शनिवार, ९ मे, २०१५

मला पडलेले प्रश्न

संतुलितपणाचा कळस असतो आयुष्य म्हणजे. रोज उठून नव्या आशा जागृत होतात, जुन्या, काही कारणाने बुजलेल्या आशा पुन्हा डोकं वर काढतात, आणि जसजसा दिवस सरत जातो, तशा, तेवढ्याच प्रमाणात, प्रसंगी जास्त त्रास देणा-या निराशाही पदरी पडत जातात. कधी निराशा दुसरं कोणी करतं, कधी आपली आपणच करतो. आपल्याच तत्त्वांना झुगारून देतो. आपल्याच दांभिकपणाचं वायफळ समर्थन करतो. आपण स्वतःलाच फसवू पाहतो. आणि समजावूनही देतो.

यश नेमकं कशात असतं? स्वतःला हरवण्यात, की स्वतःबरोबर जिंकण्यात? कसं ओळखावं की आपण बरोबर वागतोय? कसं जाणावं की इथे आपण दाखवत असलेला संयम हा संयम नसून टाळाटाळ आहे? एखादी स्फूर्ति ही केवळ एक लहर नसून ती नांदी आहे एका नव्या अंकाची, हे स्वतःला नेमकं कसं सांगावं?

मला कोणी समजूनच घेत नाही असं आयुष्यात एकदातरी म्हणणारे खूप असतात. मीही अपवाद नाही म्हणा. पण निदान मी तरी स्वतःला समजून घेतो का? कसं ओळखावं स्वतःला? आपला स्वतःशी असलेला प्रामाणिकपणा हा नेमका कुठे मर्यादा ओलांडतो? कारण आपल्या क्षमतेबद्दल मनात प्रश्नचिन्ह निर्माण होतं तेव्हा मनापासून येणारं नकारार्थी पण प्रामाणिक उत्तर बहुतांशवेळा आपल्याला चांगल्या गोष्टींपासून वंचित ठेवू शकतं. कारण ते पूर्वानुभवांवर बेतलेलं असतं. मग नवा अनुभव घ्यायचा की नाही, हे नेमकं कशाच्या जोरावर ठरवतो आपण? मनात विचारपूर्वक निर्माण केलेली/झालेली प्रेरणा की उत्स्फूर्तपणे आलेली लहर? शेवटच्या क्षणी निर्णय कोणाचा ग्राह्य धरतो?

बरं हे सगळे वायफळ विचार तरी का करावे? इतकं आत्मकेंद्री का व्हावं? काय मिळतं एवढ्या खोलवर शिरून? तसं म्हटलं तर काय मिळतं जगून? मृत्यू? मग तो मिळवण्याची वाट का पाहायची? कारण ध्येयापेक्षा प्रवास अतिरंजक म्हणून?

गंमत अशी आहे की इतका गोंधळ उडूनही, गाडी कुठेच अडत नाही. ती चालूच राहते. नवे फाटे फोडत राहते. विचारचक्र सुरूच राहतं. कधीच पंक्चर होत नाही. भटकंती सुरू राहते. कायम. निरंतर.

© कौस्तुभ अनिल पेंढारकर.

(हा लेख या ब्लाॅगवर शनिवार दिनांक 9 मे 2015 रोजी भारतातून रात्री 09.01 वाजता प्रकाशित करण्यात येत आहे. या लेखाचे सर्व हक्क लेखकाच्या नावाने सुरक्षित आहेत.

लेखकाच्या संमतीशिवाय या लेखनाचे लेखकाला श्रेय देऊन अथवा न देऊन पुनःप्रकाशन करणा-यावर लेखकाकडून कायदेशीर कारवाई करण्यात येईल.)

शुक्रवार, १ मे, २०१५

नातं - नव्याने सुरू झालेलं



त्याआधी जुहू चौपाटीवर मी एकदाच गेलो होतो, फुटबॉल खेळायला. अनुभव फारसा चांगला नव्हता. वाळूतून धावताना तिच्यात दडलेले पेव्हर ब्लॉक्स पायाला लागले होते. दोन्ही पाय दोन तीन दिवस चांगलेच ठणकले होते. मग आम्ही जरा थांबलो होतो आणि गोळा खाल्ला होता. त्यानंतर पुन्हा खेळायला गेलो तर गोळ्याची तोंडात राहिलेली चव आणि खारं वातावरण यांचं काहीतरी अजीब मिश्रण होऊन मला उलटी झाली होती. आम्ही जिथे खेळत होतो तिथेच मी ओकल्याने आमच्या खेळाचा खेळखंडोबा झाला होता. त्यानंतर काही दिवसांतच माझी जुहूला पुन्हा फेरी होईल असं वाटलं नव्हतं. पण झाली. आणि यावेळचा अनुभव कायच्या काय वेगळा होता.
ओळख फारशी नव्हती. काही दिवसांचीच. दोनदा प्रत्यक्ष भेटलो होतो, आठवडाभर व्हॉट्सअ‍ॅपवर चॅट केलं होतं, आणि नव्याने ओळख झालेल्या व्यक्तीशी बोलायचं तेवढं सगळं दोन्ही बाजूंनी बोलून झालं होतं. अचानक लहर आली आणि विचारून टाकलं, 'मरीन ड्राईव्हला येतेस? माझ्याबरोबर?' उत्तरादाखल डोळे मोठे करणारा स्माईली आणि त्यापाठोपाठ 'का?' हा प्रश्न.
'कारण मला तुझ्याबरोबर जायचंय कुठेतरी, म्हणून.'
पंधरा मिंटांनी रिप्लाय आला - 'माझ्याबरोबर का?'
मी एवढा वेळ वाट पाहून तसंही वैतागलो होतो. 'आलीये हौस, म्हणून विचारतोय. तुला कसला डाऊट वगैरे येतोय का?'
'डाऊट? कसला?'
'कसला ते तुलाच माहिती. येतोय ना?'
'हो. थोडासा, तू इतक्या लवकर कसा विचारू शकतोस?'
'मग अजून किती दिवसांनी विचारायला हवं होतं?'
ती हसली असावी. तसा इमोजी आला.
'मरीन ड्राईव्ह नको. नुकतीच जाऊन आल्येय.'
'मग?'
'जुहूला जाऊया?'
काय करावं? मीसुद्धा जुहूला नुकताच जाऊन आलो होतो. आणि मरीन ड्राईव्ह ऐवजी जुहू निवडणारी मुलगी... असो. असतो चॉईस एकेकाचा काय करणार! मी ओके म्हटलं. आणि शनिवारी सकाळी सकाळी आम्ही जुहूवर जाऊन पोचलो. मघाशी सांगितल्याप्रमाणे फोनवर सगळंच बोलून झालेलं होतं, त्यामुळे प्रत्यक्ष भेटल्यानंतर आम्ही बराच वेळ गप्पच बसून होतो. काहीच सुचत नव्हतो. ती मला प्लॅटफॉर्मवरच भेटली होती. पण ट्रेनमध्ये लेडीज डब्यात चढली. त्या वेळी विशेष गर्दीसुद्धा नव्हती. म्हणून मी आधीच खट्टू झालो होतो. त्यात आता ती गप्प. काय बोलावं, काही कळेना.
आम्ही दोघं एका ठिकाणी जाऊन बसलो. सकाळी सकाळी धावायला आणि इतर व्यायाम करायला आलेल्यांची ब-यापैकी गर्दी होती चौपाटीवर. आम्ही त्यातल्या त्यात निर्जन जागा निवडली होती. आजही तिथे फुटबॉल खेळायला बरीच मुलं आलेली होती. मला याआधीचा अनुभव आठवला. पेव्हर ब्लॉक्स आठवले. मग गोळ्याची आठवण झाली आणि पोटातच गोळा आला. मला आज काही केल्या गोळा खायचा नव्हता.


'गोळा खाऊया? इथला गोळा मस्त असतो.'
'अगं... गोळा...'
'डोंट टेल मी... तू गोळा नाही खात?'
'खातो, पण... आत्ताच तर आलोय ना, एवढी काय घाई आहे? सावकाश खाऊ'

आम्ही लाटांकडे बघत बसलो. निदान मी तरी, तिचं लक्ष कुठे होतं ते तिलाच ठाऊक. समुद्र - दुसरा शब्द नाही - घाणेरडा दिसत होता. निदान तिथे बसल्या बसल्या माझ्या नजरेच्या टप्प्यात जो भाग सहजपणे येत होता, तो तरी घाणेरडाच दिसत होता. वाळूवर येणा-या प्रत्येक लाटेबरोबर काहीतरी कचरा येऊन साचत होता. मला राग आला; लोकांचा - कारण ते माझा समुद्र घाण करत होते, आणि स्वतःचा - कारण मी त्याबाबतीत नाक मुरडण्याखेरीज काहीच करत नव्हतो.

'छान आहे ना समुद्र?'
'तुला यात काय छान वाटलं? सगळीकडे नुसता कचरा आहे.'
'तू इथल्या इथे बघू नकोस ना. जरा लांबवर नजर फिरवून बघ की.'
'आपला दृष्टिक्षेप जितका आखूड असेल तितका समुद्र स्वच्छ राहिल असं आता मला वाटायला लागलंय. आपण जिथे जातो तिथे घाण करतो.'

ती गप्प झाली. माझ्याही लक्षात आलं की मी तिच्याशी उगाचच तुसड्या स्वरात बोललो. मी सॉरी म्हणणार, एवढ्यात ती उठली आणि पुढे चालायला लागली. ती रागात उठली नव्हती, अगदी सावकाश पुढे चालली होती. थोडं पुढे जाऊन ती थांबली, इथे तिथे मान वळवली, मग पाठी वळून माझ्याकडे पाहायला लागली. सूर्य तिच्या डोळ्यांत गेल्याने तिचे डोळे बारीक झाले आणि तिने डोळ्यांवर हात घेतला. तिचे केस खा-या वा-यावर मस्त उडत होते. तिचा सुती पांढरा कुडता तिच्या अंगाला वा-यामुळे पुढून बिलगला होता. आणि पाठीमागून वा-याबरोबर वाहून जाऊ पाहात होता. तिने घातलेल्या जीन्सच्या पाऊण चड्डीला आणि हातांना वाळू लागली होती. ती तिने झटकली, पण वाळू हट्टी होती. दिवसेंदिवस, रोजच्या रोज नुसता समुद्राच्या खा-या तपकिरी गारढोण लाटांचा मार खाऊन त्या वाळूला वैताग आला होता. आता तिला ऊब हवी होती.

चेह-यावर हसू उमटलं, नजर माझ्यावर ठेवून, हनुवटी खाली घेऊन मला जवळ बोलावलं. हनुवटी खाली घेताना डोळे बॅक टू नॉर्मल झाले तेव्हा त्यांत मला एक वेगळाच उत्साह जाणवला. ती शांत उभी होती, तिची जराही चळवळ चालू नव्हती. फक्त डोळे अस्वस्थ दिसत होते. त्यांच्यात आर्जव होते. हनुवटी पुन्हा वर गेली तसे डोळे सूर्यप्रकाशात बारीक झाले. मी अजून जागचा हललो नव्हतो. चेहरा उतावळा झालेला दिसला, वाळू लागलेला, छोट्याशा बोटांची नखं निळी रंगवलेला हात वर उचलला गेला आणि मला तिच्याबरोबर यायला खुणावू लागला. मी त्यापुढे काही विचार न करता उठलो. ती जिथे नेईल, ती जे दाखवेल, ते मला आता हवं होतं. का? ते मला कळत नव्हतं.

वाळू झटकत मी उठलो, तिच्याजवळ गेलो, ती 'चल' म्हणाली आणि आम्ही दोघं पुढे निघालो. आम्ही सुक्या वाळूची हद्द ओलांडली, ओल्या वाळूवर तिचा पाय अलगदपणे पडला. तिने चपला काढल्या, तिच्या बरोबर मी सुद्धा काढल्या. चपला हातात घेऊन आम्ही दोघंही पुढपर्यंत चालत गेलो. ओली वाळू मला आवडते, त्यात पाय जास्त रूतत नाहीत. गार गार मऊशार वाटतं. आम्ही पावलांच्या खुणा उमटवत समुद्राजवळ गेलो. एक लाट आम्हाला बघून धावत धावत पुढे आली, आणि आमचे पाय गुडघ्यापर्यंत धुवून आमचं स्वागत केलं. आणि त्या अथांग समुद्राशी एकरूप व्हायला आल्या वाटेने परत निघून गेली. पण येताना ज्या उत्साहाने ती आली होती, तो उत्साह जाताना जाणवला नाही. तिच्या मऊशार कांतीला स्पर्श केल्यानंतर कोणालाच तिच्यापासून दूर जाणं पसंत नव्हतं. नाईलाजाने, निरूत्साहाने, त्या लाटेने आमचा निरोप घेतला. जाता जाता आम्हाला तिच्याबरोबर खेचून नेण्याचा केविलवाणा प्रयत्नसुद्धा केला. पायाखाली फक्त पावलांना टेकवायला पुरेल एवढीच जमीन उरल्याचा भास होत होता. छान वाटत होतं.

अगदी काही क्षणांतच, त्या परतलेल्या लाटेचा धीर सुटला आणि ती पुन्हा आम्हाला भेटायला धावून आली. आम्ही तिथे उभं राहून त्या लाटेच्या मनाशी असा बराच वेळ खेळ खेळत उभे होतो. मी बाजूला पाहिलं. ती माझ्याकडेच पाहात होती. तिचा चेहरा मस्त खुलला होता. पायांना होणा-या गुदगुल्या ती दरवेळी नव्याने अनुभवत होती. माझ्यासाठी हा अनुभव काही नवीन नव्हता. याआधी ब-याच चौपाट्यांवर असा अनुभव घेतला होता. त्यातल्या कितीतरी चौपाट्या जास्त स्वच्छसुद्धा होत्या. पण ही मुलगी एखाद्या चार पाच वर्षांच्या लहान मुलीसारखी या पाण्याचा आनंद लुटत होती.

'तू इथे पहिल्यांदा आलीयस का?'
'नाही रे... असं का विचारतोस?'
'तशीच वागत्येस म्हणून विचारलं.'
'हो ना? मी हज्जारदा आल्येय इथे. पण जेव्हा कधी येते तेव्हा आपण पहिल्यांदाच इथे आलोय असं वाटतं. का कोणास ठाऊक!'
'जुहूला हज्जारदा आलीयस? एवढी निमित्तं कुठून मिळाली तुला इथे येण्यासाठी?'
'निमित्ताची काय गरज? यावंसं वाटलं इथे की येते. कोणी बरोबर येणारं असलं तर ठीक, नसलं तर एकटी येते. पण मी इथे यावंसं वाटलं की स्वत:ला आवरत नाही. मी लहानपणापासून येते इथे'

मला मी माझंच प्रतिबिंब समोर बघत असल्याचा भास झाला. फरक हाच होता, की जे तिला जुहू चौपाटीबद्दल वाटत होतं, ते मला मरीन ड्राईव्ह बद्दल वाटायचं, वाटतं. पण काही केल्या मरीन ड्राईव्ह आणि जुहूची तुलनाच मला खुपत होती. कदाचित मरीन ड्राईव्हवर मी कधीच कंटाळलो नव्हतो म्हणून आणि जुहूला पहिल्याच भेटीत आजारी पडलो होतो म्हणून... मला त्यामुळे तिचं म्हणणं पटतही होतं, आणि त्याच वेळी खुपतही होतं.

पायांना लाट पुन्हा भिजवून गेली. तेव्हा मी तिच्या चेह-याकडे पाहिलं. आणि माझ्या लक्षात आलं, की या लाटा 'आम्हांला' भेटायला येत नव्हत्या. त्या फक्त तिच्यासाठी, तिला भेटायला येत होत्या. ती नसताना तिच्या वाटेकडे डोळे लावण्यासाठी, आणि ती असताना तिला सतत येऊन बिलगण्यासाठी. चौपाटीवरची इतर सगळी माणसं नगण्य होती. चौपाटी कितीही खराब झाली, समुद्र कितीही घाण झाला, तरी वर्षानुवर्षं त्याच्याशी असलेलं नातं विसरून न जाता वेळ मिळेल तसा सतत त्याला भेटायला येणारी ती - आणि स्वतः घाण करून नंतर चौपाटीला नावं ठेवणा-या कृतघ्न माणसांमध्ये, या एक अपवाद ठरलेल्या मुलीशी जिव्हाळ्याचं नातं ठेवणारा समुद्र - आणि या दोघांचं अव्यक्त प्रेम पाहणारा मी, असे आम्ही तिघेच तिथे उरल्यागत झालो होतो.

मला त्रास झाला. मला स्वतःची लाज वाटली. आणि पुढचा मागचा काहीही विचार न करता मी चौपाटीवर, समुद्रातून वाहून आलेला, मला दिसेल तो कचरा उचलत सुटलो. ती माझ्याकडे विस्मयचकित दृष्टीने पाहायला लागली. थोडा वेळ तिलाही कळेना की मी काय करतोय, पण मग तीही हसत हसत माझ्याबरोबर कचरा उचलायला लागली. आम्ही दोघंही तिथे जवळच असलेल्या कचरापेटीत सगळा उचललेला कचरा टाकत होतो. आम्हाला कळलंच नाही की आमच्या चार हातांना हळूहळू अजून हात येऊन मिळत होते, मात्र चौपाटी आमच्या अपेक्षेपेक्षा जलद गतीने स्वच्छ होत होती, आणि समुद्राशी माझं नातं अधिकाधिक घट्ट होत होतं.
- कौस्तुभ अनिल पेंढारकर

(लोकप्रभा साप्ताहिकात पूर्वप्रकाशित)

बुधवार, २९ एप्रिल, २०१५

दुहेरी कान्हेरी

कान्हेरीला दोन आठवड्यांत दुस-यांदा गेलो. दोन्ही फे-यांमध्ये भरपूर फरक होता. भरपूर म्हणजे चिक्कार. चिक्कार म्हणजे जबरदस्तच. बरं आता मुद्यावर येतो.

पहिली फेरी रमणीय सप्तरंगी उद्दिष्टांनी नटलेली होती. अगदी हातात हात घालून नसली तरी, इथून - मधूनच खांद्यावर, कमरेवर हात ठेवून, आणि तिथून - लाडिक फटके आणि चिमटे खात नेणारी होती. पुढचा मागचा विचार न करता शरीराला संथ गतीने आणि मनाला सुसाट पळवणारी होती. दुसरी फेरी प्रबोधनात्मक होती. विचार करायला लावणारी होती.

पहिल्या फेरीत इच्छित कल्पना वास्तवात आणण्याची खटपट होती. दुस-या फेरीत घडून गेलेल्या वास्तवीक घटनांची कल्पना करायची होती.

पहिल्या फेरीत कान्हेरीच्या वाटेवरती स्वतः हरवून जायचं होतं. हरवलेलं आपलं मूळ दुस-या फेरीत शोधून काढायचं होतं. पहिल्या फेरीत नावीन्याचा खुसखुशीत आस्वाद घ्यायचा होता, दुस-या फेरीत जुन्या जतन केलेल्या आठवणींना उजाळा द्यायचा होता.

पहिल्या फेरीत आठवणींत राहतील असे क्षण जगायला गेलो होतो. दुसरी फेरी आठवणींत ठेवाव्यातच अशा गोष्टी सांगून गेली. पहिल्या फेरीत जे सुख अनुभवलं त्यावरून भविष्याची स्वप्नं रंगवली. दुस-या फेरीनं इतिहासाची साक्ष देणा-या रंगांची झलक दाखवून दिली.

पहिल्या फेरीत आजुबाजूला माकडं चिक्कार होती पण आक्रमक कोणीही नव्हतं. दुस-या फेरीत त्यांच्याशी कुस्ती घालायचं तेवढंच बाकी ठेवलं होतं.

पहिल्या फेरीत आपल्या दुकांतात कोणी बाधा आणणार नाही असं ठिकाण निवडण्यात वेळ गेला. प्रत्येक आगंतुकाला मनोमन शिव्या घालण्यात वेळ गेला. दुस-या फेरीत ठिकठिकाणी, 'प्रायव्हसी' नकळतच नष्ट करत गेलो, आपसुकच आगंतुकासारखा, दांभिकतेनं भ्रष्ट होत गेलो.

पहिल्या फेरीची सुरूवात बाकी धमाल झाली. मनसुबे होते सायकली भाड्याने घेण्याचे. एका हाताने सायकल चालवत दुसरा हात मधूनच हातात घेण्याचे. घरून निघताना नट्टापट्टा करण्यात वेळ दवडल्यानं सायकली सगळ्या निघून गेल्या. अर्थात् याबद्दल बोल लावण्यात अर्थ नव्हता, कधीच नसतो. पण मग जे अंतर सायकल चालवत असं भसकन् पार केलं असतं, तेच अंतर आरामात, रमत गमत, थांबत थबकत, लपत लपवत कापत गेलो. सकाळच्या थंडीत सायकल चालवून अंग सुन्न करण्यापेक्षा कोवळ्या उन्हात चालून, थोडा घाम गाळून चेह-याची लकाकी अजूनच खुलवत गेलो. तरीही सेल्फी(ज) काढताना 'शी माझा अवतार बघ. एक मिनीट हं' हे करण्यात भरमसाट वेळ गेला तो भाग अलाहिदा. त्याबद्दल काही बोलणं पाप असतं. मुळात राष्ट्रीय उद्यानात येऊन कान्हेरी गाठण्याची उद्दिष्टं बाळगणा-यांनी स्वतःचेच फोटो काढत बसणं कितपत शहाणपणाचं आहे, हा ही एक वादग्रस्त प्रश्न आहेच(वादग्रस्त एवढ्यासाठीच की विचारला तर दुस-या बाजूनं वाद घालणारे(-या) खूप आहेत). पण एवढा विचार करण्याचा तो दिवसच नव्हता. कारण पहिली फेरी ही 'विलासफेरी' होती.

'विवेकफेरी' होती ती दुसरी. अ ते झ मधील प्रत्येक अक्षरानं सुरू होणा-या श्लील-अश्लील अशा सर्व शिव्या घालूनही ज्यांचं वर्णन अपुरं वाटेल अशा लोकांनी इतस्ततः टाकलेला कचरा उचलून आपल्या जवळच्या पिशवीत ठेवायला हात आसुसले होते. एकदोघांना चार उपदेशाचे डोस पाजायलाही संकोच वाटला नाही. पण या सगळ्या मेहनतीवर एका झटक्यात पाणी ओतायला हुप्पे आले की धावून; शारीरिकदृष्ट्या कितीही फेरफार झाले तरी मानसिक आणि बौद्धिक दृष्ट्या आपल्याएवढीच उत्क्रांती झालेल्या आपल्या वंशज-जातीच्या भाऊबंदांना चारचौघांत खजील केलं त्यामुळे बहुदा त्यांच्या (हुप्प्यांच्या) भावना दुखावल्या असाव्यात. मग एका माकडाशी पिशवीवरून झालेल्या झटापटीत सरशी माझी झाली आणि तो बिचारा नुसताच मला त्याच्या इवलुशा तोंडाचा चंबु करून हाॅ... हाॅ करून घाबरवायला लागला. कदाचित तेव्हा त्याने माझ्यातल्या मूळ प्रजातीला साद घातली असावी, कारण मीही उत्स्फूर्तपणे माझे दात फिरवले आणि भल्यामोठ्याने 'हाॅऽऽऽ' असा आवाज काढला. मी कुठल्या भाषेत काय बोलत होतो मला कळलं नाही, पण त्या हुप्प्याला हवा तो संदेश मिळाला आणि इतर माकडांमध्ये 'ब्राॅडकास्ट' करायला तो निघून गेला. अगदी हॅरी पाॅटर झाल्यासारखं वाटत होतं.

हे सगळं मी पहिल्या फेरीत करू शकलो असतो, पण एखादं माकड मला घाबरून पळण्याऐवजी... माझंच हसं झालं असतं त्यामुळे तेव्हा मी माझा आब राखून, माझ्या बेडकीहीन दंडाला येता जाता बाहेरून दिला जाणारा पीळ थोपटत 'काही नाही करणार. लक्ष देऊ नको.' असं म्हणत पुढे जात राहिलो होतो. या दोन प्रसंगांवरून विलासफेरीत विवेकाचा आणि विवेकफेरीत विलासाचा मी कसा अनोखा मेळ साधू शकलो हे सूज्ञांच्या लक्षात आलंच असेल.

विवेकफेरीत कान्हेरीबद्दल प्रचंड माहिती मिळाली. नालासोपारा हे एकेकाळी महत्त्वाचं बंदर होतं हे या फेरीत कळलं. आनंदून जावं की शेम शेम म्हणावं ते मात्र कळलं नाही. विलासफेरीत सेल्फी काढून फेसबुकवर लाईक्स मिळवण्यापुरते महत्त्वाचे स्तूप आणि त्या लेण्या, विवेकफेरीत पार दृष्टिच पालटून गेल्या.

दुस-या शतकातल्या विटा, त्यांचं झालेलं 'संवर्धन'; विविध काळांत दगडी भिंतींमध्ये कोरलेल्या मूर्ति, आणि एकविसाव्या शतकात त्याबाजूला हार्टं काढून आपली नावं कोरणा-या महान शिल्पकारांनी त्यात घातलेली भर; आज दिसत नसलेल्या सागवानी लाकडी बांधकामाची साक्ष देणा-या दगडांमधल्या खाचा; मूर्ति आतमध्ये कोरलीये की बाहेरून त्यावरून ती कधी घडवली त्याचा बांधता येणारा अंदाज; 'तेर' या तत्कालीन चायना माल दागिने केंद्र असणा-या आणि आजही तेर म्हणूनच नावाजलेल्या ठिकाणाची ओळख; लेण्या खोदण्यासाठी देणग्या देणा-या त्यावेळच्या टाटा अंबानींची मला अजाण अशा भाषेत अन् लिपीत कोरलेली नावं आणि मूर्ति; सर्वांत मोठी होऊ शकली असती अशी, पण कंत्राटदाराच्या कामगारांनी संप पुकारल्यामुळे असेल किंवा देणगीदारांनी हात आखडता घेतल्याने असेल, अर्धवट राहून गेलेली आणि त्यामुळे लेण्यांचं बांधकाम कसं व्हायचं याचं उत्तर देऊन जाणारी लेणी; त्यापाठोपाठ कान्हेरीत मोठी असलेली, पूर्ण झालेली, दुस-या शतकातल्या फाॅल्स सिलींगची कथा सांगणारी लेणी हा आणि असा भलामोठा खजिना माझ्यासमोर विस्तृतपणे पहुडला होता. कान्हेरी हा कृष्णगिरी या शब्दाचा अपभ्रंश असून हे एक विश्वविख्यात विद्यापीठ होतं ज्याची साक्ष देणारे शीलालेख जगभरात सापडतात, हे जेव्हा कळलं तेव्हा कान्हेरीच्या इतक्या जवळ राहणा-या मला स्वतःचीच लाज वाटली. मग त्या विद्यापीठातलं ग्रंथालय पाहून आलो. तिथल्या शांत वातावरणात एक गोरा पर्यटक कुठलं तरी गाणं गात बसला होता. आधी त्याला गप्प करावंसं वाटलं, पण त्याचे सूर तिथल्या वातावरणाशी माझ्या उपस्थितीपेक्षा जास्त सुसंगत वाटत होते हे जाणवलं आणि मीच गप्प बसलो. एका पुढच्या लेणीच्या प्रवेशद्वाराशी जपानी शिलालेख दिसले. आत गेलो तेव्हा मिट्ट काळोख होता. आम्ही डोळे बंद करून थोडा वेळ उभे राहिलो. उघडले तेव्हा अंधाराला सरावलेल्या डोळ्यांना जे दिसलं, ते दृश्य केवळ अप्रतिम होतं. अख्खी लेणी शिल्पांनी भरलेली होती. बहुतेक शिल्पांवर रंगांचे अवशेष होते. जवळजवळ सर्वच शिल्पांवर चकाकी दिसत होती. मूळ शिल्पकारांनी मायका लावला होता. विलासफेरीत फोटोग्राफीची हौस भागवली होती म्हणून विवेकफेरीत मी कॅमे-याला लगाम घातला होता. पण ही दाटीवाटीत कोरलेली शिल्पं इतकी मनमोहक दिसत होती की हात आपोआपच कॅमे-याला लागला आणि मी खचाखचा बटण दाबत सुटलो.

पासष्ठ दशलक्ष वर्षांपूर्वी आज मादागास्कर आहे त्या ठिकाणावरून स्थलांतरित होत होत भारतीय उपखंडाला येऊन मिळालेल्या तप्त ज्वालामुखीच्या भुखंडावर कान्हेरी गुहा उभ्या ठाकल्या आहेत. लाव्हारस सुकून निर्माण झालेल्या बेसाॅल्टच्या दगडधोंड्यांमध्ये आणि खडकांमध्ये प्रचंड डोकं चालवून आणि परिश्रम घेऊन या लेण्यांची निर्मिती केली गेली आणि इथे विद्यापीठ उभं राहिलं. इसवी सनाच्या पहिल्या-दुस-या शतकापासूनची बांधकामं आजपर्यंत काही जीर्ण भाग सोडता अजूनही शाबूत आहेत. त्यांच्या संवर्धनासाठी सरकार किती उदासीन आहे याबाबत खडे न फोडता, आहे त्या परिस्थितीचं खरंखुरं संवर्धन कसं करता येईल, याकडे लक्ष द्यायला हवं. अगदी त्याबाबत आपण सामान्य माणूस म्हणून समजू शकत नसलो, तरी निदान त्या स्मृतींना अभंग आणि निरंतर ठेवण्यात आपल्या उपद्रवांची भर पडून वितुष्ट येऊ नये याची तरी आपण दक्षता घेतलीच पाहिजे.

विलासफेरीत कान्हेरीला पोचलो तेव्हा मोठमोठाले, छोटछोटाले स्तूप, त्याला टेकणारी, त्यावर चढून बसणारी आणि वाॅचमनच्या शिट्टीला दाद न देणारी मंडळी; घोळक्याने गोंगाट करणारी, टोळक्याने दंगा करणारी मंडळी; चार फुटांवरून माकड गेलं तरी किचाट आवाजात ओरडून आपल्याकडे लक्ष वेधू पाहणा-या पुचाट मुली; त्यांच्यावर माकडापेक्षा जास्त घाबरवणा-या आवाजात हसणारे त्यांचे मित्र; लग्नाआधी इथे बरंच काही करून(आणि बहुधा कोरून) गेलेली, आणि आता लग्न ठरलं म्हणून पत्रिकेवर छापण्यासाठी स्वतःचे फोटो काढायला खास नटून आलेली दाम्पत्यं; या लेण्यांकडे आपल्याहूनही कितीतरी जास्त औत्सुक्याने आणि आदराने पाहणारी परदेशी मंडळी; त्यांच्या कुतुहलाने ओशाळून जाण्याऐवजी त्यांच्या चालण्या-बोलण्या-दिसण्याची थट्टा उडवणारे आणि त्यांच्या केवळ रंगसंगतीवर भाळणारे बुरसट विचारांचे लोक; त्यातल्या बौद्ध भिख्खूंना जे पाणी पवित्र वाटत होतं तिथे स्थानिकांनी फेकलेल्या बिस्लेरीच्या बाटल्या(याच पाण्याचा साठा आणि वापर करण्यामागचं चकित करून टाकणारं त्या काळचं तंत्र विवेकफेरीत समजलं), यापलिकडे कान्हेरीत काहीही पाहण्यासारखं वाटत नव्हतं. गंमत येत होती ती फक्त माकडांमुळे, कारण जिथे माणसं एकमेकांच्या सलोख्यात व्यत्यय आणत होती, तिथे नायिकेला नुसती हूल देऊन दोन जीवांना जवळ आणण्याचं पवित्र परोपकारी कार्य ती माकडं सातत्यानं करत होती.

त्यानंतर विवेकफेरीत कान्हेरीचं योग्य दर्शन घडवलं ते विनायक परब सरांनी. ज्या ज्या लेण्यांत आम्ही गेलो, तिथली इत्थंभूत माहिती ते पुरवत होते. त्यांनी अशाही अनेक बाबी दाखवल्या, सांगितल्या ज्या खूप महत्त्वाच्या आहेत आणि आपल्याला चकित करून टाकणा-या आहेत, पण ते सगळंच इथे उद्धृत करत बसलो तर कान्हेरीच्या विवेकफेरीतलं सरप्राईज एलिमेंट निघून जाईल.

आणि विलासफेरीत कोणाबरोबर गेलो, हे न सांगण्यामागे सरप्राईज एलिमेंटचा भाग कमी आणि धास्ती आणि धाकाचा भाग जास्त आहे हे सूज्ञांनी समजून घ्यावं.

- कौस्तुभ अनिल पेंढारकर.

मंगळवार, ३१ मार्च, २०१५

ट्रेनमधलं तत्त्वज्ञान भाग 5

मला लागली होती भूक. आणि कधी नव्हे ते पाकीट एरवीपेक्षा जरा जड होतं. अशा वेळी भूक जरा जास्तच लागते असा माझा सर्वसाधारण अनुभव आहे. पण मला कंपनी द्यायला कोणीच जागेवर नव्हतं. बरेच जण आले नव्हते, काहीजण येऊन घाईघाईत घरी गेले होते. तर काहीजण 'कँटीनमध्येच खाऊया' असं सुचवत होते. मला पाचशेची नोट कँटीनमध्ये मोडायची नव्हती. थोडक्यात तेव्हा तिथलं खायचं नव्हतं. कुठल्यातरी झाकडूमाकडु हाॅटेलात जायचा मूड होता माझा. पण ट्रीट देतो सांगूनही कोणी येईना. एकूणच मळभ होती वातावरणात, म्हणून असावा हा निरुत्साह. एकाने तर सरळ 'पावसाच्या दिवसांत बाहेरचं जास्त खाऊ नये' असं कारण दिलं. विशेष म्हणजे हा माणूस रोज बाहेरचं हादडणारा होता. शेवटी निराश होऊन मी घरी जातो असं सगळ्यांना सांगून निघालो. 'थांब ना काय घाई आहे. मी पण निघतोच आहे दोन मिनिटांत' हे पाऊण तासात चौथ्यांदा ऐकल्यावर मी दोन शिव्या हासडत चालता झालो.

स्टेशनजवळ पोचलो, तर तिथे बाहेरच्या हाॅटेलांमधल्या पावभाजीचा वास यायला लागला. आणि भूक प्रचंड चाळवली. पण पावभाजी खायची नव्हती मला. आणि खिशात पाचशे असताना अशा थुकरट हाॅटेलात? छे छे. मी ब्रिज ओलांडून पलिकडे गेलो. आणि मला नेहमी जावंसं वाटणा-या, एका ब-यापैकी चांगल्या दिसणा-या, मराठी आडनावापुढे स लावून ते इंग्रजीत लिहीलेल्या रेस्तराँ मध्ये शिरलो. शिरताना एका गुर्जर पोराला फोनवर दोन शिव्या हासडताना आणि 'इधर तो पक रहा है यार अभी देखता हू कुछ तो बहाना बना के निकलता हू. मेरा तो टोटल पोपट फुली फुली. फोटो एडिट मारके डाला था शायद. तुम लोग किधर हो -' मी आत शिरलो. मला गुजराती लोकांचा हेल खूप मनोरंजक वाटतो. विशेषतः ते हिंदी किंवा इंग्रजीत बोलत असतात तेव्हा. असो. सहसा असं मोठ्या हाॅटेलात एकटं जायची पद्धत नसते, पण पद्धती मोडण्यासाठीच जन्म आपुला असल्यामुळे मी दोघाजणांसाठी तयार ठेवलेल्या एका टेबलावर एकटा जाऊन बसलो. तिथे दोन ग्लास, त्यातला एक पाण्याने पूर्ण भरलेला आणि एक अर्धा रिकामा दिसला. 'एवढं चांगलं हाॅटेल असूनही गि-हाईक निघून गेल्यावर पटापट आवरायची शिस्त दिसत नाही' असा मी अंदाज बांधला. मेनू कार्ड समोर उघडं पडलं होतं. ते वाचायला लागलो. तेवढ्यात ती सहजपणे समोर येऊन बसली. मान वर करून माझ्याकडे पाहिलं. आणि तिला बघून मला जेवढा धक्का बसला त्यामानाने तिलाच कितीतरी मोठा हादरा बसल्यासारखा चेहरा झाला तिचा.

'तू इथे काय करतोयस?'
'माझं सोड तू इथे काय करत्येस? तुला घरी लवकर बोलावलेलं ना आईने?'

तिने इकडे तिकडे पाहिलं.
'तो कुठ्येय?'
'कोण तो?'

तिनं जरा आढेवेढे घेतले.
'तो मुलगा... तुझ्या आधी इथे बसला होता तो.'
'इथे कोणी बसलं नव्हतं मी आलो तेव्हा.'
'अरे असं कसं आम्ही बसलो होतो इथे. ही काय मी पर्स ठेवलेली ना इथे दिसत नाही?' असं म्हणून तिनं मला तिच्या कोचावर खाली कडेला ठेवलेली पर्स उचलून दाखवली.
'ही मला कशी दिसणार? तू आत्ता उचलून दाखवलीस म्हणून दिसतेय मला.'
'ते मरूदे. तो कुठ्येय?'
'कोण तो?' पोरगी नाव घ्यायला तयार नाही. नुसती 'प्च' करत बसली. 'तू का आलास इथे? श्शी.' केवढी वैतागली होती.
'मला काय स्वप्न पडलं होतं तू इथे येणारेस म्हणून! आणि आलो तर काय बिघडलं?'
'तरी मी बजावलं होतं सगळ्यांना, याला धरून ठेवा म्हणून.'
'ऑ? म्हणजे?'

इतक्यात 'तो' आला. 'अरे हा तर मगाचचाच च ला गुर्जर उकार' मी मनात विचार केला.

माझ्याकडे प्रश्नार्थक नजरेने बघून मग तिच्याकडे पाहायला लागला. शिष्टाचार पाळायचा म्हणून आमची ओळख करून द्यायला हवी की नाही? ते राहिलं बाजूला.
'तू किधर चला गया था?'
'अरे मुझे फोन आया था. यहा नेटवर्क नही मिल रहा था तो बाहर गया. अं... येऽऽ?' त्याने पुन्हा एकदा माझ्याकडे पाहिलं. मी ओशाळून उठलो. तिची आत्ता पेटली. ओळख बिळख करून दिली. मी काॅलेजचा मित्र आहे हे त्याला सांगितलं. तो कोण कुठचा हे मला सांगितलं नाही. मी विचारलंही नाही. आता इथून मला सटकावं लागणार होतं पण कुतुहल मला तसं करू देईना. ती नजरेने मला निघायलाच सांगत होती. तेवढ्यात तोच तिला म्हणाला,
'अच्छा... लिसन, मेरे पपा... अं... चाबी भूल गये है घर की. और पडोस में भी कोई नही है घर पे अभी तो... मुझे जाना होगा. इट्झ ओके ना?' त्याने अतिशय गोड आवाजात विचारलं.
'या या टोटली फाईन...'
'सम अदर डे... परहॅप्स!'
'या शुअर नो प्राॅब्लेम.'
'बाय.'
'बाय बाय.'
मलाही बाय म्हणून गेला. मी त्याला एक अर्थपूर्ण हास्य देऊन बाय म्हटलं. आणि तिच्याकडे वळलो.

'आजचा दिवसच खराब आहे.' ती तो गेल्या गेल्या म्हणाली.
'का काय झालं?'
'काय काय! एवढा क्यूट मुलगा आणि इतका बावळट निघावा! त्यात तू आलास!'
'मी आलो म्हणून दिवस खराब?'
'हो!' मॅडम नको तेवढं स्पष्ट बोलण्याच्या मूडमध्ये होत्या वाटतं. मी मनातल्या मनातच तिला माफ केलं. 'एकतर सकाळी आईशी वाद झालाय आज.'
'कशामुळे?'
'अरे जरा उशीर होणार आहे म्हटलं तर हजार प्रश्न विचारत बसते. मैत्रिणींचे नंबर घेऊन फोन लावत बसते. मला खोटं बोलवत नाही जास्त. मग वैतागले मी, आणि झाला वाद!'
'बरं पण खोटं का बोलायचं होतं?'
'मग काय सांगू? मी एका मुलाबरोबर डेटवर जात्येय ज्याला याआधी कधीही भेटले नाहीये?'
'म्हणजे तू डेटवर आली होतीस इथे?'
'नाही! मी हळदीकुंकवाच्या कार्यक्रमाला आले होते.'
'अगं... इतकी का वैतागतेस!'
'मग काय करू? फालतुगिरी!'
मला मात्र प्रचंड आनंद झाला होता. पण ती डेटवर आली त्याचा की डेट फिसकटली त्याचा हे माझं मलाच अजून उमगलं नव्हतं.
'एक मिनीट! तू ब्लाईंड डेटवर आली होतीस?'
'अं... साॅर्ट ऑफ! त्याने मला फेसबुकवर रिक्वेस्ट पाठवली होती.'
'कधी?'
'गेल्या महिन्यात. सोड ना काय फरक पडतो!'
'एक मिनीट, फरक पडतो. तू हे मला आत्ता सांगत्येस!? थांब आता सांगतो सगळ्यांना!'
'सगळ्यांना माहितीये.'
'ऑ??'
'मग मी काय पाप केलंय? मला का नाही सांगितलंस?'
'कारण तू गावभर दवंडी पिटतोस!'
'पिटणारच ना!! माझ्या मैत्रिणीला बाॅयफ्रेंड मिळतोय यार!!' हे मी इतक्या मोठ्याने ओरडलो की हाॅटेलमधली बरीचशी मंडळी आमच्याकडे वळून पाहायला लागली. 'साॅरी! उत्साह!'
'आता कळलं का सांगत नव्हते ते?'
'कळू दे ना लोकांना आपलं काय जातंय!'
'उगाच कशाला लोकांच्या चर्चेचा विषय व्हावं?'

ती त्या मुलाला आवडली नव्हती हे मला कळलं होतं. हे तिला सांगावं का याचा मी विचार करत होतो.

'त्यात तो मुलगा इतका बावळट निघाला... धड काही बोलतच नव्हता. किती लाजावं माणसानं.'
'अगं ठीके... त्यालाही तू पकाऊच वाटलीस!' मी चटकन् बोलून गेलो. तिची चर्या क्षणात बदलली. मी तोंड बंद ठेवून आतल्या आत जीभ चावली.
'हे तू कशावरून म्हणतोस?'
'अं... मला सांग... तुला तो आवडला का? नाही ना?' आता पचकलोच होतो, तर मला आता सगळं सांगायचं होतं. पण त्याआधी तिचं मन जाणणं गरजेचं होतं. कारण तिची चर्या... पण मला सगळं ओकायचं होतं यार!!
'आवडला म्हणजे तसा नाही रे...'
'हा मग ऐक...' असं म्हणून मी उत्साहात त्या गुर्जराचं फोनवरचं संभाषण सांगत गेलो. त्यात तिची थट्टा करायला कायमचा कोलीत मिळावा म्हणून अजून थोडा मसाला घातला आणि तिची उडवत बसलो. तिचा चेहरा नेहमीसारखा मख्ख झाला होता. ती गप्प झाली होती. मी एकटाच हसून कंटाळलो आणि तिचं तोंड बघून वरमलो.

'ए अगं... तू मनावर का घेत्येस? तो काय अगदीच असंच्या असं म्हणाला नाही... मी थोडं माझं अॅड केलंय.' मला आता सारवासारव करण्याची गरज भासू लागली. कारण धोक्याची घंटा जाणवू लागली होती. तिने हात हलकासा उडवला, गालाच्या एका कोप-यातून बारीक अशक्त हसली आणि 'छे मी कशाला मनावर घेऊ?' असं म्हणून विषय माझ्यावर आणला. माझं कसं चाललंय आयुष्यात, कोणी सापडली की नाही.. ती दोन दिवसांपूर्वी दिसली होती तिची माहिती मिळाली का इत्यादी इत्यादी. मीही पळवाट मिळाली म्हणून उत्साहात तिच्या प्रश्नांना उत्तरं देत गेलो.

मला माहीत होतं, की आमचं दोघांचंही चालू विषयात फारसं लक्ष नाहीये. तिचं त्याच्याकडे, माझं तिच्याकडे. पण दोघंही मुद्दाम हट्टानं इकडचं तिकडचं बोलत राहिलो.

खाण्यावर या सगळ्याचा अजिबात परिणाम झाला नाही. मस्त पोटभर खाल्लं आम्ही. बिलाचे पैसे मी भरल्याबद्दल खालचा ओठ बाहेर काढून, भुवया वर उंचावून मला टोमणे हाणण्यात आले. मग आम्ही स्टेशनकडे परतून खच्चून भरलेल्या डब्यात चढलो.

तिनं चढताना अजिबात नाटकं केली नाहीत. लेडीज मध्ये जाते वगैरे काही नाही. आली काही न बोलता माझ्यासोबत. एका स्टेशनानंतर मधल्या पॅसेजात कडेला टेकून ती माझ्याकडे तोंड करून उभी राहिली. चेहरा मख्ख होता. आणखी दोन स्टेशन्स नंतर मान झुकवून माझ्या खांद्यावर डोकं टाकलं. आणि एक सुस्कारा सोडला.

'आय अॅम साॅरी...' मी म्हटलं.
तिने मान वर केली नि म्हणाली, 'तू का साॅरी म्हणतोयस?'
'मी तुला सांगायला नको होतं. तुझा मूड आणखीनच खराब केला मी.'
'चल रे... काही मूड खराब वगैरे नाही झाला. नाही आवडले त्याला तर ठीके एवढं काय!' असं म्हणून थोडा वेळ ती माझ्याकडे धिटाईनं पाहात राहिली. मी क्षीण हसलो.

तिनं पुन्हा डोकं माझ्या खांद्यावर टाकलं. मला वाटलं रडते की काय आता... पण फक्त माझा दंड घट्ट पकडून 'थँक्यू' म्हणाली. मी पुन्हा हसलो. तिनं मान वर केली. 'आता ती कदाचित तिचं मन मोकळं करेल, मला विश्वासात घेऊन ती या महिन्याभरात किती गुंतत गेली ते सांगेल, जे मी खरंच कुठेतरी बोंबलत फिरणार नाही.' मी तिचं सांत्वन करण्याच्या तयारीत होतो.

'केवढा बारीक आहे रे दंड तुझा. काही मांस नाहीचे. खातोस एवढं ते जातं कुठे?'
'आता अजून कुठे जाणार?' ती मोकळेपणे हसली.

आणि मग बाकी कसल्याच भावनिक संभाषणाची गरज उरली नाही.

क्रमशः

-© कौस्तुभ अनिल पेंढारकर

शुक्रवार, ६ फेब्रुवारी, २०१५

ट्रेनमधलं तत्त्वज्ञान भाग 4

ट्रेन्स उशीरा धावत होत्या. पाऊस जबरदस्त कोसळत होता. स्टेशनवरच्या छपरांमध्ये कुठल्याशा फटींमधनं नाहीतर कुठल्यातरी भोकांमधनं पाणी वाट काढून खाली येत होतं. एखादी ट्रेन लागलीच प्लॅटफाॅर्मात तर येताना आपल्याबरोबर दारावरच्या पट्ट्यांमधून वाहून आणलेलं पाणी थांबल्या थांबल्या सोडून देत होती. छप्पर आणि ट्रेनमधल्या छोट्याशा अंतराखालून जाताना प्रवासी पूर्ण भिजून जात होते. ट्रेनचे एका बाजूचे दरवाजे पूर्ण बंद, तर दुस-या बाजूचे चढण्या-उतरण्यासाठी अर्धवट उघडे. सगळ्या खिडक्यांवर काच अंथरलेली. त्यात एखादी जुनी गाडी आली तर तिची सगळीकडून गळती चालूच. जुन्या गाड्यांनी बिचा-यांनी जितकी वर्षं सेवा केली असेल प्रवाशांची, त्याचं बेचव फळ त्यांना एकतर यार्डात सडून, नाहीतर चुकून कधी योग आलाच पुन्हा मुंबईभर फेरफटका मारण्याचा, तर प्रत्येक स्टेशनावर लोकांची वाकडी झालेली तोंडं बघून मिळणार होतं. (अर्थात्, ही सहानुभूती माझ्या मनात लिहिण्यापुरतीच आहे. जुनी ट्रेन दिसली की माझंही तोंड वाकडं होतं.)

मी ही सगळी धांदल बघत उभा होतो. मला भिजायला आवडतं. काॅलेजला मी बॅग फक्त दाखवण्यापुरती न्यायचो. त्यात आयडी आणि पाण्याची बाटली सोडली तर बाकी काही नसायचं. वही असली तर तीही अशीच कुठलीतरी... वाया गेलेली. त्यामुळे बॅगसकट भिजण्यात काहीच अडचण नव्हती. मोबाईलला प्लॅस्टिक कव्हरात घालायचं. पाकिट भिजलं तर भिजू द्यावं. थोडक्यात, आधीच झालेली सर्दी सोडून माझ्या भिजण्याच्या सहसा काहीही आड येत नाही.

पण मी भिजत नव्हतो. मी वाट बघत होतो. ट्रेन्सची नव्हे, तिची. ती अजून यायची होती. तिनं मला थांबायला सांगितलं होतं. तिनं केलेला एक प्रोजेक्ट छापण्यासाठी म्हणून मी घरी घेऊन जाणार होतो. तो ती देणार होती. मी पावसात भिजण्याच्या नादात पुढे निघून आलो होतो आणि ती मागे काॅलेजात सर ओसरण्याची वाट पाहात थांबली होती. तिचा फोन आला, 'हवीये ना प्रोजेक्ट शीट? कुठ्येस तू?' मी विसरूनच गेलो होतो. स्टेशनजवळ वाट बघत थांबलो. छपराला लटकणा-या पंख्याखाली बॅग सुकवत उभा राहिलो. कारण बॅग ओली दिसली असती तर मला शीट नक्कीच मिळाली नसती. ओल्या केसांना पंख्याचा वारा लागून मला सटासट शिंका येऊन गेल्या होत्या. पण पर्याय नव्हता. मला स्वतःला तो प्रोजेक्ट करण्याची अक्कल किंवा हिम्मत नव्हती. तसंही पाच-दहा मार्कांसाठी आपलं डोकं खाजवणं मला नेहमीच स्वतःच्या बुद्धिमत्तेचा अपमान वाटत आलंय.

ती आली. दिसली. मी वाटेकडे डोळे लावून बसलोच होतो, पण माझी अगतिकता दिसता कामा नये असं उगाच वाटलं. म्हणून मी एक वैचारिक पवित्रा घेऊन, कुठेतरी शून्यात नजर लावून किंचित हसत उभा राहिलो. आता ती येईल, मला गदागदा हलवेल, नाहीतर माझ्या डोळ्यांसमोर टिचक्या मारून विचारेल, 'कसला विचार करतोयस एवढा?' मग मी एकदम गहन वाटणारं असं काहीतरी उत्तर ठोकेन... ज्याचा अर्थ ना तिला कळेल ना मला. तिनं जास्त रस घेतलाच तर लावेन काहीतरी असंबद्ध पाल्हाळ. त्यात पटाईत होतो मी. शून्यात नजर लावून बसलेला, गहन विचारात बुडालेला, एक चमत्कारिक (आणि म्हणूनच इंटरस्टिंग) मुलगा...

'तुझ्याकडे छत्री नावाचा प्रकार नाहीये?'

पोपट झाला. पण मी इतक्यात हार मानणार नव्हतो. तिने आपला तपोभंग केल्याची तिला जाणीव व्हावी म्हणून मी दचकल्यासारखं केलं.

'अरे? तू कधी आलीस?'

'तू केवढा भिजलायस! आणि वरून पंख्याखाली का उभा आहेस मूर्ख माणसासारखा! आजारी पडशील की.'

काहीच उपयोग नव्हता. जाऊदे. ही मुलगी ना स्वतः कल्पनाविश्वात रमते ना दुस-याला रमू देते. झक मारून वास्तवात यावं लागतं हिच्यासमोर. हे मी मनातल्या मनात मान्य केलंच, पण नेमकी माझ्या शरीरानंही त्याच वेळी गद्दारी केली. त्याच वेळी लागोपाठ तीनदा शिंकलो. तिचा मुद्दा बिनतोड निघाला. ती मला पकडून पंख्यापासून लांब घेऊन गेली.

'हे घे. आणि आण उद्या काहीही करून. बस आज हवं तर रात्रभर जागत.'

'येस मॅम.'

'काय मजा येते रे रोज रोज भिजून?'

'मस्त वाटतं. तू भिजून बघ मग कळेल तुला.'

'भिजायला मलाही आवडतं रे. पण तुझं आपलं जेव्हा बघावं तेव्हा भिजतच असतोस तू.'

मी तिच्याकडे नीट बघितलं. तीसुद्धा ब-यापैकी भिजलेली होती. आधीच पाऊण पँट घालून आली होती. आणि पाठीला चिकटलेला स्लीव्हलेस कुडता. (तरी तो अजून पारदर्शक झाला नव्हता.) एका हातात ओली निळी छत्री, त्याच हाताच्या खांद्याला लटकलेली पर्स, केस मोकळे सोडलेले आणि किंचितसे भिजलेले. उघड्या दंडांवरून ओघळतं दिसणारं पाणी. गव्हाळ कांती लकाकत होती. अवतार बाकी एकदम फ्रेश दिसत होता. चेहरा स्वच्छ आणि उजळलेला.

'छान दिसत्येस' मी पटकन बोलून गेलो.

ती चपापलीच. डोळे मोठे करून दोन्ही हातांनी केस कानामागे घेत 'छान? या अशा अवतारात?' असं म्हणत तिनं स्वतःचा अवतार पाहण्यासाठी मान खाली झुकवली. तसे मागे केलेले केस पुढे आले आणि चेहरा लपवू लागले. तरी कडेनं पाहिल्यावर तिच्या गालावर बारीकशी खळी उमटलेली मला दिसली. मान पुन्हा सरळ केली तेव्हा चेहरा पुन्हा मख्ख झाला होता आणि हसू गायब झालं होतं. तरी ओठ आतमध्ये दाबले गेले होते. किती तो कंट्रोल स्वतःवर! आणि कशाला! पण नाही. आम्ही उघड उघड नाही लाजणार जा! पण तिची खळी पाहून मीही हसून बघत होतो आणि मला हसताना पाहून तिच्या ओठांची कसरतच सुरू झाली. शेवटी न राहवून, 'मी अजिबात चांगली दिसत नाहीये. एकदम चिकट चिकट झाल्यासारखं वाटतंय मला. कधी एकदा घरी जाते आणि गरम पाण्याने आंघोळ करते असं झालंय.' बोलताना तिच्या खळ्या दोन-तीनदा उमटून गेल्या. मी तेवढ्यावरच समाधान मानायचं ठरवलं.

'गरमावरून आठवलं... तुला आंघोळ करणं सोडलं तर बाकी कसली घाई नाहीये ना?'

'नाही... का? मी कुठेही येणार नाहीये हां'

'तू नको येऊस. मी जाऊन येतो पटकन. तू थांब इथेच. ट्रेन आली तर जाऊ नकोस प्लीज.'

'मी जाणार.'

'अगं... थांब ना.'

आता ती मस्त हसली. सबटेक्स्ट जाणवला - 'बिचारा. मजा येते याला छळायला.' मी अजून बिचारे भाव आणले चेह-यावर. 'प्लीज प्लीज.'

'बरं थांबते. पण कुठे जातोयस?'

'तू बघ मी आलोच.'

'लवकर ये.'

मी धावत धावत ब्रीज चढत गेलो. स्टेशनच्या बाहेर पडलो, समोरच एक वडापाववाला होता. भन्नाट गर्दी होती. मी ट्रेनमध्ये चढावं तसं त्या गर्दीत धक्काबुक्की करत आणि साॅरी साॅरी म्हणत पुढे गेलो. पुड्यात बांधून घेऊन, बॅगेत भरून धावत धावत परत आलो. येताना छपॅक छपॅक करत आजुबाजूच्या लोकांवर चिखल उडवत, आणि त्यांच्या शिव्या खात आलो. ट्रेन लागताना दिसत होती. आधीच उशीरा आलेली.

'ये पटकन ये.' ती ट्रेनमध्ये चढायच्याच तयारीत दिसत होती.

आम्ही दोघंही चढलो. चढायला गर्दी तूफान होती. पण अगदी आत शिरायला मिळालं. आणि तिला बसायलाही मिळालं. मला दम लागला होता ते बघून ती मला बसायला सांगत होती, पण मी तिलाच बळे बळे बसवलं. तिच्या मांडीवर बॅगेतला पुडा काढून ठेवला. गरमागरम लागल्यावर तिचा चेहरा पुन्हा उजळला. मी तिची छत्री आणि दोघांच्या बॅगा वर सामानाच्या रॅकवर फेकल्या. तिने पुडा उघडला आणि चित्कारली.

'कांदा भजी ओ माय गाॅऽड!'

मला तिचे ते भाव पाहून तृप्त झाल्यागत वाटत होतं. पोट तेवढ्यानेच भरल्यासारखं. मनात तिला पटवावं, तिचं मन जिंकावं, तिच्यावर प्रेम करावं, यापैकी कुठलीही योजना शिजत नव्हती. पण तिचं ते हसू मला जाम भावलं होतं आणि ते मला पुन्हा पुन्हा पाहायचं होतं. त्या हसण्याला कारणीभूत मी ठरावं आणि मीच ठरावं अशी इच्छा नकळत प्रकट झाली होती आणि दिवसेंदिवस बळावत होती. मी फारसा विचार करत नव्हतो. मला भरपूर मुली आवडायच्या. काही नुसत्याच पाहायला, काहींचा गंभीर नाद लागलेला. ही तर माझी साधी सरळ मैत्रीण होती. आणि त्यामुळे तिला खुश बघावंसं वाटण्यात मला काहीच गैर वाटत नव्हतं. केवळ मैत्रीच्या नात्याने तिच्यात गुंतत होतो, पण नेमका किती अडकलो होतो, हे इतक्या सहजासहजी समजणार नव्हतं मला. ते समजून घेण्याच्या मनस्थितीतच नव्हतो मी. तिच्या हातांत असलेली आणि माझ्यासाठी म्हणून उचलून धरलेली गरमागरम कांदाभजी माझी वाट बघत होती. आणि मी तिच्याकडे ओढला जात होतो.

क्रमशः

© कौस्तुभ अनिल पेंढारकर.

मंगळवार, ३ फेब्रुवारी, २०१५

ट्रेनमधलं तत्त्वज्ञान भाग 3

'चल गं त्यादिवशी आलीस ना जेंट्स मधून?'
'तेव्हा मी घाईत होते. पर्याय नव्हता. आणि बघितलंस ना किती गर्दी असते ते? लेडीजमधून मी मस्त विंडो सीट पकडून झोप काढू शकते.'
'अगं जेंट्समध्ये सुद्धा मिळेल विंडोसीट. पक्का. फर्स्टक्लासमध्ये नसते एवढी गर्दी. आईशप्पथ!'
'त्यापेक्षा तू चल ना लेडीज मधून.'
'पुरुष येऊन चालत नाही ना... नाहीतर आलो असतो.'
'अस्सं?'
'अर्थात्. बसल्या बसल्या केवढ्या मुली बघता आल्या असत्या.' मी निर्लज्जपणे हसलो. तिनं तोंड वाकडं केलं. 'सगळी मुलं शेवटी सारखीच' हा सबटेक्स्ट जाणवला.

खरं तर मी धादांत खोटं बोलत होतो. लहानपणीच ट्रेन्समधल्या प्रवासाचा मी धसका घेतलेला होता. कारण कुठेही जायचं झालं की आईबरोबर लेडीजमधून. आणि त्या महिला डब्यात चढण्यापासून उतरेपर्यंत जो काय धिंगाणा चालू असायचा, त्यावरून वाटायचं की नको बाबा हा ट्रेनचा प्रवास. पुढे मोठा झालो आणि जेंट्समधून जायला लागलो तेव्हा ती भिती गेली.

'चल गं भाव नको खाऊस. कंटाळा येतो एकट्याला.' मी आता ब-यापैकी बिनधास्त होऊन बोलायला लागलो होतो याबाबतीत.

तिनं एक सुस्कारा सोडला, आणि 'चला' म्हणाली. ट्रेन आली. आम्ही चढलो. विंडोसीट काही मिळाली नाही. पण बसायला मिळालं. मी खरं तर चपळाईने ट्रेनमध्ये चढून जागा अडवल्या होत्या. पण तिला खिडकीचंच कौतुक जास्त. रुसल्या चेह-याने खुन्नस देत बसली मला. मी डोळे थोडे बारीक करून, ओठ एकमेकांवर दाबून क्षीण हसलो. 'इट्झ नाॅट ओके' असं म्हणाली, आणि हेडसेट काढून कानात घालून बसली. हे शिष्टाचाराच्या विरूद्ध होतं. आणि हे तिनंच कधीतरी मला सांगितलं होतं. (नाहीतर मला कुठून कळतायत शिष्टाचार!) मी तिला आठवण करून दिली. ती हसली.

'ते तू केलंस तर लागू होतं. मी मुलगी आहे मला चालतं.'

हे काहीतरी अजब लाॅजिक असतं या मुलींचं. तिच्या वादातला फोलपणा तिला सुरुवातीपासून ठाऊक होता आणि ती हसत होती. मी तिच्याकडे असा काही बघत बसलो की ती अजून जोरात हसली, साॅरी म्हणाली आणि हेडसेट काढून ठेवून म्हणाली, 'हं. बोला.'

'काय?'
'काय जे बोलायचंय ते.'
'नाही काही विशेष नाही.'
'अरे? मग मला काॅर्ड्स का काढायला लावलेस?'
'बरं. घाल पुन्हा.'
'अरे?'
'मग काय! मी काही ठरवून आलेलो नाहीये, की हे बोलायचं आणि ते बोलायचं. सहज सुचतील तशा गप्पा मारू.'
'बरं. सुचलं काही तर सांग. मी काढेन काॅर्ड्स तेव्हा.'

मग कशाला काही सुचतंय म्हणा. मला आता काहीतरी विषय काढायला हवा होता. तसा काढला नसता तर काही बिघडणार नव्हतं, पण मग पुढच्या वेळपासून ती लेडीजमधनं गेली असती.

'तुझा कोणी... अं... बाॅयफ्रेंड वगैरे?'
'नाही.'
'कोणी आवडतो?'
'नाही रे.' वैताग जाणवला. 'का विचारतोयस?'
'सहज. दुसरं काही सुचत नाही म्हणून.'
'बरं.'
'कधीच कोणीच आवडला नाही?'
'नाही.'
'फेकू नकोस. असं होऊच शकत नाही.'
'एक आवडला होता शाळेत असताना. मोठा होता.'
'मग?'
'मग काही नाही. तो नंतर शाळा सोडून गेला. तेव्हापासून कोणीच नाही. आणि तो सुद्धा नुसता दिसायला छान होता म्हणून; सिरीअस प्रेम वगैरे काही नाही.'
'काॅलेजात नाही कोणी?'
'नाही रे. आपल्या काॅलेजात लुख्खे भरलेत सगळे.' माझ्या हे जिव्हारी लागलं.
'मुली काय कमी लुख्ख्या आहेत?' हा तिला टोमणा होता. पण विनोदबुद्धी निद्रावस्थेत असावी तिची.
'हो का. मग कट्ट्यावर बसून येणा-या जाणा-या एकेका मुलीची माहिती कोण विचारत असतं मला?'
'त्या अपवादाने आढळणा-या मुली गं.'
'अपवादात्मक गोष्टी सहसा संख्येने कमी असतात.' आता आली का पंचाईत. पण हार मानेन तो मी कसला.
'कधीकधी अपवादात्मक प्रसंगी अपवादात्मक बाबी जास्त संख्येत दिसून येतात.'
'वाह! छान हं!' आता माझा वाद फोल होता. पण शब्दच्छल करण्यात मी जास्त पटाईत होतो.

मला हसायला आलं. तीही गोड हसली. ती काही लुख्खी वगैरे नव्हती. बरी होती. पण सौंदर्यासाठी प्रसिद्ध वगैरे नव्हती. का कोणास ठाऊक, हसताना खूप छान दिसत होती. तिला हसताना पाहून मला बरं वाटत होतं. तिला असंच हसवायचं तर असेच बावळटासारखे विनोद करावे लागणार होते. अनुभवावरून खरं तर माहिती होतं, की तिला हसवायचं तर दर्जा लागतो विनोदाला, नाहीतर विनोद प्रसंगनिष्ठ तरी लागतो. ती माझ्या वाक्याला कमी आणि वायफळ वाद जिंकताना होणा-या त्रेधातिरपिटेवर जास्त हसली होती. काय करावं? कशी करून घ्यावी स्वतःचीच फजिती?

'काय झालं?'
'हुं? कुठे काय!'
'मग असा का बघतोयस?' अरेच्चा. तंद्री लागली असणार माझी. विचारात हरवून भुकेल्यासारखा बघत बसलो असेन तिच्याकडे. आता काय करावं. डाऊट खाता कामा नये.
'तुझी मिशी बघत होतो. छान आहे.'
ती दचकलीच. 'गप्प बस. मला मिशी नाहीये.'
'अगं पण मला दिसतेय.'
'मिशी मुलांना असते. मी मुलगी आहे.'
'ठीक आहे. होतं असं कधीकधी. केमिकल लोचा होतो थोडा.' मी समजावणीच्या सुराचा आव आणत म्हटलं.
'मार खाशील.'
'अगं? तुला मिशी आहे त्यात माझी काय चूक!' मी हसत होतो.
'गप्प बस नाहीतर खरंच मार खाशील.'

मी थोडा वेळ गप्प बसून राहिलो.

'मला नाही आवडत पार्लरमध्ये जायला. शी. आज जावं लागणार.' ती अक्षरशः रडवेल्या सुरात म्हणाली. मी गालातल्या गालात हसत बसलो. आवाज काढला नाही. तिला तेही बघवेना. मला चापट्या मारायला लागली. मस्त वाटत होतं.

'जा ना. गप ना नालायक.'
'ए ते बघ दाढी सुद्धा आहे तुला.' मी तिच्या गालाकडे बोट दाखवून सांगायला लागलो.
'हळू बोल ना गाढव.' तिनं दोन्ही हातांनी आधी स्वतःचं तोंड लपवून घेतलं. खाली वाकली. मग उठून पुन्हा चापट्या मारायला लागली.
'मी नाही येणार आहे तुझ्याबरोबर पुन्हा.' आणि हसायला लागली. मला हे वाक्य गंभीरपणे घ्यायची गरज नव्हती, पण तरी मी किंचितसा धास्तावलो. होतो. तिच्याबरोबर मनमोकळेपणे हसलो, आणि मग तिच्या दाढीमिशांवरनं तिची खेचणं मी थांबवलं. पण तीच बोलत बसली.

'एवढे केस तर सगळ्यांनाच असतात. मुलींनाही. आम्ही ते ब्लीच करतो. लव्ह असते ती.' मला माहितीच नव्हतं ना... पण ठीक आहे, त्यानिमित्ताने बोलत होती काहीतरी.

मग गप्प बसली थोडावेळ. मलाही काही सुचत नव्हतं. थोड्या वेळानं लक्षात आलं की ती माझ्याकडे पाहत्येय. मी भुवयी उडवून प्रश्नार्थक मुद्रा ठेवली.

'तुम्ही मुलं एकदाच दाढीमिशी वॅक्स का नाही करून टाकत?'
'वेडी आहेस का!' हसली.
'अरे त्यात काय? मी करू तुझी दाढी वॅक्स?'
'आता मी मारेन हा.' पुन्हा हसली. माझ्या दाढीला हात लावला.
'अरे खरंच. हे बघ फक्त जर्रासं खेचल्यासारखं वाटेल. अस्सं.' असं म्हणून दाढीतला एक केस हळूच खेचला तिनं.

मी ओरडलो. ती दचकली. बाजूचे तिघे चौघे दचकले. ती पुन्हा हसायला लागली. चेकाळली होती. मी गाल चोळत बसलो. मुली अंगाशी मस्ती करतात तेव्हा येणारी मजा काही औरच असते.

'लोकांना वाटेल काय चाळे चालू आहेत या दोघांचे. कपल वाटू त्यांना.' मी म्हटलं.
'ते तसेही वाटतोच आहोत. आणि वाटलो तरी तुला काय फरक पडतोय?'

सहसा या गोष्टींची फिकीर मुलींनाच जास्त असते. इथे काहीतरी भलतंच. 'मला इतकाच फरक पडतो की माझे केस उपटले जातायत.' ती हसली. 'दाढीवरचे.' ती अजून जोरात हसली.

आजचा दिवस खतरनाक होता. मी तिला एवढं हसताना क्वचितच पाहिलं असेन. तेही माझ्याबरोबर असताना. माझ्यामुळे. आपल्यामुळे आपल्या आवडत्या व्यक्तिच्या चेह-यावर हसू उमटलं की नेहमीच आनंद होत असतो मला. त्याच आनंदात मला बुडवून ठेवलं होतं तिनं. वाटत होतं की, ट्रेनमध्ये जागा नाहीये म्हणून, नाहीतर नाचली सुद्धा असती ती. मोकळी होऊन, वेड लागल्यागत. कोणी बघो ना बघो, कोणाला फरक पडो न पडो, कसली भिती नाही, चिंता नाही. मुक्त, स्वच्छंद. आपला नेहमीचा मख्ख चेहरा बाजूला ठेवून एखाद्या लहान मुलीसारखी, लाडात येऊन, खोड्या काढणारी, माझी मैत्रीण. माझी.

मी तिच्या हसण्याकडे बघत बसलो होतो. मलाही जाणीव होती. आता भुवया तिनं उडवून विचारलं. 'असा का पाहतोयस?'
'भांडू नकोस कधी माझ्याशी. भांडलीस तर रुसून बसू नकोस. राग आलाच तर बोलून टाक आणि माफ करून सोडून दे. ओके?'

तिच्या हसण्याला ब्रेक लागला. 'असं का म्हणतोयस अचानक?'
'काही नाही. तू एवढं करशील ना?'
स्मितहास्य. 'बरं.' मला हायसं वाटलं. पण मुलींचा भरवसा नसतो. आणि त्यांच्यापेक्षा मी कुठे कधी कसा वागेन बोलेन याचा बिलकुलच भरवसा नसतो. मनात धास्ती आणि उत्साह यांना घेऊन स्वतःचा तोल सांभाळायची कसरत चालू होती माझी. पहिल्यांदाच स्वतःच्या बेधडक बोलण्यावर नियंत्रण आणावंसं वाटत होतं. गप्प राहावंसं वाटत होतं. शांत व्हावंसं वाटत होतं. ती हसून हसून दमली असावी. थोड्या वेळातच माझ्या खांद्याला डोकं टेकून झोपून गेली. आणि मी, मी नुसता बघत बसलो. प्रत्येक क्षण मनात साठवत बसलो.

क्रमशः

© कौस्तुभ अनिल पेंढारकर.

शनिवार, ३१ जानेवारी, २०१५

ट्रेनमधलं तत्त्वज्ञान भाग 2

आम्ही दोघंजण जिना उतरलो कमी, आणि उड्या मारत जास्त आलो. ट्रेन कधी निघेल काही सांगता येत नव्हतं. उशीर झाला होता तिला. मला उशीर झाला नव्हता, पण मी आपला उगाचच गंमत म्हणून तिच्याबरोबर धावत निघालो. लेडीज डबा बराच पुढे होता. त्यामुळे ती साहजिकच जास्त जोर लावून पळत होती. पण तिची मजल ट्रेन निघायच्या आत जास्त पुढे गेली नाही. मी तिच्या पुढून धावत होतो. ट्रेन निघाली तेव्हा मी जवळ जवळ फर्स्ट क्लासपर्यंत पोचलोच होतो. पण ती चढल्याशिवाय मी चढणार नव्हतो. मला चढायचंच नव्हतं. तिच्याबरोबर थांबायचं होतं, तिच्याशी बोलायचं होतं. तिला माझ्याबरोबर यायला मनवायचं होतं. ट्रेन निघाली असं दिसल्यावर मी थांबलो. वळलो, आणि तिच्याकडे 'काय करणार' अशा भावनेनं पाहिलं. पण हार मानली नव्हती तिनं. मला उगाच आवडलेली नव्हती ती. बाजूने जाणा-या जेंट्स सेकंड क्लासात चढली. मी दचकलोच. तो डबा माझ्यासमोर येईस्तोवर गाडीने वेग पकडला होता. पण मुंबईकर प्रोत्साहन देण्यात पटाईत असतात. दाराशी लटकणा-या दोघांनी मला 'आ जा, डर मत आ जा...' असं म्हटलं. डरतंय कोण इथे... उलट ती अशी अनपेक्षितपणे चढल्याने मला चेव चढला होता. हिरवीणीने साहस दाखवलं तर हिरोला डबल साहस दाखवायला नको? मग तो मूर्खपणा का असेना! चढलो मी. मधल्या दांड्याला खांदा आपटला. ती मी चढतोय म्हटल्यावर आत सरकली. मुलगी धावत्या गाडीत चढतेय म्हटल्यावर तिच्या आधी दारात उभा राहणारा आपसुकच आत सरकून उभा राहिला. युगुलांवर जळणारे 'सुसंस्कृत विघ्नसंतोषी' असतात, तसेच युगुलांना सहानुभूती दाखवणारेही 'सभ्य मवाली' सुद्धा असतात हे तेव्हा मला जाणवलं. कारण तिच्याबरोबर असल्याने मलाही 'चलो अंदर घुसो. एकतो चढने दिया उपरसे गेटपे खडे रहना है' असं काही ऐकावं नाही लागलं. आम्ही दोघं दारात उभे होतो. डबा खचाखच भरला होता. ती हसत होती. मी खांदा चोळत होतो. मला तिच्याशी बोलायचं होतं. ती मागच्या दरवाज्याला चिकटून, मी खांबाला. माझी तिच्याकडे पाठ. गाडी चाललेली पुढच्या दरवाजाच्या दिशेने(म्हणूनच त्याला पुढचा दरवाजा म्हटलंय. हो. माहितीये, वाचकांना तेवढी अक्कल असते ते). विचित्र अवस्था होती. मी धिटाईने एक ऑफर केली.

'तू माझ्या जागेवर उभी राहतेस? म्हणजे नीट उभं राहता येईल आपल्याला.'
'मग आता कसे उभे आहोत? नीटच आहोत की.'
'अगं तू पुढे उभी राहा ना माझ्या अशी काय.'

आमच्या बॅगा काढून एक पायाखाली (माझी) आणि दुसरी सामानाच्या रॅकवर अशा ठेवण्यात आल्या. मॅडम खांबाला चिकटायला काही तयार नव्हत्या.

'अगं पोलडान्स करायला सांगतोय का तुला मी?' माझं मनात येईल ते ताडकन् बोलणं मला मार खायला लावेल एक दिवस. इथे तोंड वाकडं झालं. मी जेंट्स डब्यातली शिस्त मोडून आता काही रिस्पेक्टेबल लेड्या त्यांच्या डब्यात उभ्या राहिलेल्या दिसतात तसा उलट्या दिशेने, तिच्याकडे तोंड करून उभा राहिलो. १८० अंशाच्या कोनात वळताना पाठी उभ्या असलेल्या दोघाजणांना धक्का लागला. 'प्च प्च... त्च त्च... ए यार' अशा प्रतिक्रिया. मी त्या दोघांना साॅरी म्हटलं, आणि तिच्याकडे बघून बावळटासारखं हसून दाखवलं. ते बावळटासारखं होतं हे मला कळलं, कारण -

'बावळट दिसतोयस.'
'म्हणून हसूच नये का माणसानं?'
'म्हणून नाही. तुझे मागचे केस उडतायत वा-यानं. ते आधीच विचित्र दिसतंय इथून. त्यात तू असा हसतोयस दात विचकून... शी.'

स्टेशन आलं. गाडी थांबली.
'ये तू दाराजवळ. मी राहते उभी पुढे.'
'अरे व्वा. एवढी मेहेरबानी का?'
'बघवत नाहीये तुझा चेहरा म्हणून.'

आता माझं तोंड वाकडं झालं. ते पाहून ती मनापासून हसली. डबा एका झटक्यात मोकळा मोकळा झाला. दुस-या झटक्यात आधीपेक्षा गच्च भरून गेला. आम्ही जागेची आदलाबदल केली होती. आज मूड मस्त होता स्वारीचा. एरवी बसायला जागा हवीच (च वर जोर) म्हणून हट्ट करणारी आज शेवटपर्यंत दरवाज्यात उभी राहून वारा खायच्या विचारात होती.

गाडी सुरू झाली. वारा मस्त अंगावर यायला लागला. ती हळूहळू माझ्या अंगावर रेलत होती. मला तेच हवं होतं. आता आम्ही टायटॅनिकच्या अर्धवट पोझिशनमध्ये होतो. अर्धवट अशासाठी, की आम्ही हात आडवे पसरले नव्हते. एकतर एवढ्या गर्दीत हातांना मोकळीक मिळत नाही, दुसरं म्हणजे ती तोल जाऊन मेली असती. तिसरं म्हणजे कल्पना माझ्या डोक्यातली होती. तिला वारा खात असताना माझी पडलेलीही नसेल. मी तिच्यासाठी फक्त एक टेकायचा लोड होतो, तात्पुरता.

'खरंच माझं तोंड पाहवत नाही?' मी भसकन् मनातली भिती भाव न लपवता प्रकट केली. हसली. मला 'वेडा रे वेडा' हा सब्-टेक्स्ट जाणवला. उगाच विचारलं. असेनाका. ती हसली. बरं झालं विचारलं.

'नाही रे. तू एवढा ताडामाडासारखा माझ्यासमोर उभा. सगळा वारा अडवत होतास. म्हणून.' हे तिला मोठ्या आवाजात बोलावं लागलं. वारा तिचा आवाज कुठच्या कुठे घेऊन जात होता. म्हणून गप्पा मारताना तिची सोय व्हावी यासाठी मी तिच्या थोडा अजून जवळ गेलो. आणि बाहेरच्या हाताने दांडा पकडला. तिच्या कंबरेला हात घातल्यासारखंच वाटत होतं मला. एकदम बाॅडीगार्डसारखं वाटत होतं. तिचे केस मोकळे होते. उडत होते वा-याबरोबर. माझ्या चेह-यावरून केरसुणी फिरवल्यासारखे जात होते. मला आधी मस्त मजा वाटत होती. शॅम्पूच्या अॅडमधल्या नायिकेच्या केसांचा वास घेणा-या नायकासारखी. मग मात्र एकामागून एक फटके बसायला लागले तोंडावर. केस बेक्कार टोचत होते. एकदोनदा डोळ्यालाही लागले. मी वेळेत पापण्या मिटत होतो. तिला दरवेळेला कळत होतं. ती हळूच हसत होती.

परीक्षेत काॅपी करताना पाठच्या बाकावरच्या मुलाशी बोलावं तशी ती माझ्याशी तोंड आडवं ठेवून बोलत होती. फरक फक्त आवाजाचा होता. परीक्षेत छोटा असतो, हा मोठा होता.

तरी बोलणं फारसं झालं नाही. मला विषय सुचत नव्हतेच, त्यात मी माझ्या टायटॅनिक आणि तत्सम कल्पनाविश्वात रमलेला... आणि ती, ती अधून मधून बारीक सारीक चौकशा करण्यापुरती बोलत होती एवढंच. खरं तर बोलण्याची काही गरजच उरली नव्हती. छान वाटत होतं. आयुष्यभर असाच वारा खात राहावं, तिनं पुढे असावं, आपला (एव्हाना गारठ्याने बधीर झालेला पण सोडवत नसलेला) हात असाच तिच्या बाजूने घेऊन खांबाला पकडलेला असावा, ती सध्या आहे त्यापेक्षा अधिक मोकळेपणे, अधिक प्रेमाने आणि पूर्णपणे माझ्यावर रेलून, माझ्यावर विसंबून बिनधास्त उभी असावी, आणि या खटारॅक्-खटारॅक् पेक्षा काहीतरी छानसं पार्श्वसंगीत असावं.

तिचं स्टेशन आलं. तिनं एकदा माझ्याकडे पाहिलं. डोळ्यांत मिश्कील भाव होते. ती उतरली. मीही उतरलो (बॅगा घेऊनच). गर्दीचा मोठा लोंढा आमच्या पाठोपाठ उतरला.  ती माझ्याकडे पाहून म्हणाली, 'तू का उतरतोयस? मी घाईत आहे थांबणार नाहीये. जा तू याच ट्रेनने.'

'बरं. आज मजा आली ना?'

'हंऽ' मंदस्मित. मान अलगद हलवली. 'चल मी पळते. तू जा याच ट्रेनने नाहीतर तुलाही उशीर होईल.' मी हसलो. 'अर्रे?? जा ना!!' वळलो. धावलो. घुसलो. चढलो. लटकलो. आता खांद्याला बॅग होती. अर्धंअधिक शरीर बाहेर लटकत होतं. आत शिरायला जागा नव्हती. ट्रेन सुटली. मान वळवली. ती बघत थांबली होती. दोन्ही हात दार पकडण्यात व्यस्त. मानेनेच बाय म्हटलं. ती हसली. आडवी मान हलवली. पुनश्च वेडा रे वेडा हा सब्-टेक्स्ट जाणवला. वळली. आणि प्लॅटफाॅर्मवरच्या गर्दीत नाहीशी झाली. मी समोर बघायला लागलो.

एरवी अशा अवस्थेत कधी सापडलोच तर सतत पडू की काय अशी भिती वाटत राहायची. आज पडलो असतो तरी हरकत नव्हती. जीवन सार्थकी लागल्यासारखं वाटत होतं.

रात्रभर खांदा दुखत राहिला. झोप लागू दिली नाही. आणि मी त्याला दुस-या हातानं मालिश करत गालातल्या गालात हसत राहिलो. पुढच्या 'वारी'ची वाट बघत...

क्रमशः

- © कौस्तुभ अनिल पेंढारकर.