शुक्रवार, ६ फेब्रुवारी, २०१५

ट्रेनमधलं तत्त्वज्ञान भाग 4

ट्रेन्स उशीरा धावत होत्या. पाऊस जबरदस्त कोसळत होता. स्टेशनवरच्या छपरांमध्ये कुठल्याशा फटींमधनं नाहीतर कुठल्यातरी भोकांमधनं पाणी वाट काढून खाली येत होतं. एखादी ट्रेन लागलीच प्लॅटफाॅर्मात तर येताना आपल्याबरोबर दारावरच्या पट्ट्यांमधून वाहून आणलेलं पाणी थांबल्या थांबल्या सोडून देत होती. छप्पर आणि ट्रेनमधल्या छोट्याशा अंतराखालून जाताना प्रवासी पूर्ण भिजून जात होते. ट्रेनचे एका बाजूचे दरवाजे पूर्ण बंद, तर दुस-या बाजूचे चढण्या-उतरण्यासाठी अर्धवट उघडे. सगळ्या खिडक्यांवर काच अंथरलेली. त्यात एखादी जुनी गाडी आली तर तिची सगळीकडून गळती चालूच. जुन्या गाड्यांनी बिचा-यांनी जितकी वर्षं सेवा केली असेल प्रवाशांची, त्याचं बेचव फळ त्यांना एकतर यार्डात सडून, नाहीतर चुकून कधी योग आलाच पुन्हा मुंबईभर फेरफटका मारण्याचा, तर प्रत्येक स्टेशनावर लोकांची वाकडी झालेली तोंडं बघून मिळणार होतं. (अर्थात्, ही सहानुभूती माझ्या मनात लिहिण्यापुरतीच आहे. जुनी ट्रेन दिसली की माझंही तोंड वाकडं होतं.)

मी ही सगळी धांदल बघत उभा होतो. मला भिजायला आवडतं. काॅलेजला मी बॅग फक्त दाखवण्यापुरती न्यायचो. त्यात आयडी आणि पाण्याची बाटली सोडली तर बाकी काही नसायचं. वही असली तर तीही अशीच कुठलीतरी... वाया गेलेली. त्यामुळे बॅगसकट भिजण्यात काहीच अडचण नव्हती. मोबाईलला प्लॅस्टिक कव्हरात घालायचं. पाकिट भिजलं तर भिजू द्यावं. थोडक्यात, आधीच झालेली सर्दी सोडून माझ्या भिजण्याच्या सहसा काहीही आड येत नाही.

पण मी भिजत नव्हतो. मी वाट बघत होतो. ट्रेन्सची नव्हे, तिची. ती अजून यायची होती. तिनं मला थांबायला सांगितलं होतं. तिनं केलेला एक प्रोजेक्ट छापण्यासाठी म्हणून मी घरी घेऊन जाणार होतो. तो ती देणार होती. मी पावसात भिजण्याच्या नादात पुढे निघून आलो होतो आणि ती मागे काॅलेजात सर ओसरण्याची वाट पाहात थांबली होती. तिचा फोन आला, 'हवीये ना प्रोजेक्ट शीट? कुठ्येस तू?' मी विसरूनच गेलो होतो. स्टेशनजवळ वाट बघत थांबलो. छपराला लटकणा-या पंख्याखाली बॅग सुकवत उभा राहिलो. कारण बॅग ओली दिसली असती तर मला शीट नक्कीच मिळाली नसती. ओल्या केसांना पंख्याचा वारा लागून मला सटासट शिंका येऊन गेल्या होत्या. पण पर्याय नव्हता. मला स्वतःला तो प्रोजेक्ट करण्याची अक्कल किंवा हिम्मत नव्हती. तसंही पाच-दहा मार्कांसाठी आपलं डोकं खाजवणं मला नेहमीच स्वतःच्या बुद्धिमत्तेचा अपमान वाटत आलंय.

ती आली. दिसली. मी वाटेकडे डोळे लावून बसलोच होतो, पण माझी अगतिकता दिसता कामा नये असं उगाच वाटलं. म्हणून मी एक वैचारिक पवित्रा घेऊन, कुठेतरी शून्यात नजर लावून किंचित हसत उभा राहिलो. आता ती येईल, मला गदागदा हलवेल, नाहीतर माझ्या डोळ्यांसमोर टिचक्या मारून विचारेल, 'कसला विचार करतोयस एवढा?' मग मी एकदम गहन वाटणारं असं काहीतरी उत्तर ठोकेन... ज्याचा अर्थ ना तिला कळेल ना मला. तिनं जास्त रस घेतलाच तर लावेन काहीतरी असंबद्ध पाल्हाळ. त्यात पटाईत होतो मी. शून्यात नजर लावून बसलेला, गहन विचारात बुडालेला, एक चमत्कारिक (आणि म्हणूनच इंटरस्टिंग) मुलगा...

'तुझ्याकडे छत्री नावाचा प्रकार नाहीये?'

पोपट झाला. पण मी इतक्यात हार मानणार नव्हतो. तिने आपला तपोभंग केल्याची तिला जाणीव व्हावी म्हणून मी दचकल्यासारखं केलं.

'अरे? तू कधी आलीस?'

'तू केवढा भिजलायस! आणि वरून पंख्याखाली का उभा आहेस मूर्ख माणसासारखा! आजारी पडशील की.'

काहीच उपयोग नव्हता. जाऊदे. ही मुलगी ना स्वतः कल्पनाविश्वात रमते ना दुस-याला रमू देते. झक मारून वास्तवात यावं लागतं हिच्यासमोर. हे मी मनातल्या मनात मान्य केलंच, पण नेमकी माझ्या शरीरानंही त्याच वेळी गद्दारी केली. त्याच वेळी लागोपाठ तीनदा शिंकलो. तिचा मुद्दा बिनतोड निघाला. ती मला पकडून पंख्यापासून लांब घेऊन गेली.

'हे घे. आणि आण उद्या काहीही करून. बस आज हवं तर रात्रभर जागत.'

'येस मॅम.'

'काय मजा येते रे रोज रोज भिजून?'

'मस्त वाटतं. तू भिजून बघ मग कळेल तुला.'

'भिजायला मलाही आवडतं रे. पण तुझं आपलं जेव्हा बघावं तेव्हा भिजतच असतोस तू.'

मी तिच्याकडे नीट बघितलं. तीसुद्धा ब-यापैकी भिजलेली होती. आधीच पाऊण पँट घालून आली होती. आणि पाठीला चिकटलेला स्लीव्हलेस कुडता. (तरी तो अजून पारदर्शक झाला नव्हता.) एका हातात ओली निळी छत्री, त्याच हाताच्या खांद्याला लटकलेली पर्स, केस मोकळे सोडलेले आणि किंचितसे भिजलेले. उघड्या दंडांवरून ओघळतं दिसणारं पाणी. गव्हाळ कांती लकाकत होती. अवतार बाकी एकदम फ्रेश दिसत होता. चेहरा स्वच्छ आणि उजळलेला.

'छान दिसत्येस' मी पटकन बोलून गेलो.

ती चपापलीच. डोळे मोठे करून दोन्ही हातांनी केस कानामागे घेत 'छान? या अशा अवतारात?' असं म्हणत तिनं स्वतःचा अवतार पाहण्यासाठी मान खाली झुकवली. तसे मागे केलेले केस पुढे आले आणि चेहरा लपवू लागले. तरी कडेनं पाहिल्यावर तिच्या गालावर बारीकशी खळी उमटलेली मला दिसली. मान पुन्हा सरळ केली तेव्हा चेहरा पुन्हा मख्ख झाला होता आणि हसू गायब झालं होतं. तरी ओठ आतमध्ये दाबले गेले होते. किती तो कंट्रोल स्वतःवर! आणि कशाला! पण नाही. आम्ही उघड उघड नाही लाजणार जा! पण तिची खळी पाहून मीही हसून बघत होतो आणि मला हसताना पाहून तिच्या ओठांची कसरतच सुरू झाली. शेवटी न राहवून, 'मी अजिबात चांगली दिसत नाहीये. एकदम चिकट चिकट झाल्यासारखं वाटतंय मला. कधी एकदा घरी जाते आणि गरम पाण्याने आंघोळ करते असं झालंय.' बोलताना तिच्या खळ्या दोन-तीनदा उमटून गेल्या. मी तेवढ्यावरच समाधान मानायचं ठरवलं.

'गरमावरून आठवलं... तुला आंघोळ करणं सोडलं तर बाकी कसली घाई नाहीये ना?'

'नाही... का? मी कुठेही येणार नाहीये हां'

'तू नको येऊस. मी जाऊन येतो पटकन. तू थांब इथेच. ट्रेन आली तर जाऊ नकोस प्लीज.'

'मी जाणार.'

'अगं... थांब ना.'

आता ती मस्त हसली. सबटेक्स्ट जाणवला - 'बिचारा. मजा येते याला छळायला.' मी अजून बिचारे भाव आणले चेह-यावर. 'प्लीज प्लीज.'

'बरं थांबते. पण कुठे जातोयस?'

'तू बघ मी आलोच.'

'लवकर ये.'

मी धावत धावत ब्रीज चढत गेलो. स्टेशनच्या बाहेर पडलो, समोरच एक वडापाववाला होता. भन्नाट गर्दी होती. मी ट्रेनमध्ये चढावं तसं त्या गर्दीत धक्काबुक्की करत आणि साॅरी साॅरी म्हणत पुढे गेलो. पुड्यात बांधून घेऊन, बॅगेत भरून धावत धावत परत आलो. येताना छपॅक छपॅक करत आजुबाजूच्या लोकांवर चिखल उडवत, आणि त्यांच्या शिव्या खात आलो. ट्रेन लागताना दिसत होती. आधीच उशीरा आलेली.

'ये पटकन ये.' ती ट्रेनमध्ये चढायच्याच तयारीत दिसत होती.

आम्ही दोघंही चढलो. चढायला गर्दी तूफान होती. पण अगदी आत शिरायला मिळालं. आणि तिला बसायलाही मिळालं. मला दम लागला होता ते बघून ती मला बसायला सांगत होती, पण मी तिलाच बळे बळे बसवलं. तिच्या मांडीवर बॅगेतला पुडा काढून ठेवला. गरमागरम लागल्यावर तिचा चेहरा पुन्हा उजळला. मी तिची छत्री आणि दोघांच्या बॅगा वर सामानाच्या रॅकवर फेकल्या. तिने पुडा उघडला आणि चित्कारली.

'कांदा भजी ओ माय गाॅऽड!'

मला तिचे ते भाव पाहून तृप्त झाल्यागत वाटत होतं. पोट तेवढ्यानेच भरल्यासारखं. मनात तिला पटवावं, तिचं मन जिंकावं, तिच्यावर प्रेम करावं, यापैकी कुठलीही योजना शिजत नव्हती. पण तिचं ते हसू मला जाम भावलं होतं आणि ते मला पुन्हा पुन्हा पाहायचं होतं. त्या हसण्याला कारणीभूत मी ठरावं आणि मीच ठरावं अशी इच्छा नकळत प्रकट झाली होती आणि दिवसेंदिवस बळावत होती. मी फारसा विचार करत नव्हतो. मला भरपूर मुली आवडायच्या. काही नुसत्याच पाहायला, काहींचा गंभीर नाद लागलेला. ही तर माझी साधी सरळ मैत्रीण होती. आणि त्यामुळे तिला खुश बघावंसं वाटण्यात मला काहीच गैर वाटत नव्हतं. केवळ मैत्रीच्या नात्याने तिच्यात गुंतत होतो, पण नेमका किती अडकलो होतो, हे इतक्या सहजासहजी समजणार नव्हतं मला. ते समजून घेण्याच्या मनस्थितीतच नव्हतो मी. तिच्या हातांत असलेली आणि माझ्यासाठी म्हणून उचलून धरलेली गरमागरम कांदाभजी माझी वाट बघत होती. आणि मी तिच्याकडे ओढला जात होतो.

क्रमशः

© कौस्तुभ अनिल पेंढारकर.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: