शुक्रवार, १ मे, २०१५

नातं - नव्याने सुरू झालेलं



त्याआधी जुहू चौपाटीवर मी एकदाच गेलो होतो, फुटबॉल खेळायला. अनुभव फारसा चांगला नव्हता. वाळूतून धावताना तिच्यात दडलेले पेव्हर ब्लॉक्स पायाला लागले होते. दोन्ही पाय दोन तीन दिवस चांगलेच ठणकले होते. मग आम्ही जरा थांबलो होतो आणि गोळा खाल्ला होता. त्यानंतर पुन्हा खेळायला गेलो तर गोळ्याची तोंडात राहिलेली चव आणि खारं वातावरण यांचं काहीतरी अजीब मिश्रण होऊन मला उलटी झाली होती. आम्ही जिथे खेळत होतो तिथेच मी ओकल्याने आमच्या खेळाचा खेळखंडोबा झाला होता. त्यानंतर काही दिवसांतच माझी जुहूला पुन्हा फेरी होईल असं वाटलं नव्हतं. पण झाली. आणि यावेळचा अनुभव कायच्या काय वेगळा होता.
ओळख फारशी नव्हती. काही दिवसांचीच. दोनदा प्रत्यक्ष भेटलो होतो, आठवडाभर व्हॉट्सअ‍ॅपवर चॅट केलं होतं, आणि नव्याने ओळख झालेल्या व्यक्तीशी बोलायचं तेवढं सगळं दोन्ही बाजूंनी बोलून झालं होतं. अचानक लहर आली आणि विचारून टाकलं, 'मरीन ड्राईव्हला येतेस? माझ्याबरोबर?' उत्तरादाखल डोळे मोठे करणारा स्माईली आणि त्यापाठोपाठ 'का?' हा प्रश्न.
'कारण मला तुझ्याबरोबर जायचंय कुठेतरी, म्हणून.'
पंधरा मिंटांनी रिप्लाय आला - 'माझ्याबरोबर का?'
मी एवढा वेळ वाट पाहून तसंही वैतागलो होतो. 'आलीये हौस, म्हणून विचारतोय. तुला कसला डाऊट वगैरे येतोय का?'
'डाऊट? कसला?'
'कसला ते तुलाच माहिती. येतोय ना?'
'हो. थोडासा, तू इतक्या लवकर कसा विचारू शकतोस?'
'मग अजून किती दिवसांनी विचारायला हवं होतं?'
ती हसली असावी. तसा इमोजी आला.
'मरीन ड्राईव्ह नको. नुकतीच जाऊन आल्येय.'
'मग?'
'जुहूला जाऊया?'
काय करावं? मीसुद्धा जुहूला नुकताच जाऊन आलो होतो. आणि मरीन ड्राईव्ह ऐवजी जुहू निवडणारी मुलगी... असो. असतो चॉईस एकेकाचा काय करणार! मी ओके म्हटलं. आणि शनिवारी सकाळी सकाळी आम्ही जुहूवर जाऊन पोचलो. मघाशी सांगितल्याप्रमाणे फोनवर सगळंच बोलून झालेलं होतं, त्यामुळे प्रत्यक्ष भेटल्यानंतर आम्ही बराच वेळ गप्पच बसून होतो. काहीच सुचत नव्हतो. ती मला प्लॅटफॉर्मवरच भेटली होती. पण ट्रेनमध्ये लेडीज डब्यात चढली. त्या वेळी विशेष गर्दीसुद्धा नव्हती. म्हणून मी आधीच खट्टू झालो होतो. त्यात आता ती गप्प. काय बोलावं, काही कळेना.
आम्ही दोघं एका ठिकाणी जाऊन बसलो. सकाळी सकाळी धावायला आणि इतर व्यायाम करायला आलेल्यांची ब-यापैकी गर्दी होती चौपाटीवर. आम्ही त्यातल्या त्यात निर्जन जागा निवडली होती. आजही तिथे फुटबॉल खेळायला बरीच मुलं आलेली होती. मला याआधीचा अनुभव आठवला. पेव्हर ब्लॉक्स आठवले. मग गोळ्याची आठवण झाली आणि पोटातच गोळा आला. मला आज काही केल्या गोळा खायचा नव्हता.


'गोळा खाऊया? इथला गोळा मस्त असतो.'
'अगं... गोळा...'
'डोंट टेल मी... तू गोळा नाही खात?'
'खातो, पण... आत्ताच तर आलोय ना, एवढी काय घाई आहे? सावकाश खाऊ'

आम्ही लाटांकडे बघत बसलो. निदान मी तरी, तिचं लक्ष कुठे होतं ते तिलाच ठाऊक. समुद्र - दुसरा शब्द नाही - घाणेरडा दिसत होता. निदान तिथे बसल्या बसल्या माझ्या नजरेच्या टप्प्यात जो भाग सहजपणे येत होता, तो तरी घाणेरडाच दिसत होता. वाळूवर येणा-या प्रत्येक लाटेबरोबर काहीतरी कचरा येऊन साचत होता. मला राग आला; लोकांचा - कारण ते माझा समुद्र घाण करत होते, आणि स्वतःचा - कारण मी त्याबाबतीत नाक मुरडण्याखेरीज काहीच करत नव्हतो.

'छान आहे ना समुद्र?'
'तुला यात काय छान वाटलं? सगळीकडे नुसता कचरा आहे.'
'तू इथल्या इथे बघू नकोस ना. जरा लांबवर नजर फिरवून बघ की.'
'आपला दृष्टिक्षेप जितका आखूड असेल तितका समुद्र स्वच्छ राहिल असं आता मला वाटायला लागलंय. आपण जिथे जातो तिथे घाण करतो.'

ती गप्प झाली. माझ्याही लक्षात आलं की मी तिच्याशी उगाचच तुसड्या स्वरात बोललो. मी सॉरी म्हणणार, एवढ्यात ती उठली आणि पुढे चालायला लागली. ती रागात उठली नव्हती, अगदी सावकाश पुढे चालली होती. थोडं पुढे जाऊन ती थांबली, इथे तिथे मान वळवली, मग पाठी वळून माझ्याकडे पाहायला लागली. सूर्य तिच्या डोळ्यांत गेल्याने तिचे डोळे बारीक झाले आणि तिने डोळ्यांवर हात घेतला. तिचे केस खा-या वा-यावर मस्त उडत होते. तिचा सुती पांढरा कुडता तिच्या अंगाला वा-यामुळे पुढून बिलगला होता. आणि पाठीमागून वा-याबरोबर वाहून जाऊ पाहात होता. तिने घातलेल्या जीन्सच्या पाऊण चड्डीला आणि हातांना वाळू लागली होती. ती तिने झटकली, पण वाळू हट्टी होती. दिवसेंदिवस, रोजच्या रोज नुसता समुद्राच्या खा-या तपकिरी गारढोण लाटांचा मार खाऊन त्या वाळूला वैताग आला होता. आता तिला ऊब हवी होती.

चेह-यावर हसू उमटलं, नजर माझ्यावर ठेवून, हनुवटी खाली घेऊन मला जवळ बोलावलं. हनुवटी खाली घेताना डोळे बॅक टू नॉर्मल झाले तेव्हा त्यांत मला एक वेगळाच उत्साह जाणवला. ती शांत उभी होती, तिची जराही चळवळ चालू नव्हती. फक्त डोळे अस्वस्थ दिसत होते. त्यांच्यात आर्जव होते. हनुवटी पुन्हा वर गेली तसे डोळे सूर्यप्रकाशात बारीक झाले. मी अजून जागचा हललो नव्हतो. चेहरा उतावळा झालेला दिसला, वाळू लागलेला, छोट्याशा बोटांची नखं निळी रंगवलेला हात वर उचलला गेला आणि मला तिच्याबरोबर यायला खुणावू लागला. मी त्यापुढे काही विचार न करता उठलो. ती जिथे नेईल, ती जे दाखवेल, ते मला आता हवं होतं. का? ते मला कळत नव्हतं.

वाळू झटकत मी उठलो, तिच्याजवळ गेलो, ती 'चल' म्हणाली आणि आम्ही दोघं पुढे निघालो. आम्ही सुक्या वाळूची हद्द ओलांडली, ओल्या वाळूवर तिचा पाय अलगदपणे पडला. तिने चपला काढल्या, तिच्या बरोबर मी सुद्धा काढल्या. चपला हातात घेऊन आम्ही दोघंही पुढपर्यंत चालत गेलो. ओली वाळू मला आवडते, त्यात पाय जास्त रूतत नाहीत. गार गार मऊशार वाटतं. आम्ही पावलांच्या खुणा उमटवत समुद्राजवळ गेलो. एक लाट आम्हाला बघून धावत धावत पुढे आली, आणि आमचे पाय गुडघ्यापर्यंत धुवून आमचं स्वागत केलं. आणि त्या अथांग समुद्राशी एकरूप व्हायला आल्या वाटेने परत निघून गेली. पण येताना ज्या उत्साहाने ती आली होती, तो उत्साह जाताना जाणवला नाही. तिच्या मऊशार कांतीला स्पर्श केल्यानंतर कोणालाच तिच्यापासून दूर जाणं पसंत नव्हतं. नाईलाजाने, निरूत्साहाने, त्या लाटेने आमचा निरोप घेतला. जाता जाता आम्हाला तिच्याबरोबर खेचून नेण्याचा केविलवाणा प्रयत्नसुद्धा केला. पायाखाली फक्त पावलांना टेकवायला पुरेल एवढीच जमीन उरल्याचा भास होत होता. छान वाटत होतं.

अगदी काही क्षणांतच, त्या परतलेल्या लाटेचा धीर सुटला आणि ती पुन्हा आम्हाला भेटायला धावून आली. आम्ही तिथे उभं राहून त्या लाटेच्या मनाशी असा बराच वेळ खेळ खेळत उभे होतो. मी बाजूला पाहिलं. ती माझ्याकडेच पाहात होती. तिचा चेहरा मस्त खुलला होता. पायांना होणा-या गुदगुल्या ती दरवेळी नव्याने अनुभवत होती. माझ्यासाठी हा अनुभव काही नवीन नव्हता. याआधी ब-याच चौपाट्यांवर असा अनुभव घेतला होता. त्यातल्या कितीतरी चौपाट्या जास्त स्वच्छसुद्धा होत्या. पण ही मुलगी एखाद्या चार पाच वर्षांच्या लहान मुलीसारखी या पाण्याचा आनंद लुटत होती.

'तू इथे पहिल्यांदा आलीयस का?'
'नाही रे... असं का विचारतोस?'
'तशीच वागत्येस म्हणून विचारलं.'
'हो ना? मी हज्जारदा आल्येय इथे. पण जेव्हा कधी येते तेव्हा आपण पहिल्यांदाच इथे आलोय असं वाटतं. का कोणास ठाऊक!'
'जुहूला हज्जारदा आलीयस? एवढी निमित्तं कुठून मिळाली तुला इथे येण्यासाठी?'
'निमित्ताची काय गरज? यावंसं वाटलं इथे की येते. कोणी बरोबर येणारं असलं तर ठीक, नसलं तर एकटी येते. पण मी इथे यावंसं वाटलं की स्वत:ला आवरत नाही. मी लहानपणापासून येते इथे'

मला मी माझंच प्रतिबिंब समोर बघत असल्याचा भास झाला. फरक हाच होता, की जे तिला जुहू चौपाटीबद्दल वाटत होतं, ते मला मरीन ड्राईव्ह बद्दल वाटायचं, वाटतं. पण काही केल्या मरीन ड्राईव्ह आणि जुहूची तुलनाच मला खुपत होती. कदाचित मरीन ड्राईव्हवर मी कधीच कंटाळलो नव्हतो म्हणून आणि जुहूला पहिल्याच भेटीत आजारी पडलो होतो म्हणून... मला त्यामुळे तिचं म्हणणं पटतही होतं, आणि त्याच वेळी खुपतही होतं.

पायांना लाट पुन्हा भिजवून गेली. तेव्हा मी तिच्या चेह-याकडे पाहिलं. आणि माझ्या लक्षात आलं, की या लाटा 'आम्हांला' भेटायला येत नव्हत्या. त्या फक्त तिच्यासाठी, तिला भेटायला येत होत्या. ती नसताना तिच्या वाटेकडे डोळे लावण्यासाठी, आणि ती असताना तिला सतत येऊन बिलगण्यासाठी. चौपाटीवरची इतर सगळी माणसं नगण्य होती. चौपाटी कितीही खराब झाली, समुद्र कितीही घाण झाला, तरी वर्षानुवर्षं त्याच्याशी असलेलं नातं विसरून न जाता वेळ मिळेल तसा सतत त्याला भेटायला येणारी ती - आणि स्वतः घाण करून नंतर चौपाटीला नावं ठेवणा-या कृतघ्न माणसांमध्ये, या एक अपवाद ठरलेल्या मुलीशी जिव्हाळ्याचं नातं ठेवणारा समुद्र - आणि या दोघांचं अव्यक्त प्रेम पाहणारा मी, असे आम्ही तिघेच तिथे उरल्यागत झालो होतो.

मला त्रास झाला. मला स्वतःची लाज वाटली. आणि पुढचा मागचा काहीही विचार न करता मी चौपाटीवर, समुद्रातून वाहून आलेला, मला दिसेल तो कचरा उचलत सुटलो. ती माझ्याकडे विस्मयचकित दृष्टीने पाहायला लागली. थोडा वेळ तिलाही कळेना की मी काय करतोय, पण मग तीही हसत हसत माझ्याबरोबर कचरा उचलायला लागली. आम्ही दोघंही तिथे जवळच असलेल्या कचरापेटीत सगळा उचललेला कचरा टाकत होतो. आम्हाला कळलंच नाही की आमच्या चार हातांना हळूहळू अजून हात येऊन मिळत होते, मात्र चौपाटी आमच्या अपेक्षेपेक्षा जलद गतीने स्वच्छ होत होती, आणि समुद्राशी माझं नातं अधिकाधिक घट्ट होत होतं.
- कौस्तुभ अनिल पेंढारकर

(लोकप्रभा साप्ताहिकात पूर्वप्रकाशित)

४ टिप्पण्या:

- © Kaustubh Anil Pendharkar म्हणाले...
ही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
- © Kaustubh Anil Pendharkar म्हणाले...
ही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
- © Kaustubh Anil Pendharkar म्हणाले...

हा लेख या ब्लाॅगवर दिनांक 1 मे 2015 रोजी भारतातून सकाळी 9.55 वाजता प्रकाशित करण्यात आला आहे. या लेखाचे सर्व हक्क लेखकाच्या नावाने सुरक्षित आहेत.

लेखकाच्या संमतीशिवाय या लेखनाचे लेखकाला श्रेय देऊन अथवा न देऊन पुनःप्रकाशन करणा-यावर लेखकाकडून कायदेशीर कारवाई करण्यात येईल

Unknown म्हणाले...

निव्वळ कमाल!खूप दिवसांनी इतकं तरल आणि सुंदर काहीतरी वाचलं.:)