चौथे चिमणराव ह्या चिं. वि. जोशींच्या पुस्तकात चिमणरावांना रविवार हा कधीच सुखाचा सुवर्णदिन वाटला नाही.
त्यावरुन रविवारला हल्लीच्या शाळेतल्या एखाद्या विद्यार्थ्याच्या दृष्टिकोनातून नावे ठेवण्याची मला कल्पना आली. ती पुढीलप्रमाणे
मांडत आहे -
मौजेचे सहस्रावधी क्षण
वाटते असतील विलक्षण
व्यर्थ जातात पण
तोचि रविवार म्हणावा
थोडक्यात काय, सुट्टी मिळते, पण फुकट जाते. शनिवारी शाळेतून प्रचंड गृहपाठ मिळालेला असतो. तो रविवारावर ढकलण्यात येतो. शनिवारीच काय ती मौजमजा! अभ्यासात जाते रविवारची रजा.
गणित-मराठी-संस्कृत
हे अनावश्यक सुहृद
जेव्हा पकडती मानगूट
तोचि रविवार म्हणावा
शिकवण्या घेणारे नेमके रविवारीच सोकावतात. मुलांना उशिरा उठायला एक दिवस मिळतो, तोही घालवायचा, अशा त्यांच्या महत्त्वाकांक्षा असतात. बिचारी मुले आधीपासूनच अर्धवट झोपेत असतात, त्यात जांभया आणणारे विषय शिकवले जाताता. म्हणजे आधीच उल्हास, अन् त्यात फल्गुन मास!
सुदैवाने मिळे निद्रा
तिजवरीही येते गदा
असेच चालू सदान् कदा
तोचि रविवार म्हणावा
दुपारीदेखील विश्रांती मिळत नाही. शनिवारचा ढकललेला अभ्यास पूर्ण करावा लागतो. संध्याकाळी सुट्टीवर असणार् या व जाग्या झालेल्या आई-बाबा नावाच्या तोफांना तोंड द्यावे लागते{कारण खेळताना कोणाचीतरी खिडकीची काच आड येते}. त्याबद्दल चौदावे रत्न पटकावून रात्री प्रायश्चितार्थ जास्त अभ्यास करावा लागतो.
करावे लागती कष्ट
होत नसे काही इष्ट
दैव होई जेव्हा रुष्ट
तोचि रविवार म्हणावा
असा हा रविवार आठवड्यात नसावा हेच बेहत्तर !!
पण मग झी मराठीवर चित्रपट पाहता येणार नाही, हे मान्य.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा