शुक्रवार, १५ मे, २००९

मिसळपाव डॉट कॉम - एक मजेशीर ठिकाण

जवळजवळ सव्वा वर्षापासून मी एका सुंदर मराठी संकेतस्थळावर वारंवार जातो. तिथे विविध विषयांवर वादविवाद, चर्चा, इ. ची रेलचेल असते. कविता, प्रवासवर्णने, वैचारिक लेख, माहितीपर लेख अशा साहित्याच्या प्रकारांना तिथे विशेष वाव आहे. तसेच खवय्ये आणि नवे खाद्यपदार्थ तयार करण्यास उत्सुक असणाऱ्यांनी या संकेतस्थळाला जरूर भेट द्यावी. कारण येथे विविध पाककृती देखील दिल्या जातात.
या संकेतस्थळावरील वातावरण अस्सल मराठी आहे. येथे प्रत्येक इंग्रजी प्रचलित शब्दाला मराठी शब्द उपलब्ध आहे. नव्या सभासदांना या उपलब्धतेची जाणीव जुने सभासद करून देतात. उदाहरणार्थ, इंटरनेट - महाजाल, वेबसाईट - संकेतस्थळ, पासवर्ड - संकेताक्षर इत्यादी.
येथे प्रत्येक प्रकारच्या लेखन व प्रकाशनासाठी विविध विभाग आहेत. प्रत्येक प्रकाशनाचे उपप्रकारही अनेक आहेत. मराठी साहित्यात इतक्या भावना आहेत, हे त्या भावना माहित असूनही कुणाच्या लक्षात येत नाही. पण मिसळपाव डॉट कॉम वर या सर्व भावनांसाठी सारे दरवाजे उघडे असतात. एकदा या मिसळपावाची हवा लागली, की त्या हवेशी आपण समरस कधी होतो, हे आपल्याला कळतच नाही. आणि आपोआपच आपल्या आत, मनाच्या व मेंदूच्या विविध कोपऱ्यात दडलेला कलाकार बाहेर येऊ लागतो. आपण आयुष्यात कधी केल्या नसतील अशा सुंदर कल्पना आपल्या मनात येतात. त्यांना आपण कवितेचे रूप देतो, नाहीतर सरळ गद्य लेख लिहीतो. आणि आपण हे सर्व केलं, पहिल्यांदा जरी केलं, तरी त्यात आपल्याला विशेष असं काहीच वाटत नाही. कारण त्या हवेत जिवंत राहण्यासाठी लागणारा प्राणवायू हा कल्पनाशक्तीतून आपणास मिळतो. त्यामुळे आपल्या वास्तव जीवनाचा साहित्याशी अमरत्वाचा जो संबंध जोडला जातो, तो हृदयाच्या शेवटच्या ठोक्यापर्यंत टिकून राहतो.
अशा या सुंदर संकेतस्थळाचा महाजालावरील पत्ता - www.misalpav.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: