सोमवार, ७ ऑक्टोबर, २०१३

इंग्लिश मिडियम!! कशाला??

गेल्या आठवड्यात एकदा रस्त्यावरून चाल्लो होतो तेव्हा रस्त्याच्या पलिकडच्या बाजुने एक हत्ती जात होता(लोकांकडून त्याच्या माहुतासाठी पैसे आणि स्वत:साठी खायला जे काय मिळेल ते मिळवत...). माझ्या समोरुन मला एक आई तिच्या लहान मुलीला घेऊन येताना दिसत होती. ती आपल्या मुलीचं लक्ष त्या हत्तीकडे वेधत होती. तेवढ्यात त्या गजराजाने भर रस्त्यात भलामोठ्ठा प्रसाद दिला. तशी ती बाई मोठ्ठ्याने आपल्या मुलीला म्हणाली, ‘‘ते बघ शर्वरी, एलिफंटने शीऽऽ केली!!’’ मला त्या हत्तीचा ताजा पो बघून वाटली नसेल एवढी किळस त्या बाईचं वाक्य ऐकून वाटली. ही कसली पद्धत मुलांना इंग्लिश शिकवायची? आणि नाहीतरी त्यांना इंग्लिश मिडियमात घातलंच आहे तर मग शाळेत शिकतील की ती इंग्रजी. निदान एरव्ही बोलताना तरी सरळ मातृभाषेत बोला. आमच्या इथल्या एका काकूबाईंना आपल्या मुलीला, ‘‘हे बघ स्टडी कर नाहीतर गॉड तुला पनिश करेल हा!’’ असा दम भरतानासुद्धा ऐकलंय मी. हे सगळं ऐकल्यावर आधी पोट धरुन हसायला येतं खरं, पण नंतर त्याबद्दल विचार केला की तितकंच वाईटही वाटायला लागतं. माझी आजी नेहमी म्हणते, की माणसाने बोलताना एकाच कोणत्यातरी भाषेत बोलावं. मराठीत बोलताना मराठीत, इंग्रजीत बोलताना इंग्रजीत. एका भाषेत बोलताना उगाच दुसऱ्या भाषेचे शब्द वापरू नयेत. मला ते नेहमीच पटत आलेलं आहे. इंग्रजी ही इंटरनॅशनल लँग्वेज आहे, इंग्रजी फ्लुएंटली बोलता येणं ही काळाची गरज आहे, त्यामुळे आपलं मूल हे इंग्लिश मिडियमात शिकलं तर स्मार्ट होईल, पुढे अभ्यासात मागे पडणार नाही, कॉलेजात इंग्लिश नीट बोलता न आल्याने उगाच त्याला कॉम्प्लेक्स येणार नाही, पुढे आयुष्यात सुद्धा त्याला काही त्रास होणार नाही, तेव्हा आपण त्याला इंग्लिश मिडियममध्येच घालूया... आणि त्याच्या आयुष्याचं कल्याण करुया!! असं ठरवून आजचे आई-बाबा मुलांना इंग्रजी शाळांमध्ये घालतायत. त्यात आपल्या धन्य सरकारच्या शिक्षणविषयक धन्य धोरणांमुळे मराठी माध्यमाच्या शाळांची धुळधाण उडत चाल्लीये, आणि परिणामी मराठी माध्यमात घालायची ईच्छा असूनही केवळ मराठी शाळांमध्ये नीट शिकवलं जात नाही, अशा समजूतीमुळे नाईलाजास्तव(किंवा ते निमित्त पुढे करून) आई-बाबा आपल्या प्रिय पाल्याला इंग्लिश मिडियममध्ये टाकतात. मग मुलाच्या कल्याणाची सुरुवात होते. सुरुवात केजीपासून(आजकाल खरं तर प्ले ग्रूपपासून...) होते. मराठी माध्यमातला, शिशुवर्गातला, जुनाट वाटणाऱ्या साध्या रंगसंगतीच्या गणवेशातला शेंबडा मुलगा फुकटात किंवा नगण्य किंमतीत शिक्षण घेत असतो. आणि इंग्रजी माध्यमातला, पॉश युनिफॉर्ममधला, केजीतला, स्मार्ट दिसणारा(त्याला शेंबूड येत नाही वाटतं) मुलगा शिक्षण घेण्यासाठी वर्षाचे किती रुपये मोजत असतो? जास्त नाही, फक्त 60-70 हजार!! हो, फक्त केजीसाठी साठ-सत्तर हजार मोजणारे पालक आहेत आज, इंटरनॅशनल स्कूलमध्ये आपल्या मुलाने शिकावं अशी ईच्छा असते ना त्यांची! त्याने त्यांची किंवा त्यांच्या मुलाची कुली सोन्याची होत असावीत, त्याशिवाय केजीसाठी एवढे पैसे मोजण्यात काय अर्थ आहे, हे मला कळत नाही. इतकंच नाही, या केजीतल्या मुलांना होमवर्क सुद्धा असतो म्हणे!! अहो, तिसरीपर्यंत मला गृहपाठ या शब्दाचा अर्थच माहिती नव्हता, आणि या मुलांना सरळ केजीपासून होमवर्क?? काय? तर अक्षरं गिरवा वगैरे... त्यासाठी या मुलांची ट्युशन्स घेणारी मंडळीसुद्धा आहेत बरं का! केजीत शिकवण्या?? एक काळ असा होता की शिकवणीला जावं लागलं, की मुलं लाजेने ओशाळून जायची. बरं या शिकवण्यासुद्धा शाळेचे शिक्षक फुकटात घेत असतील. आणि आता केजीसाठी ट्युशन्स?? वयाच्या चौथ्या-पाचव्या वर्षी, मुलांच्या बोटांच्या हाडांची रचना/वाढ तरी पूर्ण झालेली असते का? अशा स्थितीत त्यांना गाढवासारखी गिरवागिरवी करायला लाऊन त्यांच्या बोटांच्या रचनेची वाट नाही का लागणार? मला आठवतंय तेवढं शिशुवर्गात मी असताना आम्हांला नुसती अक्षरओळख करुन दिली होती. चित्रं दाखवून प्राण्यांची ओळख करुन दिली जायची. आणि असाच काहीतरी साधा-सोपा, शिशुवर्गाला साजेलसा अभ्यासक्रम असायचा. अभ्यास कसला, नुसती धम्माल होती सोमवार ते शुक्रवार रोज दोन तास फक्त. केजीत कुणी नापास व्हायचं नाही, आणि कोणी करुही नये. आता प्रायमरीत जाऊया. पहिलीत आल्यानंतर माझ्या हातात आधी पाटी-पेन्सिल आली. त्या पाटीवर अर्धा-एक महिना सराव केल्यानंतर वही-पेन्सिलशी ओळख झाली. तेव्हा आधी आम्हांला, //??!’()+- अशी चिन्हं काढायला शिकवलं. त्यानंतर बाराखडी, मग पुढचं सगळं. प्राथमिक शाळेत अगदी पहिल्यापासून हात व्यवस्थित जोडून (अंगठे सुद्धा बोटांच्या रेषेत सरळ ठेऊन) याकुंदेंदुतुषारहारधवला चालीत म्हणायची सवय लावली गेली. स्तोत्रांना वार दिले गेले होते. मंगळवारी प्रणम्यशिरसादेवं, शनिवारी भीमरूपी महारुद्रा; दहा मनाचे श्लोक आणि सगळी रामरक्षा हे आम्ही रोज म्हणत असू. त्यामुळे उच्चार स्वच्छ, स्पष्ट आणि शुद्ध व्हायला मदत झाली. दुसरीत गेलो तेव्हा पहिलीपासूनच मराठी माध्यमाच्या शाळांमधून इंग्रजी विषय सुद्धा शिकवण्याची योजना अंमलात (काळाची गरज नाही का!) आली. तेव्हा चौथीपर्यंत इंग्रजीची फक्त तोंडी परीक्षा घेतली जाऊ लागली. लेखी माध्यमिकमध्ये गेल्यावर. मी म्हणे आधी जरा बोबडा होतो. पण प्राथमिक शाळेत आल्यानंतर माझी वाणी, माझे उच्चार व्यवस्थित सुधारले. सगळ्यांच्याच बाबतीत होतं असं नाही, पण इंग्रजी माध्यमात गेलेल्या आणि तोतल्या राहिलेल्या बऱ्याच मुलांना पाहिलंय मी. त्यांच्या घरी कोणी तोतरं नाही किंवा त्यांची जीभही मुळात जड नाही. तरीही ही बोबडेपणाची अडचण! कशामुळे? कारण ज्या वयात शुद्ध-स्पष्ट बोलायची सवय लावायला हवी, त्या वयात हाय-फाय आणि स्टायलीश शैलीची इंग्रजीच फक्त काय ती शिकवली गेल्याचा हा परिणाम! माध्यमिक शाळेत गेल्यानंतर तर आनंदीआनंद होता. तरी मराठी माध्यमात आल्यामुळे कधीही अभ्यासात पाठी पडायची वेळ आली नाही. इंग्रजी हा तर माझा सर्वात लाडका विषय होता. पण मी माझी ही इंग्रजीविषयीची आवड अभ्यासापुरतीच मर्यादित ठेवली. कोणी म्हणालं, तुझं ठीक आहे रे, तू हुशार आहेस म्हणून निभावून नेलं. म्हणजे?? मूल मूळातच हुशार असलं, तर मराठी काय आणि इंग्लिश मिडियम काय, ते अभ्यासात चमकेलच... त्यावर भाषेच्या माध्यमाचा फारसा परिणाम होत नाही. उलट जर एखाद्या मुलाची बौद्धिक पातळी कमी असली, तर त्याला तो स्मार्ट होईल, या आशेने इंग्लिश मिडियममध्ये घालणं घोडचूक ठरतं. उलट त्यांना मराठी माध्यमातून शिक्षण घेणं सोप्पं जातं. याचा अर्थ मराठी इंग्रजीच्या तुलनेत सोप्पी आणि म्हणून थुकरट आहे असा होत नसून, त्यामागचं कारण ‘कोणत्याही व्यक्तिला कधीही कोणतीही गोष्ट आपल्या घरी बोल्ल्या जाणाऱ्या आपल्या मातृभाषेतून समजावली, की लवकर लक्षात येते; तीच गोष्ट परकीय भाषेतून समजावणं अवघड जातं’, हे आहे. त्यामुळे बौद्धिक पातळी कमी असणारी मुलं जर इंग्लिश माध्यमात गेली, तर मराठीत राहून पडली नसती एवढी मागे पडतात, लहानपणातच ताणतणावाने हैराण होतात, प्रसंगी त्यांचं मानसिक संतुलनही बिघडण्याचा संभव असतो. आणि याची जिवंत उदाहरणंसुद्धा मी पाहिलीयत. पण आपल्या मुलाची बौद्धिक पातळी कमी आहे, हे कोणता पालक म्हणायला तयार होईल? तेही तो मुलगा अवघा चार वर्षांचा असताना? अशावेळी आपल्या बौद्धिक पातळीवरून मुलाच्या बुद्ध्यांकाचा अंदाज बांधून निर्णय घेतला, तर तो मुलाच्याच हिताचा ठरतो नाहीका? याचा अर्थ सगळ्या ढ मुलांनी मराठीत जावं, आणि हुशार मुलांनी इंग्रजीत, असा अजिबात होत नाही. हुशार मुलांनी सुद्धा मराठीतच जायला हवं. कारण तेच, सवयीच्या भाषेतून शिक्षण घेतल्याने त्यांना इंग्रजी माध्यमात मिळाला नसता एवढा वाव मराठीतून शिक्षण घेतल्याने मिळू शकतो. आणि मराठीला कैवारी हवाच नाहीका? वाचनाची आवड सगळ्यानाच नसली, तरी बऱ्याच मुलांना असते. वाचणारी मुलं वाचतातच. वाचनाच्या सवयीत इंग्लिश-मराठी माध्यम हा मुद्दा येत नाही. पण मराठीतून शालेय शिक्षण घेतलेली, आणि मराठीबरोबरच इंग्लिश पुस्तकं वाचणारी मुलं बरीच दिसतात. त्याउलट, इंग्लिशमधून शालेय शिक्षण घेतलेली, आणि वाचनाची आवड असलेली मुलं, ही मराठी पुस्तकं वाचताना कमीच आढळून येतात. अर्थात, ठरावीक घरांच्या इतर संस्कारांमुळे यात अपवाद आढळून येऊ शकतात, पण तरीही ते कमीच... ‘अहो पण पुढे कॉलेजात गेल्यावर इंग्लिश फाडफाड बोलणाऱ्या मुलांमध्ये आमच्या मुलाला कॉम्प्लेक्स येईल त्याचं काय?’ काही होत नाही. कॉम्प्लेक्स येत नाही असं माझं म्हणणं नाही, मलाही आला होता. पण साता-समुद्रापार राहणाऱ्या गोऱ्या चामडीच्या ज्या डुकरांनी माझ्या देशाला सतत दिडशे वर्षं लुबाडलं, त्या लोकांची भाषा फाडायला मला जमत नाही, याविषयी यत्किंचितही लाज बाळगावी असं मला वाटत नाही. याउलट इंग्रजीतून शिक्षण घेणाऱ्या मुलांची अवस्था, निदान सांस्कृतिकदृष्ट्या तरी खूप वाईट असते असं माझं स्पष्ट मत आहे. ङ म्हणजे ड वर डॉट, आणि ञ हे ज सारखं काहीतरी अक्षर आहे असा समज; ळ, ण चे चुकीचे उच्चार; स्त्रीलिंगी-पुल्लिंगी असा काही भेदभाव न करता सगळ्या शब्दांना सरळ नपुंसक करुन टाकणे; सामान्यरूप, विभक्तीप्रत्यय कशाशी खातात हे माहिती नसल्याने गहूची पोळी, विज्ञानची वही असे शब्दप्रयोग हे या मुलांमध्ये हमखास दिसून येतात आणि ही मुलं स्वत:चं यामुळे वेळोवेळी हसं करून घेतात. अर्थात अशा मुलांची संख्या आज हसणाऱ्यांपेक्षा जास्त असल्याने त्यांना काही फरक पडत नसावा. उदाहरण दिल्याशिवाय माझंच समाधान होणार नाही म्हणून एक किस्सा सांगतो. एकदा शाळेच्या मधल्या सुट्टीत आमच्या इंग्रजी माध्यमाच्या मित्रांबरोबर आम्ही मराठी मिडियममधली मुलं गप्पा मारत उभी होतो. एक इंग्रजीचा मुलगा सारखं, ‘माझी चुकी नाही, तुझी चुकी आहे’ असं म्हणत होता. शेवटी मला न राहवून मी म्हटलं, ‘अरे, चुकी नाही रे, चूक! चुकी हे सामान्यरूप झालं!’ तर तो मुलगा ‘तेच रे ते! काय फरक पडतो?’ असं म्हणाला. मी म्हटलं, ‘सॉरी बाबा, तुला समजवायला गेलो ही माझीच मिस्टूक झाली!’ तसे सगळेजण एकसुरात ‘मिस्टेक!!!’ असं ओरडले. मी लगेच ‘तेच रे ते! काय फरक पडतो?’ असं म्हटल्यावर हशा पिकला. नुकत्याच आई झालेल्या माझ्या काही मावश्यांना मी 'काय? मराठी मिडियम ना?' असं विचारलं, की 'शीऽऽऽऽऽ मराठी काय??' असं ब-याचदा ऐकावं लागतं. मराठी शाळांचा दर्जा खालवतोय, तेव्हा मराठीसाठी असलेल्या कळवळ्यापोटी आपल्या मुलांचं आयुष्य का बर्बाद करु, असा विचार करुन जर इंग्रजीत घालत असाल, तर विचार जरा बदला. आज तुम्ही मुलांना मराठीत घालून एक उत्तम उदाहरण लोकांसमोर ठेवलंत, तर आणि तरंच उद्या मराठी शाळांसाठी मागणी वाढेल. तुमच्या मुलांना मराठीचे कैवारी करा, तुमची मुलं चमकतीलच, मराठीही चमकू लागेल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: