गुरुवार, ११ ऑक्टोबर, २०१२
आम्हांला काय हवंय?
माझे सगळे शाळकरी मित्र इंजिनिअरिंग करताहेत. माझी सहामाही परिक्षा नुकतीच संपल्याने मला सध्या भरपूर वेळ असतो आणि म्हणून मी त्यांना "भेटायला येता का?' असं विचारायला फोन किंवा मेसेज करत असतो. एरवी त्यांचे क्लासेस, कॉलेज किंवा परिक्षा असल्या की ते "नाही' म्हणतात. पण मी परवापासून विचारतोय तर एकजात सगळ्यांचं एकच उत्तर - असाइनमेंट्स आहेत रे! खूप आहेत. सॉरी, नाही जमणार. पुढच्या आठवड्यात एक्साम्स आहेत, त्यांचा अभ्यास करायला सुद्धा वेळ मिळत नाहीये.
मी विचारलं, की या असाइनमेंट्सचा मार्क मिळण्यापलीकडे काही उपयोग आहे का, तर सगळेच जण नाही म्हणाले. म्हणजे हा सुद्धा शाळेत असताना निरर्थकपणे वह्या पूर्ण करण्यात मुलांचा वेळ, शक्ती, शाई, कागद, पैसा(त्यांच्या पालकांचा) आणि सर्वांत महत्त्वाचा म्हणजे त्यांचा चांगला मूड वाया जायचा, आणि अजूनही जातो, त्यातलाच एक प्रकार. कॉमर्समध्ये आम्हांलाही असेच दहा-दहा मार्कांचे प्रोजेक्ट्स दिले जातात. हे प्रोजेक्ट्स कॉलेजने दिलेल्या वहीतच करून द्यावे लागतात, नाहीतर शून्य मार्क मिळतात. कॉलेजने दिलेल्या वहीचा दर्जा अतिशय हीन असतो. तरी एका वीस पानी वहीसाठी आम्हाला गेल्या वर्षी पन्नास रुपये मोजावे लागले होते. प्रत्येक विषयाला एक वही. असे 7 विषय. विद्यार्थ्यांनी आरडाओरड करून देखील पावत्या मिळाल्या नव्हत्या, किंवा वह्यांची किंमतही कमी झाली नव्हती. यावर्षी वह्यांच्या ऐवजी पस्तीस रुपयांत सात छोटी बुकलेट्स वाटली गेली. म्हणजे एका बुकलेटची किंमत पन्नास वरून पाच रुपयांवर आली.
नव्या क्रेडिट सिस्टीमनुसार दहा मार्क उपस्थितीला दिले जातात - "हवं तर मार्क देतो, पण कॉलेजात बसा,' अशी गयावया शिक्षण खातं आपल्याकडे करतंय, असाच सूर विद्यार्थ्यांमध्ये निघताना दिसायला लागला. मार्क हे एखाद्या विद्यार्थ्याला किती येतंय, हे ठरवण्यासाठी दिले जायचे. तुझं बूड सहा महिन्यांसाठी तू रोज कॉलेजच्या तुझ्या वर्गातल्या बाकडावर टेकवलंस की तुला दहा मार्क मिळतील, या पद्धतीला काय अर्थ आहे. बूड टेकवल्याने डोचक्यात काय शिरणार आहे? मार्कांच्या आमिषाने मुलं वर्गात बसतात सुद्धा, पण शिक्षक एखाद्-दुसरे सोडले तर बाकी सगळे अतिशय बकवास असतात. कॉलेजमध्ये आल्यापासून मी स्वत: काठावर पास होणारा विद्यार्थी आहे. मार्कांच्या आमिषांना भुलून मी मी कॉलेजला जात नाही. त्यामुळे कॉलेजमधल्या शिक्षकांच्या योग्यतेबद्दल मला जास्त काही बोलता येणार नाही. पण शाळेत डोकाऊन बघावं, तर मी बरंच काही बोलू शकतो.
आम्हांला आठवीत असताना सेमी-इंग्रजीच्या वर्गाला सायन्स शिकवायला एक शिक्षिका आली होती. टेम्पररी होती ती. ती मराठी सायन्सचं पुस्तक घेऊन यायची आणि सरळ सरळ मराठीतून धडा शिकवायची - शिकवायची म्हणजे, वाचून दाखवायची. तेही तिला नीट वाचता यायचं नाही. आमच्या वर्गातली दोन-तीन हुशार मुलं-मुली, आणि माझ्यासारखी काही आगाऊ कार्टी, जेव्हा तिला एखादा प्रश्न विचारायचे, तेव्हा तिची धांदल उडायची. मग अख्ख्या वर्गाकडे नजर टाकून, "कोण सांगेल याचं उत्तर? येतंय का कुणाला?' कुणीच हात वर केला नाही, की "उद्या शोधून आणा. नाहीच सापडलं तर मी सांगते.' मग ती दुसऱ्या दिवशी स्वत: त्याचं उत्तर शोधून आणायची.
मी मुद्दामून तिला उलटसुलट शंका विचारून गोंधळात पाडायचो. एकदा तिला मी jaggery म्हणजे काय, ते विचारलं होतं. तर jaggery म्हणजे "आर्द्रता' म्हणाली. थाप मारावी, तर थोडा तरी विचार करून मारावी की गं. गायीसाठी तयार करण्यात येणाऱ्या आंबोणामध्ये शेतकरी आर्द्रता का आणि कशी मिसळेल, हे मला पडलेलं एक कोडं आहे. विद्यार्थ्यांनी तिची तक्रार केली. तेव्हा तिचं परिक्षण घेतलं गेलं. त्या परिक्षणाच्या वेळी तिने कधी नव्हे ते फळ्यावर इंग्रजीमध्ये धड्याचे मुख्य मुद्दे लिहून काढले. त्यांत तीन-चार स्पेलिंग च्या चुका होत्या. अक्षरसुद्धा परिक्षकांना नीट वाचता येणार नाही असं काढलं होतं बहुतेक. आणि बाईसाहेब कधी नव्हे ते फाड-फाड इंग्रजीतून बोलत होत्या. अर्थात त्यांची इंग्रजीमधील शब्दसंपत्ती बेताचीच होती म्हणा. पण नुसतं इंग्रजी येत नाही म्हणून नाही, तर तिला शिकवताच यायचं नाही, म्हणून मला तिचा राग यायचा. तिला त्या परिक्षणानंतर काढून टाकण्यात आलं.
आठवीतच आमच्या इंग्रजी सुपर्ब शिकवणाऱ्या परब मॅडम रिटायर झाल्या, आणि त्यांच्या जागी कोणीतरी नवीन बाई आली. तिही अर्थात टेम्पररीच. गाईडमध्ये इंग्रजीच्या धड्यांचं मराठीत भाषांतर दिलेलं असायचं. ती भाषांतरं कापून या बाई आपल्या पुस्तकात ती कात्रणं धड्यांप्रमाणे घालून ठेवायच्या आणि मग आम्हांला शिकवायला यायच्या. त्यांचा आवाज कधी आमच्यापर्यंत पोचलाच नाही. लवकरच त्यांचीही गच्छंती झाली.
संस्कृतला नव्या बाई आल्या. थोड्या बोबड्या होत्या(आहेत). भरपूर लिहायला लावायच्या. लिहायला देताना त्या "त' चा उच्चार "त्' असा करायच्या आणि अर्ध्या त चा उच्चार पूर्ण करून मग त चा पाय मोडा असं सांगायच्या. तरी हे ठीक आहे. बाकी तश्या बऱ्या शिकवायच्या. निदान त्यांना विषयाचं ज्ञान तरी होतं. असो.
बऱ्याचदा मुलांची अशी ओरड असते, की मराठी शाळांमध्ये सेमी इंग्रजीच्या वर्गांकडे जास्त लक्ष दिले जाते, त्या वर्गाचे इतर वर्गांना अवाजवी दाखले दिले जातात, ज्यामुळे विनाकारण सेमी-इंग्रजी आणि इतर वर्गांत आपोआपच तेढ निर्माण होते. तसेच दहावीच्या परिक्षेत सेमी-इंग्रजीच्या विद्यार्थ्यांकडूनच जास्त अपेक्षा असल्याने शिक्षकांकडून त्यांच्याकडे जास्त लक्ष देण्यात येते आणि इतर वर्गांकडे दुर्लक्ष होते.
प्रत्येक पुस्तकात प्रत्येक धड्याखाली स्वाध्याय म्हणून प्रश्नोत्तरं दिलेली असतात. वरकरणी मुलांना धड्यातलं किती येतंय, हे त्यांना कळावं, म्हणून स्वाध्याय दिलाय, असं सांगितलं जातं. मुलं काय मूर्ख आहेत? पेपर काढणं सोयीचं जावं, म्हणून हे स्वाध्याय दिलेले असतात, हे चटकन मुलांच्या लक्षात येतं, आणि गाईड मधून फक्त धड्याखालची प्रश्नोत्तरं पाठ करून ही मुलं परिक्षेत पैकीच्या पैकी मार्क मिळवतात. मुळात धड्याखालचे स्वाध्याय देणं बंद करून, मागल्या वर्षींचे पेपर उपलब्ध करून देणे तात्पुरतं बंद केलं, की आपोआप मुलं सगळे धडे पूर्णपणे वाचतील आणि खऱ्या अर्थाने त्यांच्या डोक्यात भर पडेल. अशा रितीने घेण्यात येणारी परिक्षा सुद्धा खरी असेल आणि त्याचा निकाल सुद्धा.
इतिहास-नागरिकशास्त्र या विषयांना मार्कांच्या दृष्टीने जे महत्त्व दिलं जातं, ते अतिशय गैर वाटतं मला तरी. खरं तर
इतिहासापेक्षा नागरिकशास्त्र हा विषय जास्त महत्त्वाचा आहे. पण नागरिकशास्त्र हा विषय कंटाळवाणा आहे. त्यात त्याला चाळीसापैकी फक्त बारा मार्क असल्याने कुणाला परिक्षेच्या वेळीही त्याचा अभ्यास करावासा वाटत नाही. नागरिकशास्त्राचा अभ्यासक्रम चांगला असतो, पण परिक्षेच्या दृष्टीने त्याला फारसं महत्त्व न दिल्याने त्याच्याकडे विद्यार्थ्यांकडून कानाडोळा केला जातो. हे अगदी साहजिकच आहे. त्यामुळे चाळीसापैकी अठ्ठावीस मार्क नाशा ला, आणि फक्त बारा मार्क इतिहासाला द्यावेत, जेणेकरून मार्कांचे महत्त्व लक्षात घेऊन तरी मुलं या विषयाचा अभ्यास करतील. इतिहासच्या पुस्तकाकडे एक गोष्टीचं पुस्तक म्हणून बघितलं जातं. त्यामुळे मार्क कमी केले तरी वाचणारी मुलं इतिहासाचा अभ्यास करतीलच.
मराठी विषयांत घरी धडे वाचून येऊन परिक्षेत ते न बघता लिहायची पद्धत मला अजिबात आवडत नाही. अहो तुम्हांला मुलांच्या भाषेचं ज्ञान वाढवायचंय की पाठांतर? "दोन्ही' असं म्हणाल तर पाठांतर इतर विषयांमध्येसुद्धा होतच असतं. त्याची मराठी विषयात गरज काय? कवितांचं पाठांतर चालेल, पण धड्यांचं कशाला?
एकूण अभ्यासक्रम तसा फारसा वाईट नसतो, पण त्यातही सुधारणेला भरपूर वाव आहे. पण महाराष्ट्रातल्या सर्व स्तरातल्या मुलांना झेपेल, असा अभ्यासक्रम काढला जातो. तेव्हा, सर्व राज्याला एकच अभ्यासक्रम ठेवण्याऐवजी, जिल्ह्यानुसार अभ्यासक्रमाची पातळी ठेवण्यात यावी, असंही बरेच विद्यार्थी म्हणतात. उदाहरणार्थ, मुंबई-ठाण्यासारख्या जिल्ह्यांत, जिथे महाराष्ट्रांतील बहुतांश जिल्ह्यांच्या मानाने विद्यार्थ्यांना हव्या त्या सुविधा मिळणे सोयीस्कर जाते, तिथल्या अभ्यासक्रमाची पातळी आणि दर्जा जास्त ठेवला जावा.
अनेक शाळांमध्ये आठवीपासून संस्कृत, हिंदी किंवा काही शाळांमध्ये विदेशी भाषांचे पर्याय दिले जातात. त्याऐवजी(किंवा त्याबरोबरच) अर्थशास्त्र या विषयाचा पर्याय ठेवण्यात यावा. दहावी झाल्यानंतर मुलांना विज्ञान, वाणिज्य किंवा कला यापैंकी एक शाखा निवडावी लागते. इतिहासाप्रमाणेच भूगोलाचे महत्त्व कमी करून अर्थशास्त्र हा विषय आठवीपासूनच मुलांना लागू केल्यास दहावीपर्यंत आपल्याला कोणत्या शाखेत जास्त रस आहे, याची योग्य कल्पना मुलांना येऊ शकेल.
हे सर्व एक विद्यार्थी म्हणून सुचवत असताना एक नमूद करावेसे वाटते, की वर्षानुवर्षे सह-विद्यार्थ्यांशी सहज अधूनमधून चर्चा करून समोर आलेले विचार मी येथे मांडले आहेत. हे आणि असे विचार योग्य असतीलच, असं नाही. पण एकूणच विद्यार्थ्यांच्या मनात शिक्षणपद्धतीविषयी काय काय कल्पना आणि विचार आहेत, ते मांडण्याचा मी एक प्रयत्न केला आहे(यात एक विद्यार्थी म्हणून माझ्या काही कल्पना आणि विचार यांचाही समावेश होतोच).
हे आमचे विचार आम्ही कुणापुढे मांडायला जावं, तर "अभ्यास करा आधी स्वत:चा; ते सोडून नसत्या उखाळ्यापाखाळ्या काढत बसल्येत विद्वान' असं म्हणून आम्हांला गप्प केलं जातंच(अर्थात्, मी अभ्यास करत नाही, यात बरंच तथ्य आहे म्हणा). म्हणून इथे मांडतोय. चुकलो, तर दुरुस्त करा; पटलं, तर अंमलात आणा, एवढीच विनंती.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा