शुक्रवार, १५ नोव्हेंबर, २०१३

उगवलास तू भास्करा

पहाटे डोळे खुलले
पाहतो जग हे निजले
पान निद्रेत गळले
पर्ण दवबिंदूंनी भिजले

उमलत्या कळ्यांचा मुजरा
उमेदीचा नवा चेहरा
उजळवितो चराचरा
उगवलास तू भास्करा

का असा बसलास पाहात?
कसा गेलास सोडून साथ?
कुठे होतास अवघी रात?
का सोडलंस मला नरकात?

काल भाच्याने तोंड काळं केलं
काळोखात अमावास्येच्या नेलं
किती हे मन विषण्ण केलं
कुठेतरी भरकटत गेलं

पडझड होते जाता तू
पण आलायस परत आता तू
पृथ्वीचा थोरला भ्राता तू
प्रकाशाचा खरा दाता तू

दिपेंद्रा कशी रे तुझी लहर
दिवस येतोय जरा डोईवर
दिसशी तू होताना प्रखर
दिनकरा क्रोध हा आवर

ममता तुझी जादूयी खरी
मावळतीच्या सुखद सरी
माया करुनी ही मजवरी
माझ्यासमोर गेलास घरी

शनिवार, ९ नोव्हेंबर, २०१३

आहे मी ब्राह्मण!! मग??



आठवीनंतरच्या उन्हाळ्याच्या सुट्टीत कोकणात गेलो होतो. तिकडे एका मित्राबरोबर पैज लाऊन सात वाट्या ताक प्यायलो होतो (तेव्हाची कॅपॅसिटी तेवढीच होती). आम्हांला ताक वाढणा-या मावशींनी सहाव्यांदा वाटीत ताक ओतताना 'तुझी जात कोणती रे?' असं हळूच विचारलं.
"ब्राह्मण!!"
"वाटलंच मला!" असं हसत म्हटलं आणि निघून गेल्या. सातव्यांदा ताक ओतताना, "राग नाही ना आला?" असं विचारलं आणि मी "नाही, राग का येईल?" असं म्हटल्यावर पुन्हा हसत हसत निघून गेल्या.

नवीन नवीन मैत्री झालेल्या मित्रमंडळात मी एक गोष्ट नेहमी पाहिलीये. गप्पा मारताना सणवार, लग्न, किंवा घरातल्या इतर कोणत्यातरी समारंभाच्या विषयावरून "आम्ही अमुक अमुक जातीचे आहोत ना, आमच्यात असं असतं" असं कोणीतरी म्हटलं, की त्यावरून जातीचा विषय निघतो, आणि मग ग्रूपमधल्या निदान एकालातरी सगळ्यांची जात विचारायची खाज सुटते. तसं त्याने एक-दोघांना विचारल्यानंतर बाकीच्यांच्या चेह-यावर त्यांची पाळी आली की लगेच आपली जात सांगण्याची तयारीही दिसून येते. तशी ती माझ्यावर आली, आणि मी ब्राह्मण म्हटलं, की "तू ब्राह्मण आहेस???" अशी कोरसमध्ये प्रतिक्रिया ब-याचदा येते. मग त्यापाठोपाठ 'वाटत नाही तुझ्याकडे बघून', 'तुझ्या बोलण्याच्या स्टाईलवरून कळतं', 'वाटलंच होतं मला' अशा प्रतिक्रिया येतात. त्यांचं मला विशेष असं काही वाटत नाही. गंमत वाटते, ती 'सही रे!!!' या प्रतिक्रियेची. मी ब्राह्मण आहे, यात 'सही' काय आहे? मला कळत नाही.

एकदा आमचा एक ग्रूप क्लासच्या दिशेने चालला होता. त्यात एक 'सुबक ठेंगणी' मुलगीही होती. मी अर्थात तिला कंपनी देत होतो. आणि आमचा बोलण्याचा विषय आमच्याच ग्रुपमध्ये आमच्या पुढे चालणा-या एका मुलाचा होता.
ती मुलगी म्हणाली, 'तो मला अजिबात आवडत नाही. डोक्यात जातो.'
'का गं, काय झालं?'
'तो ब्राह्मण आहे आणि सगळे ब्राह्मण बायले असतात.'
मी थबकलो. आणि त्या मुलीकडे बघून हसलो. तशी तीही चमकली.
'तू ब्राह्मण आहेस?'
'हो!!'
'सॉरी सॉरी सॉरी... तू बायल्या नाहीयेस. पण बरेच ब्राह्मण बायले असतात.'
मी वाद घातला नाही. तिने सुद्धा माझ्या आडनावाचं एका भंडारी आडनावाशी साधर्म्य असल्याने मी ब्राह्मण कसा असा प्रश्न विचारला आणि मग तो विषय तिथेच थांबला. त्या दिवसानंतर ती मुलगी माझ्याशी तितक्याच सलगीने पुढे कधी बोल्ल्याचं मला आठवत नाही.

गप्पा मारताना मध्येच मला, 'तू ब्राह्मण आहेस का?' असं निदान पंधरा-वीस लोकांनी तरी आत्तापर्यंत विचारलं असेल. 'नाही काय आहे, तू जे नॉर्मल मराठी बोलतोस ना ते सुद्धा खूपच हाय लेवलचं आहे ना म्हणून विचारलं!' काय संबंध???? माझे कितीतरी मित्र असे आहेत, ज्यांचं मराठी माझ्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त चांगलं आहे. त्यातला एक आग्री आहे, एक क्षत्रिय आहे आणि एक महार आहे(आणि यांनासुद्धा लोक 'तू ब्राह्मण आहेस का?' असं विचारतात). इतकच नाही, तर कितीतरी ओळखीची मंडळी अशी आहेत ज्यांचं मराठी भंगार आहे आणि ते ब्राह्मण आहेत. पुण्याच्या गोडबोले नावाच्या एका मित्राची टोपी हरवली होती. ती सापडली का, असं विचारलं तेव्हा तो 'हो भेटली!' असं म्हणाला होता. माझं स्वतःचं मराठीसुद्धा तितकसं चांगलं आहे असं मला वाटत नाही. चिरणे आणि कापणे, यात माझा नेहमी गोंधळ उडतो. भाजी चिरतात, फळं कापतात हे माहितीये, पण तरीही ब-याचदा मी उलटं बोलतो.

आमच्या घरी नॉन-व्हेज खाण्यावर बंदी नाही. पण घरी आम्ही सहसा नॉन-व्हेज खात नाही, कारण कुणाला करताच येत नाही. त्यामुळे आम्हांला आमच्या शेजा-यांनी, वहिनीच्या माहेरच्यांनी, कधी हौसेने चिकन-मटन आणून दिलं, की आम्ही त्यावर मस्त ताव मारतो. वडिलांचे एक मित्र तर ब-याचदा आम्हांला त्यांच्या घरी मासे खायला बोलावतात. तरी माझे आई-वडील 'शक्यतो आपण जास्त नॉन-व्हेज खाऊ नये' असं म्हणतात. त्यामागे कारण हे, की लहानपणापासून शाकाहाराची सवय असलेल्या शरीराला एकदम नॉन-व्हेजचा पुरवठा झाला, तर त्याचे परिणाम खाल्ल्यानंतर दुस-या दिवशी सकाळी दिसून येतात. हॉटेलात मित्रमंडळींबरोबर नॉन-व्हेज खात असताना मात्र बरेच अब्राह्मण मित्रच माझ्या नॉन-व्हेज खाण्यावर आक्षेप घेताना दिसतात. मी तर श्रावणात सुद्धा नॉन-व्हेज खातो. 'तू ब्राह्मण ना, मग नॉन-व्हेज कसा काय खातोस?' अशी मला विचारणा होते. 'काही फरक पडत नाही. हल्ली सगळेच ब्राह्मण खातात.' असं मी म्हटलं, की माझ्या वाक्याला पुष्टी जोडणारी उदाहरणं सुद्धा मिळतात, आणि, 'नाही हा, आमच्याइकडे एक ब्राह्मण आहेत, जे नॉनव्हेज असलेल्या टेबलावर बसत सुद्धा नाहीत' 'आमचा एक ब्राह्मण मित्र नॉन-व्हेज तर खातो, पण घरी जाऊन स्वत:वर गोमुत्र शिंपडून घेतो.' असे किस्सेसुद्धा ऐकायला मिळतात. 'तुझ्या घरी माहितीये का तू इथे नॉन-व्हेज खातोस ते? तुला घरचे काही बोलत नाहीत?' असं लोक विचारायला लागले, की माझं एक लांबलचक उत्तर रेडी असतं. "पूर्वी शिक्षणाची मक्तेदारी ब्राह्मणांकडे होती. शिक्षण घेण्याची, किंवा देण्याची सगळ्याच जातीच्या लोकांना अनुमती नव्हती. आता बघा, शिक्षण देण्या-घेण्याचा अधिकार हा सगळ्या जातीच्या लोकांना समान आहे. तसंच पूर्वी ब्राह्मणेतर नॉन-व्हेज खायचे. आता सगळ्यांबरोबर ब्राह्मणही नॉन-व्हेज खाऊ लागले तर काय बिघडलं?" शरीराला पचत नाही, वासाचा त्रास होतो, दुस-या जीवाला मारून खाणं पटत नाही, म्हणून नॉनव्हेज कुणी खात नसलं तर ठीक आहे. पण 'मी ब्राह्मण आहे, म्हणून मी नॉन-व्हेज खाणार नाही', असा विचार करणारा माणूस (जो जन्मामुळे ब्राह्मण आहे) मागासलेल्या विचारांचा आहे असं नाही का म्हणता येणार??

विशिष्ट भाषा-जाती-धर्म-प्रांताच्या लोकांतील काही गुणांत-अवगुणांत साधर्म्य आढळतं हे मान्य!! पण ते एखाद्या जातीच्या सर्वच व्यक्तींत, सर्वच बाबतीत आढळून यावं असं तर नाही ना. आज समाजात अशी ब्राह्मण मंडळी आहेत, जी स्वतःला ते ब्राह्मण असल्यामुळे जास्त श्रेष्ठ समजतात. आणि त्यांचं हे मत उघडपणे मांडतात सुद्धा. बरीच अशी मंडळीही आहेत, जी ब्राह्मण असूनही ब्राह्मणांनाच शिव्या घालतात. पण काही अशी मंडळीसुद्धा आहेत, ज्यांना आपण ब्राह्मण असल्याचा गर्वही नाही, लाजही नाही. ब्राह्मणतेरात काही अशी मंडळी आहेत, जी ब्राह्मणांचा ते ब्राह्मण आहेत म्हणून द्वेष करतात. तर काही अशी मंडळी आहेत, ज्यांच्या मनात एखादा माणूस ब्राह्मण आहे हे कळल्यावर त्याच्याविषयी कौतुक आणि आदर वाटायला लागतो.

जातीवरून माणूस चांगला की वाईट, हुशार की मठ्ठ, हे ठरवणं चुकीचं आहे. जातीचा दुराभिमान बाळगणारे, जातीवरुन लोकांना संघटित करणारे, जातीविषयी लाज बाळगणारे, जातीच्या अशा मानल्या गेलेल्या जुन्या रुढी परंपरा जपणारे, आणि जातीची यत्किंचितही पर्वा नसणारे असे लोक हे सगळ्या जातींत असतात. तेव्हा ठरावीक लोकांच्या स्वभावावरुन अख्ख्या जातीचं चारित्र्य ठरवणं हा मूर्खपणा आहे. हे फक्त ब्राह्मणांच्या बाबतीत होतं असं नाही. त्यामुळेच इथे ब्राह्मण-ब्राह्मणेतर असा मुद्दाही मांडायचा नाही. सगळ्याच जातींच्या बाबतीत होतं. मी ब्राह्मण जातीचा आहे त्यामुळे मी ब्राह्मणांबद्दल माझ्या अनुभवातून सांगितलं. दुस-या जातीचा असतो, तर फक्त नाव आणि उदाहरणांचं स्वरूप बदललं असतं, मुद्दा तोच राहिला असता.

बुधवार, ६ नोव्हेंबर, २०१३

तू गेलीस मला सोडून

तू गेलीस मला सोडून
म्हणून मी जगायचं थांबलो नाही
तू लांबवलंस मला तुझ्यापासून
म्हणून मी तुझ्यापासून लांबलो नाही
तरी पुढे करायचं काय ते कळेना मला
माझंच मेलेलं मन मिळेना मला
मन कुठेतरी हरवलं होतं,
आणि काय करायचं ते वेंधळ्यासारखं
मी मनातल्या मनातच ठरवलं होतं
काय करायचं होतं आयुष्यात ते मला आठवेना
मेंदू बधिर झाला माझा, एकही ऑर्डर पाठवेना
कल्पकता मेली माझी, डोळे मिटले की तू दिसायचीस
स्वप्नांनाही कंटाळलो मी, कारण त्यांतही तूच असायचीस
मी हसलो, की तुझं हसू आठवायचं
मी रडलो, तरी तुझं हसूच आठवायचं
तुझ्या डोळ्यातली आसवं मला ना कधी बघवत होती
तुझ्या हस-या चेह-याची आठवणच मला जगवत होती.
तू भांडायचीस तेव्हा मी चिडायचो
मी चिडलो, की तुलाही पिडायचो
मूड तुझा सदैव रोमॅन्टिक दिसायचा
प्रेमाचा वर्षाव जायगँटिक असायचा
मी जरी कामात स्वतःला रखडून घेतलं होतं
तरी प्रेमाच्या पाशात तुझ्या जखडून घेतलं होतं
लाजाळूशा शेमेत, सोनेरी अशा हेमेत,
खेळकरशा गेमात, प्रेमळ अशा प्रेमात,
तू मला कायमचं गुंफून टाकलं होतंस
कधीही न संपणा-या जीवनाच्या मैलावर
माझ्यासारख्या या अगदी अरसिक बैलावर
प्रेमाचं औतं तू जुंपून टाकलं होतंस
बदललीस कशी अशी अचानक तू
प्रेमाची राक्षसी भयानक तू
मला विसरलीस मला सोडलंस
त्याच्यावर भाळून त्याला धरलंस,
माझ्यावर केलेलं वेडंखुळं प्रेम
जाऊन तू त्याच्या साच्यात भरलंस
आणि आज अशी एकदम मला आडवी आलीयस तू
त्या गाढवावर प्रेम करून गाढवी झालीयस तू
आज त्यादिवसापेक्षा कितीतरी गोड वागत्येस
दुसरी संधी निलाजरेपणे माझ्याकडे मागत्येस
कल्पना तरी आहे का मनाला
माझ्या किती पडल्यात भेगा
खैर आजा वापस कातिल-ए-दिल,
तू भी क्या याद रखेगा!!

सोमवार, ४ नोव्हेंबर, २०१३

फुकणं वाईट, फुकाडे नव्हे.

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या मते दरवर्षी ५०लाखांहून अधिक माणसे तंबाखूशी संबंधित असलेल्या आजारांमुळे मृत्यूमुखी पडतात. फुकण्याने तुमच्या आरोग्यावर परिणाम होतो; शारीरिक तसेच मानसिक आरोग्यावर परिणाम होतो. तुमची भूक मरते, वजन कमी होतं, हृदयरोग, कॅन्सरसारखे आजार होतात.

जनमानसातही धूम्रपान हे तुमच्या प्रतिमेला काळिमा फासण्यास कारणीभूत ठरते. पूर्वी सगळेच हिरो, व्हिलन, चित्रपटातली इतर पात्रं ही ऑनस्क्रीन स्मोकिंग करताना दिसायची. अजुनही दिसतात, पण तरी प्रमाण बरंच कमी आहे असं म्हणायला हरकत नाही. तेव्हाची परिस्थिती ठाऊक नाही, पण निदान आता तरी, एखादा माणूस फुकतो म्हटल्यावर तोपर्यंत त्या माणसाबद्दल मनामध्ये असणा-या आदरात नॉन-स्मोकर्सच्या मनात कमी-अधिक प्रमाणात घट होते. माणसाच्या तोडांला सिगरेटचा नाहीतर/आणि मिंटचा वास येतो, त्याचे ओठ काळे पडतात, तो सतत खोकत राहतो. त्याची बोटं काळी-निळी पडतात, इ. या सगळ्या कारणांमुळे त्या व्यक्तीच्या जवळ जाणेदेखील बरेच नॉनस्मोकर्स शक्यतो टाळतात. सार्वजनिक ठिकाणी खुलेआम स्मोकिंग करण्यावर निर्बंध घातल्याने ही स्मोकिंग करणारी मंडळी एका विशिष्ट ठिकाणी एकत्र स्मोकिंग करत उभी असताना दिसतात. (विशेषतः) कॉलेजमध्ये एखाद्या 'स्टायलीश आणि कूल' ग्रूपमधल्या एखाद्या मुलाला आपण त्याची सिगरेट पेटवून दिल्याने त्या ग्रूपमध्ये एन्ट्री मिळण्याची, किंवा निदान त्यांच्याशी ओळख होण्याची 'संधी' आपल्यासाठी निर्माण झालीये, ही भावनाही याच अड्ड्यांवर बळावते. या किंवा अशाप्रकारे लोकांना 'स्मोकिंग बडीज' मिळतात. पण या ग्रूप्सबद्दल जर जनमानसात वाईट मतं प्रचलित असतील (उदा. वाया गेलेली मंडळी) तर अशा माणसांबरोबर फुकताना दिसलो गेल्याने काही लोक आपल्याबद्दलही तेच मत बनवतात हे सगळ्यांच्या लक्षात येतं असं नाही. याचे पडसाद त्या व्यक्तीच्या वैयक्तिक आयुष्यात उठू शकतात, उठतात.

सध्या धूम्रपानविरोधी जनजागृतीचं प्रमाण वाढत चाल्लंय. सरकारसुद्धा चांगल्या आणि सूचक जाहिराती दाखवून धूम्रपानविरोधी जनजागृती करतंय. न्यूजपेपरात धूम्रपानाच्या दूष्परिणामांसबंधी विविध संशोधनांची, बातम्यांची, अनुभवांची माहिती छापून येत असते. स्मोकिंगवर काही नाटक-सिनेमातूनही भाष्य केलं जातं. स्मोकिंग वाईट हा संदेश स्मोकिंगला तीव्र विरोध करणारे सामान्य लोकसुद्धा आपापल्या परीने समाजात पसरवत असतात. एवढं सगळं असूनही, अजुनही, व्यसनाच्या वाटेवर नेऊन सोडणारा तो सिगरेटचा पहिला 'झुरका' घ्यायला नॉनस्मोकर्स प्रवृत्त का होतात???

यामागे बरीच कारणं आहेत.

संगतका असर
स्मोकिंगची सवय लागण्यामागचं हे एक मोठ्ठं कारण असू शकतं. साधारणतः टीनेजर्स, कॉलेजमधली मुलं, या वयात त्यांच्या शरीरात, मनावर, विचारांत घडणा-या सर्व बदलांमुळे 'आपली परिस्थिती समजून घेण्याची शक्यता' जास्त वाटणा-या समवयीन मुलांमध्ये मिसळतात. मानसिक आधारासाठी कुटुंब आणि शिक्षकांपेक्षा मित्रांवर जास्त विसंबून राहतात. इथेच जर एखादा स्मोकिंगच्या आहारी गेलेला 'सच्चा' मित्र गवसला, तर कल्याण झालंच म्हणून समजा. प्रत्येक व्यक्तीची स्वतःवर नियंत्रण ठेवण्याचीदेखील सीमा असते. ती सीमा ओलांडली, की मित्राच्या हातातली सिगरेट, 'बघू रे जरा आज मी ट्राय करून बघतो' असं म्हणून आपल्या हातात येते आणि सवयीचा श्रीगणेशा होतो.

कुतूहल
कुतूहल हे सोबतीच्या लोकांच्या सवयी बघून किंवा असंच रस्त्यात येता-जाताना, सिनेमात बघताना, पालक 'असं नाही करायचं' म्हणतात म्हणून निर्माण होऊ शकतं. काही लोकांना डेअरींग करायची सुद्धा हौस असते. डेअरिंग किंवा कुतूहल म्हणून घेतलेला हा झुरका आवडतो आणि सवय लागते.

मित्रप्राप्ती
वर सांगितल्याप्रमाणे स्मोकिंग बडीज मिळण्याच्या आशेने ही सवय लागू शकते.

पालकांचं अनुकरण
फुकणा-या पालकांच्या मुलांना स्मोकिंगची सवय लागण्याची शक्यता न फुकणा-या पालकांच्या मुलांच्या तुलनेत खूप जास्त
असते. पालकांचं बघून मुलं शिकतात आणि जर लहानपणापासून मुलांनी पालकांना फुकताना पाहिलं असेल, तर थोडं मोठं झाल्यावर मुलंसुद्धा चोरीछुपे (प्रसंगी ब्रॉडमाइन्डेड पालकांसमवेत) झुरके मारताना दिसून येतात.
या टेन्डन्सीचं एकच उदाहरण देतो, एकदा एका फॅमिली रेस्टॉरंट मध्ये बसलो होतो. आई-बाप-मुलगा-मुलगी असं कुटुंब होतं. बापाने जेवणाबरोबर दारू मागवली आणि आपली अख्खी फॅमिली बोलण्यात गुंतलीये हे बघून तो ७-८ वर्षांचा लहान मुलगा बापाचा दारूचा ग्लास जवळ घेऊन हळूच प्यायला गेला. तेवढ्यात नशिबाने सगळ्यांचं त्याकडे लक्ष गेलं, पण हे नशीब त्यांना कितीसं काळ साथ देईल कोणास ठाऊक!

चुकीची माहिती
सिगरेटमुळे किक बसते, आपण जागरूक राहतो, ताण-तणाव कमी होतो, मस्त वाटतं, इ. लोकांचे अनुभव, तसंच 'अरे हल्ली फ्लेवर्ड आणि लाईट सिगरेट्स मिळतात, त्यात तंबाखू नसतो. त्या सेफ असतात त्यात काही नसतं.' किंवा 'अरे हा ब्रँड तितकासा डेंजरस नसतो. घे बिनधास्त याने काही होणार नाही' असं सांगणारी मंडळी दिमतीला आली, की आपल्या कुतूहलाला, सुप्त वासनेला वाव द्यायची आयतीच संधी लोकांना मिळते.

मानसिक संतुलनावर उपाय आणि मिडिया
सिगरेटचा ड्रगसारखा वापर तणाव, डिप्रेशन, भिती, यासारख्या मानसिक विकारांवर उपाय म्हणून मोठ्या प्रमाणावर केला जातो. आणि हल्ली फॅशन, हिरोईनसारख्या किंवा 'द लास्ट लेअर' सारख्या चित्रपटांतून 'माणूस डिप्रेस झाला की स्मोकिंग करायला लागतो' हे त्याची अधोगती होते हे सूचकपणे दाखवण्याच्या उद्देशाने दर्शवलं जातं आणि नेमका त्याचा उलटा परिणाम होऊन डिप्रेशन वर उपाय म्हणून लोक सिगरेटच्या आहारी जातात.

ही सवय वाईट आहे हे मनापासून जाणवल्यानंतरही ती सुटता सुटत नाही... का? याचं कारण एका मित्राला विचारलं असता तो म्हणाला, 'माझ्या शरीराला स्मोकिंगची सवय झालेली आहे आता. मी जरा जरी फ्रस्टेट झालो, इरिटेट झालो, की लगेच फुकायची तल्लफ येते. नाही फुकायचं म्हटलं तर डोक्यात कळ येते, घसा कोरडा पडतो, आणि त्रास व्हायला लागतो. त्यामुळे सवय ही एकदा ठरवलं आणि सुटली असं होत नाही, हळू हळू सोडावी लागते.' - यात किती तथ्य आहे माहिती नाही, पण शेवटी एकेकाचं स्वतःवर किती नियंत्रण आहे त्यावरच शेवटी सगळं काही अवलंबून असतं.

असं मानलं जातं की प्रत्यक्ष स्मोकिंग केल्यापेक्षा सेकंड हँड स्मोकिंगने म्हणजेच पॅसिव्ह स्मोकिंगने माणसाला जास्त त्रास होतो. यात भरपूर तथ्य आहे. सत्य घटना सांगतो. एक गृहस्थ चेनस्मोकर होता. त्याचं लव्ह मॅरेज झालं. नवरा फुकायला बाहेर गेला तर दारू पिऊन घरी येतो, आणि काही केल्या स्मोकिंगला आवर घालता येईना म्हणून 'तुम्ही घरीच बसून फुकत जा' असं बायको म्हणाली. लग्नानंतर अवघ्या तीन वर्षांत ती लंग कॅन्सरनं मेली. मेडिकल रिपोर्टमध्ये तिच्या बरगड्यांची अक्षरशः राख झाल्याचं आढळून आलं.

स्वतःचा विचार जास्त करणारे, आणि स्वतःआधी दुस-यांचा विचार करणारी मंडळी असतात. हे प्रकार अर्थात स्मोकर्समध्ये सुद्धा आढळून येतात. पहिल्या प्रकारात मोडणा-यांना त्यांच्या स्वतःच्या आरोग्यावरील परिणामांची आणि दुस-या प्रकारात मोडणा-यांना त्यांच्या आप्तेष्टांच्या आरोग्यावरील परिणामांची योग्य जाणीव करून देत राहण्याखेरीज सध्यातरी आपल्याकडे दुसरा पर्याय नाही. कारण स्मोकिंग विरोधी अधिक कायदे आणि त्यांची अंमलबजावणी होण्यास किती कालावधी लागेल आणि तोवर किती जण या स्मोकिंगचे बळी पडतील काही कल्पना नाही.

शेवटी एवढंच म्हणेन, की फुकण्याची सवय वाईट असते, फुकणारी समस्त मंडळी नाही. कारण ही सवय तुम्हा-आम्हा कोणालाही जडू शकते. तेव्हा या सवयीत अडकलेल्यांची परिस्थिती समजून घेऊन त्यांना त्यातून बाहेर पडण्यात मदत करणे हे सर्वांच्याच हिताचे होईल. आणि कोणास ठाऊक त्यामुळे आपल्याला 'नो-मोअर-स्मोकिंग बडीज'ही मिळतील.

शनिवार, २ नोव्हेंबर, २०१३

तू उत्तर नाही दिलंस मला

तू उत्तर नाही दिलंस मला
मी एक प्रश्न विचारला
का तुझ्यातल्या नव-याने
आज माझ्यावर हात उगारला?

तू उत्तर नाही दिलंस मला
हवं तर पुन्हा विचारते
तुझ्या चुकांचं खापर मी
का डोक्यावर माझ्या मारते?

तू उत्तर नाही दिलंस मला
मी केव्हाची वाट पाहत्येय
संसार अधोगतीच्या प्रवाहात जातोय
आणि मीही त्यात वाहत्येय

तू उत्तर नाही दिलंस मला
उलटून बोलतोयस तू फक्त
तुझ्यासारखाच मीही जाब विचारला
तर का खवळतंय तुझं रक्त?

तू उत्तर नाही दिलंस मला
आता वाट पाहून मी थकले
तुझा विश्वास मिळालाच नाही
आज तुझ्या प्रेमालाही मी मुकले