शनिवार, ९ नोव्हेंबर, २०१३

आहे मी ब्राह्मण!! मग??



आठवीनंतरच्या उन्हाळ्याच्या सुट्टीत कोकणात गेलो होतो. तिकडे एका मित्राबरोबर पैज लाऊन सात वाट्या ताक प्यायलो होतो (तेव्हाची कॅपॅसिटी तेवढीच होती). आम्हांला ताक वाढणा-या मावशींनी सहाव्यांदा वाटीत ताक ओतताना 'तुझी जात कोणती रे?' असं हळूच विचारलं.
"ब्राह्मण!!"
"वाटलंच मला!" असं हसत म्हटलं आणि निघून गेल्या. सातव्यांदा ताक ओतताना, "राग नाही ना आला?" असं विचारलं आणि मी "नाही, राग का येईल?" असं म्हटल्यावर पुन्हा हसत हसत निघून गेल्या.

नवीन नवीन मैत्री झालेल्या मित्रमंडळात मी एक गोष्ट नेहमी पाहिलीये. गप्पा मारताना सणवार, लग्न, किंवा घरातल्या इतर कोणत्यातरी समारंभाच्या विषयावरून "आम्ही अमुक अमुक जातीचे आहोत ना, आमच्यात असं असतं" असं कोणीतरी म्हटलं, की त्यावरून जातीचा विषय निघतो, आणि मग ग्रूपमधल्या निदान एकालातरी सगळ्यांची जात विचारायची खाज सुटते. तसं त्याने एक-दोघांना विचारल्यानंतर बाकीच्यांच्या चेह-यावर त्यांची पाळी आली की लगेच आपली जात सांगण्याची तयारीही दिसून येते. तशी ती माझ्यावर आली, आणि मी ब्राह्मण म्हटलं, की "तू ब्राह्मण आहेस???" अशी कोरसमध्ये प्रतिक्रिया ब-याचदा येते. मग त्यापाठोपाठ 'वाटत नाही तुझ्याकडे बघून', 'तुझ्या बोलण्याच्या स्टाईलवरून कळतं', 'वाटलंच होतं मला' अशा प्रतिक्रिया येतात. त्यांचं मला विशेष असं काही वाटत नाही. गंमत वाटते, ती 'सही रे!!!' या प्रतिक्रियेची. मी ब्राह्मण आहे, यात 'सही' काय आहे? मला कळत नाही.

एकदा आमचा एक ग्रूप क्लासच्या दिशेने चालला होता. त्यात एक 'सुबक ठेंगणी' मुलगीही होती. मी अर्थात तिला कंपनी देत होतो. आणि आमचा बोलण्याचा विषय आमच्याच ग्रुपमध्ये आमच्या पुढे चालणा-या एका मुलाचा होता.
ती मुलगी म्हणाली, 'तो मला अजिबात आवडत नाही. डोक्यात जातो.'
'का गं, काय झालं?'
'तो ब्राह्मण आहे आणि सगळे ब्राह्मण बायले असतात.'
मी थबकलो. आणि त्या मुलीकडे बघून हसलो. तशी तीही चमकली.
'तू ब्राह्मण आहेस?'
'हो!!'
'सॉरी सॉरी सॉरी... तू बायल्या नाहीयेस. पण बरेच ब्राह्मण बायले असतात.'
मी वाद घातला नाही. तिने सुद्धा माझ्या आडनावाचं एका भंडारी आडनावाशी साधर्म्य असल्याने मी ब्राह्मण कसा असा प्रश्न विचारला आणि मग तो विषय तिथेच थांबला. त्या दिवसानंतर ती मुलगी माझ्याशी तितक्याच सलगीने पुढे कधी बोल्ल्याचं मला आठवत नाही.

गप्पा मारताना मध्येच मला, 'तू ब्राह्मण आहेस का?' असं निदान पंधरा-वीस लोकांनी तरी आत्तापर्यंत विचारलं असेल. 'नाही काय आहे, तू जे नॉर्मल मराठी बोलतोस ना ते सुद्धा खूपच हाय लेवलचं आहे ना म्हणून विचारलं!' काय संबंध???? माझे कितीतरी मित्र असे आहेत, ज्यांचं मराठी माझ्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त चांगलं आहे. त्यातला एक आग्री आहे, एक क्षत्रिय आहे आणि एक महार आहे(आणि यांनासुद्धा लोक 'तू ब्राह्मण आहेस का?' असं विचारतात). इतकच नाही, तर कितीतरी ओळखीची मंडळी अशी आहेत ज्यांचं मराठी भंगार आहे आणि ते ब्राह्मण आहेत. पुण्याच्या गोडबोले नावाच्या एका मित्राची टोपी हरवली होती. ती सापडली का, असं विचारलं तेव्हा तो 'हो भेटली!' असं म्हणाला होता. माझं स्वतःचं मराठीसुद्धा तितकसं चांगलं आहे असं मला वाटत नाही. चिरणे आणि कापणे, यात माझा नेहमी गोंधळ उडतो. भाजी चिरतात, फळं कापतात हे माहितीये, पण तरीही ब-याचदा मी उलटं बोलतो.

आमच्या घरी नॉन-व्हेज खाण्यावर बंदी नाही. पण घरी आम्ही सहसा नॉन-व्हेज खात नाही, कारण कुणाला करताच येत नाही. त्यामुळे आम्हांला आमच्या शेजा-यांनी, वहिनीच्या माहेरच्यांनी, कधी हौसेने चिकन-मटन आणून दिलं, की आम्ही त्यावर मस्त ताव मारतो. वडिलांचे एक मित्र तर ब-याचदा आम्हांला त्यांच्या घरी मासे खायला बोलावतात. तरी माझे आई-वडील 'शक्यतो आपण जास्त नॉन-व्हेज खाऊ नये' असं म्हणतात. त्यामागे कारण हे, की लहानपणापासून शाकाहाराची सवय असलेल्या शरीराला एकदम नॉन-व्हेजचा पुरवठा झाला, तर त्याचे परिणाम खाल्ल्यानंतर दुस-या दिवशी सकाळी दिसून येतात. हॉटेलात मित्रमंडळींबरोबर नॉन-व्हेज खात असताना मात्र बरेच अब्राह्मण मित्रच माझ्या नॉन-व्हेज खाण्यावर आक्षेप घेताना दिसतात. मी तर श्रावणात सुद्धा नॉन-व्हेज खातो. 'तू ब्राह्मण ना, मग नॉन-व्हेज कसा काय खातोस?' अशी मला विचारणा होते. 'काही फरक पडत नाही. हल्ली सगळेच ब्राह्मण खातात.' असं मी म्हटलं, की माझ्या वाक्याला पुष्टी जोडणारी उदाहरणं सुद्धा मिळतात, आणि, 'नाही हा, आमच्याइकडे एक ब्राह्मण आहेत, जे नॉनव्हेज असलेल्या टेबलावर बसत सुद्धा नाहीत' 'आमचा एक ब्राह्मण मित्र नॉन-व्हेज तर खातो, पण घरी जाऊन स्वत:वर गोमुत्र शिंपडून घेतो.' असे किस्सेसुद्धा ऐकायला मिळतात. 'तुझ्या घरी माहितीये का तू इथे नॉन-व्हेज खातोस ते? तुला घरचे काही बोलत नाहीत?' असं लोक विचारायला लागले, की माझं एक लांबलचक उत्तर रेडी असतं. "पूर्वी शिक्षणाची मक्तेदारी ब्राह्मणांकडे होती. शिक्षण घेण्याची, किंवा देण्याची सगळ्याच जातीच्या लोकांना अनुमती नव्हती. आता बघा, शिक्षण देण्या-घेण्याचा अधिकार हा सगळ्या जातीच्या लोकांना समान आहे. तसंच पूर्वी ब्राह्मणेतर नॉन-व्हेज खायचे. आता सगळ्यांबरोबर ब्राह्मणही नॉन-व्हेज खाऊ लागले तर काय बिघडलं?" शरीराला पचत नाही, वासाचा त्रास होतो, दुस-या जीवाला मारून खाणं पटत नाही, म्हणून नॉनव्हेज कुणी खात नसलं तर ठीक आहे. पण 'मी ब्राह्मण आहे, म्हणून मी नॉन-व्हेज खाणार नाही', असा विचार करणारा माणूस (जो जन्मामुळे ब्राह्मण आहे) मागासलेल्या विचारांचा आहे असं नाही का म्हणता येणार??

विशिष्ट भाषा-जाती-धर्म-प्रांताच्या लोकांतील काही गुणांत-अवगुणांत साधर्म्य आढळतं हे मान्य!! पण ते एखाद्या जातीच्या सर्वच व्यक्तींत, सर्वच बाबतीत आढळून यावं असं तर नाही ना. आज समाजात अशी ब्राह्मण मंडळी आहेत, जी स्वतःला ते ब्राह्मण असल्यामुळे जास्त श्रेष्ठ समजतात. आणि त्यांचं हे मत उघडपणे मांडतात सुद्धा. बरीच अशी मंडळीही आहेत, जी ब्राह्मण असूनही ब्राह्मणांनाच शिव्या घालतात. पण काही अशी मंडळीसुद्धा आहेत, ज्यांना आपण ब्राह्मण असल्याचा गर्वही नाही, लाजही नाही. ब्राह्मणतेरात काही अशी मंडळी आहेत, जी ब्राह्मणांचा ते ब्राह्मण आहेत म्हणून द्वेष करतात. तर काही अशी मंडळी आहेत, ज्यांच्या मनात एखादा माणूस ब्राह्मण आहे हे कळल्यावर त्याच्याविषयी कौतुक आणि आदर वाटायला लागतो.

जातीवरून माणूस चांगला की वाईट, हुशार की मठ्ठ, हे ठरवणं चुकीचं आहे. जातीचा दुराभिमान बाळगणारे, जातीवरुन लोकांना संघटित करणारे, जातीविषयी लाज बाळगणारे, जातीच्या अशा मानल्या गेलेल्या जुन्या रुढी परंपरा जपणारे, आणि जातीची यत्किंचितही पर्वा नसणारे असे लोक हे सगळ्या जातींत असतात. तेव्हा ठरावीक लोकांच्या स्वभावावरुन अख्ख्या जातीचं चारित्र्य ठरवणं हा मूर्खपणा आहे. हे फक्त ब्राह्मणांच्या बाबतीत होतं असं नाही. त्यामुळेच इथे ब्राह्मण-ब्राह्मणेतर असा मुद्दाही मांडायचा नाही. सगळ्याच जातींच्या बाबतीत होतं. मी ब्राह्मण जातीचा आहे त्यामुळे मी ब्राह्मणांबद्दल माझ्या अनुभवातून सांगितलं. दुस-या जातीचा असतो, तर फक्त नाव आणि उदाहरणांचं स्वरूप बदललं असतं, मुद्दा तोच राहिला असता.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: