावलं. स्वत:च्या या
तो-यावर खुश झालो. आणि त्या खुशीत इट्झ ओके टायपून तिला पाठवूनही दिलं.

क्रमश:

- © कौस्तुभ अनिल पेंढारकर
*





शुक्रवार, ४ जुलै, २०१४

छोटीसी मुलाकात...

अकरावीचं वर्ष. शाळेच्या युनिफॉर्मचा त्याग करून कॉलेजच्या कट्ट्यावर फॅशनेबल कपड्यांत रॅम्पवॉक करायला उत्सुक असलेल्या शेकडो मुलींची चाल; आणि आपल्या सात-आठ जणांच्या घोळक्याला कॉलेज सुरु होऊन तीन-चार महिने उलटले तरी अजुनही एकाही संघभेदिकेचा लाभ का झाला नाही या व्यथेत पडलेल्या माझी नजर यांची सतत पकडापकडी चालायची. पकडापकडी का, झटापटीच म्हणा ना. या सुंदर मुली स्वत:बरोबर त्यांच्यावर जळणा-या, राहणीमानाच्या पद्धतीत त्यांची नक्कल करणा-या किमान एक-दोन मुलींना सोबत घेऊन फिरत असायच्या. आम्ही बघतोय हे कळल्यावर सुंदर मुलींपेक्षा त्यांच्या या दत्तक मैत्रीणीच जास्त नाक मुरडायच्या. पण हे सगळं सगळं पचवेबल होतं. डोकं हटायचं, ते आपल्याहून कैकपटींनी लुख्ख्या दिसणा-या एखाद्या मुलाला, आपल्याहून दुपटीनं चांगल्या दिसणा-या मित्रालाही मिळणार नाही, अशी फटाकडा पोरगी गवसल्यावर. दोघं कॉलेजबाहेर फिरत असताना त्या लुख्ख्यापेक्षा ती ललनाच जास्त लोचटगिरी करताना दिसली, की आम्ही मित्र एकमेकांकडे 'आपल्यात काय वाईट होतं?' असे भाव चेह-यावर ठेऊन पाहायचो. दोघांनाही आपले भाव समोरच्याच्या चेह-यावर प्रतिबिंबित होताना दिसायचे आणि एकत्रच हसू फुटायचं. मग आपसुकच त्या लुख्ख्या बायल्याच्या वॉईसला आणि त्या सुंदर ललनेच्या भंगार चॉईसला आम्ही शिव्या देत असू. घोळक्यात प्रत्येकाचं एक वेगळं, आवडतं प्रेक्षणीय स्थळ ठरलेलं असायचं. तसंच घोळक्यातल्या सगळ्यांना एकाच वेळी आवडणारी एखादी 'अल्टिमेट' मुलगीसुद्धा ठरलेली असायची.

पण या सगळ्या मुली आपल्या कुवतीबाहेरच्या आहेत, हे सगळेच मनोमन जाणून असायचे. मर्सिडीज-ऑडीच्या शोरूमबाहेरून आतल्या गाड्या बघत उभ्या राहिलेल्या भिका-यासारखे आम्ही कट्ट्यावरून एकेका मॉडेलला भुकेल्या नजरेने न्याहाळत असू. एखादा दिडशहाणा मित्र इथून-तिथून त्याला आवडणा-या मुलीचा नंबर मिळवायचा, फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवायचा. तिस-या ट्रायमध्ये, वाढते मुतुअल फ्रेंड्स बघून कुतुहूल म्हणून मुलगी त्याला अ‍ॅड करायची. पोरगं बेभान होऊन जायचं. तिच्या प्रत्येक फोटुला लाईक ठोकायचं(बहुधा नंबर ऑफ लाईक्स वाढतील या आशेनेच ती अशांना अ‍ॅड करायची/करते). पण त्याने चॅटवर प्रेमाने घातलेली साद त्या मुलीची रसिकतेनं दिलेली दाद कधीच मिळवू शकायची नाही. शेवटी उतावीळ होऊन बिचारा काहीतरी कुठंतरी प्रेमा-बिमाचं बरळून घोळ घालून ठेवायचा, आणि मग प्रकरण चिघळून त्या मुलीच्या चार वर्षांनी सिनिअर असलेल्या पंटर लोकांचा मार खाऊन यायचा(चेह-यावरची सूज कमी झाल्यावर).

बघता बघता शेवटी आम्ही थकलो आणि डिसेंबरच्या फेस्टिव्हलच्या काळात आमच्या ग्रुपला येऊन मिळालेल्या आमच्या पातळीच्या चार संघभेदिकांवर आम्ही समाधान मानलं. वर्ष संपायच्या आतच त्या संघभेदिकांनी आपल्या अदाकारी आणि करामतींनी आमच्या अभेद्य संघाची यशस्वी फाळणी केली. त्यातल्या एका तुकड्याचा सभासद झालेला मी बारावीच्या सुरुवातीच्या दिवसांत कट्ट्यावर एका संघभेदिकेबरोबर (सॉरी चुकलो... आता ती जीवाभावाची, सेंटींग लाऊन देण्याची नुसती तयारी दाखवणारी मैत्रीण झाली होती) बसलो होतो. दोन दिवस झाले पाऊसच पडला नव्हता. त्यामुळे कट्टा सुका होता. बारावीत आमच्या तुकड्यातले बाकी दोस्त दुस-या वर्गांत गेले होते. शेवटचं लेक्चर असलं तरी इकोनॉमिक्स असल्यामुळे ते अटेंड करायचे. त्यांचा तास संपायची वाट बघत बसलो होतो. हे रोजचंच झालं होतं. पण अशी वाट बघण्यातसुद्धा गंमत असायची. आमच्या कॉलेजला चिकटून दुसरं कॉलेज होतं. तिथल्या मुलींसमोर आमच्या कॉलेजच्या पोरी नेहमीच फिक्या वाटायच्या. मी मुद्दामून कट्ट्याच्या त्यांच्या कॉलेजगेट समोरच्या भागावर जाऊन बसायचो. येणा-या जाणा-या सगळ्या मुली नजरेची भूक एकाच वेळी वाढवत आणि शमवत जायच्या.

दुपारचे चार - साडे चार झाले असतील. फारशी वर्दळ नव्हती. ना मुलामुलींची, ना गाड्यांची. सगळं वातावरण शांत होतं. तरी कट्टा ब-यापैकी भरलेला होता. मीही त्या जीवलग मैत्रिणीबरोबर कट्ट्यावर बसलो होतो. आज ब-याच दिवसांनी आमच्या गप्पा रंगात आल्या होत्या. एवढ्यात माझी नजर शेजारच्या कॉलेजच्या गेटमधून बाहेर आलेल्या एका मुलीने वेधली. माझ्याच वयाची होती (म्हणजे मला सिनिअर नसावी). दोन्ही हातांत कुबड्या घेऊन चालत होती. तिच्या डाव्या पायात काहीतरी खोट होती. तो थोडा वाकलेला होता. तिने पंजाबी ड्रेस घातला होता. आकाशी रंगाचा. केस लांब होते, वेणी होती. त्यामुळे तसं म्हटलं तर टाईट जीन्स, थ्री-फोर्थ, पाव चड्डी किंवा मिनी स्कर्ट घालून फिरणा-या, केस मोकळे सोडून त्यांना रंगवणा-या मुलींना पाहणा-या आमच्यासारख्यांसाठी 'काकुबाईछाप' मुली करतात तसा पोशाख तिनं परिधान केला होता. पण तरीही ती छान दिसत होती. चेहरा खूप सुंदर होता असं नाही. पण पोशाखाप्रमाणे सोज्वळ होता, शांत होता. तिला तो पोशाख शोभत होता. ती लंगडत असली तरी सुरेख दिसत होती. तिच्या त्या तशा चालण्यातही एक डौल होता, एक ऐट होती. नकळत मी गालातल्या गालात हसलो. ब-याच दिवसांनी आपादमस्तक न्याहाळून घेतल्यावरही आपण हिला 'चेकआऊट' केलंय असं म्हणता येणार नाही, ही जाणीव या मुलीनं दिली होती. ती थोडी पुढे आली. कुबड्या आणि स्वतःचा तोल सहजपणे सावरत तिनं उजव्या हातानं एक टॅक्सी थांबवण्याचा प्रयत्न केला. टॅक्सी पुढे निघून गेली. ती भरलेली होती. दुसरी टॅक्सी आली, ती तर रिकामी होती. पण टॅक्सीवाला माजुरडा होता. तो न थांबता निघून गेला. आपण हात करूनही रिकामी टॅक्सी थांबली नाही, यामुळे स्वतःचा इगो हर्ट झाल्यागत हावभाव करणा-या फाल्तुमधल्या फालतु मुली मी पाहिल्या होत्या, आहेत. पण या मुलीच्या चेह-यावर असे कोणतेच भाव नव्हते. चटकन टॅक्सी मिळत नाही म्हणून आपणही वैतागतो, टॅक्सीवाल्यांना कधी मनातल्या मनात तर कधी उघडपणे शिव्या घालतो, तिथे या लंगड्या माणसांचं काय होत असेल? पण नाही. या मुलीच्या चेह-यावर निराशा, वैताग यांचा लवलेशही दिसून येत नव्हता. तिच्याकडे जितका वेळ बघत होतो तितकी ती जास्त नजरेत भरत चालली होती. बघतच बसावंसं वाटत होतं. असं वाटलं, की या मुलीला टॅक्सी मिळूच नये, आणि आपण उरलेला दिवसभर असंच तिच्याकडे पाहात बसावं. तेवढ्यात डोक्यात वीज चमकली. या मुलीने आत्तापर्यंत चार-पाच टॅक्स्यांना थांबवण्याचे निष्फळ प्रयत्न केले होते. आणि इतका वेळ मी नुसताच ठोंब्यासारखा बसून होतो. मला स्वतःची लाज वाटली. तिला टॅक्सी पकडून देण्यासाठी मी उठलो, पण संकोचून पुन्हा बसलो. आपण तिला मदत केलेली तिला आवडली नाही तर?? काही अपंग मंडळी खूप स्वाभिमानी असतात. त्यांना सहानुभूती दाखवलेली आवडत नाही. ही त्यातलीच एक निघाली तर?? त्यातलीच असावी. इतक्या वेळात आपली अवस्था बघून टॅक्सी पकडून द्यायला आपल्याला कोणी मदत करेल का, या आशेनं तिनं जराही इकडं तिकडं पाहिलं नव्हतं. काय करावं?? काही का असेना, आपल्या मनाला योग्य वाटतं ते करावं, दिली टॅक्सी पकडून तर ती काय फाडून खाणार आहे का आपल्याला?? मग?? जाऊया... मी बुड उचललं आणि तिकडे तिला टॅक्सी मिळाली. त्यात बसून ती गेली. तिला टॅक्सीत चढायला वेळ लागला. मला स्वतःची, स्वतःच्या अशा 'नको-तिथे-संकोची' वृत्तीची शरम वाटली. ती मुलगी अगदीच असहाय होती असं नाही, पण तरी... मी पहिल्या फटक्यातच तिला मदत केली असती, तर तिचा थोडा वेळ तरी वाचला असता. माझं मघाशीच तिला पाहिल्यावर गप्पांतून लक्ष उडालं होतं... आता ती अशी गेल्यावर रसही उडाला. डोक्यात पूर्णवेळ तिच होती. आपण एखाद्याला मदत करायला हवी होती, पण निव्वळ संकोचापोटी मदत केली नाही, ही गोष्ट सतत बोचत राहिली. हां, अगदीच, जेवण-खाण न जाण्याइतपत, किंवा झोप न लागण्याइतपत मी व्यथित झालो नव्हतो, पण तिचा विचार मनातून जात नव्हता. बिछान्यात आडवा झाल्यावर दिवसभरातल्या सगळ्या विशेष घडामोडी, किंवा उद्यावर येऊन ठेपलेल्या संभाव्य संकटांचा/मौजमजेचा विचार डोक्यात घोळत राहतो. आज डोक्यातल्या घमेल्यातली सगळी द्रव्यं, ती मुलगी आपल्या कुबड्यांनी ढवळून काढत होती. तो असमाधानी दिवस आपल्या मागे टाकून मी एकदाचा झोपून गेलो.

दुस-या दिवशी योगायोगाने पुन्हा त्याच वेळी मी कट्ट्यावर त्याच मैत्रीणीबरोबर त्याच जागी बसायला गेलो. तोवर आदल्या दिवशीचा प्रकार मी विसरलो होतो. पण बुड टेकलं आणि समोर बाजुच्या कॉलेजच्या गेटवर नजर जाताच सगळं आठवलं आणि चेहरा आपोआप पडला. मैत्रीणीला ते जाणवलं असावं.

'काय रे असा अचानक गप्प का झालास?'
'काही नाही गं.'
'अरे काही नाही कसं? काय झालं?'
'काहीतरी आठवलं.' मी मान खाली घातली.
'काय?'
'काही विशेष नाही गं. सोड.' मी तसाच थोडा वेळ बसून राहिलो. एवढ्यात -
'ए ती बघ कालची मुलगी' मी झटकन मान वर केली. बघतो तर खरंच, तीच मुलगी माझ्यासमोर, तसाच शांत चेहरा, तसाच पोशाख, फक्त आज आकाशी ऐवजी केशरी रंग होता, आजही तितकीच सुरेख दिसत होती. मी चमकून माझ्या मैत्रीणीकडे पाहिलं. ती माझ्याकडेच हसून बघत होती.

'काय?? आजही नुसता बघत बसणारेस का??'

मी हसलो, पण माझा अजुनही धीर होत नव्हता.

'तिला मी मदत केलेली आवडली नाही तर?'
'शी असा काय तू?? का नाही आवडणार?? वेडा आहेस का जरा?? आता जा नाहीतर दुसरा कोणीतरी मदत करेल तिला तुझ्या आधी'

संभाव्य स्पर्धकाचा उल्लेख झाल्याबरोब्बर मी ताडकन उभा झालो. मैत्रीण पुन्हा म्हणाली,

'अरे जा ना...'

एखाद्या कुत्र्याला 'टॉमी छू' म्हटल्यावर तो पळत सुटतो, तसा मी 'अरे जा ना' म्हटल्या म्हटल्या उतावीळपणे पुढे झालो. आता मी कट्ट्यावरून फुटपाथवर आणि फुटपाथवरून रस्त्यावर येऊन अगदी तिच्या समोर रस्त्याच्या दुस-या बाजुला उभा झालो. एव्हाना दोन टॅक्स्या गेल्या होत्या. तिचं लक्ष माझ्याकडे गेलं. मी किंचीत हसलो, हातानेच, 'मी थांबवतो तुझ्यासाठी टॅक्सी' अशी खूण केली, आणि रस्ता ओलांडून तिच्या जवळ गेलो.

'अं... कुठे जायचंय असं सांगू??'
'सायन'
'ओके'
मी रस्त्याच्या दोन्ही बाजुंना आलटून-पालटून जाऊन येणा-या जाणा-या प्रत्येक टॅक्सीला थांबवायचा प्रयत्न करत होतो. एक-दोन थांबल्या, पण सायन म्हटल्यावर गेल्या. शेवटी एकदाचा एकजण थांबला, सायन म्हटल्यावर तयार झाला. मी त्याला टॅक्सी वळवून तिच्यासमोर घ्यायला सांगितली. त्याने तशी वळवली. मी क्रॉस करून तिच्याजवळ गेलो. ती हसली, थँक्यू म्हणाली, आणि टॅक्सीत चढली. चढताना मात्र तिने माझा आधार घ्यायला, किंवा माझ्या हातात एकही कुबडी द्यायला हसूनच नकार दिला.

'यू वाँट मी टू ड्रॉप यू ऑफ समव्हेअर??'
(आयला इंग्लिश) 'ओह... नो नो... नो!!'
'ओके... थँक्स अगेन... बाय'
'बाय'

ती गेली. मला स्वतःबद्दल वाटणारी शरम आता ब-याच अंशी कमी झाली होती. पण आता मी एका वेगळ्याच विचारानं अस्वस्थ झालो होतो. तिच्या बोलण्यात साधेपणा होता. जरी तिने इंग्लिश फाडलं तरीही ती साधी होती. लंगडत असुनही तिचा वावर सहज होता. आमच्या या छोट्याश्या मुलाखतीत कुबड्या ती वापरत होती, पण अवघडलो मी होतो. मी तिला आता अपंग मानायला तयारच नव्हतो. तिच्यासमोर मीच खरं तर लुळा-पांगळा झालो होतो. आता यापुढे पुन्हा कधी आपल्याला टॅक्सी पकडून देण्याची संधी मिळाली, तर आपण कसे वागू, ओळख कशी वाढवू, वगैरे वगैरे कल्पना रंगवत मी पुन्हा कट्ट्यावर जाऊन माझ्या मनापासून जीवलग झालेल्या अशा मैत्रीणीशेजारी जाऊन बसलो.

*****

योगायोगांबद्दल माझ्या मनात संमिश्र भावना आहेत. संमिश्र म्हणजे, मला ते आवडतात सुद्धा, आणि त्यांचा रागही येतो. जेव्हा मी एखाद्या व्यक्तिचा सतत विचार करत असतो, ती व्यक्ती भेटत राहावी, समोर यावी अशी मनातल्या मनात प्रार्थना करत असतो, ती मुलगी समोर आल्यावर तिच्याशी मी कसा बोलेन, तिला कसा सामोरा जाईन वगैरे कल्पना रंगवत असतो, तेव्हा ती व्यक्ती कधीच समोर येत नाही. आणि नेमका मी बेसावध असताना, माझ्या मनाची काहीच तयारी नसताना, ती व्यक्ती, म्हणजे मुलगी, समोर येऊन उभी राहते.

अजुन एक योगायोग जो मला कट्ट्यावर बसलेलं असताना नेहमी जाणवतो, तो हा, की आपलं स्वतःचं असं जे फेव्हरेट प्रेक्षणीय स्थळ असतं, ते नेहमी आपल्याआधी आपल्या मित्राला किंवा मैत्रीणीला कुठेतरी दिसतं आणि मग ते आपल्याला दाखवतात. आमच्या ग्रुपमध्ये, आपल्याला आवडणारी मुलगी दिवसभरात कुठेही पहिल्यांदा दिसली, की 'माझा अटेंडंस लागला', असं म्हणायची पद्धत होती. मी आठवडाभर रोज नियमितपणे संध्याकाळी चारच्या लेक्चरला कट्टा-क्लासरूम मध्ये माझी नेहमीची जागा पकडून बसलो होतो. पण माझा एकदाही अटेंडंस लागला नाही. मी निराश झालो. तिच्याबद्दल माहिती काढायला हवी होती. पूर्वार्धात (म्हणजे संघभेदिकांचा ग्रुपमध्ये शिरकाव होण्याआधी) आमच्या अखंड ग्रुपमध्ये एक मुलगा होता. त्याला आम्ही 'इन्फोसिस' म्हणत असू. तो सगळ्या मुलींची माहिती काढायचा. नाव, पत्ता, नंबर, बॉयफ्रेंड(किंवा इतर इच्छुक स्पर्धक), इयत्ता-तुकडी, इतिहास(म्हणजे शाळेतली लफडी), आणि सर्वात मुख्य म्हणजे, बजेट. त्याच्याच मदतीने संघभेदिकांचा संघात शिरकाव झाला होता. तो आता संघाच्या दुस-या तुकड्यात होता. मी त्याच्याकडे गेलो, तर मला म्हणाला,

'यार अभी ट्वेल्थ का पढाई छोडके तू लडकीयो के पीछे क्यु दौड रहा है? और वो भी बाजुवाले कॉलेजकी? मैने अभी लडकीयो की इन्फो लडकोमें बाटना बंद कर दीया है(एका संघभेदिकेने केलेल्या कानउघाडणीचा परिणाम. याच्या सांगण्याचा अर्थ हा की मुलींची इन्फो हा यापुढे फक्त इतर मुलींना देणार, मुलांना नाही. म्हणजे त्यांना चरायला आयता चारा मिळाला ना. तरीच ग्रुपचे तुकडे पडूनही सगळ्या संघभेदिका याच्याशी मात्र सलगी ठेवून होत्या). फिर भी तेरे लिये अपने कॉलेजकी होती तो ढुंढ भी लेता मै. पर बाजुके कॉलेज के बारे में मै कुछ नही बता पाऊंगा!! फिर भी ट्राय करता हु. गॅरंटी नही दे सकता.' तेवढ्यात एका ललनेची त्याला हाक आली, आणि कॉलेजमधल्या घडामोडींचा इत्थंभूत समाचार द्यायला तो तिच्याकडे निघून गेला. मी निराश झालो. ती मुलगी पुन्हा भेटण्याचा आता काही चान्स नाही, हे मला कळून चुकलं होतं. मी आता मूव्ह ऑन होण्याचं ठरवलं आणि माझा अटेंडंस लावण्यासाठी आता नवं स्थळ शोधायला लागलो.

जुलै महिना उजाडला. एक आठवडा सरला. पावसाने हल्ली जोर धरला होता. धो-धो कोसळायचा. सेंट्रल साईडच्या सगळ्या ट्रेन्स तासन-तास लेट व्हायच्या नाहीतर सरळ रद्द व्हायच्या. वेस्टर्न ब-यापैकी सुरळीत चालू होती. पण रस्त्यांत पाणी खूप साचायचं. आमच्या कॉलेजबाहेर तर तळं व्हायचं अक्षरशः. गाड्या बंद पडायच्या. त्यामुळे सगळ्यांनाच स्टेशनपर्यंत पाण्यातून वाट काढत चालत जावं लागायचं नाहीतर पाऊस ओसरे पर्यंत कॉलेजात थांबावं लागायचं. हे चित्र रोज नाहीतर किमान एक-दिवसाआड तरी दिसायचंच. मी एक दिवस कँटीनमध्ये माझी बॅग टाकून शेजारच्या कॉलेजातल्या मित्राकडून पेन ड्राईव्ह घ्यायला गेलो होतो(अर्थात वॉचमनची नजर चुकवून). कॉलेजच्या इमारतीत शिरलो, आणि बाहेर धो-धो पाऊस सुरू झाला. थोडक्यात वाचलो, असं वाटलं. पण परत जाताना भिजावंच लागणार होतो. आणि आज भिजायचा मूड नव्हता. हरकत नाही, मित्राबरोबर बोलत उभा राहिलो असतो. मी दुस-या मजल्यावर जाऊन त्याच्याकडून पेन ड्राईव्ह घेतला, तसा तो सटकायला लागला. 'अरे लेक्चर आहे रे, नंतर भेटून बोलू ना आपण...' मी काही बोलायच्या आतच तो पसार. मी त्याला मनातल्या मनात शिव्या घालत खाली उतरलो. पेन ड्राईव्ह माझा होता. तो जराही भिजलेला मला चालला नसता. आता धावतच जावं लागणार होतं.

मी खाली उतरलो, तशी मला बिल्डींगच्या दारापाशी गर्दी दिसली. घरी जायला निघालेले, छत्र्या रेनकोट असलेले पण जोराचा पाऊस जरा तरी ओसरण्याची वाट पाहणारे बरेच जण तिथे उभे होते. मी त्यांच्यामधनं वाट काढत पुढे सरकू लागलो. इतक्यात मला ती दिसली. तिच्याकडे छत्री किंवा विनचिटर, काहीही नव्हतं. मी मुद्दामून तिच्याजवळ जाऊन थांबलो. कमरेवर हात ठेऊन तिला ऐकू जाईल अशा आवाजात बाहेर पावसाकडे बघत, 'ए यार... त्च!!' असं स्वतःशीच म्हटलं. मग अलगद तिच्या दिशेने मान हलवली. ती सुद्धा आवाज ऐकून माझ्याकडे पाहात होती. मग मी ती आत्ताच माझ्या नजरेला पडल्यासारखे हावभाव केले आणि स्माईल दिली. मी स्माईल दिल्यावर तिनेही दिली(ओळखलं की नाही कुणास ठाऊक).

'पाऊस खूपच आहे नाही आज?' मी.
'हो ना... मी सुद्धा नेमकी आज विनचिटर घरी विसरले घाईगडबडीत... सकाळी तेवढा पाऊस सुद्धा नव्हता ना त्यामुळे लक्षातच आलं नाही.'
'हो... खरंच.'

त्यापुढे ती काहीही बोलायला तयार नाही. मलाही काही सुचेना. खरं तर मला मस्त वाटत होतं. थोड्या वेळापूर्वी याच पावसाला मी शिव्या घालत होतो आणि आता त्याच्यामुळेच मला ती दिसली होती, तिच्याशी बोलता आलं होतं, तिच्या बाजुला इतका वेळ उभं राहता येत होतं. पण गाडी तिथेच अडली होती. पुढे सरकत नव्हती. कॉलेजसमोर रस्त्यावर तळं तयार झालं होतं. फुटपाथवर सुद्धा पाणी ब-यापैकी साचत चाललं होतं. अशा अवस्थेत या मुलीला टॅक्सी मिळण्याची काहीच चिन्हं नव्हती. मग ही घरी कशी जाणार होती?? उजवीकडून नेऊन आमच्या कॉलेजच्या मागच्या बाजुला एक गल्ली होती, तिथून हायवेला जाता आलं असतं. तिथे विशेष पाणी साचलं नसणार. तिथून टॅक्सी सुद्धा मिळेल. पण तिथपर्यंत तरी तिला पाण्यातून चालत जावं लागणार होतं. त्यात त्या गल्लीत त्या पाण्याची पातळी किती होती, कमी की जास्त? हे मी इथून सांगू शकत नव्हतो. त्यात ही विनचिटर विसरलेली. म्हणजे आधीच या मुलीला त्या पाण्यातून कुबड्या घेऊन जावं लागणार होतं, आणि त्यात तेवढं अंतर पार करून टॅक्सी मिळेपर्यंत भिजावंही लागणार होतं. पाऊस ओसरायची चिन्हं नव्हती. नुकताच तर सुरु झाला होता. काय करावं? बरं मी स्वतःहून काही करायला गेलो तर तिला ते आवडेल का?? हात्तिच्या! पुन्हा तेच!! का नाही आवडणार? आणि विचारायला काय जातंय? कमॉन यू कॅन डू इट... विचार तिला. वन, टू, थ्री!! -

'अम्म... आजही सायनलाच जायचंय ना?'
'अं? तुला कसं माहिती की मी सायनला जाणार आहे? आणि आजही म्हणजे?' ओक्के. हिने मला ओळखलं नव्हतं. कोई बात नही. मी जरा बावचळलो. पण हिम्मत नही हारनेका बच्चू.
'अगं मी तो.. मी तुला टॅक्सी पकडून दिली नव्हती का, काही दिवसांपूर्वी...' मी चाचरत विचारलं.
'अरे हो.... तरीच म्हटलं तुला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय. सॉरी मी आधी ओळखलं नाही. हाय!!'
'ओह.. हाय!!' जीव भांड्यात पडला. 'पण मी ओळखलं तुला.' मी हसत हसत म्हटलं. तिने लगेच स्वतःच्या कुबड्यांकडे पाहिलं आणि मग माझ्याकडे बघून 'ओह' असं म्हणून एक खोटं स्माईल दिलं. मी लगेच दुरुस्ती केली.
'अगं म्हणजे, मला सुंदर मुलींचे चेहरे चांगलेच लक्षात राहतात.' मी खूप हिम्मत करून डायलॉग मारला होता.
'ओह.. मी सुंदर? अरे बापरे!! थँक्स!'

तिचं खोटं स्माईल गायब होऊन आता त्या चेह-यावर एक मोकळं हसू आणि गोड खळी उमटली होती. ती लाजली होती की काय?? तिचा चेहरा अजुनही शांत होता. ती घरी कशी जाणार याचं मला टेन्शन होतं पण ती निर्विकार दिसत होती. तिच्या बोलण्यात अजुनही तोच सहजपणा होता. आपण मात्र (तिचं लक्ष वेधून घेण्यासाठी का असेना) पाऊस पडतोय म्हटल्यावर लगेच 'ए यार... त्च' म्हणून वैताग दर्शवला होता.

'इथे तर टॅक्सी मिळणार नाही. मिळाली तरी ती मध्येच बंद पडेल.' मी.
'हो... पण ठीक आहे. हळूहळू ओसरेल पाऊस.'
'अगं पण तोवर तू अशीच उभी राहणार का??'
'मग दुसरा उपाय काय आहे??' तिने हसत हसत विचारलं. 'तू काय करणारेस दुसरं?'
'मी काय मी छत्री आणलीये गं. माझ्या बॅगेत आहे ती. आणि बॅग कॉलेजमध्ये आहे. (तिने प्रश्नार्थक नजरेनं पाहिलं) मी त्या कॉलेजचा आहे. मी पोचेन धावत जाऊन. थोडासा भिजेन फार फार तर... त्यात काय!!'
'मग थांबलायस का?' आता आली का पंचाईत. 'तुझ्यासाठी थांबलोय' असं म्हणू कसं मी तिला?
'अगं पण तू कशी जाणार?'
'मी काय मी थोडा वेळ थांबेन. नाहीच ओसरला पाऊस तर इथून चालत हायवेला जाईन आणि तिथून टॅक्सी पकडेन. तुझ्यासारखं धावता येणार नाही म्हणा. थोडी जास्त भिजेन मी फार फार तर.. त्यात काय!!'

मी ओशाळलो. माझ्या बोलण्यातून मी सारखं तिला ती अपंग असल्याने असहाय आहे असं दाखवतोय, तिच्या क्षमतेवर शंका घेतोय आणि ती मात्र अतिशय खिलाडूवृत्तीने मला उत्तर देत्येय हे माझ्या लक्षात आलं. मी ओशाळलोय हे तिच्याही लक्षात आलं असावं. ती हसली.

'सॉरी अगं... म्हणजे, आपली काही ओळखही नाही आणि मी...'
'इट्झ ओके रे. तुझी काही चूक नाही. तू काळजीपोटीच बोलतोयस ना...'
'हो हो... प्लीज डोंट माइंड हा...'
'अरे इट्झ ओके. माझ्याकडे सगळेच सिम्पथेटिक नजरेने बघतात. खरं तर सिम्पथीची किंवा त्यामुळे इन्स्पायर होऊन केलेल्या मदतीची मला गरज वाटत नाही, मला ते आवडतही नाही. पण तरी लोक मदतीला येतातच. तू सुद्धा आलासच की.'
'अगं मी सिंपथी म्हणून नाही मी आपलं...'
'अरे ठीक आहे. खरं तर माझ्या अपंगत्वाचे मी खूप आभार मानते. सुरुवातीला मी अपंग आहे, हे बघून मदतीच्या हेतूनेच लोक माझ्याजवळ येतात आणि मग माझी त्यांच्यापैकी बहुतेकांशी मैत्री होते. आणि एकदा मैत्री झाली, की मला सिंपथी आणि मदतीची गरज नाही, हे त्यांना आपोआप कळतं. म्हणून तर मी माझ्या सगळ्या फ्रेंड्स ना माझ्याआधी घरी पाठवते. त्या गेल्या, की मग मी खाली उतरते आणि टॅक्सी पकडून घरी जाते.'
'ओह्ह... म्हणजे थोडक्यात तुला सिम्पथी दाखवलेली आवडत नाही.'
'अर्थातच नाही...'
'मग अपंगत्वाचे आभार का मानतेस?? लोक मैत्रीच्या दृष्टीने न बघता सहानुभती म्हणून तुझ्याजवळ येतात जे तुला आवडत नाही, आणि तरी त्याबद्दल तू अपंगत्वाचे आभार मानतेस?' ती जरा बावचळली. तिला कदाचित असा थेट प्रश्न विचारणारा मी पहिलाच असेन. मी सुद्धा जरा जास्तच आक्रमकतेने हा प्रश्न विचारल्याचं माझ्या लक्षात आलं.
'सॉरी, मला वादविवादात मजा येते. मी लगेच एक्साईट होतो. सॉरी.' ती गप्प. मी अस्वस्थ झालो. तिला म्हटलं,
'एक मिनिट हा... इथेच थांब. कुठेही जाऊ नकोस. प्लीज इथेच थांब. ओके?'
'ओके'

मी धावत धावत कॉलेजात गेलो. छातीची धडधड वाढली होती, ते आत्ता लक्षात आलं. कँटिनमध्ये शिरलो, बॅगेतून छत्री बाहेर काढली, आणि धावत धावत पुन्हा तिच्याजवळ आलो.

'चल..'
'कुठे??'
'तुला हायवेपर्यंत सोडतो.'
'अरे नको... तू कशाला उगाच त्रास घेतोस?'
'चल अगं.. तुझ्याशी मैत्री करायची हीच पद्धत असेल, तर मग शुभस्य शीघ्रम!! डोंट वरी माझी छत्री मोठी आहे, ही बघ!!'

मी तिला छत्री उघडून दाखवली.

'तू ही छत्री तुझ्या कँटीनमधून घेऊन आलास ना?'
'हो!!'
'मग येतानाच जर तू ती उघडली असतीस तर तू सुद्धा कमी भिजला असतास...'
'अरे हो... विसरलो.'
'एवढा एक्साईट झालायस माझ्याशी वाद घालण्यात?'
'हो.. चल ना!!'

ती माझ्या छत्रीखाली आली. मी तिला पूर्णपणे माझ्या छत्रीखाली येऊ दिलं आणि स्वतः बाहेर राहिलो.

'अरे तू भिजतोयस की पूर्णपणे. याला काय अर्थ आहे??'
'अगं नाही ठीक आहे.'
'ठीक आहे काय? ये ना तू सुद्धा छत्रीत. दोघं एका छत्रीतून जायला लागलो तर काय लगेच कपल वाटणार नाहीयोत आपण'
'अगं तसं नाही (मी लाजलो!!) मला खरं तर भिजायला आवडतं.'
'मग छत्री कशाला आणतोस?'
'(तुझ्यासाठी) अगं बॅग... बॅग ओली होता कामा नये ना'
'ह्म्म!!'

माझं लक्ष तिच्या कुबड्यांकडे होतं. आम्ही छोट्या-मोठ्या डबक्यांतून जात होतो. त्यात रस्त्यांत कुठे खड्डा आहे कुठे नाही, त्याचा बरोबर अंदाज यावा म्हणून मी तिच्या आधी सगळीकडे पाय टाकून बघत होतो आणि मग तिला गाईड करत होतो. माझी तारांबळ उडत होती. पण ती बिन्धास्त होती.

'अरे तू एवढं लक्ष देऊ नकोस, मी येते बरोबर. पाण्यातून जायची सवय आहे मला. नाही सरकणार मी. आणि सरकले समजा, तर फारफार तर काय होईल, पडेन मी घसरून. पडले तर पडले - मज्जा असते त्यातसुद्धा!!'
'मज्जा काय, पडलीस आणि काय झालं म्हणजे?'
'काय होणार आहे? मी कोणी म्हातारी आहे का?'
'म्हणजे?'
'समज आत्ता तू घसरून पडलास, तर काय होईल?'
'मी ओला होईन. बाकी काय?'
'हो ना!! मग माझ्याबाबतीत दुसरं काय होणार आहे??'
'हो गं... बरोबर!!'
'माझ्या फक्त चालण्याच्या स्टाईलमध्ये लोचा आहे. बाकी मी तुझ्यासारखीच आहे रे'
'हो माहितीये मला!!' ही मुलगी मला सारखी खजील करत होती.
'हा तर तू काय म्हणत होतास? मी अपंगत्वाचे आभार का मानते!!'
'नाही ते जाऊ दे तो विषय आता सोड.'
'अरे नाही ऐक ना, बरं झालं तू विचारलंस. त्यामुळे मीच विचारात पडले... पण आता मनात सगळं क्लिअर झालंय!'
'म्हणजे?'
'म्हणजे असं बघ... लोकांनी मला सहानुभुती दाखवलेली मला आवडत नाही हे खरंय. मला नाही वाटत माझ्याकडे तुम्हा लोकांच्या तुलनेत काही कमतरता आहे. त्यामुळे साहजिकच माझ्या कुबड्या बघून कोणी मदतीला आलं की सुरुवातीला मला राग यायचा. पण मग मी विचार केला, की समजा मी तुमच्या सारखीच 'नॉर्मल' असते, तर मी आज आहे तशा एखाद्या अपंग माणसाकडे बघून मलाही सहानुभुती वाटलीच असती ना... आणि तसंही सहानुभुती लोकांना का वाटते? सांग बरं.'
'का वाटते?'
'कारण समोरच्या माणसामधली जी उणीव, जी कमतरता दिसून येते, तीच कमतरता उद्या आपल्या नशिबी आली, तर आपण तिच्यावर मात करु शकलो असतो का? असा प्रश्न त्या माणसाच्या मनात नकळत उपस्थित होतो. माणूस नकळत स्वतःला समोरच्या कमनशिबी माणसाच्या जागी उभा करतो आणि त्या जगण्याची कल्पना करून बघतो. ज्यांना त्या कल्पनेचा खूप त्रास होतो, ते माझ्या मदतीला येतात. ज्यांना विशेष त्रास होत नाही, ते नुसतीच कसरत बघत बसतात किंवा सरळ दुर्लक्ष करतात. अशा वेळी मला खरंच मदतीची गरज आहे का, मी मदत मागत्येय का, याची त्यांना तितकीशी फिकीर नसते. माझी मदत केल्याने त्यांना त्या कल्पनेच्या जाचातून मुक्तता मिळणार असते. कठीण परिस्थितीतल्या माणसाला मदत केल्यानंतर 'आपण काहीतरी चांगलं केलं आज' म्हणून आपल्याला समाधान मिळतंय असं माणसाला वाटतं. मुळात आपल्या मनातली अस्वस्थता दूर करण्यासाठी त्यांनी असं केलेलं असतं.'
'मी एक सांगू?'
'सांग ना!!'
'सगळं बाऊन्सर गेलं गं. तू काय सायकोलॉजी वगैरेची स्टुडंट आहेस का?'
'हेहे. अरे सायकोलॉजी आहे आम्हाला पण आपलं माझं मत सांगितलं तुला.'
'अच्छा अच्छा!! चांगलंय!!'
'शॉर्टमध्ये सांगते. जी माणसं माझ्या असहायतेकडे बघून माझ्या मदतीला येतात, खरी मदतीची गरज त्यांनाच असते. मला मदतीची गरज नसतानाही मला मदत केल्याने त्यांना बरं वाटणार असतं म्हणून मी त्यांच्यावर न रागावता त्यांना मदत करू देते आणि हीच गोष्ट मी तुला एक्स्प्लेन करून दिली तशी एरवी एक्स्प्लेन न करता त्यांच्या लक्षात आल्याने ते माझे फ्रेंड्स होतात.'

खरं तर तिने माझी इज्जतच काढली होती. 'जे इतरांना न सांगता कळतं, ते तुला इतकं स्पष्टीकरण देऊनही बाऊन्सर गेलं म्हणतोस म्हणजे तू केवढा मोठा च ला उकार असशील, असाच तिच्या म्हणण्याचा रोख वाटायला लागायला मला. तिने मला असा हा नवा दृष्टीकोन दिला हे खरं, पण तिचा हा दृष्टिकोन तिच्याचकरवी आणि तिलाच मी नकळत समजावून देत होतो, क्लिअर करून देत होतो, हे तिच्या लगेच लक्षात आलं नसावं. पण तिच्या ते लक्षात आलं असणार, कारण बाय म्हणताना तिने माझं नाव आधी विचारलं, माझा नंबर मागून घेतला, आणि आमच्या 'मैत्रीचा' असा शुभारंभ झाल्यावर त्यात रंग भरायचं कामही तिनेच आधी केलं.

आम्ही हायवेला पोचलो. तिथे तिला मी टॅक्सी पकडून दिली. ती स्वतः चढली, मी मदत करायला गेलो नाही. मीटर पडला, आणि ती घरी निघून गेली. मी ओलाचिंब झालो होतो. छाती अजुनही धडधडत होती. मला आता तिच्याबद्दल करुणा, दया, सहानुभुती, यातलं काहीही वाटत नव्हतं. वाटत होता तो आदरयुक्त जिव्हाळा. तिच्या या असा विचार करण्याच्या स्टाईलमुळे मी थक्क झालो होतो. मी पुन्हा एकदा लुळा पांगळा झालो होतो. पहिल्या भेटीत माझे नुसते हात पाय गळून गेले होते, दुस-या भेटीत माझे डोळे आत्तापर्यंत काही कामाचे नव्हते हे मला तिने दिलेल्या दृष्टीतून उमगलं होतं. मी छत्री बंद केली, आणि एक हात खिशात घालून कॉलेजकडे चालायला लागलो. हाताला पेन ड्राईव्ह लागला. त्यात भरपूर पाणी गेलं असणार. म्हणजे तो नक्कीच खराब झाला असेल. पण मी 'अरे यार...' म्हटलं नाही. माझा चेहरा निर्विकार होता. आणि मनातल्या मनात मी हसत होतो.

(समाप्त)