शुक्रवार, १५ मे, २००९

मिसळपाव डॉट कॉम - एक मजेशीर ठिकाण

जवळजवळ सव्वा वर्षापासून मी एका सुंदर मराठी संकेतस्थळावर वारंवार जातो. तिथे विविध विषयांवर वादविवाद, चर्चा, इ. ची रेलचेल असते. कविता, प्रवासवर्णने, वैचारिक लेख, माहितीपर लेख अशा साहित्याच्या प्रकारांना तिथे विशेष वाव आहे. तसेच खवय्ये आणि नवे खाद्यपदार्थ तयार करण्यास उत्सुक असणाऱ्यांनी या संकेतस्थळाला जरूर भेट द्यावी. कारण येथे विविध पाककृती देखील दिल्या जातात.
या संकेतस्थळावरील वातावरण अस्सल मराठी आहे. येथे प्रत्येक इंग्रजी प्रचलित शब्दाला मराठी शब्द उपलब्ध आहे. नव्या सभासदांना या उपलब्धतेची जाणीव जुने सभासद करून देतात. उदाहरणार्थ, इंटरनेट - महाजाल, वेबसाईट - संकेतस्थळ, पासवर्ड - संकेताक्षर इत्यादी.
येथे प्रत्येक प्रकारच्या लेखन व प्रकाशनासाठी विविध विभाग आहेत. प्रत्येक प्रकाशनाचे उपप्रकारही अनेक आहेत. मराठी साहित्यात इतक्या भावना आहेत, हे त्या भावना माहित असूनही कुणाच्या लक्षात येत नाही. पण मिसळपाव डॉट कॉम वर या सर्व भावनांसाठी सारे दरवाजे उघडे असतात. एकदा या मिसळपावाची हवा लागली, की त्या हवेशी आपण समरस कधी होतो, हे आपल्याला कळतच नाही. आणि आपोआपच आपल्या आत, मनाच्या व मेंदूच्या विविध कोपऱ्यात दडलेला कलाकार बाहेर येऊ लागतो. आपण आयुष्यात कधी केल्या नसतील अशा सुंदर कल्पना आपल्या मनात येतात. त्यांना आपण कवितेचे रूप देतो, नाहीतर सरळ गद्य लेख लिहीतो. आणि आपण हे सर्व केलं, पहिल्यांदा जरी केलं, तरी त्यात आपल्याला विशेष असं काहीच वाटत नाही. कारण त्या हवेत जिवंत राहण्यासाठी लागणारा प्राणवायू हा कल्पनाशक्तीतून आपणास मिळतो. त्यामुळे आपल्या वास्तव जीवनाचा साहित्याशी अमरत्वाचा जो संबंध जोडला जातो, तो हृदयाच्या शेवटच्या ठोक्यापर्यंत टिकून राहतो.
अशा या सुंदर संकेतस्थळाचा महाजालावरील पत्ता - www.misalpav.com

स्वप्ननगरी

स्वप्ननगरीत माझ्या मी
सोन्याने न्हाऊन निघालो
आईने पाणी शिंपडल्यावर
खडबडूनि जागा झालो

स्वप्ननगरीत माझ्या
ताकाचे प्याले मी प्यालो
जरा जास्तच प्यायल्यामुळे
खडबडूनि जागा झालो

जिंकूनि क्रिकेट वर्ल्डकप
मी माझ्या मायदेशी आलो
मॅच हरल्याच्या बोंबा ऐकून
खडबडूनि जागा झालो

जेव्हा खरोखर जाग आली
तेव्हा कळले झोपेत होतो
आई म्हणाली मला माझी
मी झोपेत बडबडत होतो

झोप

दुपारी माझा सूर्य उगवे
मावळतीची नसे निश्चित वेळ
जाग आल्यास झोपी जाण्याचा
असाच आहे माझा हा खेळ

सकाळी उठवून म्हणते आई
शाळेला जायचंय कर घाई
दोन मिनिटांत उठतो म्हणुनी
माझी स्वारी झोपून जाई

कविता पाठ होत नाही
कडवे किती बडे बडे
झोपेत बनवे मी कित्येक गाणी
आनंदी आनंद गडे

संगीताचे जसे असतात सूर
तसेच असे माझे घोरणे
जी कुंभकर्णाची तत्वे होती
तीच आहेत माझी धोरणे

मला सारखी झोप येते
त्यावर काही नाही उपाय
तुम्हीच सांगा मंडळी आता
मी नेमके करू काय?

जास्वंद

पानापानांवरती आला शहारा
कोमल भासला बोचरा वारा !
शाखेवरच अडल्या जलधारा
फुलला पिसारा !!

जीवनाचा प्रवास झाला सुरू
लाडके असे ते माझे लेंकरू !
छेडितसे तयां दुष्ट पांखरू
कसे सहन करु?

पाचुंसाठी त्या देठ वधारला
सुर्याने प्रकाश दिधला त्याला !
प्रार्थना करितो हीच देवाला
उमलूदे त्याला !!

कळी म्हणते जग हे मोठाले
चहूदिशांनी मनासि वेधिले !
म्हणूनच पाचूला मी छेदिले
दुनियेला भेटले !!

तुझ्यासाठी सोसेन सारे कष्ट
जल शोषून जरी भेदले हे ओष्ठ !
मजवरि कधी न होता रूष्ठ
होशिल तू धष्टपुष्ठ !!

रक्तरत्न फुलले बाहेर
पाचुच्या शेराला सव्वाशेर !
लाल पाकळ्या डोई मोहोर
जणु नाचतो मोर !!

डोळे दिपले दिसता ते दृश्य
सदा छळतसे वारा अदृश्य !
कोमल पाकळ्या व्हाव्या अस्पृश्य
जग हे सदृश !!

नीतिने केला हाय अपघात
मायबापच बसले पहात !
त्राणच उरले नाही अंगात
उगवली रात !!

नको तो रविवार !!

चौथे चिमणराव ह्या चिं. वि. जोशींच्या पुस्तकात चिमणरावांना रविवार हा कधीच सुखाचा सुवर्णदिन वाटला नाही.
त्यावरुन रविवारला हल्लीच्या शाळेतल्या एखाद्या विद्यार्थ्याच्या दृष्टिकोनातून नावे ठेवण्याची मला कल्पना आली. ती पुढीलप्रमाणे
मांडत आहे -

मौजेचे सहस्रावधी क्षण
वाटते असतील विलक्षण
व्यर्थ जातात पण
तोचि रविवार म्हणावा

थोडक्यात काय, सुट्टी मिळते, पण फुकट जाते. शनिवारी शाळेतून प्रचंड गृहपाठ मिळालेला असतो. तो रविवारावर ढकलण्यात येतो. शनिवारीच काय ती मौजमजा! अभ्यासात जाते रविवारची रजा.

गणित-मराठी-संस्कृत
हे अनावश्यक सुहृद
जेव्हा पकडती मानगूट
तोचि रविवार म्हणावा

शिकवण्या घेणारे नेमके रविवारीच सोकावतात. मुलांना उशिरा उठायला एक दिवस मिळतो, तोही घालवायचा, अशा त्यांच्या महत्त्वाकांक्षा असतात. बिचारी मुले आधीपासूनच अर्धवट झोपेत असतात, त्यात जांभया आणणारे विषय शिकवले जाताता. म्हणजे आधीच उल्हास, अन् त्यात फल्गुन मास!

सुदैवाने मिळे निद्रा
तिजवरीही येते गदा
असेच चालू सदान् कदा
तोचि रविवार म्हणावा

दुपारीदेखील विश्रांती मिळत नाही. शनिवारचा ढकललेला अभ्यास पूर्ण करावा लागतो. संध्याकाळी सुट्टीवर असणार् या व जाग्या झालेल्या आई-बाबा नावाच्या तोफांना तोंड द्यावे लागते{कारण खेळताना कोणाचीतरी खिडकीची काच आड येते}. त्याबद्दल चौदावे रत्न पटकावून रात्री प्रायश्चितार्थ जास्त अभ्यास करावा लागतो.

करावे लागती कष्ट
होत नसे काही इष्ट
दैव होई जेव्हा रुष्ट
तोचि रविवार म्हणावा

असा हा रविवार आठवड्यात नसावा हेच बेहत्तर !!
पण मग झी मराठीवर चित्रपट पाहता येणार नाही, हे मान्य.

नयन मोहणारे नैनीताल - भाग १

मी येथे माझ्या प्रवासाबद्दलचे विचार सांगण्याच्या फंदात जास्त पडणार नाही. फक्त अनुभव नमुद करण्याचा प्रयत्न करीन. कारण विचार, प्रतिक्रिया, कोट्या या भरपूर असतात, आहेत; आणि त्या सांगत बसल्यास मूळ विषयावरून मी भरकटतो. असे प्रस्तुत लेखात झाल्यास तसे मला वाचकांनी सांगावे ही विनंती.
मागच्या महिन्यात नैनीतालला जाऊन आलो. तेथे जाण्यासाठी आधी पूर्णपणे ए.सी. असणाऱ्या ए.के.राजधानी मधून प्रवास घडला व दिल्लीत उतरणे झाले. त्यामुळे दक्षिण ध्रुवाकडे जात असताना मध्येच वाळवंट लागावे, तशी गत झाली. दिल्लीच्या निझामुद्दीन स्टेशनवर उतरुन जवळच्या कमसुम कॅफेमध्ये जेवलो. तिथून नॉन एसी बसमधून आम्ही रामनगर या जिम कॉरबेट पार्कच्या हद्दीजवळील ठिकाणी गेलो. मध्येच बस खराब झाल्याने आम्हाला रामनगरात पोचायला रात्रीचे 10.30 वाजले.
त्या हॉटेलात तंबू आणि कॉटेजस मध्ये राहायची सोय होती. माझ्या नशिबात तंबू होता. का कोण जाणे, पण प्रचंड उत्साह, काहीतरी ऍक्टीव्ह वाटण्याजोगे करण्याची ईच्छा आणि तसेच शारीरिक तयारी असूनही, लगेच झोप लागली. माझा तर रात्रीतच अंाघोळ करायचा इरादा होता. कारण ए.के.राजधानीत व बसमध्ये न्हाणीघराची व्यवस्था नव्हती. पण रामनगरचं पाणी एवढं थंडगार होतं, की मी केवळ स्पर्शानेच थरथरू लागलो. तेव्हा म्हटलं, बाबा झोप पत्करली.
दुसऱ्या दिवशी आम्हाला पाच वाजता ऊठून पावणे सहा पर्यंत सर्व काही आटपायचं होतं. पण आम्ही पक्के सूर्यवंशी निघालो ना! आमची स्वारी पावणे सहा वाजताच ऊठली. दहा-पंधरा मिनिटांत सर्व व्यवहार उरकले. आंघोळ करायला नंतर वेळ देणार होते. पण नाहीतरी आंघोळीची घाई कुणाला होती. आधीच चार चार कपडे अंगावर चढवूनसुद्धा आम्ही कुडकुडत होतो.
आम्हाला एकूण पाच जिप्सी गाड्यांत बसवण्यात आले. आणि त्या ज्या काही भरधाव वेगात सुटल्या म्हणता! आम्ही जंगल सफारीला निघालो होतो. एका जिप्सी गाडीत कमीत कमी सहा प्रवासी, चालक आणि वाटाड्या. मी थोड्या वेळाने उभा राहिलो. दोन्ही हात टायटॅनिकच्या पोझमध्ये पसरवले, आणि त्या बोचऱ्या वाऱ्याला आव्हान देत तसाच उभा राहिलो होतो, जोवर गाडीने मध्येच ब्रेक मारल्याने माझ्या केंद्रस्थानी गाडीचा एक आडवा रॉड लागला, आणि मला माझे हात तिथे सुरक्षेसाठी धाडावे लागले. आम्हाला सतर्क राहण्यास सांगितलेले होते, व एखादा प्राणी वा पक्षी दिसल्यास गोंगाट न करता, खुणेने इतरांचे लक्ष तिथे वेधण्यास सांगितले होते. पण एखादा प्राणी दिसेल तर ना! आम्हाला दिसले काय, तर लंगूर आणि डरे. ज्यांनी आम्हाला आधी पाहिले आणि त्यांच्या ऐवजी आम्हालांच घाबरून वेग वाढवावा लागला. काही वात्रट नगांनी शेवटी कंटाळून वाटेल तिथे बोट दाखवून ""ए तो बघ घोडा!'' किंवा "ए ते बघ रानडुक्कर!!'' असे ओरडण्यास सुरुवात केली. त्यामुळे अनेकदा गाड्या विनाकारण थांबल्या. शेवटी आम्ही सगळेच मनाला वाटेल त्या प्राण्याचे नाव घेऊन वाट्टेल तिथे बोटे दाखवायला सुरुवात केली.
मी कॅमेरा घेऊन गेलो होतो, पण फोटो काढायच्या मुडमध्ये बिलकुल नव्हतो. आधीच्या माझ्या मोजक्या अशा काही प्रवासांतून मला असा अनुभव आला, की फोटो काढायच्या फंदात पडल्याने, आपली उघड्या डोळ्यांनी निसर्गाची रचना व सौंदर्य पाहून घेण्याची संधी हुकते. ती संधी यावेळी मला काहीही करून हुकवायची नव्हती.
आम्हांला तेव्हा काही मोजकेच प्राणी दिसले. उदा. पाच सहा मोर-लांडोर, हरिण (काहीजण उगाच त्याला बार्किंग डीयर म्हणत होते. पण ते फक्त आम्हांला नैनीतालच्या झूमध्येच पाहायला मिळाले), साप(मेलेला), माकडे, एक गाय, बास! याउपर आम्हांला काहीही दिसले नाही. एक गोष्ट मानली पाहिजे, की आम्हांला जिथे नेले होते तिथे दुतर्फा असलेल्या जंगलाचे सौंदर्य मोहून टाकणारे होते. निदान मी तरी, उभा असल्याने, अगणित पक्षी पाहिले. त्यांची नावे येथे दिली असती, पण मलाच माहित नसल्याने देत नाही.
सफारी चांगले दोन ते तीन तास चालली. बोरिवलीच्या नॅशनल पार्कची लायन किंवा टायगर सफारी, जिच्यात एकटे दुकटे वाघ-सिंह असतात, त्यात पाच-दहा मिनिटातच झोप येते. पण या सफारीने मात्र माझी अन्‌ सर्वांचीच झोप उडवली. सफारीहून परत आल्यावर आम्ही हॉटेलमागच्या नदीत बराच वेळ डुंबलो. नदीत शेवाळे भरपूर वाढले होते. ते सहज हातात यायचे. ते एकमेकांवर, एकमेकांच्या चड्डी नि सदऱ्यात फेकून आम्ही भयंकर मस्ती केली. नदीतून बाहेर आल्यावर सर्वांनी पुन्हा बाथरूमात जाऊन आंघोळी केल्या. पण माझ्या हुशार सहप्रवाशांना याची कल्पना नव्हती, की नदीतील वाहते शुद्ध पाणी म्हणजे काही स्वीमिंग पुलामधील क्लोरिनेटेड वॉटर नव्हे. आणि त्या नदीचे पाणी खरोखर स्वच्छ आणि शुद्ध होते. तसेच बाथरूमच्या थंड पाण्यात आंघोळ करण्याच्या भितीला निमित्त म्हणून नदीचे पाणी मी कल्पनेनेच शतपटींनी शुद्ध झाल्याचे अनुभवले व आपण आंघोळ न केल्याची कारणमीमांसा केली.
त्यानंतर रामनगरबद्दल जास्त काही सांगण्यासारखे नाही. आम्ही तिथून दुपारी दोन किंवा तीन वाजता निघालो. तोवर पत्ते, गप्पाटप्पा, यातच वेळ गेला. संध्याकाळी सहाच्या सुमारास नैनीतालला पोचलो. आम्हांला तेव्हा सांगण्यात आले, की नैनीताल शहर हे एरियल व्ह्यु ने पाहायला मिळेल अशा उंच ठिकाणी आमचे हॉटेल आहे. आणि खरोखरच ते हॉटेल नैनीताल शहरामधील उंचावरील वास्तूंपैकी एक होते. आम्हांला हॉटेलच्या पुढल्या भागात उभे केले व प्राथमिक स्वरूपाच्या ओळखी-पाळखी करुन दिल्या. मग आम्हांला आमच्या डॉर्मिटरीज्‌ दाखविण्यात आल्या. त्या छान होत्या. आमचे सामान त्या डॉर्मिटरीज्‌ मध्ये ठेवल्यानंतर आम्ही हॉटेलच्या पाठच्या भागात गेलो. आणि आम्हांला जे दृश्य दिसले, त्याने आम्ही इतकी वर्षे मुम्बईत बसून फुकट घालवली असे वाटू लागले.

त्या दिवशी आम्हाला विश्रांतीसाठी मोकळीक दिली होती. पण विश्रांती घ्यायची कुणाला होती लेकाला? नैनी तलावाचे मायावी दर्शन आणि त्यालाच लागून असलेल्या क्रिकेटचे मैदान इतक्या वरून पाहिल्यानंतर कुणाला एका जागेवर स्वस्थ बसवेल?
सर्व सहप्रवासी एव्हांना चांगलेच मित्र झाले होते. त्यामुळे हसत-खेळत, खिदळत, दिवस निघून गेला आणि रात्र झाल्याचं कुणाच्या लक्षातही आलं नाही. रात्री आम्हांला गरम गरम टोमॅटोचं सूप ब्रेडच्या तुकड्यांबरोबर दिलं. ते आम्ही इतक्यांदा परत मागून घेतलं, की अर्ध्या तासाच्या आत सर्व सूप संपलं. रात्री आम्ही पत्ते खेळत जागत होतो. कारण अंगाअंगात रोमांच भरलं होतं. कुणाला झोपच येत नव्हती. शेवटी हॉटेलच्या दीपक सरांनी येऊन दमदाटीच्या स्वरूपात सांगितलं, की दुसऱ्या दिवशी आम्हांला पाच वाजता उठणे अत्यावश्यक होतं. शेवटी नाईलाजास्तव आम्ही खाटेवर पाठ टेकवली. तरी रात्रभर एकमेकांवर टॉर्चचा प्रकाश मारणे, उश्या चोरणे, खाट जोरजोरात हलवणे असे अक्षरश: पोरकट चाळे आम्ही चालू ठेवले. दुसऱ्या दिवशी पाच वाजता आम्ही उठलो तेव्हा आम्हाला कळलं की आपण उगाच लवकर उठलो आहोत. सगळेजण डाराडूर झोपले असताना आम्ही फुकटच एक तास लवकर उठलो. खरं तर सहा वाजता उठायचं होतं. मग आम्ही मिळालेला तास तरी का सोडावा? लगेच झोपून गेलो. तो एकदम सव्वा सहा वाजता जागे झालो. तेव्हा आम्हा सगळ्यांना आमच्यातल्याच दोघा मित्रांनी उठवलं. आदल्या रात्री आमच्यातला एकजण पत्ते खेळायच्या आधीच झोपला होता. तोच आम्ही अजुनही बिछान्यावर रेंगाळत पडलेला पाहिला. जेव्हा सगळेजण 'फ्रेश' होऊन आलो, तेव्हाही त्याने फक्त दात घासून कप़डे बदलले होते. मी त्याला विचारलं, "अरे फ्रेश होऊन आलास का?'' तर म्हणाला, "मी पावणे सहा वाजताच फ्रेश झालो. आणि परत येऊन झोपलो.''

त्या दिवशी टीम बिल्डींग ऍक्टिविटीझ होत्या. प्लॅंक वॉक, टायटॅनिक, स्पायडर वेब, ट्रस्ट फॉल, आणि ब्लाइंडफोल्ड ट्रेक. मी आणि माझ्या ग्रुपने सगळ्यातच गटांगळ्या खाल्या. एकूण चार ग्रुपमधील आमचा ग्रुप सगळ्यांत बेकार होता. आणि त्या ग्रुपचा मी लिडर म्हटल्यावर सगळ्यांनी माझ्यावरच ताशेरे ओढले. प्रत्येक ग्रुपला कशाना कशात तरी एक्सिलेंट मिळाले. पण आम्ही आपले प्रत्येकात ऍवरेज, प्लॅंक वॉक मध्ये तर बिलो ऍवरेज. मला अगदीच मेल्याहून मेल्यासारखं झालं. पण त्याच वेळी आम्हा सर्वांच्या एक गोष्ट लक्षात आली, की भले आम्ही डोकं न लावता सगळे उपद्‌व्याप (ऍक्टिविटीझ)केले, तरी आमच्याच ग्रुपने सगळ्यात जास्त मजा केली.

प्लॅंक वॉक च्या वेळी आम्ही सगळ्यात जास्त वेळा पडण्याचा रेकॉर्ड केला. टायटॅनिक च्या वेळी (दोन दगडांवर एक ओंडका ठेवून त्यावर सात जणांनी कमीत कमी दहा सेकंदासाठी उभे राहायचे, जमीनीवर कोणताही अवयव लागता कामा नाही.) आम्ही तीन सेकंद तरी नीट उभे राहिलो असलो तर शप्पथ. वास्तविक आमच्या ग्रुपमध्ये जाडा एकच होता. तरी आम्हाला जमलं नाही.
ट्रस्ट फॉल म्हणजे ग्रुपमधील इतरांनी कापड ताणून धरायचे आणि एकाने पाय न वाकवता त्या कापडावर पडायचे. मी हा फॉल तीन वेळा केला. पण मला एकदाही पाय ताठ ठेवता आला नाही. आमच्यातल्या जाड्यालाही जमलं, ते मला जमलं नाही. पण मी ते लगेच विसरलो. असं पडायचा प्रयत्न घरी मी हजारदा केला आहे. पण एकदाही मला तो जमला नाही. स्पायडर वेब हा ट्रस्ट फॉलनंतरचा पहिला चांगला जमलेला उपद्‌व्याप. मी बारीक असल्याने दोन दोऱ्यांच्या मधनं जाणं मला कठीण नव्हतं. एका मित्राला तर आम्ही उचलून दोरीमधून दुसऱ्या बाजूला दिला. पण तरीही आम्हाला चांगला शेरा दिला नाही. ब्लाइंड ट्रेकला मी आंधळा झालो होतो. मला एका मुक्याने वाट दाखवायची असा त्या ब्लाइंड ट्रेकचा नियम. म्हणजे काय, तर तोंड बंद ठेवून डोळ्यावर पट्टी बांधण्याऱ्याला कुठे उतार, चढ, दगड, झाडी आहे, ते सुचवायचे. माझा माझ्या मुक्या सहकाऱ्यावर बिलकुल विश्वास नव्हता. म्हणून मी त्याला धरूनच चालू लागलो. मी धडपडलो, तर तो गाढव फिदीफिदी हसायचा. त्याची आंधळा होण्याची आणि माझी मुका होण्याची पाळी आली, तेव्हा मला त्याला ढकलून द्यावेसेच वाटत होते. बेफिकीरपणे कोणत्याही झाडीत घुसायचा. आम्ही ठरवलेल्या खाणाखुणा तो कधीच विसरून गेला होता. शेवटी एकदाचा तो छोटासा 'ट्रेक' संपला.

दिवसाच्या सुरुवातीला ज्यांनी मला न विचारता माझं नाव लीडर पदासाठी घेतलं होतं, ते आता लीडर बदलायच्या गोष्टी करु लागले, तेही माझ्या तोंडासमोर. तू आमची वाट लावलीस, असं बिनधास्त बोलत होते. मी काहीही उत्तर दिलं नाही. आम्हाला विश्रांतीसाठी वेळ दिला होता तेव्हा मी टेबलटेनिस खेळायला गेलो. तिथे तिघे चौघे जण होते. वास्तविक टेबल टेनिसबद्दल मी अडाणीच. पण तिथे हजर असलेले रथी महारथी माझ्याहून अधिक पंक्चर झालेले होते. तेव्हा मीच जिंकायला लागलो.
संध्याकाळी आम्हाला नैनीताल दाखवायला बाहेर आणलं. एक जागा ठरविली, आणि दोन तासांनी तिथे भेटायचं ठरलं. आम्हाला आधीच सांगण्यात आलं होतं, की इतक्यात शॉपिंग करू नका. शेवटच्या दिवशी तुम्हाला तीन तास देऊ, त्या वेळेत हवं ते घ्या. त्यामुळे मी पाकिट हॉटेलवरच ठेवून फिरायला निघालो होतो.
नैनीताल शहर तसं बघायला गेलं तर स्वच्छ आहे. त्यामुळे यांच्यातलेच लोक मुंबईला येऊन घाण करतात, की ती घाण मराठमोळीच असते, असा प्रश्न पडतो. तिथे शाळांच्या वेळा काही वेगळ्याच असतात. एप्रिलचा पहिला पंधरावडा उलटला होता, तरीही शाळा कॉलेजातील मुलं दिसत होती.
आम्ही नैनी तलावात चांगलं तासभर बोटिंग केलं. तलावात कृत्रिम शुद्धीकारक जागोजागी बसवलेले होते. त्यामुळे पाणी तसं शुद्धच होतं. तरीही लोकांनी फेकलेला कचरा, झाडांच्या सुकलेल्या पाना-फांद्यांचा गाळ, यांनी तलावात उपस्थिती लावलेलीच होती. बोटिंग नंतर आम्ही माल रोड (किंवा असंच काहीतरी नाव आहे) ला फिरायला गेलो. तिथे पार टोकापर्यंत जाऊ नका, परतायला उशीर होईल, असे सांगितलेले असतानाही आम्ही पुढेपुढे चाललो होतो. रस्त्यात कोल्ड्रिंक आणि आईसक्रीमवर आम्ही ताव मारला. परत आल्यावर आमच्यापैकी अनेकांना भरमसाठ सर्दी झाली होती. एकजण तर परतल्या परतल्या झोपायलाच गेला.
त्या दिवशी रात्री साडे नऊ पर्यंत आम्हाला स्लाईड शो दाखवण्यात आले. स्नाऊट ऍडवेन्चर्स आणि युथ हॉस्टेलच्या विविध ट्रेक आणि गिर्यारोहणाच्या वेळी केलेली फोटोग्राफी दाखवण्यात आली. सुरुवातीला मजा वाटली, पण नंतर सगळेच जांभया देऊ लागले. मलासुद्धा कंटाळा आला होता, पण त्याच दिवशी बेकार लिडरशीपवरून मी कितीतरी टोमणे ऐकले होते, त्यामुळे मी हा स्लाईड शो लक्षपूर्वक पाहिला. त्या रात्री आम्ही बाहेरच्या एका बाकावर टोमॅटो सूप पित गप्पा मारत बसलो होतो. थोड्या वेळाने आम्हाला आमच्या डॉर्मिटरींमध्ये पिटाळण्यात आले. सर्वजण दिवसभरातील ऍक्टिविटीझमुळे थकलेले होते, म्हणून लवकर झोपायला गेले. पण आमचा ग्रुप, ज्यांनी कोणतीच ऍक्टिविटी नीट केली नव्हती, तो थकलाच नव्हता. इतर ग्रुपमधील काहीजणांना आम्ही जबरदस्तीने पत्ते खेळायला लावले. थोड्या वेळाने तेही थकवा विसरून खेळायला लागले. निशाद फणसे नावाच्या मित्राने आम्हांला पत्त्यांतला जजमेंट हा खेळ शिकवला. एक प्रकारचा जुगारच तो. पण नाहीतरी पत्ते म्हटले की जुगार हा आलाच. तेव्हा आम्ही जजमेंट खेळलो. त्या खेळात मला काही विशेष मजा नाही आली, कारण त्यात मी एखाद-दुसरा डावच जिंकलो असेन. थोड्या वेळाने परत एक सर आले, आणि त्यांनी आम्हाला झोपायला सांगितले. अशा प्रकारे नैनीतालमधील आमची दुसरी रात्रही संपली.
तिसऱ्या दिवशी मी उठलो, ते जरा उशीराच. तरी मुम्बईत उठतो त्या मानाने तर मी पहाटे उठलो, असंच म्हणायला हवं. आदल्या दिवशी स्लाईड शो जेव्हा दाखवला गेला, तेव्हा 'रोप कोर्स' ह्या प्रकाराबद्दल आम्हाला थोडीशी माहिती देण्यात आली होती. त्याच्या प्रात्यक्षिकांची छायाचित्रे बघून जांभया देणारे आम्ही सूर्यवंशी खडबडून खूर्चीत सरळ होऊन बसलो. छायाचित्रांत बोल्डरिंग, रॅपलिंग, रिवर क्रॉसिंग (सस्पेन्शन ट्रॅव्हर्स), पॅरलल रोप, इ. ची प्रात्यक्षिके बघून आमची गाळण उडाली. प्रत्येकाला (आणि प्रत्येकीला) 'टेन्शन' आलं होतं. खरं तर ती प्रात्यक्षिके खऱ्याखुऱ्या ट्रेकच्या वेळची होती. त्यामुळे त्यांची तीव्रता आम्हाला जास्त वाटत होती. कारण आम्ही तर साध्या ऍडवेन्चर कॅम्पला गेलो होतो. बोल्डरिंग हा प्रकार त्या सर्वांत मला छायाचित्रे बघून जरी सोपा वाटला, तरी आमच्या उंचीएवढे दगड केवळ हाता-पायांचा वापर करून चढायचे, आणि लगेच त्याच्या वरील खडकावर पुन्हा चढायचे, म्हणजे थकवणारा प्रकार होता. त्यामुळे दिवसभरातील टीम-बिल्डींग ऍक्टिविटीझमुळे जरी आम्ही दमून खाटेला पाठ टेकली, तरी त्या 'टेन्शन' मुळे कुणाला झोप म्हणून लागली नाही.


दुसऱ्या दिवशी आमच्याकडून कवायत करून घेतली. मुन्नाभाई एमबीबीएस मधील लाफ्टरथेरपी (सॉरी; लफ्टरथेरापी) चा प्रत्यय मला त्यादिवशी पहिल्यांदा आला. एकसाथ सगळ्यांनी मोठमोठ्याने हसायचे. त्याची सुरुवात कुणीतरी आधी पुढे येऊन करायची. तेव्हा दीपक सरांनी विचारले, ''कौन आयेगा आगे?" ए.के.राजधानीत मी सहप्रवाशांना अनेक विनोद सांगितले होते. तेव्हा ते सगळे इतके मोठ्याने हसले होते, की रात्री दोन वाजता झोपलेले बाकी सर्वजण दचकून जागे झाले. तसेच दिल्लीत, दिल्लीपासून रामनगर आणि नैनीतालपर्यंत बसमध्ये आणि इतर विश्रांतीच्या वेळी मी माझा एक मित्र अशा दोघांनी मिळून सगळ्यांना हसवत ठेवले होते. तेव्हा अर्थातच पुढे येण्यासाठी सर्वांनी आमची नावे सुचवली. आधी माझ्या ठाण्याच्या नव्या मित्राचं, अपूर्व पात्रेचं नाव सगळ्यांनी सुचवलं. त्याने पुढे जाऊन ''मला नाही जमणार" असं म्हणून माझं नाव सुचवलं. तेव्हा आम्ही दोघांनी हसायला सुरुवात केली. अर्थात मोठ्याने हसायचं हे काही आम्हांला तेव्हा जमण्यासारखं नव्हतं. कारण जॉगिंग आणि इतर कवायती एवढ्या सकाळच्या थंडीत कराव्या लागल्याने आमच्या छात्यांचे ठोके ताडताड उडत होते आणि नाक सुन्न झालं होतं. श्वास घेऊ नये असंच वाटत होतं. तेव्हा मोठ्याने हसणं अगदी आवाक्याबाहेर होतं. तरी आम्ही कसंबसं हसायला सुरुवात केली. आम्हाला काही हात वर करायला सांगितलं नाही, आणि आम्हीही हात वर केले नाहीत. तेवढ्यात आम्हाला हसण्यातील वराईटी दाखवायला सांगितले. आता नेहमी हसतो, त्याहूनही क्षीण आवाजात आवाज फुटत होता. त्यात हसण्याची वराईटी काय दाखवणार डोंबल! तरीही मी सर्वांत कमी कष्ट करावे लागणाऱ्या (अर्थात, मला कमी कष्ट लागणाऱ्या.)(माझा खरा आवाज खणखणीत पुरुषी आहे.)बायकी आवाजात हसायला लागलो. तो इतका किचाटपणे बाहेर पडला, की हा आवाज मीच काढतोय ना अशी मलाच शंका वाटली. बाकी सर्व जण सुद्धा क्षणभर या विचारानेच गप्प बसले, की मी नेमकं आत्ता काय केलं? मग मी अंगात उसनं अवसान आणून मोठमोठ्याने हसायला लागलो, तेव्हा कुठे बाकीच्यांनाही हसायची वाचा फुटली. खरंखुरं हसून गडाबडा लोळण्याचा प्रसंग माझ्या आयुष्यात बऱ्याचदा आला होता पण कधीही पोट दुखलं नव्हतं, जे इतकं खोटं हसल्याने दुखलं(कुणाला शंका असेल तर आत्ताच क्लिअर करतो, कि त्या दिवशी सकाळीच मी 'फ्रेश' झालो होतो. मात्र पोट हे हसल्यामुळेच दुखत होतं).

मग आमचा नाश्ता कधी एकदा होतो, असं आम्हाला झालं होतं. नाश्त्याच्या आधी आम्हाला सांगण्यात आलं, की नाश्त्याला थोडा वेळ असेपर्यंत काहीजणांनी आपल्या आंघोळी उरकल्या तरी चालतील. बाकीच्यांनी नाश्त्यानंतर आंघोळी करा. मी तिथेच ठरवलं आंघोळ नाश्त्यानंतर करायची, म्हणजे नाश्ता हा गरम असतानाच हातात येईल आणि सर्वांत आधी जर आपली न्याहारी झाली, तर बाथरूमही रिकामं मिळेल. कारण आमच्या डॉर्मिटरीमध्ये आम्ही दहा जण होतो, आणि बाथरूमं तीनच होती. बाथरूममध्ये गीजर नव्हता. नळाचं पाणी थंडगार. हॉटेलची माणसं लाकडं फो़़डून, जाळून बॉयलरमध्ये पाणी तापवायची. बाथरूममधील बादली जो आधी पळवेल, तो त्या बाथरूममध्ये आधी आंघोळ करेल, असा अलिखित कॉमन सेन्सचा कायदा आमच्या खोलीत होता. सेल्फ सर्विस असल्याने बॉयलरपर्यंत जाऊन स्वत: बादलीत भरलेलं पाणी डॉर्मिटरीमधील बाथरूमपर्यंत आणावे लागायचे. त्यामुळे बॉयलर ते डॉर्मिटरीचा दरवाजा हे दहा पावलांचं अंतर बादली पाण्याने भरल्यावर मला दहा किलोमीटरचं वाटणं साहजिक होतं. दोन डॉर्मिटरीज, एक स्पेशल रुम, किचन आणि डायनिंग रूम हे एकाच इमारतीच्या तळमजल्यावर होते. आणि सर्वांचे दरवाजे दिसायला सारखे असल्याने मी नेहमी गोंधळात पडायचो. खरं तर जिथे बॉयलर होता, तिथपासून आमची डॉर्मिटरीच सर्वांत जवळ. तरीही गाढवासारखा मी उगाच खूप पुढे गेलो. माझ्या डॉर्मिटरीला मी कधी मागे टाकलं मला कळलंच नाही. डावीकडे वळून मी एका दरवाज्यापाशी येऊन थांबलो आणि बादली खाली ठेवली. तो दरवाजा स्पेशल फॅमिली रूमचा होता. पण मला तो आमच्या डॉर्मिटरीचा दरवाजा वाटला. तेवढ्यात त्या दरवाज्यातून दोन मुली बाहेर पडल्या. मला विचित्रच वाटलं. आपल्या जेन्ट्‌स डॉर्मिटरीमध्ये मुली कशा? तेवढ्यात त्या ज्या दरवाज्यातून बाहेर पडल्या, त्या उघड्या पडलेल्या दरवाज्याकडे माझं लक्ष गेलं. बघितलं तर आत एकदम पॉश फर्निचर, सोफा, कोच, टिपॉय वगैरे. आणि आमच्या खोलीत तर फक्त खाटाच होत्या. तेव्हा मला लक्षात आलं की आपण खूप पुढे आलो आहोत. मग मी बादली उचलून स्वत:च्या वेंधळेपणावर रागवत माझ्या खोलीच्या मोरीपर्यंत गेलो. तेव्हा माझं बादलीतल्या पाण्याकडे अजिबात लक्ष राहिलं नाही. त्यामुळे अर्धं पाणी खाली सांडत सांडत मी बाथरूमात जाऊन पोचलो. तोवर पाणी गार झालं होतं.

अशीच त्या वेळचीच आठवण आहे. नेमकी त्याच दिवशीची आहे की नाही आठवत नाही, पण आंघोळीच्या वेळचीच आहे. नैनीतालमधील त्या हॉटेलच्या आवारात सकाळी आणि रात्री वातावरण प्रचंड थंड असते. त्यात आंघोळ तर सकाळीच करावी लागते कारण हॉटेलची माणसं पाणी फक्त सकाळच्या वेळीच पाणी तापवतात. माझी आंघोळ चालू होती. तेव्हा आम्हा दहाजणांपैकी एकजण मी आंघोळ करत असलेल्या बाथरूमाचं दार बडवू लागला. मला विचारतो, की आत कोण आहे? मी म्हटलं, ''मी आत आंघोळ करतोय, दार का ठोकतोय्स?" तर म्हणतो, ''लवकर बाहेर ये मला थंडी वाजतेय इथे उभं राहून." मी म्हटलं, ''अरे इथे नागडा होऊन थंड पडलेल्या पाण्याने आंघोळ करतोय, आणि तू बाहेर भारंभार कपडे घालून कुडकुडायच्या गोष्टी कसल्या करतोस?" तर बावळट हसायला लागला.
''आता आंघोळ करताना कपडे तर काढणारच ना माणूस? तसंच आंघोळ कोण करणार?" असं मी विचारल्यावर म्हणतो, ''मी निदान अंडरवेअर तरी घालतो." असं म्हणून स्वत:च बाहेर जाऊन सगळ्याना सांगत सुटला की मी पूर्ण नग्नावस्थेत आंघोळ करतो. सगळ्यानी यात विशेष काय विचारल्यावर स्वत: आंघोळ कशी करतो ते त्याने अभिमानाने सांगितले. एकजण म्हणाला, ''आत काय सीसी टीव्ही कॅमेरे लावलेले असतात काय?" तेव्हापासून त्या गोष्टीवरून सगळेजण त्याला चिडवायला लागले. दुसऱ्या दिवशी माझ्याकडे येऊन गंभीरपणे म्हणाला, ''अरे आज मी तुझ्यासारखीच आंघोळ केली. आता मला चिडवू नका.'' आता मी काय म्हणणार? मी बरं तर म्हटलं, पण त्याने बाकीचे थांबताय्त थोडंच? स्वत:च्याच पायावर त्याने अशाप्रकारे धोंडा आपटून घेतला होता, त्यात मी काय करू शकणार होतो?
आंघोळी झाल्यावर दीपक सरांनी सगळ्याना विचारलं, "सबने नहा लिया?" रोज कोणीतरी थंडीच्या भितीमुळे किंवा बादली वेळेत न मिळाल्याने आंघोळ करायचा नाही. तेव्हा तीन-चार हात वर आले. मग सरांनी विचारलं, ''सब फ्रेश होके आये है ना? कोई ऐसा है क्या जो फ्रेश नही हुआ है? देखिए अभी फ्रेश होईये. बाद मे रोप कोर्स करते वक्त 'प्राब्लेम' हो सकती है.'' मग सरांनी काहीजणांकडे बघून फ्रेश झालात ना? असं विचारलं. सगळ्यांनी हसत ह्सत माना डोलावल्या. मग आमच्या फेमस बाथरूमबॉयकडे बघत मोठ्याने विचारले, "आप फ्रेश हुये क्या?" त्याने घाबरत घाबरत मान डोलावली. सरांनी त्याला पुन्हा विचारले, तेव्हा तो नही म्हणाला आणि सरांनी सांगितल्याप्रमाणे फ्रेश व्हायला गेला. त्याने गाढवाने फ्रेशचा शब्दश: अर्थ घेतला आणि फक्त जाऊन तोंड धुवून आला. इतक्या लवकर तो आल्याने सरांनी विचारलं, "इतनी जल्दी? अभी तो एक मिनीट भी नही हुआ. सब ठीकसे साफ तो हुआ ना? पानी वगैरा डाला ना?" असं सरांनी विचारताच जो काही हशा पिकला, त्याने लाफ्टरथेरपीच्या पेक्षासुद्धा जास्त गोंगाट केला.