शनिवार, ६ ऑक्टोबर, २०१२

ट्रेन आणि थुंकी

शाळा संपली; दहावी पास झालो. चांगल्या कॉलेजात प्रवेशही मिळाला. आणि ओघानेच ट्रेनने नियमितपणे प्रवास करण्याचे दिवस सुरु झाले. ट्रेनमध्ये गर्दी असते, त्यापेक्षा बस बरी - अशा मताचा मी होतो. पण माझं हे मत, मला लहान असताना आईबरोबर लेडिज कंपार्टमेंटात दरवेळी चढावं लागल्याने तयार झालं होतं, तेव्हा आता ते मत बदलून, जनरल डब्यातला माझा रोजचा प्रवास माझ्या अपेक्षेपेक्षा कितीतरी अधिक सुखमय होऊ लागला. कधी जास्त गर्दीतून जावं लागलं, तरी मजा यायची. आणि मग ट्रेनपेक्षा बसचा प्रवासच कितीतरी जास्त क्लेशकारक आहे, अशा मताचा मी झालो. पहिला महिनाभर सेकंडक्लासात घालवला. मग कन्सेशनपास मिळायला लागल्यापासून फर्स्टक्लासने यायला लागलो. सकाळी-सकाळी गोरेगाव-जोगेश्वरीला लागून जलद ट्रेन दौडु लागली, की पूर्वेकडे उगवणारा भलामोठा तांबडा सूर्य बघून आपण दहिसरला का बरं राहतो, असं राहून राहून वाटतं. वांद्रे जवळ आलं की तिथल्या खाडीत प्रत्येक ट्रेनच्या या-ना त्या डब्यातून कचऱ्याने भरलेल्या प्लॅस्टिकच्या पिशव्या पडायला लागतात, तेव्हा त्यांना फेकणाऱ्या लोकांनाच फेकून द्यावंसं वाटतं. पुढे माहिम-माटुंगा हा प्रवास जीव (म्हणजे नाक) मुठीत धरून करावा लागतो, निदान सकाळच्या वेळीतरी. माहिम-माटुंगा दरम्यानच्या सर्व रेल्वेपट्ट्‌या म्हणजे मुंबईतील सर्वात मोठं सार्वजनिक मलनिस्सारण केंद्र आहे, असं म्हणायला हरकत नाही. केवळ मोठं असल्यानेच तिथे रांगा लागत नसाव्यात, इतकाच काय तो त्यातला आणि बाकी "सुलभ' मधील फरक. दादरला ट्रेन लागली, की अतिशय चिंचोळ्या जिन्यांवर मुंबईकरांच्या फौजा चढाव करायला सुरुवात करतात, ते बघणं म्हणजे एक डिफरंटच अनुभव असतो. सेकंडक्लासात मराठमोळ्या, तर फर्स्ट क्लासात प्रामुख्याने गुर्जरगप्पा कानी पडतात. कधीकधी हिंदी आणि इंग्रजीत गप्पा झाडणारी माझ्यासारखी कॉलेजवयीन मुलं सुद्धा येतात. बारावीत भल्या पहाटे उठून क्लासला जायचो, म्हणून वसई-विरार वरून येणाऱ्या गाडीत चढायचो. तिथे तर भलताच प्रकार. वसईच्या लोकांची भाषा काही निराळीच आहे. त्यातलं ओ-का-ठो मला कळलं नाही कधी. या गाड्यांमध्ये एखाद-दुसरे नायजेरियन नागरिक सुद्धा दिसून येतात. विरारवरून येणारी बहुतेक मंडळी, ही अंगापिंडाने चांगली मजबूत असतात. त्यामुळे "अपना पैर हटाओ, हात निकालो, बाजू हटो ना, उतरो जल्दी जल्दी' अशा तुसड्या स्वरातील सुचना त्यांना द्यायला माझं मन (आणि तोंड) कधीही धजत नाही. ट्रेनमध्ये सगळ्यांत मजेशीर आणि कधीकधी(म्हणजे तशी नेहमीच) किचकट वाटणारी एक गोष्ट म्हणजे लेडीज डब्याबाहेरचा आणि आतला गोंधळ, धक्काबुक्की आणि कलकलाट. त्या डब्यात आधी कोण चढतो (ते), यावरून (अक्षरश:) मारामारी होते. एकमेकींच्या वेण्या, ओढण्या, पदर ओढत या बायका ना धड स्वत: नीट चढतात, ना दुसऱ्याला चढू देतात. बरं गाडी ज्या दिशेनं चालली आहे, त्यादिशेकडे तोंड करून कधीही चढणार किंवा उतरणार नाहीत. वसई-विरार ट्रेनमध्ये, परतीच्या वेळी, गोरेगाव-मालाड(आजकाल काही ठरावीक गाड्या थांबतात), दहिसर इथे हमखास बाया प्लॅटफॉर्मवर उतरताना तोल जाऊन आदळताना आढळतात. काही स्त्रिया माझ्या या सगळ्या निरीक्षणावर आक्षेप घेतील बहुतेक, पण माझ्या कित्येक मैत्रिणींनी स्वत:च या गोष्टीची "लेडीज कंपार्टमेंट? बापरे! डोंट आस्क!' अशा काहीशा शब्दांत कबुली दिली आहे, की "जेंट्‌स खूपच को-ऑपरेटिव्ह असतात.' सकाळी सकाळी विरारहून येणाऱ्या गाड्या आमच्या बोरीवलीहून निघालेल्या संथ गतीच्या ट्रेन्सच्या बाजूने भरधाव वेगाने जातात. त्यांच्या कोणत्यातरी डब्यामध्ये झांजांचा आवाज नेहमी येत असतो. लोक भजन म्हणत असतात. मला एकदातरी त्या भजन गाणाऱ्या लोकांच्या डब्यातून प्रवास करायचा आहे, पण आजपर्यंत तरी तो योग आलेला नाही. दहिसरला सकाळी अकरा वाजून सतरा मिनिंटानी येणाऱ्या गाडीमध्ये पुढच्या फर्स्टक्लासमध्ये काही अयोध्येकरांनी रामाच्या रटाळ आरती-स्तोत्रांचा सपाटा लावलेला असतो. खरं तर, त्या आरत्या रटाळ नसाव्यात, पण त्या गाणाऱ्या लोकांचचं स्वरज्ञान बेताचं असतं, त्यामुळे त्या डब्यात चढलं, की डोकं फिरतं. पण एक वेगळीच गोष्ट आहे, जी या सगळ्यापेक्षा हटके आहे, आणि भारतीय रेल्वेची ती एक अविभाज्य घटक आहे. प्रत्येक स्टेशनावरील चित्रविचित्र पोशाखातील विविध रंगाढंगाच्या मुलींपेक्षाही हीगोष्ट माझ्या जास्त नजरेत भरत आलीय. ती म्हणजे - पिचकारी - थुंकी ! रेल्वेने रोज हजारो लोक प्रवास करत असतात. त्यातले शेकडो लोक येता-जाता थुंकत असतात. कोणी दरवाज्यात लटकत असताना अधून-मधून थुंकतं, कुणी त्या लटकणाऱ्यांना बाजुला व्हायला सांगून स्वत:ची पिंक टाकून घेतं, तर कुणी खिडकीच्या गजांमधून थुंकतं. कुणी पचा-पचा थुंकत राहतात, कुणी घसा खरवडून "खर्राक्‌... थू' करतात. कुणी जीभेनं आणि प्रसंगी बोटाने तोंडात उरलेला सगळा चोथा ओठांशी आणून मग थुंकतात. कुणी थुंकतंय की ओकतंय तेच कधी कधी कळत नाही. काही जण हनुवटी गळ्याजवळ आणून, मग ती पुढे नेताना थुंकतात, जेणेकरून थुंकी लांबवर उडावी. काहीजण नुसतेच जुन्या नळातून सरळ पाणी खाली गळावं तसे थुंकतात. कुणी लाल थुंकतात, कुणी नुसताच पांढरा फेस थुंकतात, कुणी थुंकायला मजा येते म्हणून सुद्धा थुंकत असावेत - काही सांगता येत नाही. अहो, ढुंगणातून काढायचा, तो धूर नळकांडी वापरून तोंडातून काढणारे आणि त्याला "कूल' म्हणणारे का थोडे आहेत? त्यांच्या तुलनेत थुंकणं हे कूल असतं, असं कुणी मानलं तर त्यात विकृती ती कसली? असो. लहानपणी मला या थुंकणाऱ्यांकडे बघून मोठी मजा वाटायची. रस्त्यातून येता-जाता मला जागोजागी थुंकलेलं दिसून यायचं. एकेकाची थुंकी भरपूर मोठ्ठी असायची. मी एकदा थुंकुन पाहिलं, तर माझी थुंकी त्यामानाने खूपच छोटी वाटली मला. मी नाराज झालो. पण त्यावेळी आपण सलमान खानला फायटिंग शिकऊ शकतो, असे मानणारे काडी-पेहेलवान आम्ही! थुंकी मोठी दिसावी, म्हणून लोक ती आधी तोंडात साठवून घेत असावेत, आणि पुरेशी साठली, की मग थुंकत असावेत, असं मला वाटलं. कारण असं केल्याशिवाय माझी थुंकी मोठी येत नाही, आणि जर माझी येत नाही, तर इतर कुणाची कशी बरं येईल? या गोष्टीला इगो-सेंट्रलिझम असं म्हणतात म्हणे - लहान मुलांमध्ये नेहमी आढळून येतो. काही जण म्हणतात, की तो माझ्यात अजूनही आहे. ते जाऊ दे. तर आईबरोबर एकदा फिरत असताना, माझ्या बाजूने एक माणूस गेला आणि जाताना थुंकला, त्याची थुंकी छानपैकी नाण्याच्या आकाराएवढी मोठी होती. मी लगेच प्रयोग करून बघितला. चांगली तीन-चार मिनिटं मी तोंडात जमेल तेवढी थुंकी गोळा करण्यात घालवला. मग मी ती थुंकलो. लगेच आईने मला फटका मारला, तिथल्या तिथेच. "सगळे थुंकतात म्हणून मी सुद्धा थुंकतो, मला मोठी थुंकी हवीये सगळ्यांसारखी', असं मी म्हटल्यावर मला अजून एक फटका बसला. "ते थुंकणारे लोक घाण्णेड्डे असतात, आपण थुंकायचं नाही त्यांच्यासारखं' अशी समज मला देण्यात आली. तेव्हापासून मी रस्त्यात थुंकणं जे बंद केलं(त्यापूर्वी तरी असा कितींदा थुंकलो होतो म्हणा), ते आजतागायत मी कधी थुंकलेलो नाही, आणि थुंकणारही नाही. लहान असताना सुट्टीत ठाकूरद्वारला आजीकडे जायचो, तेव्हा तिथल्या चौथ्या मजल्यावरून जिन्यामधून वाकून बघायचो, आणि थेट तळमजल्यावर नेम लाऊन थुंकायचो. एवढ्या वरून स्वत:ची थुंकी खाली जाताना बघताना मजा यायची. तो खेळच होता माझा. कंटाळा येईपर्यंत खेळत बसायचो रोज संध्याकाळी. एकदा कुणा बाईच्या अंगावर माझी थुंकी पडली. तिने मान वर करून बघायच्या आतच मी मान मागे केली आणि घरात धूम ठोकली. तेव्हापासून तो खेळ बंद झाला. आता मी ना रस्त्यात थुंकायचो, ना जिन्यात. पण उल्हासनगरला जात असताना, ट्रेनमध्ये माझ्या समोर बसलेल्या आजीबाईंनी थुंकण्याची एक वेगळीच स्टाईल मला दाखवली. म्हणजे, त्या थुंकत होत्या, मी बघितली. दात एकमेकांवर ठेऊन त्यांच्या फटींमधून त्या खिडकीबाहेर थुंकत होत्या. मला ते बघून सापाच्या फुत्काराची आठवण झाली. लगेच मलाही त्याचं प्रात्यक्षिक करायची हुक्की आली होती, पण सार्वजनिक ठिकाणी थुंकणं मी बंद केलं असल्याने, मला आमच्या बाथरूमात त्याचा प्रयोग करावा लागला - अर्थात तो अयशस्वी ठरला. कितीही केल्या माझ्या दातांमधून पुरेशी थुंकी बाहेर येईना. शेवटी मी नाद सोडला. आज मी अजिबात थुंकत नाही. कुठेही नाही. जेव्हा लोक थुंकतात, तेव्हा ते बघायला किळस वाटते. असं वाटतं की जाऊन एक थोतरीत ठेऊन द्यावी त्या थुंकणाऱ्याच्या. बोरिवली स्टेशनात पहिल्या आणि दुसऱ्या प्लॅटफॉर्मच्या मध्ये जे रूळ आहेत, त्यांच्यावरचे दगड, आणि मधलं लोखंडी कुंपण, हे सदैव लाल असतं. इतर सुचनांप्रमाणेच रेल्वेची बाई फाटक्या लाऊडस्पिकर मधून "यात्रियोंसे निवेदन है, की वे कृपया रेल्वे प्लॅटफॉर्मपर मत थुके. थुकनेसे बिमारी फैलती है' असं काहीतरी बरळत असते. तिच्याकडे कोण लक्ष देतं कुणास ठाऊक. तरी प्लॅटफॉर्मवर आजकाल नाही कोणी थुंकत जास्त. बहुधा दंड आकारत असावेत. रेल्वेने नव्या लोकल्स आणल्या, तर त्यावरही लाल रंगाची होळी खेळली जाऊ लागली. कोणाला म्हटलं, की बाबा रे, कशाला थुंकतोस, उगाच कशाला मुंबई खराब करतोस, तर "मुंबई? कचरपट्टी तो है, सब कचरा करते है. उसमे मैने जरासा थुक दिया तो इतना क्या बिघडने वाला है?' असंच काहीसं उत्तर ऐकायला मिळणारच. जिथे आपण राहतो, जी आपली कर्मभूमी आहे, तिचा जरासा तरी आदर उरी बाळगायला नको का? मला तर लहानपणीच समज आली नशीबाने, आता बाकीच्यांना कधी येईल ते बघूया. खरं तर शहाण्यास शब्दाचा मार... या नियमाने अश्या थुकाड्यांना बडवूनच काढायला हवं. सार्वजनिक मालमत्तेविषयी अनादराची प्रवृत्ती इतकी बोकाळली आहे, की कुल्यावर चार छड्या बसल्याशिवाय अशा लोकांना समज यायची नाही. चार-पाच वर्षं जरी थुंकणाऱ्यांवर आणि कचरा टाकणाऱ्यांवर जरब ठेवली, की भितीपोटी का होईना, या वाईट सवयी सुटतील. आणि एकदा त्या सुटल्या, मनोवृत्ती बदलली, की आपोआप स्वच्छतेची आवड निर्माण होऊन लोकच या नियमांचं पालन करतील. एवढंच नाही, तर त्यांची मानसिकता एवढी बदलेल, की प्रसंगी कायद्याचा बडगा दाखवणाऱ्यांची गरजही लागणार नाही; एखाद्या थुंकणाऱ्या, कचरा टाकणाऱ्या व्यक्तीला रेल्वेमधल्या डब्यातील एकजात सगळ्यांनी झापताना, सुनावताना मला बघायचंय. लाजेनं थिजुन जाऊन ती व्यक्ती नरमली तर ठीक, नाहीतर अशा माणसाला थोडा चोप मिळाला तरी हरकत नाही. आणि एकदा का अशा प्रसंगांना सुरुवात झाली, की आपोआपच अमेरिका आणि लंडनसारख्या प्रदेशांना पॉश मानणाऱ्यांना सध्या कचऱ्याखाली गाडला गेलेला आपला "पॉश' देश दिसू लागेल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: